• Pune, Maharashtra
कथा
रुपेरी रिंगण

रुपेरी रिंगण

Spread the love

Ruperi Ringan अनवाणी पायांवर सागराच्या हळुवार लाटांची आंदोलने घेत ती मावळतीच्या सूर्याकडे एकटक पाहत उभी होती.

तिच्या डाव्या पायाचा अंगठा सतत रेतीत तोंड घालीत होता आणि वर काढीत होता. पायांतील पैंजणात लाटांचा बारीक फेस अडकून राहत होता तर लाटांसोबत आलेली ती पांढरी रेती लागून घोट्याभोवती अगदी पैंजणाच्या वरच काहीसं पैंजनागतच एक रिंगण देखील तयार झालं होतं एव्हाना! रुपेरी वाळूचं! त्यामुळे तिचे सावळे पाय अधिकच आकर्षक दिसत होते.

ruperi ringan
ruperi ringan

अगदी घोट्यापर्यंत रुळणाऱ्या तिच्या फिक्कट गुलाबी रंगाच्या झग्याच्या त्या कडा, लाटांच्या त्या स्पर्शाने ओलावल्या होत्या. कदाचित त्यांनाही त्या लाटांचा वारंवार होणारा तो स्पर्श हवाहवासा वाटत असावा. नाहीतर ती ओल मग अशी ऊर्ध्वगामी उगाच का निघाली होती?

समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या वाऱ्यावर तिचे ते कुरळे केस अगदी संथ होऊन मस्त हेलकावत होते. गळ्यातली पांढऱ्या रंगाची ओढणी आपल्या दोन्ही हातांनी छातीजवळ पकडून ती मावळतीला झुकलेल्या आणि नारंगी रूप धारण केलेल्या सूर्याला न्याहाळीत उभी होती. त्याचा तो नारंगी रंग पाण्यावरून परावर्तित होऊन तिच्या सावळ्या रुपावर आपली मुक्त उधळण करीत होता.

दूरवर समुद्रात सूर्याच्या अलीकडेच एक गलबत खाली कुठेतरी अलिबागला वगैरे निघालं होतं. एकीकडे मुंबईच्या त्या आकाशाला भिडणाऱ्या उंचच उंच इमारती होत्या आणि दुसरीकडे त्याच आकाशाला क्षितिजावर अगदी कवेत घेणारा तो अथांग सागर होता.

गिरगाव चौपाटीला आज तशी नेहमीसारखी गर्दी वाटत नव्हती; पण मुंबई आणि गर्दीचं समीकरण कधी चुकलं आहे का? त्यामुळे नाही म्हणायला तिथे तशी गर्दी होतीच, मात्र नेहमी असते तेवढी नव्हती, खचाखच अशी!

मग भेळपुरी, पाणीपुरी, चहा, चणे-फुटाणे विकणारे तर होतेच. त्यात मग अै, चणा लेलो. भेळ लेलो, चाय लेलो म्हणत फिरणारे  आपापल्या शैलीत नि लबकीत  काही वेगळे आवाज काढीत फिरूफिरून ते विकत होते. सहकुटुंब आलेले लोक बिनदिक्तपणे तर लपून छपून आलेली प्रेमी युगुले(?) स्कार्फ-बुरख्याच्या आडून एकेक घास खाताना दिसत होती.

‘अहंम’ करीत व काहीसा घसा साफ करीत अमोलने तिला आपण आल्याची जाणीव करून दिली; पण जणू काही तंद्री  लागल्यागत ती क्षितिजाआड जाऊ पाहणाऱ्या सूर्यनारायणालाच पाहत होती. किती गोड दिसत होता तो आगीचा गोळा. आता त्या क्षितिजावर, त्या सागरात विलीन होताना त्याचं तेज कसे काय बरे कमी होत नसावं? पुन्हा सकाळी पूर्वेला तो तितक्याच उमेदीने उगवतो आणि दिवसभर आपलं तेज संबंध पृथ्वीतलावर उधळत राहतो. कदाचित असले काही विचार ती करत तर नसावी ना?

तिची लागलेली तंद्री भंग करण्याच्या हेतूने अमोलने तिच्या नजरेसमोर आपला हात नेत एक चुटकी वाजवली आणि ती विचलित झाली.

“अरे, आलास तू?” ती पटकन म्हणाली; पण तिच्या चेहऱ्यावर म्हणावी तशी खुशी काही त्याला दिसली नाही.

“सॉरी हं, आरती. स्टाफ मिटिंग खूपच वेळ ताणली गेली आणि त्यात पुन्हा हे मुंबईचं ट्रॅफिक.” तो म्हणाला. तरीही ती आपला चेहरा पाडूनच. त्याला वाटलं की त्याच्या उशिरा येण्याने कदाचित ती नाराज झाली असेल म्हणून मग त्याने तिला खुश करण्यासाठी म्हणूण शेजारून जाणाऱ्या भेळवाल्या भैय्याला हाक देत हातानेच आपल्याकडे बोलावून घेतले.

“बोलिए साबजी क्या दूँ?” डोक्याला तांबडे उपरणे बांधलेला आणि काहीसं मडक्यागत ढेर सुटलेला तो भैय्या तिथे येऊन म्हणाला.

“अमोल मला नाही काही खायचं.” आरती म्हणाली.

“अगं पण.”

“नको रे आत्ता.” ती नाखुशीनेच म्हणाली.

“ले लिजीए मॅडम. एकबार रामकिसून के हाथ का भेल खाओगे तो आप मिया-बीवी जिंदगीभर याद रखोगे.” तो म्हणाला.

त्याच्या त्या बोलण्याने तिने त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला. मात्र अमोलला त्याच्या बोलण्याचं हसू आलं. तो हसतच म्हणाला, “भाई रामकिशन हमारी शादी अभी हुई नही है.”

“हुई नही है तो हो जायेगी ना साब. एकबार खा लो. और हमारा नाम रामकिसून है साब.”

“अच्छा रामकिसून,” तो किसून वर जरा जोर देत बोलला, “शादी के लिए भेल है. शादी के बाद बच्चे होने के लिए भी कुछ ..?”

“क्या साब आप भी मजाक कर रहे हो.”

“अरे भैय्या तुम जाओ ना. नही लेनी है हमे भेल. जाओ अब. निकलो.” आरती चिडून म्हणाली तसा तो तिथून निघूनच गेला.

“काय तू पण. कशाला असं बोलायचं त्याला.” अमोल म्हणाला. तीने फक्त त्याच्याकडे पाहिले आणि आपली नजर पुन्हा त्या क्षितिजाकडे लावली. सूर्य नुकताच डुंबला होता.

“बरं ते जाऊ दे सगळं. एवढ्या तातडीने का बोलावलंस ते सांग.” त्याने सरळ विषयालाच हात घातला.

“बसून बोलूया आपण?” तिने विचारले.

“हो हो. चल मागे जाऊन बसूया.”

“इथेच बसूया.” ती म्हणाली.

“इथे?” पायांना स्पर्शु पाहणाऱ्या लाटांकडे पाहत त्याने विचारले. मग तिने त्याच्याकडे पाहिले आणि चार-एक पाऊले मागे जात आपला झगा सावरत ती त्या चौपाटीच्या वाळूवरती सावकाश बसली. अमोल लगोलग तिच्या शेजारी येऊन बसला.

समुद्रावरून येणारा वारा अंगाला थोडी ऊब देत होता तरीही तिने आपली पांढरी ओढणी आपल्या उघड्या दंडांवरून ओढली. तोच अमोलने देखील तिच्या खांद्यावर आपला हात ठेवला आणि तिला सावकाश आपल्या जवळ ओढून घेतले. तिनेही मग आपले डोके त्याच्या खांद्यावर अलगद ठेवले.

काहीक्षण दोघांनीही अबोला धरला. असे काही कारण नव्हते; पण एकंदरीत त्यांना त्या वेळेसाठी अबोला धरू वाटला. सागराच्या त्या तांबूस क्षितिजाकडे दोघेही मग आपली नजर लावून निवांत बसले. एखाददुसरे गलबत अजूनही जाताना दिसत होते. मागील गर्दीचा तो गोंगाट देखील कानी आपटत होता. आणि त्या समुद्राच्या त्या लाटांचा रोरारव.. तोही अगदी हळुवारच ऐकू येत होता!

आसपासच्या आवाजाला  बगल देत मग आरतीने अमोलला विचारले, “घरी बोललास? काय म्हणाले घरचे?”

“त्यांना काय, आपलं सगळं माहीतच आहे की. विचारायचं काय त्यात? ते काही नकार वगैरे देणार नाहीत.” तो म्हणाला. ती त्याच्या बगलेतून थोडीशी बाजूला झाली. ती शांतच होती. तिची अशी शांतता पाहून अमोलनेच तिला विचारले, “तू.. विचारलंस.” त्यावर तिने फक्त होकारार्थी मान हलवली.

“आणि काय म्हणाले घरचे? दिला त्यांनी होकार?” त्याने जराशा शासंकपणेच विचारले. तेव्हा तिच्या डोळ्यांत अश्रुंच्या उमटलेल्या छटा त्याला जाणवल्या आणि तो समजून गेला. त्याने पुढे एकही प्रश्न केला नाही.

मग बराच वेळ ते एकमेकांना काहीच बोलले नाहीत. समुद्राच्या त्या लाटांकडे नजर लावून ते आपापल्या विचारांच्या गर्तेत हरवून तसेच बसून राहिले.

“तुझ्याशिवाय नाही जगू शकणार रे मी.” रडावलेल्या चेहऱ्याने ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. मग तोही म्हणाला, “मग मी जगू शकेन असं वाटतंय का तुला?”

“काय करू शकतो आपण घरच्यांच्या पुढे?” तिने विचारले. तो म्हणाला, “मला तर आता काहीच सुचत नाहीये. नाही म्हणजे तुझ्या घरच्यांचा मी होकारच गृहीत धरून होतो; पण आता..” तो बोलता बोलता थांबला आणि थांबलाच. त्याला काही सुचेनासं झालेलं.

“आत्महत्या?” ती त्या खळखळत्या लाटांकडे पाहत बोलली.

“अं ?”

“आत्महत्या करूया का.. आपण?”

“ये.. ये. तू काय डोक्यावर पडलीयेस का? काहीही बोलत सुटलीयेस. असं आत्महत्या आणि काही करून प्रश्न सुटणार आहेत का? उगीच आपलं काहीतरी.” तो तावातावाने तिला म्हणाला. म्हणाला कसला ओरडलाच म्हणा!

“मग आहे का तुझ्याकडे काही पर्याय? असेल तर सांग. पण मी तुला सांगून ठेवते आहे. आपण एकत्र आलो नाही तर मी जीव देईन. खरंच मी जीव देईन.”

“आता पुढे एक शब्द जरी बोललीस तर तू जीव द्यायच्या आधी मीच तुझा जीव घेईन. कळलं?” तिच्यावर बोट तानत तो तिला म्हणाला. ती मात्र भरलेल्या डोळ्यांनी पुढे समुद्रास न्याहाळीत होती. जणू ती त्याला काही सांगत होती. दोघंचं काही हितगुजच सुरू असल्यागत.

काही वेळाच्या शांततेनंतर मग अमोलच बोलू लागला. आता त्याचा आवाज काहीसा मृदू  आणि प्रेमळ झाला होता. तो म्हणाला, “असं हताश होऊन चालणार नाही. आपल्याला काहीतरी करावे लागेल. मी.. मी करतो काहीतरी. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. तू.. तू विश्वास ठेव माझ्यावर. आपण बोलू तुझ्या घरच्यांशी. ते होतील तयार. देतील होकार. पण.. पण तू काही असले भलते सलते विचार मनात नकोस आणू. इथपर्यंत आणलंय तर अजून थोडं पुढे नेवूयात. ठीक आहे?”

त्याचे बोल जरी दिलासादायक असले तरी तिने नुसती त्यावर होकारार्थी मान हलवली होती. अमोलने देखील तिचे पुरते समाधान झाले नसल्याचे ओळखले होते आणि म्हणूनच तिचा मूड बदलावा म्हणून त्याने विषयांतर करायचे ठरवले आणि तो बोलू लागला, “पोटात बेक्कार कावळे ओरडायला लागलेत माझ्या. असं वाटतंय की तुझा कानच खाऊन टाकावा. घाप्पदिशी.”

त्याच्या घाप्पदिशी या शब्दाने तिला थोडेसे हसू फुटले. ती म्हणाली, “नुसता कान खाऊन भूक भागणार आहे?”

“मग अख्खीच्या अख्खी खातो.” तो पटकन बोलला व त्याला कोपर रुतवत ती म्हणाली, “चल, चावट कुठला.” आणि ती हसू लागली.

अंधार पडू लागला होता. ठिकठिकाणी बसलेली जोडपीवजा प्रेमीयुगुले ओढणी ओढून आपापसांत गुंतली होती. गर्दीही होती तशी. काहींची निघण्याची लगबग देखील सुरू होती.

ruperi ringan
ruperi ringan

“भेळ घेऊन येतोस? मलाही भूक लागलीय ना.” अमोलला ती म्हणाली.

“थांब, मी किसूनला.. रामकिसूनलाच हाक देतो.” असे म्हणत त्याने त्याला देण्यासाठी मागे वळून पाहिले तर तो दूरवर भेळ विकताना उभा दिसला. त्याने दोन-चार हाका देऊन पाहिल्या; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी तो आरतीला मीच जाऊन घेऊन येतो असे म्हणून तिथून उठून भेळ आणायला निघून गेला.

“साबजी, आवाज देनी थी ना. आ जाते हम.” अमोलला येताना पाहून रामकिसून त्याला म्हणाला.

“आवाज तो दी थी पर तुम्हे सुनाई नही दी. तो मै खुद चला आया. वो जाने दे. दो भेल बना अब जल्दी ” अमोल म्हणाला.

ठीक है साब म्हणत तो भेळ बनवू लागला. जर्मनच्या पातेल्यात त्याने चिरमुरे टाकले आणि आधीच बारीक असा चिरलेला कांदा आणि टोमॅटो त्याने मुठीने त्यात टाकले. एका प्लास्टिकच्या डब्यात असलेली कोथिंबीर देखील त्याने त्यात टाकून दिली आणि लाकडी पळीने ते मिश्रण चांगले मिसळू लागला. अमोल हाताची घडी घालून हे सर्व पाहत होता . मधूनच तो आरतीला देखील पाहत होता.

दूरवर दोन्ही पाय पोटाशी घेऊन पाठमोरी बसलेली ती त्या मंद अंधारात नुसती एखाद्या पुतळ्यासारखीच भासत होती. त्यातही तिचा कमनीय बांधा आणि खासकरून बसल्यामुळे तिचा कामरेखालचा भाग अधिकच डेरेदार वाटत होता. अगदी कुंभाराने आपल्या हातांनी तो आकार दिल्यासारखा!

“मॅडमवा बहुत गुस्से मे थी साब. का हुआ? सब चंगा?” रामकिसूनने भेळ बनवता बनवता त्याला विचारले.

“अरे भाई, तुम अपना काम करो ना. क्यु दिमाग की मा-बहन..”

“सॉरी साबजी कशाला चिडता.”

“च्यायला मराठी बोलतो की तू.”

“थोडाबहुत आता है साब.”

“जसं की?”

“तुझ्या आईची..”

“घाण..” तो पुढे काही बोलायच्या यातच अमोल म्हणाला, “घाण काही नाही. तू तो गालिया दे रहा बे.”

“और भी आता है साब. जैसे की, जय महाराष्ट्र.” असे म्हणत त्याने दोन भेळीचे कोन त्याच्या हातात टेकवले.

“जय महाराष्ट्र. किती झाले?”

“तीस रुपया.” तो म्हणाला व पुढे बोलू लागला. “साब घरवाले मना कर रहे है ना?”

अमोल दोन क्षण गप्प झाला. मग त्याने नुसती मान हलवली.

“टेंशनवा ना लो साब. सब ठीक हो जाएगा. खाली आप लोग कुछ गलत कदम मत उठाना.”

तो असं म्हणताच अमोलची नजर आरती बसलेल्या ठिकाणी गेली. ती तिथे नव्हती.

“एक जमाना था. हम भी किसी को चाहते थे..” रामकिसून आभाळाला नजर लावून बोलू लागला तसा अमोल वरच्या खिश्यातील तीस रुपये काढून त्याच्या पुढ्यात फेकीत आणि हातातील भेळ खाली टाकत तिथून तिकडे पळता झाला.

[पुढे सुरू राहील]

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

माय व्हॅलेंटाईन

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

न्यू इयर पार्टी नाईट भाग ६


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.