• Pune, Maharashtra
कथा
तिची वटपौर्णिमा

तिची वटपौर्णिमा

Spread the love

सकाळी सकाळी उठून ती अंगावर साडी चढवत होती. आपल्या सावळ्या बोटांनी तिने सावकाश साडीच्या निऱ्या पाडून त्या तिने बेंबीच्या अगदी चार बोटे खाली खोवून दिल्या.

बेंबी, तेवढी आकर्षक नव्हती तिची. ना कांती उजळ होती तिची. सावळीच होती ती; पण त्या सावळ्या कातडीआड, आत अगदी हाडांच्या त्या मजबूत पिंजऱ्यात असलेलं तिचं ते हृदय, तेच मयूरला अगदी आकर्षक आणि नितांत सुंदर वाटलं होतं. आणि म्हणूनच आप्पांच्या आणि जिजीच्या इतक्या टोकाच्या विरोधाला देखील त्यानं टोकावर बसवलं होतं.

तिची वटपौर्णिमा
तिची वटपौर्णिमा

बिछान्यावर निवांत पालथा पडून तो अजून साखर झोपच घेत होता. तिने आपले ओले केस टॉवेलला बांधत त्याचा बुचडा केल्यागत केले आणि स्टूलवर टेकत ती आरशात पाहून आपल्या कपाळावर कुंकू लावू लागली. कपाळ राठ होतं तिचं. चेहराही राठच होता. आरशात स्वतःला पाहून नाजुक हसत तिने आपल्या काहीशा काळपट ओठांवर अगदी लालभडक लाली लावली. दोन क्षण पुन्हा आरशात स्वतःला एकटक पाहत मग ती अजून एकदा हसली; पण लगेचच तिचं हास्य चिंतेत, भीतीत बदललं. एक विलक्षण उदासी, धाकधूक तिच्या मनामध्ये भरली. दडपणाचा भलामोठा ढग जणू तिच्या मस्तकी फिरू लागला.

त्याच दडपणाखाली ती मग समोर ठेवलेल्या हिरव्या काचेच्या बांगड्या एकेक करून सावकाश आपल्या हातांत चढवू लागली. भडक रंगाची ती मेंदी अजून तिच्या हातावर तश्शीच होती. सावळ्या तिच्या वर्णाला ती आणखीनच साजेशी वाटत होती. आरशात तिची नजर स्वतःवरच खिळली होती. मागे बांगड्यांची हलकीशी किनकीण ऐकू येत होती आणि ती भूतकाळात निघून गेली होती.

“रम्या, आरं त्यो एक प्रेमात येडा झालाय; पण तुला काय अक्कल नकू का?”

“माझं पण हायच की प्रेम त्याच्यावर.”

“आरं पण आपण असली, टाळ्या वाजवून पोटं भरणारी. आपल्यासारख्यांनी असली सपनं नसत्याती रं बघायची रम्या, माझ्या बाबा!”

“स्वप्नांना काय चौकटी असत्यात का, मावशे? ती तर ती क्षितिजे, सातासमुद्रापल्याड, त्या सूर्याच्या पण पल्याड फिरून येतात गं. आणि प्रेमात तर ती कुठे कुठे फिरून येतात तुला माहितीय घोड्यावर बसून?”

“रम्या, घोड्यावर नर- मादी बसलेली बरी दिसंल. का….आपलं उगीच?”

“मग काय हिजड्यांनी काय प्रेम करायचं नाय का? अन् मावशे, प्रेमाला नर अन् मादी असं असतं का कुठं? प्रेम कुणावर बी होत असतं.”

“समाजानं नकू का मान्य करायला?”

“समाजाचं काय घेऊन बसलीय तू मावशे. समाजाची तुंबली तर तो बी येतोच का नाय आपल्या इथं मोकळं व्हायला? तवा कुठं जात्यात गं ह्यांच्या मान्यता बिन्यता?”

“बरं प्रेम मान्य केलं तरी लगीन? लगीन कसं मान्य करील रं समाज?”

“समाजाशी लगीन नाय करायचं मला मावशे. मयूरसोबत करायचंय. तुझीय का मान्यता सांग?”

त्याच्या या प्रश्नावर मावशी काहीच बोलली  नाही.

“मावशे?”

“रक्तबंबाळ करील रं त्यो समाज, रम्या.”

“त्यातून मग रक्तफुलं फुलतील मावशे.” तो हसत म्हणाला आणि पुढे बोलू लागला, “अन् हे सारखं रम्या रम्या बंद कर म्हणायचं. मयूरी म्हण. तो मयूरीच म्हणतो. मयूरची मयूरी. भारी वाटतंय ना?” तो खुश होऊन म्हणाला आणि तिथून चालता झाला. मावशी शांत होती. चिंतीत होती. ती म्हणाली, “मयूर ची मयूरी, हं.  मयूरे, सरावणातलं काळं ढग दाटून येत्याल तवा तुझा मोर पिसारा फुलवून नाचंल गं. लै नाचंल; पण नाचून नाचून त्यो जवा डोळ्यातनं मोती गाळंल तवा ते अलगद झेलायला तू लांडोर नाय हे ध्यानात ठेव, मयूरे!”

कचकन एक बांगडी फुटून तिची काच तिच्या हातात घुसली आणि त्यातून रक्त वाहू लागलं. मावशीचं ते वाक्य मयूरीला जणू ती बांगडी होऊनच बोचलं होतं. साडीच्याच पदराने तिने ते रक्त दाबून ठेवलं आणि तिने एक नजर आरशातून दिसत असलेल्या मागे शांत झोपलेल्या मयूरवर टाकली.

बाहेर येऊन तिने खुर्चीत बसून टीव्हीवर बातम्या पाहत असलेल्या आप्पांना अदबीने वाकून नमस्कार केला. आप्पांना ते लग्न मुळीच आवडलेलं नव्हतं. एक हिजडा आपली सून बनून घरी आलेला त्यांच्या अजून पचणी पडत नव्हतं. त्यांनी आपले पाय आखडून घेतले. ते रोज तसे करायचे आणि ती रोज त्यांचे पाय स्पर्शायची. हिजडा असून पण एक सून म्हणून आपल्या सासू सासऱ्यांच्या सेवेत ती कमी पडायची नाही.

नमस्कार करून ती आत स्वयंपाकघरात आली. नाकात नथ ल्यायलेली जिजी अगदी नऊवारीत तयार होती. हातात नैवद्य, पंचपाळ्याचं ताट घेऊन ती बाहेर निघालीच होती तोच मयूरी आत आली आणि जिजीला अवघडलेपण आलं. मयूरीने तिलाही वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, “अय्या, आज किती सुंदर दिसताय जिजी तुम्ही.” जिजी गप्पच.

कुणाची नजर नको लगायला असे म्हणत तिने मग आपल्या डोळ्यांतील काजळाने आपल्या सासूची दृष्ट काढली आणि टिपिकल हिजड्याप्रमाणे बोटे देखील मोडली. जिजीला मात्र मग आणखीनच अडघडल्यासारखे झाले.  

“आणि हे काय? तुम्ही मला सोडूनच निघाला होता की काय वटपूजनाला?” मयूरी म्हणाली.

“अं.. ते..तू येणारच आहेस का?” जिजीला आता पुढे काय बोलावं काही सुचेना आणि मयूरी तर अगदी नटून थटून तयार होऊन आली होती.

“हो तर. आणि माझी पहिलीच तर आहे वटपौर्णिमा.”

तिची आज पहिलीच वटपौर्णिमा होती. ती जिजीची सून होतीच; पण ती..काही झालं तरी होती हिजडाच ना. आणि म्हणूनच कदाचित जिजीला तिच्यासोबत जाणं ठीक वाटत नसावं. शिवाय चारजणी दबक्या आवाजात नाहीतर उघड उघड टोमणे मारतील. तीही बाब होतीच.

जिजीने हातातील ताट तिच्या हातात सोपवले आणि म्हणाली, “तू ये आधी जाऊन. मी जाईल नंतर.” जिजीच्या मनातला संकोच तिला लगेचच समजला. तिने एक स्मित देत तिच्या हातातले ताट आपल्या हातात घेतले आणि ती निघाली.

“अहो, का जाऊ देताय याला? आधीच नाचक्की काय कमी होत आहे म्हणून तुम्ही पण.. सगळ्यांनी ताळ सोडलाय या घरात.” आप्पा बोलले. आप्पांचे ते शब्द मयूरीच्या काळजात जणू विंचवाने दंश केल्यागत पसरले. टचकन तिच्या डोळ्यांत पाणी आले. पण सणाच्या दिवशी आणि तोही पहिलाच सण असल्याकारणाने तिने ते सहन केले आणि ती घराबाहेर पडली.

“बाई, जिजीचं घर बाटवलं या हिजड्याने आणि आता काय हा वड बाटवायला आलाय की काय?” नाकपुड्या त तनवून एक बाई म्हणाली. तिच्या तशा बोलण्याने चारदोन बायका वडाला फेरा घालत होत्या त्याही हातातील दोरा सोडून बाजूला झाल्या.

“मग तर काय? आम्ही बायकांनी कुठं म्हणून जायचं?” एक बाई म्हणाली.

“आणि चालणं तर बघा त्याचं. धड बाईगत बी नाय आणि धड बाबागत पण नाय.”

“मी तर म्हणते आपण सगळ्या जणी मिळून जिजीच्या घरीच जाऊया तडक.”

“जाऊया काय. जायलाच पाहिजे. त्याशिवाय तिला बी नाय समजणार. लोकांच्या पोरी-सुना येत्यात. कळायला पाहिजे त्यांना.”

बायका तिला ऐकू जाईल अशा आवाजात बोलत होत्या. रम्या असताना तिने बायकांचेच नव्हे तर कसल्या कसल्या पुरूषांचे नाही नाही तसले ऐकून वगैरे घेतले होते; पण आता ती, ती झाली होती. कुणाची तरी पत्नी आणि कुणाची तरी ती सून झाली होती. समाज त्यांचं नातं किंवा तिला मिळालेली नवी ओळख सहजा सहजी स्वीकारेल तर तो समाज कसला? मावशी देखील तिला असंच काहीतरी बोलली होती; पण तिने मात्र ते मनापासून स्वीकारलं होतं. आपल्या वेलीवर काहीकेल्या कळ्या उमलणारच नाहीत; पण ती ज्या झाडाच्या आधाराने वर जाईल त्या झाडाला मात्र ती नक्कीच प्रेमाचा गारवा देईल याबाबत तिला खात्री होती.

आपण एक पूर्ण स्त्री नसलो म्हणून काय झालं, आपल्याला पती तर आहेच ना? तसं पाहायला गेलं तर मलाही हाच पती जन्मोजन्मी मिळवा असं म्हणण्याचा या स्त्रीयांइतकाच मला अधिकार आहे असा विचार करून तिने पुढे पाऊले टाकण्यास सुरवात केली.

पण असतं ना, सरळ मार्गात काटेच फार, तसं तिचं झालं. बायकांचे टोमणे तिला सहन होईनात आणि आता आयुष्यात पहिल्यांदा तिला अपूर्ण असल्याची भावना इतक्या झपाट्याने स्पर्शून गेली की जणू तिला भोवळच आली असती. पुढे टाकलेली पाऊले तिच्याही नकळत कधी मागे फिरली तिलाही समजले नाही. नजर झुकवून ती घराची वाट चालू लागली.

दहाएक पाऊले गेली नसेल तोच जिजी तिच्या पुढ्यात ठाकली. डोळ्यांत तिच्या जणू ज्वालाच भडकल्या होत्या. तिने सर्व ऐकलं असावं असा अंदाज बांधून ती जिजीला म्हणाली, “मला माफ करा जिजी. मी यायला नको होतं. हे ताट घ्या.”

आपल्या हातातील ताट तिने जिजीला दिले आणि ती म्हणाली, “येते मी.”

ती निघू लागताच जिजीने तिचा हात जोरात पकडला आणि त्याला हिसका देतच ती पाऊले टाकू लागली. वडाकडे!

मयूरी एकदा जिजीकडे पाहत होती तर एकदा त्या प्रचंड मोठ्या वडाकडे!!

[समाप्त]

हे पण वाचा:

पावसात भिजलेली एक परीराणी

डू यू लव मी ?

हल्ली हल्ली सुचतच नाही

चिमणी गेली उडून

रुपेरी रिंगण, भाग ४

रुपेरी रिंगण, भाग ३

रुपेरी रिंगण, भाग २

रुपेरी रिंगण

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

माय व्हॅलेंटाईन

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

 marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,

chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi wit

best stories to read,best novels to read,best romance novels of all time,content writing,story writing, copy writing,storytelling,art of storytelling,h mora

l


Spread the love

1 thought on “तिची वटपौर्णिमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *