
रेडकू
रेडकू redku ही एक marathi story मराठी स्टोरी, marathi story writing मराठी कथा आहे.
अशी marathi story ज्यात एक लहान मुलाचं आणि रेडकाचं नातं सुरू होतं, वाचा redku रेडकू.
“मेली ती.” एवढंच म्हणून तिनं फोन ठिवून दिला अन् आपल्या लुगड्याचा पदर तिच्या वल्ल्या पापण्यांना लावला.
मायचं ते परंपरागत लुगडं हुतं. तिच्या आज्जंसासूकडून तिच्या सासूकडं अन् तिच्या सासूकडून आता तिच्याकडं आलेलं. एकमेव आसं. म्हणून की काय कुणास ठाऊक त्या लुगड्याला एक परंपरागत वास हुता. अन् कदाचित ह्येलाच लोक मग आपलेपणा, आपुलकी, मायेची ऊब असं काहीबाई म्हणत असत्याल. काय की!

भविष्यात ते लुगडं ऱ्हायलं तर माझ्या बायकोकडंपण! पण तवर जमाना कुठल्या कुठं जाईल काय सांगता येत नाय.
त्या फोनाचंच उदाहरण घ्या की. आज्जा म्हणतू की आमच्या येळाला कोण मेलं बिलं तर कळोस्तोवर त्येचं तेरावं बी उरकल्यालं असायचं. आता फोनातनं नुसतं हालू म्हटलं की बातमी हिकडची तिकडं हुतीया. झपाकदिशी!
माय मग डोळ्याला लावलेल्या पदारानं नाक पुसत आत, सैपाकाच्या खूलीत झटदिशी निघून गेली. आज्जा सोप्यात पटक्यावर डोकं टेकून वर खांडाच्या हलकडीला लटकावलेल्या व बेण्याला ठेवलेल्या पिवळ्या वांग्यांकडं बघत घोंगड्यावर नुस्ता पडून राहिला हुता. थकला हुता त्योबी आता. तरीबी चांगला चिवाट हाय त्यो. बोकडाची हाडं अजून त्याच्या दाताखाली भुगा हुत्यात. जर्मलच्या ताटात म्हशीच्या दुधात सकासकाळी चांगल्या दोन भाकरी कुस्करून हाणल्याशिवाय त्याला समाधान नसतं. दूध नसंल तर ताक. ते तर वरपून वरपून हाणतं अन् मग ब्रापदिशी ढेकर देत पोटावरून हात फिरवतं.
थोडी कनकनी आली की ते मस्त म्हणतं, आता काय जगत बिगत न्हाय म्हणून; पण रग हाय त्येच्यात. गोष्टी सांगताना कधी कधी लोंबणाऱ्या दंडाची बेंडकुळी देखील काढून दाखवतं. मला मज्जा वाटती!
“आज्ज्या? लका कळलं का तुला?” मी घोंगड्यावर त्येच्या कुशीत जात त्येला ईचारलं.त्येनं नजर न हलवता नुसती मुंडी हलवली.
“तुला रडू नाय का येत?” मी परत प्रश्न केला. आज्जा मात्र तसाच. मग मी बारीक आवाजात पुटपुटलो, “माय रडत्याय की. तू पण लका रडायला पायजे.”
आज्ज्याचं एक नाय दोन नाय. चांगल्या बोटभर आत गेलेल्या डोळ्यांच्या खोबणीतनं त्यो तसाच वांगी पाहत होता.
मी उठलू. सैपाकाच्या खूलीत शिरतलू. माय नव्हती तिथं. मग खालीच ठेवलेल्या शेंगदाण्याच्या ताटातलं बचकभर शेंगदाणं घेत मी मनाशीच म्हणालू, “मघाशी तर रडत रडत आत शिरलेली. कुठं गेली आसंल?”
सैपाकाच्या खूलीतनं मागच्या बाजूला एक दार हुतं आमच्या. मी त्ये ढकलून पायऱ्या उतरलू. तिथं आमची न्हाणी, पाणी तापवायची चूल, जळान असं लै काय काय हुतं. संडास बांधला हुता; पण पाण्याची लईच आबदा असल्यामुळं त्यात बारीक जळान कुकुच्चून भरलं हुतं. बाजूला असलेल्या चुलीवर पाणी तापत हुतं अन् त्येला चांगलंच आधान पण आलं हुतं. मी बचकंतलं शेंगदानं तोंडात टाकत मागं परड्यात आलू.
परड्यात माझं माय-अण्णा, चारेक बायका आणि अजून एकदोन जण गडी माणसं जमली हुती. माय त्याच लुगड्याच्या पदरात तोंड खुपसून रडत हुती. सोबतीला एखाद-दुसरी बाय रडल्यागत करत हुती.
आमची म्हस मेली हुती; पण असं एखाद्या नव्या माणसाला घरातलंच कुणी बिनी मेलं असल्यागत वाटावं असा माहुल बनला हुता.
मायचा लईच जीव हुता तिच्यावर. नंतर माझ्यावर. अन् आमच्या दोघांच्यापेक्षा माझ्या मोठ्या बहीणीवर. मगा फोनात तिलाच तर बोलत हुती ती.
आमच्या घरात आधी माझी बहीण आली. मग म्हस आणि शेवटाला मी. शेंडंफळ; पण बहीण नांदायला गेल्यावर माझा लाड व्हायचा सोडून, मुका जीव म्हणून ह्या म्हशीचाच लाड लै झाला.
म्हैस म्हातारी झाली म्हणून तिला मायनं इकू दिली नाय. वर तीच म्हणायची, “म्हशीनं दावणीला जीव सोडला तरी चालंल; पण खाटकाच्या हातात म्हशीची येसन देणार नाय.”
तशी ती आमची एकुलती एक म्हस न्हवती बरं का. अजून चार म्हशी दावणीला बांधून हुत्या. पण हिची कडूचीची बातच और हुती. आज्जा म्हणायचा, ‘म्हशीची थानं मंजी लोण्यावानी हायती. पिळतच राहावं वाटतं नुसतं.’ आणि दुधाचं तर ईचारुच नगा. आगायायाय!
“गुर्जीला सांगू का तू येणार नाय म्हणून?” सुताराचा नावन्या मला म्हणाला. बेणं कधी यिऊन शेजारी उभा राहिलं कळलं पण नाय.
मी फक्त हो अशी मान हलवली. अन् मेलेल्या म्हशीवर काही वेळ नजर रोखून मग त्येला ईचारलं, “तुला काय वाटतंय नवन्या, आमच्या म्हशीला जाळत्याली का रं?”
“काय की.”
“जाळलं तर माती पण आसंल का रं?”
“आयला, लका जाळल्याव करायला लागंल वाटतंया माती.”
“मग तीन दिवस येत नाय म्हणून सांग गुर्जीला.”
“एवढ्या दिवस हुय रं लका?”
“माय यिवडी रडत्याय तर जाळत्याली लका म्हशीला. त्येबग की, बाया बी रडू लागल्यात्या.”
“हं, मंजी जाळत्याली; पण असल्या ढोल्या म्हशीला खांद्यावर कशी नेणार रं?”
“मला बी त्योच प्रश्न पडलाय. त्यात अक्की बी ईना अजून.”
“ती येणार हाय वी रं?”
“मायनं फोन तर केलता; पण नवन्या, तुझी आय आली बग. तू निग शाळंला. नायतर धोपटंल तुला.” नवन्याची आय तरातरा चालत येताना पाहून मी त्याला म्हणालो.
“धोपटायला कुठलं, रडायला आली आसंल. गावात कुणी बी गचकूदी , आय रडायला फूडं आसती माजी.”
“हं.” मी आवाज केला. काही येळ आम्ही हाताची घडी करून समोरचं दृश्य पाहत उभा हुतो. अजून दोन माणसं तिथं आली. बायका रडायच्या कमी आल्या. नवन्याची आय सोडून. मला वाटलं, आमच्या त्याच म्हशीचं दूध तांब्या-तांब्यानं ती नेत हुती. ते बी फुकाट. आता कुठलं नेणार? म्हणून रडू येत असावं तिला. नाय म्हंजी बाकीच्या म्हशी हुत्याच; पण हिची फ्याट लै लागायची. म्हणून आसंल. जाउद्या. कुणाचं काय अन् कुणाचं काय.
पण नवन्या फूडं आपुण काय बोललो नाय. दोस्त हाय आपला त्यो.
“तरी तूमाला म्हणत हुती मी. म्हस म्हातारी झाल्याय आता नका फळवू म्हणून.” आय बायकांच्यातनं अण्णाकडं हात करत रडत रडत बोलत हुती. अण्णाचं एक नाय ना दोन नाय. त्ये आपलं माणसांशी बोलण्यात गुंग! अन् माय पुन्हा रडण्यात गुंग.
मायचं भारी हाय. लगीच रडती ती. पण नवन्याच्या आयच्या खालीच! मागं एकदा शेळीला किराळ लागलं हुतं. नवी नवी ईली हुती. चार पाटरं झालती चांगली. तरपडून तरपडून मिली ती. तिच्या आदी पाटरं मेलेली. माय तवा तर लईच रडली हुती. खुटीला मोकळं पडलेलं तसलं बोरकडी आसलेलं दावं बगून तिचा पदर सारखा डोळ्याला जायचा.
तशी ती लै खंबीर हाय म्हणा; पण असल्या येळंला ती रडून घेती. आमच्या काळ्या रानात एकदा दोन लांडगं आलतं. सोबत चार शेळ्या, डोक्यावर गवताचा भारा आणि मायनं नुसता आरडून वरडून कालवा केला; पण लांडग्यांना जवळ काय यीव दिलं नाय. आज्जा म्हारतीच्या पारावर बसून त्याल-मीठ लावून सांगत हुता सूनंचा पराक्रम. मला लै जाम भारी वाटलं तवा.
नवन्या अन् मी मग चालत चालत मेलेल्या म्हशीकडं आलो. तोंडातनं फेस बाहेर पडला हुता तिच्या. त्यावर माशा घों घों करत हुत्या. मला जरा वाईटच वाटलं. मागं नजर टाकली तर तिच्या ढुंगनाला पण माशा लागल्या हुत्या. मागणं झार तसाच अडखळून पडला हुता. मग अजून वाईट वाटलं. ते रगात, त्यो फेस, त्या माशा. मला माज्या म्हशीबद्दल लईच कसंतर वाटलं. काय झालं तरी आमचीच हुती ती. तिचं दूद, धय, ताक, लूणी, तूप मी पण खाल्लं हुतंच. आता तिच्या फुगलेल्या थानातनं दूद कदीच नाय येणार. मरान लईच वाईट!
बायकांच्या घोळक्यातनं नवन्याची आय उठली अन् तरातरा चालत जाऊन चुलीवरचं आदान आलेलं पाणी बादलीत घिऊन आली. मायनं मग कडू त्याल म्हशीच्या अंगाला लावलं अन् साऱ्या बायकांनी मिळून तिला आंगुळ घातली.
अण्णा मग तिचं नुकतंच जनमलेलं रेडकू काकंला घिऊन आलं. भारी हुतं ते. कपाळाला त्येच्याच आयगत पांढरा टिपका हुता त्येच्या. त्येच्या आयसोबत त्येला बी मायनं न्हाऊ घातलं. माय आता हुंदकं देत हुती.
नवन्या म्हणाला, “रेडा हाय का रीडी? हुई रं?”
“सकाळी अण्णा म्हणत हुतं रीडी झाली म्हणून.”
“मग म्हस कशी मीली?”
“काय की; पण माय म्हणत हुती, येल्यावर म्हशीनं आंग टाकून दिलं म्हणून.”
“हं.”
आम्ही दोघं मग म्हशीला बैलगाडीत टाकस्तोवर एका कोपऱ्यात उभा होतो. रेडकाच्या पायाला दावं बांधून अण्णा माझ्याकडं आलं अन् ते माझ्या हात देऊन काहीच न बोलता निघून गेलं.
अण्णा कधी कधी जाम तंद्रीत असत्यात. आपल्याच. माय खंबीर तर अण्णा गंभीर असायचं. माय तरी रडायची तरी आदनं मदनं, अण्णा आता बी रडलं नव्हतं. आज्जी मेली तवा बी थोडंच रडलं हुतं. बारकं चुलतं लै रडलं. आज्जा नाय रडला. मी पण अण्णागत हुणार!
“लका, मी पण नाय जात आज साळंला.” नवन्या म्हणाला.
“का रं?”
“म्हटलं हुतं म्हस जाळली तर मातीला बुडवीन शाळा; पण हिला तर पुरायला नेली.”
“ऱ्हाव दी मग.” मी माझ्या पायाशी ढुशांडी मारणाऱ्या रेडकाला कुरवाळत नजरेपासून दूर जाणाऱ्या बैलगाडीकडं बघत उभा ऱ्हायलो.
[समाप्त]
हे पण वाचा:
आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.
व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १
लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
माझी आई निबंध सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नक्की वाचा..