• Pune, Maharashtra
कथा
रुपेरी रिंगण, भाग ४

रुपेरी रिंगण, भाग ४

Spread the love

त्या रात्री त्याचं कशातही लक्ष लागलं नाही. आपण नायर मॅडमला असं बोलायला नको होतं हे राहून राहून त्याला वाटत होतं. पण का..?

तो आज टेबल लॅम्प सुरू करून नुसता लॅपटॉपसमोर बसून राहिला होता. त्याच्याने धड एक शब्दही पुढे टाईप करणे झाले नाही. त्याच्या मनाचा वारू असा काही उधळला होता की तो कधी आरतीकडे धाव घ्यायचा तर कधी नायर मॅडमकडे. भूतकाळ त्याला सोडवत नव्हता आणि वर्तमान? वर्तमान तो झिडकारू पाहत होता.

Ruperi ringan
Ruperi ringan

लॅपटॉप बंद करून तो तडक बिछान्यावर आडवा झाला. डोक्याखाली हात घालून मग त्याने त्याची नजर त्या मंद फिरणाऱ्या पंख्यावर स्थिर केली. खंगलेल्या म्हाताऱ्यासारखा तो पंखा आवाज करीत होता; पण अशा खोलीत पंख्याचा तो आवाजच आता त्याचा सोबती बनला होता. सवयच झाली होती त्याला आता त्याची.

हाताला मुंग्या आल्या तेव्हा त्याने आपली कूस बदलली. मग तो तसाच या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिला. डोळ्यांसमोर आज पडलेल्या कानशीलाचा प्रसंग सतत उभा राहत होता. का कुणास ठाऊक पण त्याचे त्याला तितकेसे वाईट वाटत नव्हते. उलट प्रत्येक वेळी तो प्रसंग आठवून त्याच्या चेहऱ्यावर एक किंचितसे स्मित मात्र उमटायचे.

मात्र अचानक मग तो काहीसा उदास झाला. स्वत:शीच मग प्रश्न विचारू लागला. कोणत्या अधिकाराने आपण तिला बोललो? एखाद्या स्त्रीला हे असं काही थेट बोलणं कितपत योग्य होतं? पण मुळात आपण तिला हे बोलावंच का? की आपल्याला ती दुसऱ्या कुणाबरोबर असे काही करताना पटणार नाही आणि म्हणूनच आपण तसं बोललो? मी जळत होतो का? की आपल्याला ती आवडू लागली होती? आपण तिच्या प्रेमात वगैरे?

“छे छे.” तो एकदम स्वत:शीच पुटपुटला आणि उशीखालचा मोबाईल त्याने सावकाश बाहेर काढला. व्हॉट्स अॅप उघडून त्याने नायर मॅडमसाठी एक मेसेज टाईप केला. त्यात फक्त लिहिलं होतं- आय एम सॉरी!

अजूनही खूप काही लिहिण्याची इच्छा होती त्याची; पण लिहावं की नाही या द्विधा अवस्थेत त्याने मग पुढे काहीच लिहिलं नाही. आता त्याची खरी कसोटी होती, टाईप केलेला तो मेसेज तिला सेंड करण्याची. मेसेज सेंड करण्यासाठी उचललेला अंगठा मग थरथरू लागला. त्याच्या पोटात हलकीच कळ आल्यागत झाले. पण शेवटी धाडस करून त्याने तिला मेसेज पाठवलाच!

काळजाची धाकधूक वाढली. मेसेज सेंड होताच दोन टिक दिसल्या आणि लगोलग त्या निळ्याही झाल्या. पलिकडून तिने इतक्या पटकन मेसेज पाहिला होता जणू ती त्याच्याच मसेजची वाट पाहत असावी. त्याला थोडं बरं वाटलं आणि सोबतच थोडी भीती देखील वाटली. भीती यासाठी वाटली की आता यावर तिचा काय रिप्लाय येईल? तो तसाच मग मोबाईल पाहत पडून राहिला. झोप एव्हाना दूर पळाली होती.

This image has an empty alt attribute; its file name is CLICK-ANYWHERE-ON-THE-IMAGE.jpg

काही वेळाने मग ती काहीतरी टाईप करतानात्याला दिसली. त्याची उत्सुकता ताणली गेली. करेल का ती माफ? की पुन्हा रागवेल? वगैरे वगैरे!

बराच वेळ त्याला ती पलिकडून नुसती काहीतरी टाईप करतेय असंच दिसत राहिलं. इतकं काय टाईप करून पाठवणार होती ती? याचा अंदाजवजा विचार मात्र अमोलच्या मनात घोळत राहिला आणि अचानक पलिकडून ती टाईप करायची थांबली. ती थांबली ती थांबलीच! तिचा काही रिप्लाय आलाच नाही. राहून राहून मग तोच वरचेवर तपासून पाहत राहिला आणि यात त्याला कधीचा डोळा देखील लागला.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर, लोकलमधून जाताना, कॉलेजात, कँटिनमध्ये बसल्यावर, ऐन लेक्चरमध्ये, आठवेल तेव्हा, लोकलमधून परत येताना अशा बऱ्याचदा त्याने आपल्या व्हॉट्स अॅपवर तिचा मेसेज आला की नाही हे पुन्हा पुन्हा पाहिले होते. मात्र दरवेळी त्याचा हिरमोडच झालेला.

शिवाय जितक्या वेळा नायर मॅडम त्याच्या समोर आली तितक्या वेळा तिने त्याच्याकडे साधं ढुंकुनही पाहिलं नव्हतं, बघणं तर दूरच!

नंतरचे काही दिवस त्याचा दिनक्रम काहीसा असाच राहिला. तो रोज रात्री बिछान्यावर पडून तिला एक सॉरीचा मेसेज पाठवायचा, ती तो लगेचच पहायचीही; पण.. पण रिप्लाय मात्र काहीच नाही द्यायची. तो बिचारा मात्र तिच्या रिप्लायची वाट पाहत रहायचा; पण त्याची निराशा ही ठरलेलीच. निदान कॉलेजात आल्यावर तरी तिने आपल्याशी बोलावं, आपल्याला माफी द्यावी अशी जरी त्याची इच्छा असली तरी तीही पूर्ण होणे दुरापास्त होते.

हल्ली तर तो इतका उदास नी निराश दिसायचा की त्याचे लेक्चर, लिखाण इत्यादींवरचे लक्षही उडाल्यासारखे वाटत होते. तो गळ्यात ती ओढणी मफलरसारखी गुंडाळून कधी कधी शून्यात नजर लावून बसून रहायचा, तर कधी कधी ऐन लेक्चरमध्ये भाऊंचा पुतळा उभारल्यासारखी तंद्री लागायची त्याची.

आपल्या मनाची अशी उडालेली भांबेरी, त्यामुळे होणारी आपली हतबलता याची त्याला नाही म्हटलं तरी कल्पना ही होतीच. शिवाय आपण अधिकाधिकच नायर मॅडममध्ये गुंतत चाललो आहोत हेही त्याला पटत होते. त्या दिवशी रागात का असेना; पण बोलता बोलता नायर मॅडमने तिच्या मनात त्याच्याबद्दलची असलेली भावना त्याला सांगून टाकली होती आणि तिथूनच हा सारा खेळ सुरू झाला होता.

कुणी आपल्यावर प्रेम करावं यासाठी आपण लायकच नाही आहोत असेच त्याला वाटे. नायर मॅडम त्याच्यामुळे दुखावली गेली, जी त्याच्याही न कळत त्याच्यावर भाळली होती. शिवाय आरती.. आरतीने असं स्वत:ला संपवलं याचाही दोष तो आता स्वत:वर घेऊ लागला होता. आपल्यामुळेच लोक आपल्यापासून दुरावतात अशीच त्याच्या मनाची पक्की धारणा बनू पाहत होती.

त्यात आणखी एक बाब म्हणजे त्याला नायर मॅडम आवडते की नाही, तिच्याबद्दल त्याच्या काय भावना आहेत याबाबत त्याच्याच मनात संभ्रम होता. कधी कधी लोक आपलं प्रेम ओळखायला देखील कमी पडतात. हेच ते प्रेम आहे हेच त्यांना कळेनासं होतं आणि मग आपलं प्रेम कुणाचं तरी दुसऱ्याचं प्रेम झाल्यावर कुणा तिसऱ्याच्याच प्रेमाला मग आपलं प्रेम म्हणून अख्खं आयुष्य काढावं लागतं!

त्या दिवशीची सकाळची लोकल अगदी खचाखच भरली होती. बायका-माणसे अंगाशी अंग घासेल इतकी खेटून उभी होती. सकाळची वेळ असली तरी उकाडा मात्र जाम जाणवत होता. बायका साडीच्या पदराने, ओढणीने घाम टिपत होत्या तर माणसे कधी रूमालाने, कधी दंडावरील शर्टानेच तो घाम पुसत होती. पटरीचा आणि लोखंडी चाकांचा वरचेवर आवाज होत होता. त्यात एखादं स्टेशन आलं की माणसांचा गोंधळ. लोकल धावू लागली की डब्यातही पुन्हा माणसांचा गोंधळ. सगळीकडे गोंधळच गोंधळ!

गळ्यातून खाली रुळणारी ओढणी सावरत त्या गर्दीत अमोल आपल्या हातात पकडलेल्या मोबाईलमध्ये कसलातरी व्हिडिओ पाहत उभा होता. त्या दिवशी लोकलमध्ये गाणं गाणाऱ्या त्या पोराचा होता तो व्हिडिओ. व्हायरल व्हिडिओ!

अहमss अहमss असा कुणाचातरी घसा साफ केल्याचा आवाज त्याच्या कानी पडला. तसेही गर्दीत खूप सारे आवाज कानी पडतच होते, त्यामुळे त्याने तिकडे फारसे लक्ष दिले नाही. तो आपला तसाच मोबाईलमध्ये तोंड घालून तो व्हिडिओ पाहत राहिला. मग पुन्हा तसाच आवाज; पण काहीसा मोठा आणि जाणूनबुजून काढल्यासारखा. हे त्यालाही जाणवले. म्हणूण मग त्याने वर पाहिले. तोच पोरगा होता तो. व्हायरल झालेला.

“अरे तू? तू तर यार व्हायरल झालास की.” अमोल आनंदाने त्याला म्हणाला.

“व्हायरल पण झालो आणि कुणाचं तरी लक्ष पण गेलं.” तो पोरगा म्हणाला.

“अंss, लेट मी गेस युवर नेम.” अमोल चेहऱ्यावर खुशीचे भाव आणत त्याला म्हणाला आणि त्याचं नाव आठवू लागला. “अंss? अर. . . बा. . . ज, अरबाज, अरबाज खान? . त्यावर तो नुसता हसला आणि म्हणाला, “जाऊ द्या हो. नावात काय आहे.” 

तो असं म्हणताच ते दोघेही हसले. “चुकलो असेल तर मला दुरुस्त कर. आता तू व्हायरल झाला आहेस म्हणून. आणि उद्या जाऊन तू सेलेब्रिटी झालास की मला सांगता येईल ना की अमुक अमुक गायक माझ्यासोबत लोकलनी प्रवास करायचा म्हणून.” अमोल त्याला म्हणाला.

“मग तर तुमची चूक दुरुस्त केलीच पाहिजे. मी खान नाही शेख आहे.” अरबाज डोळा मारत त्याला म्हणाला.

“हं.. येस येस. अरबाज शेख. आता लक्षात राहील माझ्या.” असं म्हणत त्याने मनात चांगलं चारेकदा त्याचं नाव घोळलं आणि पुढे त्याने अरबाजला विचारलं, “कुणाचं लक्ष गेलं म्हणालास मघाशी?”

“अच्छा, लक्ष होय. ते इंडियन आयडॉल, त्यांच्याकडून बोलावणं आलंय.” तो म्हणाला.

“अरे वा. एक व्हायरल व्हिडिओ आणि थेट इंडियन आयडॉल. छान छान. तू तो रातोरात स्टार बन गया. ”

“हाहा, रातोरात स्टार. लोकांना एक रात्र दिसते; पण त्या एका रात्रीच्या आधीच्या अशा कितीतरी भयानक रात्री असतात ज्या फक्त आपल्यालाच माहीत असतात.” तो हसत म्हणाला. अमोलला देखील त्याचं म्हणणं पटलं. त्याने मग एक स्मित करत त्याला दुजोरा दिला. मग काहीसं इकडचं काहीसं तिकडचं बोलणं करत त्यांचा लोकलचा प्रवास चालू राहिला.

एका स्टेशनला मग अरबाज उतरताना अमोल त्याला म्हणाला, “इंडियन आयडॉल जितने के बाद बढीयासी बिर्याणी खिलाना मेरे भाई.” त्यावर हसत तो अमोलला म्हणाला, “पक्का भाई पर मै जितने के बाद तुम भी मुझे पुरणपोळी खिलाना. माझ्या अम्मीला खूप आवडायची.”

“मंजूर.” म्हणत त्याने त्याला निरोपाचा हात केला.

“आणखी एक गोष्ट.” प्लॅटफॉर्मवर उभा राहून तो जोराने बोलू लागला. अमोलने त्याच्याकडे पाहत आपल्या भुवया उंचावल्या. अरबाज म्हणाला, “महाराष्ट्रात मराठीच. मुस्लिम असलो तरी मराठी आहे.” तो हाताची मूठ छातीवर ठेवून म्हणाला. अमोलला हे जाम भारी वाटलं. तो फक्त म्हणाला, “जय महाराष्ट्र.”

“जय महाराष्ट्र!” अरबाजदेखील म्हणाला.

गर्दी कमी झाली असल्या कारणाने त्याने एक रिकाम्या बाकडावर अगदी खिडकीकडेची जागा निवडली आणि तो बसला. लोकलने मग हळूहळू वेग पकडला. फ्लॅटफॉर्मवरील लोक केव्हाचे वर चढले होते. खिडकीतून आत शिरणारा मुंबईचा तो खरा वारा त्याचे केस हळुवारपणे लहरवत होता आणि सोबत लहरत होती त्याच्या गळ्यातली ती ओढणी!  

त्याने मग व्हॉट्स अॅप उघडून पाहिले. पदरी नेहमीप्रमाणे निराशाच. तो मग खिडकीतून बाहेर पाहत राहिला. मागे पडणारे खांब, माणसे, इमारती, झाडे हे सगळं जरी तो पाहत असला तरी त्याचे मन कुठे दुसरीकडेच भटकलेलं होतं.

तुझ्या राती वेगळ्या

माझ्या राती वेगळ्या

रातीच्या राती मात्र

सारख्याच.

तुझ्या रातीला संघर्ष

माझ्या रातीला विरह

तिच्या रातीला वेदना,

पदोपदी श्वापदांची!

काहीसं असंच! मनातल्या मनात शब्दांचे मग धुमारे वाढू पाहत होते त्याच्या. खिश्याला असलेला पेन काढून तो मग खिश्यातीलच एका कागदावर ते उतरवू लागला. कागद मांडीवर ठेवून तो उतरवत असताना अचानक त्याची नजर पुढ्यात बसलेल्या त्या बाईच्या पायांवर गेली. काहीसे स्थूल; पण सावळे पाय. सावळे! ते पाय पाहून का कुणास ठाऊक त्याला आरतीची आठवण आली. तीही काहीशी स्थूल असती तर तिचे देखील पाय असेच दिसले असते. अगदी असेच. त्याला वाटले.

तो आपलं लिखाण थांबवून तसाच त्या पायांना न्याहाळू लागला आणि शेवटी न राहूनही त्याने आपली नजर वर केली. एक मध्यम स्थूल बाई डोक्यावरचा पदर थोडासा पुढे ओढून खाली मान घालून तिथे बसली होती. क्षणभर त्यालाही वाटले की जर ती सडपातळ असती तर नक्की आरतीच असती. तशीच सावळी कांती होती तिची आणि पाय देखील!

पण.. ती बाई.. अशी का बसली होती? अमोलला प्रश्न पडला. त्याने पेन आणि कागद खिशात ठेवून दिला आणि तो तिला पाहू लागला. ती सतत अंग चोरत होती, थरथरत होती, क्षणाक्षणाला आपला पदर पुढे ओढत होती, मात्र वर पाहत नव्हती. कदाचित ओढलेल्या पदराआडून पाहत देखील असावी. आपल्या डाव्या पायाचा अंगठा ती सतत आपल्या चप्पलेत रुतवत होती. का करत असावी ती अशी? आणि अचानक त्याला मघाशी लिहित असलेल्या कवितेच्या शेवटच्या त्या दोन ओळी आठवल्या- तिच्या रातीला वेदना, पदोपदी श्वापदांची!

“छिनाल, इथं येऊन बसलीय होय तू? मादरचोद.” कुणा बेवड्याचा सहन न होणारा आवाज कानी आला आणि त्या आवाजासोबत देशी दारूचा असा काही भपकारा आला की अमोलला एक कोरडा हुंदाडाच येऊन गेला. परत एक आवाज झाला. खाडकन. आणि समोरची ती बाई अक्षरक्ष: अमोलच्या मांडीवर फेकली गेली. त्या बेवड्याने तिच्या कानशिलात लगावलेली होती. लोकलच्या डब्यातले लोक मात्र नेहमीच्याच प्रसंगासारखे गप्प. षंढ साले!

का कुणास ठाऊक, ती मांडीवर कोलमडताच अमोलने त्या बेवड्याला मागे ढकलून दिले आणि त्या बाईच्या दंडाला पकडून तिला सावरले; पण पुढे त्याने जे पाहिले त्यातून मात्र तो सावरला नाही.

तिच्या ब्लाऊजमध्ये न मावणाऱ्या तिच्या छातीवर काळे-निळे डाग, ओरखडे होते. कुणीतरी सिगारेटचे चटके दिल्याचे देखील डाग तिच्या मानेवर, खांद्यावर होते. चेहऱ्यावर गालावर हाताचे व्रण होते आणि.. आणि रानटी श्वापदांच्या सारखे चाव्याचे देखील व्रण होते. मानवी चाव्याचे! जणू कुणीतरी तिचे लचके तोडत असावे, रोज, रात्री!

आणि ओठ? तेही काळे, फाटलेले.

“आरती?” नकळत त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. ती फक्त त्याला पाहत राहिली, काहीच प्रतिसाद न देता. तो पुन्हा आरती असं म्हणाला. तेव्हा तिने त्याच्यावरून नजर हटवून ती खिडकीच्या बाहेर लावली.

मनाच्या अडगळीत दडलेली आरतीच्या विषयीची त्याची भावना कदाचित आज दाटून येत असावी आणि म्हणूनच त्याला त्या समोरच्या बाईत आपली आरतीच दिसत असावी असा तो विचार करत होता. कुणास ठाऊक; पण त्याला जणू खात्री होती की तीच त्याची आरती होती.

“आरती?” त्याने पुन्हा हाक दिली. फक्त तिलाच ऐकू जाईल अशीच आणि खिडकीच्या बाहेर नजर लावलेल्या त्या बाईच्या डोळ्यांत पाणी दाटले. नुसते दाटले नाही तर त्याचे ओघळ तिच्या गालावरून खाली ओघळते झाले. स्तब्ध असा तो मग काही क्षण तिला पाहतच राहिला. अगदी डोळ्यांत डोळे घालून. ते काहीच बोलले नाहीत; पण त्यांचे डोळे, ते मात्र खूप काही बोलत राहिले एकमेकांशी.

“का?” तो म्हणाला. ती मात्र अनुत्तरीत. भावनाशून्य चेहऱ्याने तो मग जागचा उठला. गळ्यातील ओढणीला झटदिशी हाताने हिसका दिला आणि तो तिथून उठून निघून गेला.

जड अंत:करणाने आणि तशाच जड पावलांनी तो चालत जावून लोकलच्या दारात उभा राहिला. चेहऱ्यावर ना कोणते भाव होते ना आणखी काही. तो दारातील खांबाला पकडून तसाच स्तब्ध उभा होता. आता मात्र चेहऱ्यावर एक स्मित होतं त्याच्या.

अंगातील कपडे, डोक्यावरील केस आणि ती गळ्यातील ओढणी त्या दारातून आत शिरणाऱ्या वाऱ्यावर उडत होते. लोकलचा आवाज, गर्दीचा कोलाहल, मागे पडणाऱ्या इमारती, मागे पडणारे खांब झपाझप डोळ्याआड होत होते आणि दिसत मात्र होते ते तिच्या पायांना समुद्राच्या वाळूने केलेले ते रुपेरी वाळूचे रिंगण, गळ्यातील त्या ओढणीचे गळ्याभोवतीचे ते रिंगण, नायर मॅडमच्या बाहुवरील ते बाजूबंद. तेही रिंगणच! आणि.. आणि आज पुन्हा इतक्या वर्षांनी भेटलेली त्याची आरती. तेही एक रिंगणच! ते रिंगण जणू त्याला आता एक फास वाटू लागलं होतं. फास गळ्याभोवतीचा, फास आयुष्याचा, फास आणखी कशाकशाचा. फास, फास आणि फासच!

खिडकीला डोके लावून खिडकीच्या बाहेर नजर लावून बसलेली ती अजूनही आसवे गाळीतच होती. शेजारी बसलेला बेवडा नवरा शिव्यांची लाखोली वाहत असताना ती मात्र आपल्याच विश्वात हरवलेली होती.

कसलातरी आवाज झाला. खिडकीतून कसलेतरी शिंतोडे उडत आत आले आणि लगोलग बाहेरून एक ओढणी उडत येऊन तिच्या चेहऱ्यावर विसावली. तिने ती बाजूला केली. काहीशी मळकट, जीर्ण, दुधाळ. अगदी ओळखीचीच! पण रक्ताने माखलेली. मघाचे शिंतोडेही रक्ताचेच!

मग लोकलच्या डब्याच्या दारातून लोकांच्या गोंधळाचा आवाज कानी आला आणि काहीजण उठून पुढे धावले. कुणी ओरडले, “चैssन खेचाss.”

पण धावणारी ती लोकल बरीच पुढे निघून आली होती आणि आरती मात्र आपल्या छातीशी ती ओढणी घट्ट कवटाळून जोरजोरात हंबरडा फोडत होती.

एका मंद उजेडाच्या खोलीत वैद्यकीय उपकरणांचा बीप्.. बीप् असा सततचा आवाज होत होता. त्यांच्या स्क्रीनवर काहीतरी आकडे, रेषा दिसत होत्या. शेजारीच असलेल्या बेडवर अमोल सर्वांगाला पांढऱ्या पट्ट्या लपेटलेल्या अवस्थेत पडून होता. तब्बल महिनाभराच्या तपानंतर दोनच दिवसांपूर्वी त्याला शुद्ध आली होती.    

तशा मंद उजेडात कुणीतरी बाई आत येऊन दारात उभी राहिली. काही क्षण ती नुसती तशीच उभी राहिली, त्या बेडकडे पाहत. काहीही हालचाल न करता. खोलीतल्या उपकरणांचा आवाज तेवढा काय तो कानी पडत होता. मग तिने आपल्या दोन्ही खांद्यावरून अंगावर चढवलेला ड्रेस खाली सोडून दिला. मंद उजेडात तिची फक्त नग्न पाठमोरी आकृती तेवढी काय ती डोळ्यांना जाणवत होती. मग डोक्याचे बांधलेले केस तिने मोकळे सोडले आणि ते पार तिच्या पार्श्वभागापर्यंत खाली रुळते झाले.

Ruperi ringan
Ruperi ringan

आपले पंजे टेकवत सावकाशपणे ती त्या बेडकडे चालत गेली आणि वर चढून ती प्लास्टर आणि पट्ट्यांत लपेटलेल्या अमोलच्या वरच जाऊन बसली आणि तेवढयातूनही त्याच्या उघड्या अंगावरून ती आपले हात नी ओठ सावकाशपणे फिरवू लागली. चंद्र जसा कलेकलेने वाढतो तसा तिचा वेग वाढत होता आणि अमोल? तो अकल्पित अशा प्रसंगाने काहीसा गोंधळून जागा होत होता; पण जे काही सुरू होतं ते या अवस्थेतही त्याला हवंहवंसं वाटत होतं.

डोके, मान, हात, पाय यांना प्लास्टर गुंडाळलेलं असल्याने त्याच्या हलचालीला मर्यादा येत होत्या. ती त्याला आपल्यात सामावून घेऊन त्याच्यावर स्वार होऊन बसली होती. तिने त्याचा संपूर्ण ताबाच घेतला होता जणू!

आपल्यावरती हे कोण स्वार झालंय हा प्रश्न त्यालादेखील पडला होता; पण डोळेच काय तो इतरत्र फिरवू शकत होता. जे काही पुढ्यात दिसत होते ते तिचे उरोज. ते त्याला ओळखीचे वाटले. कुठेतरी पाहिल्यासारखे; पण कुठे हे त्याला आठवेना.

प्रवाहाच्या उलट वल्हे मारताना नाव आणि नावाडी पुरते बेभान झाले होते. मधूनच मग नावाड्याच्या दंडावरील तो बाजूबंद नावेच्या म्हणजेच त्याच्या नजरेस पडला आणि.. आणि मग तो शांत होऊन नावाड्याचे वल्हे आणि हिसके घेत पडून राहिला. तृष्णेच्या त्या अत्युच्च शिखरावर पोहोचेपर्यंत!

थकून जेव्हा ती त्याच्यावर पहुडली तेव्हा तो मात्र तिचा तो बाजूबंद पाहत पडून राहिला.

[समाप्त]

रुपेरी रिंगण, भाग ३

रुपेरी रिंगण, भाग २

रुपेरी रिंगण

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

माय व्हॅलेंटाईन

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi with moral

 marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *