• Pune, Maharashtra
कथा
मी मॅरेज मटेरियल mi marriage material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

Spread the love

आपली मागील कथा-मॅरेज मटेरियल marriage material ही कथा तुम्ही त्याच्या अनुषंगाने वाचली. आता तीच कथा सुजाताच्या बाजूने वाचून पाहावी.

मला नव्हतं काही आटपाडीला जायचं; पण बाबा हट्टच धरून बसले आणि माझा नाईलाज झाला. सासऱ्यांना मी बाबाच म्हणते. म्हणायलाच हवं. अगदी माझ्या जन्मदात्या पित्यासारखी माया लावलीय त्यांनी. खासकरून सुरेश गेल्यानंतर.

होय, मी सुजाता! माझ्या सुरेशची पत्नी, बाबांची सून; पण मुलगीच जास्त आणि. . . आणि त्याची. . . त्याची मॅम. अर्थातच मॅरेज मटेरियल. त्यानं सांगितलं असेलच!

marriage material, Images are for illustration purpose only
marriage material, images are for illustration purpose only

कसलं मॅरेज मटेरियल आणि काय! सुरेश अचानक सोडून गेला. आता त्याची विधवा म्हणून आयुष्य कंठीत रहायचे. पण बाबा ऐकायला तयार नाहीत. म्हणे दुसरं लग्न कर. माहेरची मंडळी म्हणतात, दुसरं लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का? तर सासरची मंडळी म्हणतात, पोर अजून उमदी आहे, आयुष्याचा खेळखंडोबा नको करायला.

मी मात्र अडकित्त्यात सापडलेल्या सुपारी सारखी कधी इकडून तर कधी तिकडून कातरली जातेय. चांगलीच दुविधेत आहे मी. दुसरं लग्न करावं तर सुरेश नंतर सासू-सासऱ्यांना सांभाळणारे, त्यांची काळजी करणारे कुणीच नाही मागे. शिवाय पुरुषांचा पुनर्विवाह जितक्या सहजतेने समाज स्वीकारतो तितक्या सहजतेने माझा विधवेचा पुनर्विवाह तितक्या सहजतेने समाज स्वीकारेल? की पाहील नुसत्या वाकड्या नजेरेने आणि हिणविल मला एक विधवा म्हणून? आयुष्यभर?

mi marriage material sangramcha katta marathi podcast

मला तर काहीच कळत नव्हतं. त्यात बाबा चार-दोन ठिकाणी बोलूनही बसलेत लग्नाबद्दल. माझ्या माहेरच्यांना त्यांचं हे वागणं काही पटलेलं नव्हतं. दिल्या घरी सुखी रहा म्हणून त्यांनी केव्हाची मला पाहुणी बनवून टाकलं होतं आणि दिलेल्या घरचे, मी सुखी व्हावी म्हणून मला देण्यासाठी अजून एक घर शोधत होते!

अजून एसटी कशी येईना म्हणून मी माझ्या घड्याळात पाहिले. घड्याळाचे काटे फिरत होते आणि फिरलं होतं माझं नशीब पण. काटे पाहताना नियतीने आपल्या आयुष्यात कसे काटे रोवले होते याची जाणीव झाली आणि आपोआपच समोर वेळ पाहण्यासाठी धरलेला हात खाली गेला. किती वाजले होते कुणास ठाऊक घड्याळात. माझ्या मात्र नशिबाचे बारा वाजले होते.  

‘गाडी आली. गाडी आली.’ आमच्यासोबत एसटीची वाट पाहणारे कुणीतरी म्हणाले आणि सगळेजण तयारीत राहिले. पंढरपुर- आटपाडी बस होती ती. बाबा माझ्या मागेच उभे होते. बस अगदी पुढ्यात येऊन थांबली आणि आतून प्रवासी एकामागून एक उतरते झाले.

“सुजाता, चल बाळ.” बाबा म्हणाले. मला अगदी गहिवरून आल्यासारखे झाले होते. आटपाडीला जाऊन मला आई-बाबांच्या दु:खाचे कारण नव्हते बनायचे. ऊठ सुठ शेजारच्यांचे टोमणे आणि कोरडी सहानुभूती मला कशी काय सहन होणार होती?

जड अंत:करणाने मी वरती पाऊल ठेवले आणि बसण्यासाठी सीट शोधीत मी वरती चढून आले. एक होतं रिकामं. तिथे मी बसायचे ठरवले आणि बाबांसाठी जागा शोधण्यासाठी इतरत्र नजर टाकली आणि. . . आणि समोर. . . तो होता.! माझ्याकडेच पाहत होता. कधीपासून कोण जाणे; पण अगदी हरवल्यासारखा वाटला. क्लासमध्ये असताना देखील अस्साच पाहायचा अगदी!

पण तेव्हा तो दिसायला पण बरा वाटायचा. आत्ता अगदीच बदललाय. टक्कल देखील पडू लागलंय की त्याला. सुरेशला देखील तस्संच होतं अगदी. मुलांना पण ना हल्ली लवकरच टक्कल पडतं.

त्यात ग्रामसेवक आहे तर वरकमाई चांगलीच होत असणार! पोटही सुटू लागलं होतं की त्याला, म्हणून वाटलं तसं. मागे एकदा क्लासमधील नेहा भेटली होती तीच बोलली होती त्याच्याबद्दल.

कस्सा अजूनही ढम्यागत मलाच पाहत उभा होता तो. सात वर्षांतून पाहत होता ना, म्हणूण असेल कदाचित. वाटलं जाऊन सांगावं त्याला, आता मी तुझी क्रश नाही राहिले, नियतीने माझे आयुष्य क्रश करून टाकलंय म्हणून; पण-

विचारमग्न मी माझ्या तंद्रीतून बाहेर आले आणि बाबांना मागे जाऊन बसण्यास सांगून मी माझ्या सीटवर बसले. बाबांना पण नेमकं त्याच्याच शेजारी जाऊन बसायचं होतं? आता याच्यापुढे त्यांनी माझ्या लग्नाचा विषय काढू नये म्हणजे भागलं असा मनातल्या मनात विचार करीत मी मात्र पुढे पाहत राहिले.

जरा विचित्रच प्रसंग होता. कधीकाळी आपण कुणाची तरी क्रश असतो, कुणालातरी आपण आवडत असतो; पण समोरचा कधी आपल्याला विचारत नाही ना आपण कधी त्याला विचारायला जात नाही. मात्र एकमेकांना चोरून, अगदी लपून छपून अधून मधून पहायचे. नजरेनेच नजरेला खुणावण्याचा प्रयत्न करायचे मात्र विचारायचे धाडस कुणी नाही करायचे. मला वाटलं असल्याच कारणाने आम्ही मुली मुलांच्या नेहमी क्रशच राहत असेल.

तो ही तस्साच मला पाहायचा क्लासला असताना अन् मी? मी त्याच्याही नकळत त्याला पाहायचे. आत्ताही तो मलाच पाहत असेल, मला खात्री होती. का कुणास ठाऊक मागे एकदा तरी पलटून पाहावं असं मनोमन वाटत होतं; पण आपण आता ती सुजाता नाही आहोत ही भावना जेव्हा मनाला स्पर्शून गेली तेव्हा हात आपोआप माझ्या मोकळ्या गळ्याकडे गेला. काही दिवसांपूर्वी त्यात सुरेशच्या नावाचे मंगळसूत्र होते. आज तो रिकामा आहे. उद्याचं नाही माहिती मला.

सुरेशच्या आठवणी अजूनही माझ्या मनात अगदी तश्याच आहेत. अगदी ताज्या. तरीही मी एखाद्याबद्दल असा विचार कसा काय करू शकते? माझे मन माझ्याशीच भांडू लागलं होतं. हृदयी एवढी भळभळती जखम असताना अंतरीतील जुन्या एखाद्या आटलेल्या झऱ्याच्या ओलाव्याने मनाला सहस्रो सुया टोचल्याच्या वेदना होत होत्या.

माझ्यासारख्या विधवेने असले विचार बाळगणे म्हणजे-

का? वेलीवर येणाऱ्या प्रत्येक कळीला जसा उमलण्याचा अधिकार आहे, तसेच उमलल्यानंतर तिला आपला सुगंध इतरत्र दरवळण्याचा देखील अधिकार आहे. मनाच्या विचारांना कोण कसा बांध घालू शकेल? असवंचे घडे डोळ्यांत साचवित मी खिडकीतून मागे पडणारी झाडे नी घरे पाहत होते.

दिघंची मागे टाकल्यावर गाडीमधील गर्दी चांगलीच ओसरली होती; पण एसटीच्या कडकड कडकड आवाजाने कान बधिर होण्याची वेळ आली होती. त्या आवाजात मला बाबांचा मागून बरीकसा आवाज कानी पडला. त्याच्याशीच बोलत होते ते. काहीतरी स्वीकारण्याच्या गोष्टी करीत होते बहुतेक. फारसे काही कानी नाही पडले; पण विधवा, स्वीकार असे काही अस्पष्ट शब्द माझ्या कानी मात्र पडले. मला कसलाच अर्थ लागला नाही.

एसटी बाजार पटांगणात येऊन उभी राहताच मी पटकन खाली उतरून आले. मला त्याला टाळायचे होते. का कुणास ठाऊक; पण मनाला भीती वाटत होती. तसंही उद्ध्वस्त आयुष्याचे गाऱ्हाणे मलाही कुणाच्यासमोर नव्हते गायचे!

गाडीतून उतरून तो दबकतच माझ्याकडे चालत आला आणि म्हणाला, “सुजाता? ओळखलं का?”

“न ओळखायला काय झाले? मी तर तुझी मॅम. . . अर्थात मॅरेज मटेरियल.” मनातल्या मनात मी बोलले; पण बोलण्याचे धाडस मात्र काही झाले नाही. मी फक्त होकारार्थी मान हलवली आणि काय बोलावे, कसे बोलावे याचा विचार करीत मी तशीच तिथे उभी राहिले.

“जायचं?” बाबांचा आवाज आला मागून. मी मग खाली मान घालून नुसती मान हलवली.

“सून आहे माझी.” बाबा त्याला सांगत होते. मी वरती पाहिले. मोठा आ वासून तो त्यांना पाहत होता. मला काहीच उमगत नव्हते.

“तुमची. . . मुलगी?” असे शब्द त्याच्या तोंडून पडतात तोच बाबा त्याला मध्ये अडवत म्हणाले, “दोन महिन्यांपूर्वी मुलगा गेला माझा अचानक आणि ही विधवा झाली.”

मला आता वरती बघवेना. मी अश्रू ढाळीत खाली मान घालून तशीच उभी राहिले. कंठ अगदी दाटून आला होता. मी जर वरती पाहिलं असतं तर मला रडूच कोसळलं असतं. देवशप्पथ!

काही क्षण आमच्यात शांतता होती. बाजार पाटांगणातल्या त्या गोंगाटाचा देखील आवाज कानी पडत नव्हता आता.

बाबांनी मग रुमालाने आपली आसवे टिपत माझी बॅग उचलली आणि आम्ही वाट चालू लागलो. तो मात्र तसाच उभा असल्याची जाणीव माझ्या मनाला होती. निशब्द, हताश आणि उद्विग्न!

बाबांचा स्वभाव मला माहीत होता. एसटीत मागे बसून त्यांनी त्याला लग्नाचं विचारलं तर नसेल? असा विचार नकळत माझ्या मनाला शिवून गेला. बाबांनी एकवेळ त्याच्याकडे मागे वळून पाहिल्याची जाणीवही मला झाली खरी; पण-

तसे असेल तर मग. . . मग, मीही विचार करून पाहीन ; पण तो विधवेशी करेल लग्न? देवाला ठाऊक! तशीही मी त्याची मॅरेज मटेरियल होतीच की!

मी आड होताना खूप धिटाईने मागे वळून पाहिले. सोबत आणलेली बॅग पाठीवर टाकून तो नुकताच मागे वळाला होता.

[समाप्त]

माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

lekhani sangram
lekhani sangram

आधीची कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. माझ्या आगामी कथा किंवा कविता न चुकता वाचण्यासाठी सुरवातीला जे Push Notification आपल्याला मिळते ते स्वीकारा.

मॅरेज मटेरियल Marriage Material

लेखणीसंग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

ती आणि ती A lady and a prostitute

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग १

भाऊबीज भाग १

व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला भते द्या.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १


Spread the love

2 thoughts on “मी मॅरेज मटेरियल mi marriage material

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *