
मिशन सूर्यमाला – उड्डाणापूर्वी
मिशन सूर्यमाला – उड्डाणापूर्वी
पृथ्वी. असा ग्रह ज्याची निर्मिती साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली. कुणी याला ‘निलग्रह’ म्हणतो तर कुणी ‘जलग्रह’ म्हणतो.
एका अंतराळ महास्फोटात जे लहान लहान तुकडे इतरत्र विखुरले गेले, त्या तुकड्यांपैकी एक तुकडा म्हणजे आपली पृथ्वी. असे अनेक तुकडे एकत्र येऊन आपली सूर्यमाला तयार झाली. सूर्य हा या तुकड्यांच्या केंद्रस्थानी राहिला व गुरुत्वीय बलामुळे इतर तुकडे त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालू लागले. त्यामुळे प्रत्येक तुकड्याची एक ठराविक कक्षा निर्माण झाली. या तुकड्यांना आता आपण ग्रह म्हणतो!
पण त्यागोदर, खरंतर ‘मिशन सूर्यमाला’ मी पहिल्यांदा साधारण २००५ साली लिहिलेली. हायस्कूलला होतो तेव्हा! नंतर २००९ साली ती थोडे बदल करून लिहिली आणि आता ती मी अगदी किंचितसे बदल करून इथे लिहीत आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला ती काहीशी आउटडेटेड वाटण्याची नाकारता येत नाही. पण मज्जा येईल तुम्हाला! वाचत रहा! खासकरून आपल्या लहान मुलांना नक्की वाचायला द्या!

आपल्या पृथ्वीलाही अगदी सुरवातीच्या काळात ठराविक आकार नव्हता. महास्फोटानंतर तयार झालेला तो एक ओबडधोबड असा तुकडा होता, तसेच तो एक तप्त गोळाही होता. नंतर हळु हळु तो थंड होत गेला. परिवलन आणि परिभ्रमण या गोष्टींमुळे तिचा आकार गोलाकार होत गेला. मग हळु हळु पृथ्वीवर वातावरण निर्मिती होत गेली. वातावरणातील बदल यामुळे पृथ्वीवर वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण होऊ लागल्या. निरनिराळे वायु आणि बाष्प असे घटक वातावरणात मिसळू लागले. बाष्पाचे प्रमाण इतके वाढले की वातावरणात गारवा गारवा निर्माण होताच पाऊस पडू लागला. पुढे जाऊन पाणी आणि वातावरणातील इतर वायु यांची रासायनिक अभिक्रिया होऊन पहिला एकपेशीय जीव पृथ्वीवर अस्तित्वात आला. आणि पृथ्वीवर जीवसृष्टीची नांदी झाली!
नंतर हळुहळु बहुपेशीय सजीव अस्तित्वात आला. वनस्पती वाढीस लागल्या. हळुहळु जीवसृष्टीत उत्क्रांती होत गेली. पृथ्वीवर डायनासोरसारखे महाभयानक व महाप्रचंड प्राणी अस्तित्वात आले व भूकंप, ज्वालामुखी आणि उल्कापातांमुळे ते नष्टही झाले. जे सजीव प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगले ते मात्र शेवटपर्यंत टिकले.
मानवाचीही उत्क्रांती आशाचप्रकारे झाली. माकड हे आपले पूर्वज आहेत. माकडांत होत गेलेल्या बौद्धिक आणि शारीरिक बदलाचा परिणाम म्हणजेच आजचा हा मानव आहे आणि याचे पुरावेही ठिकठिकाणी केलेल्या उत्खननात सापडतात. परिस्थितीनुसार माकडात जे बदल झाले, त्यामुळे त्याच्यात उत्क्रांती होत गेली. चार पायांवर चालणारे माकड दोन पायांवर चालू लागले.
सुरवातीला माकड म्हणजेच आपण वृक्षचरच होतो. मग उत्क्रांती आपल्याला बदलत गेली आणि आपल्या पाठीचा कणा हळुहळु ताठ होत गेला, आपण आपल्या दोन्ही पायांवर ताठ उभे राहून चालू लागलो. मानवाचा मग झाडाचा आसरा हळुहळु मग कमी होत जाऊन तो गुहेकडे जास्त झाला आणि यात त्याचे शेपूटही कमी वापरात येऊन कालांतराने तेही नाहीसे झाले.
आपल्यात फक्त शारीरिक उत्क्रांती झाली नाही तर ती बौद्धिकरित्याही झाली. मानवाला पक्षी-प्राणी यांच्या आवाजावरून भाषा विकसित झाल्या. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होऊ लागली. ऊन, पाऊस, थंडी यांपासून संरक्षण मिळावे म्हणून झाडाच्या साली (वल्कले), पाने अंगाभोवती गुंडाळून घेतली. हळुहळु आपण मग समूहाने राहू लागलो. सुरवातीला गुहेचा अश्रय घेतला गेला. त्यानंतर अन्नाची गरज भागवण्यासाठी शेतीचा पर्याय अवलंबला, नाहीतर फळे, कंदमुळे आणि कच्चे मांस हे आपले अन्न होतेच! मग शेतीबरोबरच आपण पशुपालनही करू लागलो. अशारीतीने समूहाने राहता राहता आपल्यांत सामाजिक जाणीव वाढीस लागली.
आगीच्या शोधाने तर मानवी जीवनात तर प्रकाशच निर्माण केला. सुरवातीला अग्नीला पाहून माणूस दूर पळून जात होता; पण अग्नि ही एक संहारक शक्ती नसून ती आपल्याला ऊब व प्रकाश देते याची जाणीव मानवाला झाली. अशाप्रकारे मानवाच्या उत्क्रांतीत भर पडतच गेली व नवनवे शोध लागतच गेले. चाकाचाही शोध फार महत्वाचा मानावा लागेल, कारण त्या शोधामुळे मानवी जीवनास खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली. हाच शोध खरा क्रांतिकारक ठरला, कारण दळणवळणाची सोय या चाकाच्या शोधामुळे झाली.
पण जेव्हा मात्र धातूचा शोध लागला तेव्हा मग खरी मानवाची प्रगती सुरू झाली. अश्मयुगात आपण दगडाची हत्यारे, भांडी वापरत होतो, तर धातुयुगात आपण धातूंची हत्यारे व भांडी वापरू लागलो. आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण अनेक शोध लावत गेलो. छपाईचा शोध जेव्हा लागला तेव्हा तर संदेशवहन इतके सुलभ झाले की आपला फार वेळ वाचू लागला. जसजसे नवनवीन शोध लागत गेले तसतसे उद्योगधंदे वाढत गेले. त्यांना फार महत्व प्राप्त झाले. वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन, कापड विणण्याचे यंत्र, मोटरगाडी यांचे शोध लागले गेले. मानवाला तीस हजार वर्षांत जेवढी प्रगती साधता आली नाही, ती नंतर त्याने अलीकडच्या पाचशे वर्षांत साधून घेतली.
विसाव्या शतकात तर कमालच झाली. शतकाच्या सुरवतीसच १९०३ साली राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. हा शोध म्हणजे काही साधासुधा नव्हता. मानवी संस्कृतीची आकाशात भरारी घेण्याची ही कदाचित पहिली नांदी असावी; पण असं म्हटलं जातं की, एखादी चांगली घटना घडत असताना तिच्या दुसऱ्या अंगाला काहीतरी वाईट घडण्याची सुरवात ही झालेली असते. मानवाच्या बाबतीतही असंच झालं. विसाव्या शतकात दोन भयंकर महायुद्धे झाली. त्यात फार मोठी जीवितहानी झाली. जपानवर अणुबॉम्ब हल्ला झाला. सगळ्या जगाने युद्धाची झळ अनुभवली. विमानांचा जास्तीत जास्त वापर युद्धासाठी केला गेला. तसेच क्षेपणास्त्रांच्या बाबतीतही असेच झाले. त्यामुळे लोकांची अशी समजूत झाली की ही सर्व साधने संहारक आहेत; पण १९५७ साली रशियाने ते खोटं ठरवलं. ‘स्फुटनिक’ हा उपग्रह पहिल्याप्रथम रशियाने अवकाशात सोडला आणि अंतराळयुगाला प्रारंभ झाला. परंतु अमेरिकेचा असा गैरसमज झाला की रशिया त्याच्याविरुद्ध काहीतरी डाव आखतोय, म्हणून त्यांनी नासाची स्थापना केली व त्याद्वारे आज अमेरिकेने अंतराळ संशोधनात फार मोठी कामगिरी केली आहे. चंद्रावर पहिले पाऊल अमेरिकेने टाकले. आज अमेरिकेची दोन अंतराळ याने मंगळ ग्रहाच्या दोन्ही ध्रुवावर विराजमान आहेत. प्रत्येक देशाचे उपग्रह आज पृथ्वीभोवती फिरत आहेत. प्रत्येक देशात आज प्रगतीची चढाओढ सुरू आहे. अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र यांची निर्मिती करण्यात आज प्रत्येकजण गुंतला आहे. आपण एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून जगासमोर उभं राहू असं प्रत्येक राष्ट्राला वाटू लागलंय. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मानव आज सर्वांगीण प्रगती साधण्यात व्यस्त आहे.
परंतु, ही प्रगती करता करता मानव स्वतःचं स्वरूप, अस्तित्व हरवून गेला आहे. औद्योगीकरणासाठी भरपूर जंगलतोड केली त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पार ढासळला आहे. शहरीकरणामुळे राहणीमान बदलले आणि मानवी वृत्तीही बदलली. बेसुमार जंगलतोडीमुळे पावसाचे संतुलन बदलले आणि काही ठिकाणी महापूर तर काही ठिकाणी दुष्काळ पडू लागले. काही ठिकाणी उपासमार होऊ लागली तर काही ठिकाणी खून-दरोडे पडू लागले. बेकारीत वाढ झाली. खनिजसंपत्तीही मानवाने सोडली नाही. वाहनांसाठी खनिजतेलचे साठे त्याने बेसुमार उपसले व ते आज इतकेच शिल्लक आहेत की ते पुढील काही वर्षेच पुरतील.
मानवी हस्तक्षेपामुळे प्रदूषण वाढले गेले आहे. औद्योगिक सांडपाणी सरळ नद्यांत सोडले जात असून ते पिण्याच्या पाण्यासोबत घराघरांत येत आहे. धूरांमुळे होणारे वायुप्रदूषण तर फारच घातक होत चालले आहे. अनियमित वादळे आणि भूकंप येताहेत व भयंकर जीवित- वित्त हानी करत आहेत. या साऱ्यांचा अप्रत्यक्ष परिणाम पृथ्वीवर होतं आहे. मानवी हस्तक्षेपामुळे तिचे आता जणू शेवटचे दिवस शिल्लक राहिले आहेत. खनिजसंपत्ती संपण्याच्या मार्गावर आहे. हीच गोष्ट पाणी आणि हवेच्या बाबतीत आहे. वाढत्या लोकसंख्येचा भार आता पृथ्वीला पेलावत नाही. तिच्या दोन्ही ध्रुवावरचे बर्फ आता वितळू लागले आहेत. त्यामुळे समुद्रपातळीत वाढ होऊन जगबुडी होईल की काय अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. एकंदरीत ही सर्व सजीवसृष्टी आता आपल्यामुळे नष्ट होणार याची खात्री मानवाला पटली आहे.
आपली पृथ्वी नष्ट होणार या धास्तीने जग खडबडून जागे मात्र झाले आहे. ज्या ग्रहाने आपल्याला सुरवातीपासून सांभाळले त्याला नष्ट कसे काय होऊ द्यायचे? पण हे अशक्य आहे. पृथ्वीचा अंत निश्चित आहे!
आणि म्हणूनच हा धूर्त मानव अंतराळात कोणत्या दुसऱ्या ग्रहावर त्याच्यासाठी राहण्यास अनुकूल असे वातावरण आहे का ते शोधत आहे. देशोदेशींच्या मोहिमा आखल्या जात आहेत.
मग आपला भारत त्या बाबतीत मागे कसा बरं राहील?तोही अशाच एका मोहिमेच्या तयारीत जिच्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. आणि जर ती मोहीम यशस्वी झाली तर..?
. . . . . . . . . . आणि म्हणूनच हे ‘मिशन सूर्यमाला’!
[पुढे सुरू राहील]
हे ही वाचा:
‘व्हायरस’ वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १
ध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता