• Pune, Maharashtra
कथा
पाडवा

पाडवा

Spread the love

पाडवा

गावाच्या बाहेर, अगदी सुरवातीलाच त्या म्हातारीचं ते कुडाचं खोपटं होतं.

छोट्याशा टेकडावर ते काळपट असं खोपटं जणू असं काही उभं होतं की गावात येण्याऱ्यांच्या स्वागतालाच ते उभा आहे असं काहीसं वाटत होतं.

gudhi padwa
gudhi padwa

रखरखत्या त्या उन्हात थोडासा गारवा मिळावा म्हणून म्हातारीनंच काही वर्षांपूर्वी त्या टेकडाच्या खाली जिथून गावात रस्ता जात होता तिथं आणि खोपीच्या बगलेला अशा दोन नांदुरकीच्या फांद्या आणून पुरल्या होत्या. आज नाही म्हणायला त्यांचे वृक्ष होताना पहायला मिळतंय.

रस्त्याकडेची कुसळं धुळीनं माखली होती. उन्हं आता तव्यागत तापली होती. काळा बुलबुल पक्षी अशाच एका वटलेल्या झाडाच्या फांद्यांवर ऊठबैस करत होता. त्याच्या पलिकडंच गोट्यांएवढ्या कैऱ्यांनी लगडलेल्या त्या आंब्याच्या झाडातून पावशा सतत ओरडत होता.

म्हातारी मात्र रस्त्याकडंच्या त्या नांदुरकी खाली अगदी चवड्यावर बसली होती. हात भुवयांच्या वर टेकवून  तिनं त्या रस्त्याकडं नजर लावली होती. बराच वेळ झालं त्या रस्त्यावरून कुणी आलं नव्हतं ना कुणी गेलं होतं.

जाड तांबड्या मुंग्याची रांग आता मातीतून निघून झाडाच्या खोडावरून वर निघाली होती. अगदी शिस्तबद्ध अशी! चवड्यावर बसून तिच्या पायाला आता मुंग्या येऊ लागल्या होत्या. थोडीशी उसंत घ्यावी म्हणून मग ती मागंच एका दगडावर टेकली. मग टेकावर असलेल्या आपल्या खोपीकडं तिनं नजर टाकली. चारदोन कोंबड्या कुक्कुडुक कुक्कुडुक आवाज करत खोपट्याभोवती येरझाऱ्या घालत होत्या. अंड्याशी आलेली एखादी कोंबडी सतत खोपीच्या डोबळ्यात उडी मारून जाऊन बसायची आणि पुन्हा खाली उडी घ्यायची.

कमरेशी खोचलेला आपला बटवा तिनं हळूच बाजूला घेतला आणि रस्त्याकडं पाहतच तिनं मग त्यात हात घालून एक चिमटभर ओवा त्यातून बाहेर काढला आणि काहीशा थरथरत्या हातानंच तिनं तो तोंडात पण  टाकला. सावकाश मग तो बटवा तिनं पुन्हा आपल्या कमरेला खवून दिला.

मधूनच एखादी वाऱ्याची झुळूक नांदुरकीत शिरली की पानांचा सळ्ळ् असा आवाज कानी पडायचा. बऱ्याचवेळानंतर त्या डांबरी रस्त्यावरून कुठलंतरी वाहन येताना नजरेस पडलं. दोन्ही बाजूंनी कातरलेली ती डांबरी आणि त्यावर पडलेलं खड्डं चुकवत एक कमांडर गाडी झुलत डुलत, हेलकावं घेत, मागं बक्कळ फुफाटा उडवत येत होती.

गाडीची चाहूल लागताच मग म्हातारी थोडी सावरून बसली. आज रामचंद्र येणार होता इचलकरंजीहून. तिच्या लेकासोबतच कामाला होता तो गिरणीत! नारायण सोबत.

गुढीपाडव्याला चांगलं काठापदराचं लुगडं पाठवून देतो असा सांगावा धाडला होता त्यानं मागच्या वेळेला. रामचंद्रापाशीच! त्याचीच वाट बघत बसली होती ती केव्हाची. तसंही गुढी उभारायला देखील आता तिच्याकडं ना दुसरं कुठलं लुगडं होतं ना आणखी काही!

नळकांडीतून काळाशार धूर सोडत आणि इंजिनाचा हुंदके दिल्यागत आवाज करत गाडी झाडाजवळ येऊन थांबली. दोनएक माणसं मागून उतरली. रामा अजून कसा उतरला नाही असा विचार मनात करत म्हातारी उतरणाऱ्या माणसांकडं पाहत होती. इंजिनाच्या आवाजानं अखंड गाडी थरथरत होती.

“अय म्हातारे, आ कुठं जायचंय तुला?” पुढे बसलेल्या प्रवाशांच्या आडून बगळ्यागत मान लांबवित ड्रायवरनं ओरडून विचारलं. म्हातारी अजून रामाच्या उतरण्याचीच वाट बघत होती.

“मसनात जायाचं हाय. न्हितुस का?” आपलं सुरकुतलेलं तोंड मुरडत म्हातारी फटकळपणाने म्हणाली.

“ती तर तू आशीच जाशील वर्षभरात.” ड्रायवर तिची चेष्टा करण्याच्या उद्देशानं म्हणाला.

“आरं तुझ्या तिरडीचा बांबू मोडला तुझ्या. मला मसनात न्हितुस व्हय रं? तुझ्या तेराव्याला जिवून जाईल ही म्हातारी, किरड्या.” म्हातारीनं तोंडाचा सपाटा लावला.

“काय म्हातारे, कशाला त्या बिचाऱ्याला मारत्याय?” रामचंद्र गाडीतून उतरून तिच्याजवळ उभा राहत म्हणाला.

“आरं, आला वी  तू?”

“हं.”

“बग की ताटीवाला घालवाय निघालाय मला.” म्हातारी बसूनच ड्रायवरकडे हातवारं करत नी बोटं मोडत म्हणाली.

“आगं ये म्हातारे, तुला कुठं बी घालवत नाय मी. तू जग बाय अजून शंभर वर्षं. मी जातू.” म्हणत तो तिथून निघून गेला. त्याची गाडी तिथून वळण घेत दुसऱ्या गावाच्या वाटेला लागली.

“रामा आला बाबा तू. बरं झालं. पण मुलकाचा वकूत केलास बग.”

“वक्ताचं काय बी ईचारु नगंस बग. तुज्या सरकारनं लैच गुळगुळीत सडका केल्यात्या. काय सांगू तुला.”

“ते तुजं सरकार बिरकार घाल चुलीत. आधी सांग नाऱ्यानं दिलं का लुगडं?” म्हातारीनं विचारलं. त्यावर रामानं एकवेळ तिच्या नजरेत पाहिलं आणि काय बोलावं म्हणून तो गप्पच राहिला. नजर बाजूला करत मग त्यानं तिच्या खोपीकडं पाहिलं आणि म्हणाला, “म्हातारे, कापायजूगी हाय का गं एखादी कुंबडी?”

“का रं मुडद्या, माज्या कोंबड्यांवर डोळा हाय वी तूजा?”

“आगं तसं नाय गं म्हातारे. इकात घिन की मी.”

“आन तुला इकून माजी आंडी बंद हुत्याली त्येचं काय?”

“आयला, जाव दी मग. तू तर लैच आडवाट हाय म्हातारे. जातू बग मी.” असं म्हणउण तो उठला व त्यानं गावची वाट धरली.

“आरं, लुगडं रं?” म्हातारीनं त्याला हात करत मोठ्या आवाजात विचारलं.

रामाने मागं वळत उत्तर दिलं, “औंदा नाय दिलं. म्होरच्या वक्ताला दिल म्हणाला त्यो आन पैकं पण नाय दिलं.”

त्याच्या त्या उत्तरानं म्हातारीचा सुरकुतलेला चेहरा अजूनच सुरकुतला, तिची उत्सुकता मालवली आणि तिची जागा मग निराशेनं घेतली.

काळवंडलेल्या नी भेगाळलेल्या हातानं ती आपल्या वयाला जमंल तशी ज्वारीची कणसं खुडत होती. पोक आलेल्या पाठीतून मणक्याची अख्खी माळ दिसत होती आणि त्यावर वरून उन्हं चपाचप आपला चपकारा मारत होती. कानाला गुडघं लावून म्हातारी मात्र आडव्या पाडलेल्या पाचुंद्याची कणसं खुडून मागच्या डालग्यात टाकत होती.

पाडवा उद्यावर आला होता. म्हातारीला तो करायचाच होता. पुढच्या पाडव्याला आपण असू नसू म्हणून कदाचित. त्यात लेकानं लुगडं पण नव्हतं पाठवून दिलं. बरं राहिलं लुगडं; पण मागच्या तीन वर्षांत तो इकडं फिरकला पण नव्हता!

“म्हातारे, आगं चालव की पटापटा हात. का म्हागं ऱ्हायायचाय?” सोबत कणसं खुडणारी रानमालकीण तिला म्हणाली.

 “मी काय तरणी हाय वी तुझ्यागत पटापटा हात चालवायला?”

“आगं पण आज लैच हळू चाललंय काम तुझं, म्हणून म्हणत्याय मी. का गं काय प्राब्लेम हाय का?”

“कसला पराबलीम असणार हाय मला म्हातारीला? कूपीत आसं एकटं किती येळ बसायचं म्हणून कामाला येती. आता वयाच्यामुळं उरकत न्हाय त्यो भाग रास्त हाय; पण करायचं काय?” असं म्हणून म्हातारी गप्प झाली. आजूबाजूच्या बायका लगबगीनं कणसं खुडत होत्या.

“पाच-सा कोंबड्या हायत्या. एक शीळी हाय. कशाला असल्या कामात पडायचं गं?” पलीकडंच कणसं खुडत असलेली एक मध्यमवयीन बाई तिला म्हणाली.

“न्हाय तर काय. तिकडं ल्योक कामाला हाय गिरणीत. पाठवत आसलच की पैकं. तरीबी हितं तरफडत्याय.” आणखी एक बाई तोंडातली मिश्री थुकत ठिसकतच म्हणाली.

“न्हाय तर काय? उन्हाचा पार काय कमी हाय वी? त्यात आपुन म्हातारं. आली भवळ आन जिवाचं काय… ” अजून एक बाई बोलली; पण तिचं बोलणं काटतच तिसरीच बाई म्हणाली., “काय बी काय बुलत्याय आगं? पाडवा उद्यावर आलाय आणि.. तुझ्या जीभंला काही हाड बीड?”  

“ये बायांनो, तुमालाबी ईषयच पायजी आसतूया बोलायला. उरका पटापटा. नायतर तुमच्या गप्पांच्या नादात जेवायची सुट्टी व्हायची. कामं कमी अन् बाताच जास्त!” रानमालकीण बायांवर खेकासली तशा बायका पुन्हा खाली मान घालून ज्वारी खुडू लागल्या.

कामावरून सुटतानाचा शेवटचा डालगा ज्वारीच्या खळ्यात ओतताना म्हातारी रानमालकीणीला म्हणाली, “आगं, नंदा? थोडं उसणं पैकं दितीस का? नाय मजी पाडवा हाय तर..”

“म्हातारे आगं, तू बघत्याय की, किती ज्वारी झाल्याय ती. वाटलं तर एखादा डालगा वाढवून घी; पण पैकं..”

“पैकंच तर पायजिल हायतं गं. त्यात पाडवा हाय उद्याच्याला.”

“आगं पाडवा हाय म्हणूनच. न्हायतर मी काय दीनाय वी  तुला?” ती म्हणाली. त्यावर म्हातारी एकदम शांतच झाली. काही क्षण गप्प राहून ती पुन्हा म्हणाली, “बरं, मग एखादी नवी साडी-लुगडं तर..”

“आणि ते गं कशाला?”

“अं.. पाडवा हाय न्हवं.”

“ये म्हातारे, कशाला गं तसल्या भानगडी पाहिज्येत तुला? पाडवा बिडवा, पोळ्या बिळ्या. आं? मी दिन आणून पोळ्या- गुळवणी. तू उगाच गप्प बस.” 

“आगं पण.”

“पण बिन काय न्हाय. जा आता घरी.” असं म्हणून ती तिथून निघून गेली.  

म्हातारी बिचारी गप्प बसली. एकवेळ त्या खळ्यावर नजर रोखली आणि मग कमरेवर डालगा पकडून ती वाट चालू लागली.

तिन्हीसांजेला खोपीत दिवा लावून म्हातारीनं भात शिजू घातला. मघाशी काढलेलं शेळीचं दूध चुलीवर उतू चाललं होतं. चुलीतला आर मागं ओढून तिनं त्या उकळत्या दुधाला शांत केलं. एका जरमलच्या पिलटीत त्यातलं थोडं दूध ओतून तिनं ते मांजराच्या पुढं सारून दिलं. डोळं मिटून ते गरमागरम दूध मांजर पिऊ लागलं.

गावात एव्हाना दिवेलागण झाली होती. अजून सगळ्या घरात लाईट पोहचली नव्हती. घराघरांतून धपाधप भाकऱ्या थापल्याचं आवाज कानी पडत होतं. गल्ल्यांतली कुत्री भुंकत होती.

दिवा विझवून म्हातारीनं खोपटाचं दार बाहेरून ओढून घेतलं. मस्त भात आणि शेळीचं दूध खावून तिनं एक समाधानाची ढेकरपण देऊन टाकली. सावकाश टेकाड उतरत चांदण्या प्रकाशात ती गावात शिरली.

“दुरपे? हाय का गं जागी? का डोळा लागला?” आपली समवयस्क दुरपा म्हातारीकडं ती सांच्याला बसायला यायची.

“डोळा मस्त लागंल गं; पण झोप लागाय नकू? अन् खाली का उभी वट्ट्यावर यि की.” दुरपा म्हातारी वाकळंवर पडूनच म्हणाली. म्हातारी मग ओटा चढून वर आली आणि तिच्या बगलेला जाऊन बसली.

“पोटाला काय घातलं बितलं का न्हाई?” दुरपा म्हातारीनं तिला विचारलं.

“मस्त दूधभात खाऊन आल्याय. पोटाला कितीसं लागतया?” म्हातारी म्हणाली.

आज म्हातारी तिच्याकडं उद्याच्या सणाला गुढी उभारायला साडी-लुगडं मागायला आली होती; पण विचारायचं कसं म्हणून ती बोलू की नको करत शांतच बसून राहिली होती.

“त्या नंदीची कणसं खुडायला जातीया वी?” मघाचपासूनची शांतता तोडत दुरपा म्हातारीनं तिला विचारलं.

“हं. शेर दोनशेर दानं हुत्यालं म्हटलं. शीळीबी जोगवून निघत्याय. आजून काय पायजी?”

“आगं पण झेपतं तर का तुला?”

“काय करायचं मग? रोजच्याला काय इट्टल यिल का भाकऱ्या थापाया?” काहीशी हसून ती म्हणाली.

“हां. आन् रकमा बरी यिव दिल गं त्येला.” दुरपा म्हातारीपण मजा करत तिला म्हणाली. दोघीही हसू लागल्या.

“दुरपे, एक काम हुतं गं माझं.” म्हातारी थोडी दबकतच म्हणाली.

“ते गं कसलं?”

म्हातारीला आता मागू की नको मागू असं झालं होतं; पण तिला उद्या आपल्या दारात गुढी उभारायचीच होती. ती म्हणाली, “तुझ्या सूनंला ईचारून बघ की एखादी साडी नायतर लुगडं दित्याय का म्हणून. नाय मंजी मी सांच्याला आणून दिल.”

“का गं? कुठं परगावी बिरगावी..?”

“नाय गं. ती आपली गुडी उभारायची हुती.. म्हणून.”

त्यावर दोघीही म्हाताऱ्या गप्प झाल्या. एकीला आपल्या सुनेला कसं मागायचं आणि दुसरीला यांच्याकडून तर गुढीसाठी साडी- लुगडं मिळंल का हा प्रश्न!

“आता ईचारु म्हणतीस सूनंला?” दुरपा म्हातारीनं विचारलं.

“आता रातचं इंदारचं कशाला? तांबडं फुटायला ईचार उद्या.” म्हातारी म्हणाली. त्यावर दुरपा म्हातारी नुसती हसली. दोघीही मग आभाळकडं नजर लावून बसून राहिल्या. चांदणे पाहत!

“कलंड जरा.”

“नगं, कलंडल्याव डोळा लागंल.”

गांव निजू लागला होता. लोकं दिवाबत्त्या घालवून अंथरुणे जवळ करत होते. काही गाढ झोपीही गेले होते. म्हातारीच्या मात्र स्वप्नात तिच्या खोपट्याच्या वर असलेल्या उंच खणकूटाला एक गुढी जोरजोरात लहरत असलेली दिसत होती.

दिवस उगवायच्या आत म्हातारीनं डाळ शिजवून घेतली. आज दारात गुढी उभारायचीच असं तिनं मनाशी पक्कं केलं होतं. त्यासाठीच हा तिनं पोळ्यांचा बेत होऊ घातला होता.

उजाडल्या उजाडल्या लगेच कुणाच्या दारात का म्हणून जायचं म्हणून ती आंघोळ- पाणी करून दिवस चांगला कासरा दोन कासरा वर आल्यावरच दुरपा म्हातारीच्या दारी येऊन थडकली.

दारात एका येळवाच्या लांब काठीवर मस्तपैकी गुढी उभारली होती तर दुरपा म्हातारी एकटीच ओसरीत एक पाय गुडघ्यात मुडपून त्यावर कोपर ठेवून हात डोक्याला लावून बसली होती. कुणाशीतरी सकाळी सकाळी बिनसल्यागत!

“दुरपे? अशी का गं बसलिया. तुला सनसुद काय कळतू का नाय?” ओट्याखालूनच म्हातारी तिला म्हणाली.

“मला मस्त कळंल गं. माझ्या त्या सुनंला कळूनी का?”

“का गं काय झालं?”

“तू आधी वर यी. सांगती. नायतर हायत्या बायका आग लावायला.” दुरपा म्हातारी असं म्हणताच ती लगबगीनं ओटा आणि मग ओसरी चढून वर गेली व तिच्या शेजारी जाऊन बसली आणि दबक्या आवाजात तिला म्हणाली, “हं. सांग आता.”

“आगं म्या आंगूळ करून लुगडं पिळलं नाय. म्हटलं पिळंल ही. तर सणाला मलाच वटावटा करून गेलीया.”

“आन् मग गुडी?”

“नवरा-बायकोनं उभारली बी अन् पूजली बी.”

थोडं थांबून आणि मनात कसलातरी विचार करून म्हातारीनं दुरपा म्हातारीला थोडं दबकतच विचारलं, “ते माझ्या लुगड्याचा ईषय..?”

“कुठलं काय.” म्हणत दुरपा म्हातारीनं तोंड मुरडलं. आता काही आपली गुढी उभा राहत नाही नी आपला पाडवादेखील होत नाही या विचारानं मग म्हातारी मनातून निराशच झाली. तिचा चेहरा पुरता उतरला.

ऐन सणाच्या वारी झालेल्या हिरमोडामुळं म्हातारी खाली मान घालून घराकडं निघाली. आपल्या लेकानं रामचंद्राजवळ लुगडं पाठवून दिलं असतं तर आजचा दिवस आपला खुशीचा झाला असता असं तिला न राहून वाटत होतं.

रामचंद्राच्या दरात येताच तिची नजर त्याच्या दारातल्या चांगल्या दिमाखात उभ्या असलेल्या त्या गुढीवर पडली. काठपदराचं एक नवंकोरं लुगडं त्यावर घट्ट आवळून बांधलं होतं. नारायण पाठवायचा अगदी तस्संच!

“राम्याची बायकू कधीपस्न लुगडं नेसाया लागली म्हणायची?” म्हातारी एकटीशीच पुटपुटत खोपटाकडं चालली होती.

आणि अचानक कसा काय कुणास ठाऊक; पण सोसाट्याचा वारा सुटला. धुळ आभाळभर उडू लागली, वाळलेला पाला-पाचोळा घिरक्या खात वाऱ्यावर उडू लागला. गंजींच्या पेंडया पोरींनी फुगडीचा फेर धरावा तशा हवेत उडाल्या. गुरंढोरं दावणीशी स्तब्ध झाली. रस्त्याची लोकं आडोशाला गेली. कुणाच्या घराचे पत्रे, तर कुणाच्या घराची कौले आवाज करत उडाली. कुत्री जोरजोरात भुंकू लागली. वलणीची कापडं देखील उडाली आणि असं अचानक उडलेलं वावटळ तसंच अचानक शांत देखील झालं.

टेकडाखालच्या नंदुरकीच्या आडोशाला बसून राहिलेली म्हातारी मग अंदाज घेत उठली. एकवार तिनं नजर आपल्या खोपटावर टाकली. खुराडा, खोपटं शाबूत होतं. तिला समाधान वाटलं. खोपट्याच्या वर असलेल्या त्या उंच खणकूटाने मात्र तिची नजर खिळवून ठेवली. एक साडी कुठूनतरी उडून येऊन त्याच्या टोकाला लटकली होती. आता वाऱ्यावर झुलत होती. सावकाश!

gudhi padwa
gudhi padwa

गुढी उभारली गेली होती! पाडवा पार पडला होता!

म्हातारी मग लगबगीनं वर येऊन शिजवलेली डाळ वाटू लागली. पाट्यावर वरवंटा जोरजोराने चालू लागला. म्हातारीचं सुरकुतलेलं हात जणू हातांत विलक्षण ऊर्जा आल्यागत वरवंटा चालवत होतं.!

[समाप्त]

चिमणी गेली उडून

रुपेरी रिंगण, भाग ४

रुपेरी रिंगण, भाग ३

रुपेरी रिंगण, भाग २

रुपेरी रिंगण

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

माय व्हॅलेंटाईन

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi with moral

 marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,

 


Spread the love

2 thoughts on “पाडवा

    • Author gravatar

      मस्त ग्रामीण लिखाण आहे तुमचे . दोन तीन कथा वाचल्या ,, काळजात भिडल्या , अस्सल ग्रामीण भाषा , वास्तव लिखाण खूप मनाला भावले , एखादी कथामालिका प्रकाशित करा रेडकू , पाडवा , चिमणी उडाली मस्त कथा आहेत

      देविदास कापसे 9421213378

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *