• Pune, Maharashtra
कथा
न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

Spread the love

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५ new year party night

“इन्स्पेक्टर साहेब, मला श्रेयाशी थोडं बोलायचं आहे. प्लीज थोडा वेळ देता?” निर्विला वरती ठेवून स्वप्नील धावतच खाली आला आणि गाडीत बसलेल्या इन्स्पेक्टर कदमांना म्हणाला.

New Year Party Night, Images are illustration purpose only
New Year Party Night, Images are illustration purpose only

“वेळ बीळ काही मिळणार नाही. आधीच उशीर होतोय आम्हाला. तुम्हाला जे काही विचारायचे आहे, बोलायचे आहे, ते, तिकडे, स्टेशनला येऊन. आता घाई आहे आम्हाला.” असे म्हणत त्याने हातानेच स्वप्नीलला बाजूला होण्याचा इशारा केला आणि ड्रायवरला देखील हातानेच इशारा करीत त्याने गाडी पोलीस स्टेशनला नेण्याची सूचना दिली.

माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

lekhani sangram
lekhani sangram

“प्लीज, प्लीज इन्स्पेक्टर साहेब. प्लीज. फक्त पाचच मिनिटे. प्लीज.” मग स्वप्नीलने त्याला विनंती केली.

“ठिकाय; पण फक्त एकच मिनिट.”

“श्रेया, क्. . काय. काय झालंय नेमकं काल? प्लीज मला सांग. सगळं ठीक तर. .” तो तडक तिच्याकडे येऊन विचारू लागला तोच त्याचं बोलणं मध्येच तोडीत ती म्हणाली, “स्वप्नील, आय एम सॉरी. मी तुला दुपारीच बोलायला हवं होतं; पण. .”

“पण काय? काय झालंय? सांग मला.”

“अरे, असं काही नाही..” ती काही बोलणार तोच कदम पुढून जोरात बोलला, “मिस्टर दंडवते तुमचा एक मिनिट संपला बरं का. बाकी तुम्ही पोलीस स्टेशनात येऊन बोला आता. मोटे जाऊ दे गाडी.”

पोलीस स्टेशनात इन्स्पेक्टर कदमसमोरील लाकडी खुर्चीत श्रेया जणू समाधी लागल्यासारखी बसली होती. कालच्या न्यू इयर पार्टीतील काही प्रसंग ती आठवून पाहत होती. पार्टी, नाच, कलीग्ज, नशा, कार, रस्ता, पाठलाग करणारी कार, अपघात, टेमघर, पाणी, गुदमरणे, विशाल आणि मग तो सारा प्रसंग!

“काही आठवतंय?” इन्स्पेक्टर कदमने तिला विचारले.  

“नाही इन्स्पेक्टर साहेब.” ती म्हणाली.

“ड्रग्स वैगेरे करता?”

“नाही ओ साहेब. लहान मुलगी आहे मला.”

“का? मुलं असणाऱ्या बायका करत नसतात का ड्रग्स?”

“आय डोन्ट नो; पण मी नाही करत काही.”

“ते रिपोर्ट सांगतीलच तुमचे; पण परत एकदा नीट आठवून पहा आणि सांगा. पार्टीत किंवा परत येताना कुणी तुमच्या पाळतीवर वगैरे..” तो असं म्हणताच ती लगेचच म्हणाली, “नाही इन्स्पेक्टर.”

पण मग लगेच तिला कालचा तो प्रसंग आठवला. कुणीतरी आपला पाठलाग करीत असल्याचा; पण तो सांगावा तर मग तोही म्हणजे विशालचा प्रसंगही सांगावा लागेल. म्हणून मग ती गप्प बसली.

“कुणावर काही संशय? नाही म्हणजे ऑफिसात, ऑफिसाच्या बाहेर कुणाशी काही भांडण?”

“असलं काही नाही इन्स्पेक्टर साहेब.”

“घरात नवऱ्याशी? तुमचं तुमच्या नवऱ्याशी. . ?”

“काहीही काय विचारताय तुम्ही.”

“आमचं कामच आहे मॅडम. हा अपघात होता की घातपात हे तपासायला नको? नाहीतर तुमचे ब्लड सॅम्पल्स येतीलच मग लागतील ड्रिंक अन् ड्राइवची कलमे. चालेल?”

ती असं म्हणताच ती काहीशी वरमली. म्हणाली, “साहेब, काल पार्टीत घेतली होती आणि त्यामुळेच हा अपघात घडला. बाकी काही नाही साहेब; पण काही कलमे वैगेरे नको ना.”

“ते तर आहेच ओ मॅडम; पण आता अपघाताची नोंद झालीय. पंचनामा झालाय. आम्हाला कायद्यानुसार जावं तर लागेलच.” कदम म्हणाला.

“साहेब, या फाईलचं काम इथवर झालंय. हे काही फोटो आहेत घटनास्थळी घेतलेले आणि बाकीचे काही रिपोर्टस व पंचनामा आहे. फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट यायला वेळ लागेल म्हणताहेत. हाडांचा सांगाडा उरलाय ना नुसता. म्हणून..” हवालदार माने धडक तिथे येऊन कदमांच्या समोर एक फाईल धरून त्यांना सांगू लागला.  

“ठिकाय ना माने; पण तुम्ही स्वस्थ नका बसू. तपास सुरू ठेवूया आपण. पाहूया काय हाती लागतंय का ते.” कदम म्हणाला आणि त्याने श्रेयाकडे पाहिले आणि मग पुन्हा मानेंकडे पाहत तो म्हणला, “च्यायला आपलं कसं झालंय ना ते, त्या म्हणीगत, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे!तशा दोन दोन केसेस अॅट ए टाईम. ”

“माझी चौकशी झाली असेल तर मी येऊ?” श्रेयाने विचारले.

“साहेब यांना काही माहिती असेल तर पाहूया? नाही म्हटलं स्पॉट तोच होता ना.” माने कदमांच्या कानात पुटपुटला.

कदमने मग एकदा मानेंकडे पाहिले आणि मग श्रेयाकडे पाहत तो ती फाईल तिच्या पुढे सरकवत म्हणाला, “ हे फोटो पाहून काही ओळखता येतंय का पहा. ही कार.”

“पण हे माझ्या कारचे नाहीयेत. रंग पुरता उडाला आहे. त्यात नंबर देखील अस्पष्ट दिसतोय.”

“हो तुमच्या कारचे नाहीत ते; पण तुमची कार पाण्याबाहेर काढताना आम्हाला ही आणखी एक कार सापडली म्हणून विचारलं; पण नसेल तुमचा काही संबंध.”

“मग येऊ मी?” तिने विचारले.

“हं या.” कदम म्हणाला तशी श्रेया खुर्चीतून उठली आणि जायला मागे वळली.

“कधी कधी बायकोचं बाहेर अफेअर आहे समजल्यावर देखील नवरे असं करू शकतात मॅडम. बरं का?” ती जाता जाता कदम तिला बोललाच. तिने मग मागे वळून एक जळजळीत काटाक्षच टाकला त्याच्यावर. कदमने तशी आपली नजर खाली केली; पण तिच्या कटाक्षातला जळजळीतपणा फार वेळ टिकला नाही. दुसऱ्याच क्षणात मग तिच्या डोळ्यांसमोर रात्रीचा तो प्रसंग उभा राहिला आणि ती एक अपराधीपणाच्या नजरेने ताडताड पाऊले टाकत ती बाहेर पडली.

बाहेर पडून तिची नजर आता काहीतरी शोधत होती. तिची कार. पोलीस स्टेशनच्या बाजूला एका अडगळीच्या जागेत बरीच वाहने भंगारात गंजत पडली होती. त्यात तिला तिची कार नजरेस पडली तशी ती तिकडे गेली.

कालच्या अपघाताने तिचे बरेच नुकसान झाल्याचे दिसत होते. बोनेटचा चांगलाच चुराडा झाला होता. ठिकठिकाणी ओरखडे देखील आले होते. श्रेया सावकाशपणे हाताचा स्पर्श करून आपली कार पाहत होती आणि एवढं सगळं होऊन देखील आपण व्यवस्थित सुरक्षित आहोत याचे तिला आश्चर्य आणि मनोमन समाधान देखील वाटत होते.

“थॅंक गॉड तू आलास विशाल, नाहीतर मी. .” मग ती स्वत:शीच पुटपुटली. तिला कळून चुकले की रात्री त्याने जर तिची सुटका केली नसती तर आज या क्षणी ती इथे नसतीच; पण आपल्याला वाचवून तो असा गेला तरी कुठे? ना घरी होता ना आणखी कुठे. कुठे निघून गेला असेल बरं? ती त्याच्या विचारांत हरवून गेली होती आणि..

आणि एकदम तिची नजर तिच्या कारच्या काही अंतरावरच उभ्या केलेल्या त्या कारवर पडली. ती कार. ती कार मघाशी इन्स्पेक्टर कदमांनी तिला फोटोत दाखवली होती ती. अगदी तशीच आताही होती ती. कुतुहलापोटी मग ती त्या कारजवळ आली. कसल्यातरी ओढीने ती तिच्याभोवती फिरून फिरून पाहू लागली.  

ड्रायवर सीटच्या बाजूला असलेल्या दरवाजाला तिचा हात लागताच तो दरवाजा उघडला गेला. तिने तो आत दाबण्याचा प्रयत्न केला परंतु तो पुन्हा उघडला गेला. दरवाजा काही बसत नाही हे पाहून तिने तो तसंच ठेवून दिला आणि ती मागे वळणार तोच तिची नजर त्या कारच्या डॅशबोर्डवर पडली.

तो.. तो.. तोच.. तो लाफिंग बुद्धा! तिने विशालला दिलेला. तस्साच होता अगदी तो. नुसताच ढकललेला तो दरवाजा तिने प्रकाशवेगाने उघडला. श्वासगती तेज होऊन ती ताडकन सीटवर बसली. बुद्धाच्या त्या लहान मूर्तीकडे आपले डोळे नेऊन तिने ती ओळ. . पुसटशी दिसत असलेली, ती वाचण्याचा प्रयत्न केला.

‘Wishes to Vish..’- पुढचं सगळं मुजलं असल्याकारणाने वाचता आलं नाही; पण तिला समजलं. ती. ती विशालचीच कार होती. काळजात एकदम धस्स झालं. अवसान गळून पडलं. धमन्यांतून वाहणारं रक्त एकदम थंड पडलं. जणू गोठलंच होतं ते. तिचे हात कारच्या त्या स्टीअरिंगवर घट्ट चिकटले होते. डोळ्यांतून अश्रूंचे घडे कधीचे वाहत होते.

आपला विशाल आपल्याला पाच वर्षांपूर्वी सोडून केव्हाचा दूर निघून गेला होता. कधीही परत न येणाऱ्या त्या वाटेला तो लागला होता आणि आपल्याला त्याची अगदी पुसटशीही कल्पना नव्हती. केवढं आपलं दुर्भाग्य ते! कितीतरी पुढे, कितीतरी लांब, डोळ्यांना न दिसण्याइतपत तो निघून गेला होता. कदाचित आता आपणही त्या वाटेने त्याच्या शोधार्थ जाऊ तरीही आपली आणि त्याची गाठ पडणार नाही.

ती वाट पुढे कुठे जाईल? स्वर्गात की नरकात? नाही नाही. तो स्वर्गातच जाईल. मग पुढे ती वाट दुभंगली तर? त्याचा पाठलाग करता करता मीच नरकाच्या द्वारी पोहचले तर? एकदाही नाही का पडणार आपली त्याच्याशी गाठ?

मग काल जे आपल्यात घडलं ते काय होतं? त्याचीच तर ती योजना नव्हती ना? एकदा शेवटचं भेटण्यासाठी? की मी इथे या पाण्याच्या तळाशी एकटा पडून आहे म्हणून सोबतीला तर बोलवत नव्हता ना तो? नसेल तसं. त्यानेच तर आपल्याला बाहेर आणलं.

आणि.. आणि नंतर तो.. तो प्रसंग. त्याने कुठे काय केलेलं? मीच तर त्याला चुंबत होते. मीच होते चिंब ओली तरीही विस्तवासारखी तप्त नि संतप्त. मीच मग त्या सावळ्या ढगाशी सलगी केली आणि बरसवला तो एकदाचा. कित्येक वर्षांची तृष्णा शमवली त्याच्या प्रत्येक एका थेंबाने. तरीच  पाण्यातून येऊनही त्याच्या मिठीत ती विलक्षण ऊब का उगीच जाणवलेली आपल्याला? तोच होता तो? आपला विशाल? अहं!

आत्मा! विशालचा! त्याच्या आत्म्याशी एकरूप झालेले मी! आत्मीय समागम होतं ते! तिचे मन तिच्याशीच बोलत राहिलं.

ती आपले हात स्टीअरिंगवर घट्ट पकडून त्यावरच डोके आपटीत भरपूर रडली. पाच वर्षांपूर्वी जो पतंग हृदयापासून खूप दूर नजरेआड त्या ढगांच्या पल्याड उडत होता असं वाटत होतं तो आज अचानक त्याच्याही पल्याड दूर, त्या अनंतात उडाला आहे. तो त्याचा दोरा आता सैल पडला आहे आणि वाऱ्यावर सैरभैर हेलकावत आहे, असं तिच्या अंत:करणात झालं.

तिने काही क्षण त्याच्या आठवणीत तिथे कारमध्ये व्यतीत केले. स्व:ताला सावरलं आणि मग ती एकटक कशात तरी हरवून गेली. तंद्री लागल्यासारखी. मनात खूप काही सुरू असावं तिच्या. तिच्या कपाळावरच्या आट्या आणि भुवयांची ती हालचाल काहीतरी औरच सांगत होती. काहीतरी भयानक!

[पुढील भाग अंतिम असेल…]

कथेचा आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

न्यू इयर पार्टी नाईट भाग ४ New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *