
व्हायरस: प्रकरण १४. रहस्याची उकल करताना
रहस्याची उकल करताना Marathi Katha, Marathi story, marathi fiction, solving the mystry
दरवाजा आता पूर्णपणे उघडल्यावर तिघेही आत जाण्यासाठी सज्ज होते. समोर पूर्णपणे अंधार होता. त्यांना काहीच कल्पना नव्हती की आत नेमकं त्यांच्यासाठी काय वाढून ठेवलंय. एखाद्या अंधाऱ्या निर्वात पोकळीत किंवा जसं काही एखाद्या कृष्णविवराच्या मुखाशी उभे असल्याची थोडीबहुत जाणीव त्यांना झालीही असेल!
कित्येक वर्षे बंद त्या अकल्पित खोलीत काय असेल याची यत्किंचितही कल्पना त्यांच्या एकाच्याही मनाला साधी शिवूनही गेली नाही. उलट जे काही घडतंय, ते तिघे त्यासोबत पुढे पुढे जणू निघालेच होते!

अश्वथचा ड्रोन आतमध्ये दाखल झाला. त्याच्यामागोमाग तिघेही आत शिरताच आतमधील लाईट्स सुरु झाल्या. ड्रोनचा उजेडही होताच म्हणा; पण आतील लाईट्स लागताच ड्रोनची लाईट आपोआप बंद झाली.
तिघेही आता इकडेतिकडे पाहू लागले. आतमध्ये कुणीच नव्हतं. खोली भली मोठी होती, जणू एखादी प्रयोगशाळाच. पण मग प्रयोगशाळा तर म्हणायचं कसं? कारण, त्यात काही तशी उपकरणे नव्हती ना काही कॉम्प्युटर्स होते. सबंध खोली रिकामी होती, तरीही ते काही सापडते का याचा शोध घेतच होते; पण काही सापडलं तर शप्पथ!
अश्वथने ताराला पूर्ण खोली स्कॅन करायला सांगितली तशी तारा ड्रोनच्या मदतीने ती सबंध खोली स्कॅन करू लागली. इकडे यांचाही शोध सुरूच होता; पण रिकाम्या त्या भल्यामोठ्या खोलीत त्यांना सापडणार ते का? काहीच नाही. शेवटी बराच वेळ स्कॅन करून झाल्यावर तारा म्हणाली, “स्कॅन निगेटिव्ह.”
ताराने असं सांगताच सर्वांची निराशा झाली. हाती काहीतरी जबरदस्त लागेल याची अपेक्षा असताना त्यांच्या हाती मात्र रिकामी खोली लागली होती. निराश होऊन सुब्बू एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला व नाराजीने त्याने आपला हात भिंतीवर जोरात मारला. तशी त्या खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यातील एक फरशी उघडली गेली.
“आश्चर्यच आहे.” सुब्बू आश्चर्यानेच म्हणाला. अश्वथ आणि आर्याच्या देखील भुवया आता उंचावल्या गेल्या. उघडल्या गेलेल्या फरशीच्या खाली बहुतेक छुपी खोली होती. आर्या लगेच तिथून शिडीने पायऱ्या उतरत खाली गेली. अश्वथही लगेचच आर्याच्या मागोमाग खाली उतरला व सुब्बू त्याच्या मागोमाग. पुढे जाण्यात काय धोका किंवा काय आणखी गौडबंगाल असेल असा विचार देखील आता त्यांच्या ठायी नव्हता.
खोलीत भयंकर अंधार होता. अश्वथचा ड्रोन वरती राहिला होता. पहारा देत असावा बहुतेक. त्यांना आता खाली काही दिसत नव्हते. तिघेही एकमेकांना आपले टॉर्च सुरु करण्याबाबत बोलले. सुब्बूने आपला टॉर्च सुरु केला आणि खोलीत फार नाही; पण पुरेसा उजेड झाला.
इतक्यात ड्रोनही खाली आला. खोली आकाराने खूप छोटी होती ती. तीमध्ये फक्त एक टेबल व खुर्ची होती. टेबलावर एक कसलीतरी छोटीसी गोष्ट होती. आत्ताच्या हार्ड ड्राईव्ह सारखी दिसणारी हुबेहूब. अश्वथने पुढे जाऊन ती हार्ड ड्राईव्हसारखी गोष्ट हातात घेतली. तिघेही त्याकडे उत्सुकतापूर्वक पाहू लागले.
“चला अजून क्रिप्टोमनीची सोय झाली म्हणायची.” सुब्बू खुश होऊन म्हणाला. अश्वथ मात्र काहीच बोलला नाही. तो त्या ड्राईव्हकडे पाहतच होता. त्याला उलटं पालटं करून तो ती ड्राईव्ह अगदी बारकाईने न्याहाळीत होता.
शेवटी त्याला त्या ड्राईव्हवर एक बटन दिसले. छोटेसेच. तो लगेचच म्हणाला, “क्रिप्टोमनी मिळेल की नाही ते माहित नाही; पण काहीतरी विशेष आपल्या हाती लागणार हे नक्की आहे.” व त्याने ते बटन दाबले आणि काय आश्चर्य-
बटन दाबताच त्या ड्राईव्हमध्ये लाईट लागली व एक होलोग्राम सुरु झाला. त्यात एक व्यक्ती हातात गाडीचे स्टिअरिंग पकडून घाबरलेल्या अवस्थेत काहीतरी सांगू लागला. तिघेही आश्चर्यचकित झाले व डोळे विस्फारून ते त्याकडे पाहू लागले. जेव्हा तो ड्राईव्ह सुरु झाला, अगदी त्याच वेळेस अश्वथच्या घरात असलेला त्या उपकरणाचा न चालू झालेला तुकडा प्रकाशित झाला आणि बीप् बीप् करू लागला.
“आज पाच ऑक्टोबर आहे. साल आहे २०५१ आणि मी डॉ. अभिनव, जर हा मेसेज कुमार पाहत नसेल तर. माझ्याकडे वेळ फार कमी शिल्लक राहिला आहे. कालभद्र व त्याचे लोक माझा पाठलाग करत आहेत. मी काही महत्वाची माहिती एका आभासी आयडीवर पाठवून दिली आहे; जी एका ड्राईव्ह वरती असून जेव्हा तू तो ड्राईव्ह या आणि फक्त याच कॉम्प्युटरला जोडशील, तेव्हाच ती माहिती आपोआप डाऊनलोड होईल. तू पंचवीस वर्षांचा झाला की तुला तो ड्राईव्ह मिळावा याची व्यवस्था मी केली आहे. तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. बाकी तू हुशार आहेसच. माहीत नाही आपली पुन्हा भेट होईल की नाही. आज वाचलो तर जग वाचवेन.स्वतःला जप आणि..” ती व्यक्ती बोलत होती आणि बोलता बोलता अचानक त्यांना मागून धक्का बसल्याचे दिसले व कुणीतरी एक व्यक्ती त्याच्याकडे येताना पुसटशी दिसली आणि होलोग्राम बंद झाला.
तिघेही आपले डोळे मोठे करून आणि आ वासून त्या होलोग्राम बंद झालेल्या ड्राईव्हकडे पाहत राहिले. खोलीत एक चिडीचूप शांतता पसरलेली होती.
मध्यरात्र झाली तरी इकडे कालभद्र अजून आपल्या काल-कॉर्पच्या ऑफिसमध्येच होता. ऑफिसच्या मंद
प्रकाशात उभा राहून काचेतून बाहेर तो एका उदास व खिन्न अशा नजरेने पुणे शहराकडे पाहत होता. आत्तासारखं रात्री चमकणारं ते पुणे राहिलं नव्हतं; पण ते पूर्णपणे अंधारातही नव्हतं. कदाचित कालभद्र जुन्या पुण्याच्या आठवणीत रामला तर नव्हता? म्हाताऱ्याच्या मनात नेमकं चाललं काय होतं ते त्याचं त्यालाच माहीत!
तेवढ्यात उंच टाचांचे सँडल्स घातलेली, गोऱ्याचिट्ट पायांची त्याची ती सेक्रटरी टक् टक् टक् आवाज करत चालत आत आली. तिचं चालणं अगदी एखाद्या हरणीसारखं होतं. अंगात घातलेल्या लाल रंगाच्या लो-कट बॉडी फिट ड्रेस मधून दिसणारे तिचे क्लीव्हेजेस आणि बॉडी कर्व्हज कुणालाही मोहात पाडणारे होते.
“सर, इट्स टू लेट. तुम्ही घरी जायला हवं. तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता आहे.” कालभद्रच्या जवळ येऊन त्याच्या अगदी मागे उभी राहत ती म्हणाली. त्यावर त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.
इतक्यात अचानक त्याच्या कॉम्पुटरचा बीप् बीप् असा आवाज येऊ लागला. कालभद्रचे लक्ष तिकडे वेधले गेले. तेव्हा त्याच्या कॉम्पुटरमधून आवाज आला, “कुणीतरी डॉ. अभिनवचा संगणक वापरू पाहतोय.”
आज इतक्या वर्षांतून कोणी बरं त्यांचा कॉम्प्युटर वापरू पाहतंय याचं त्याला आश्चर्य तर वाटलंच; पण काहीशी अस्वस्थता देखील वाटली. कालभद्र लगेच आपल्या कॉम्पुटरच्या पारदर्शक स्क्रीनकडे पाहत म्हणाला, “वेदिका, साम्ब्राशी बोलणं कर माझं. आत्ताच्या आत्ता.” तो स्क्रीनकडे पाहतच होता. त्याला दोन लाल ठिपके दिसत होते स्क्रीनवर. वेदिकाने पटकन कॉल जोडून दिला.
“येस सर.” पलीकडून साम्ब्राचा तो भसाडा आवाज आला.
“दोन लोकेशन्स पाठवतो तुला. पाहून घे. बाकी वेदिकाशी बोलून घे.” बाजूला जात कालभद्र म्हणाला.
कसला तरी विचार करून तो पुन्हा वेदिकाच्या जवळ आला आणि तिच्या ड्रेसकडे पाहत म्हणाला, “डोन्ट यु थिंक आय एम टू ओल्ड टू हॅन्डल धिस?”
ती हसली; पण आधी तिला साम्ब्राशी बोलायचे होते. त्यामुळे ती तिथून निघाली. जाता जाता थांबली व मागे पलटून म्हणाली, “इट इज अ बॉडी, दॅट ग्रोज ओल्डर, नॉट दी माइंड!” व ती निघून गेली. कालभद्र मात्र तिच्या पार्श्वभागाकडे पाहतच राहिला आणि स्वतःशीच पुटपुटला, “फक दॅट माइंड!”
आता साम्ब्राला दोन्ही लोकेशन्स मिळाली. त्यापैकी जे जवळचं लोकेशन होतं ते अश्वथच्या घरचं. तो मग धडकच तिकडे निघाला.
तिघेही डॉ.अभिनवचा कॉम्पुटर घेऊन वरती येण्यासाठी भराभर सब-वेच्या पायऱ्या चढू लागले. वरती येऊन त्यांनी काही चर्चा केली व उद्या सकाळी भेटण्याचे पक्के ठरवून सुब्बू त्याच्या घरी निघून गेला व अश्वथ आर्याला स्लम टॉवर्सला सोडण्यास गेला. नक्कीच काहीतरी मोठे त्यांच्या हाती लागले होते, याची त्यांना कल्पना होतीच. आता उद्या सकाळी भेटून त्यांना पुढच्या गोष्टींचा शोध घ्यायचा होता.
अश्वथने आर्याला स्लम टॉवर्सला सोडले आणि तिचा निरोप घेऊन तो थेट बाणेर हिल्सकडे निघाला.
आर्या दार उघडून सावकाश घरात आली. तिची आई अजून जागीच होती.
“खाल्लंयस का तू काही?” तिच्या आईने तिला विचारले.
“हो आई आणि तू?”
तिच्या आईने एक स्मित हास्य करत होकारार्थी मान हलवली. आर्या बिछान्यावर पडली. तिची आई तिच्या शेजारी बसली व तिचे डोके आपल्या मांडीवर घेत ती तिला बोलू लागली, “आर्या, आता तू मोठी झालीय. मला माहित आहे तू जबाबदार आहेस. तू माझी काळजीसुद्धा घेतेस; पण खरं सांगू?”
“सांग ना आई.”
“मला तुझी खूप काळजी वाटते. आपल्यासाठी, पोटासाठी आणि खासकरून माझ्या डोससाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागतेय. रात्री रात्रीचं कुठे कुठे भटकत राहतेस. मला ना खूप भीती वाटते कधी कधी.”
“आई, मला काही होणार नाही. मी माझी काळजी अगदी व्यवस्थित घेऊ शकते. तू प्लिज नको काळजी करू. इंदिरा गांधी की काय तशी आयर्न लेडी आहे मी!” आर्या हसत म्हणाली.
“तू ना अगदी तुझ्या बाबांवर गेली आहेस. हट्टी. माझं काही ऐकणारच नाहीस.”
“आई?”
“अं?”
“मला सांग ना बाबांबद्दल.”
“काय सांगणार? आपल्या दोघींना एकटं टाकून गेले म्हणून सांगू?”
“देवाघरी?”
“नाही माहित.” आई म्हणाली व थोडावेळ थांबून म्हणाली, “म्हणून सांगतेय, हे वय असंच असतं. आपण जे काही करतो ते बरोबरच आहे असं वाटतं; पण कधी कधी या वयात केलेल्या चुका आयुष्यभराची शिकवण देऊन जातात पोरी.” बोलताना आईच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले होते.
“आई, म्हणजे मी तुझी चूक आहे?” आर्याने तिचे अश्रू पुसत तिला विचारले.
“नाही गं वेडे. तू तर माझी परी आहेस.” असं म्हणत तिने आपल्या गळ्यातील एक लॉकेट काढून तिच्या गळ्यात घातले.
“हे काय?” आर्याने त्याला हात लावत विचारले.
“असुदे तुला.”
“बाबांनी दिलेलं हे?” आर्या त्या लॉकेटला असलेल्या तिच्या आईच्या आणि बाबांच्या तरुणपणीच्या फोटोंकडे पाहत म्हणाली.
आईने एक स्मितहास्य केले आणि तिला विचारू लागली, “पाहिले का मग गणपती बाप्पा? धमाल केली असेल तुम्ही आज? काय नाव बरं त्या मुलाचं ….?”
“आई, मुलगा काय म्हणते अगं? अश्वथ नाव आहे त्याचं.” ती बिचारी लाजेने गुलाबी होतच म्हणाली.
इकडे साम्ब्रा अश्वथच्या घरात दाखल झाला होता. गामाने काही करण्याआधीच त्याला त्याने कसलेतरी ड्रग दिले होते. त्यामुळे तो बेशुद्ध होऊन बाहेर पडला होता व आतमध्ये अंधारात हातात क्रिप्टोमनी उपकरणाचा तुकडा अर्थातच तो ड्राईव्ह पकडून साम्ब्रा उभा होता. इतक्यात अश्वथची मोटारसायकल आवाज करत तिथे आली. साम्ब्रा सावध झाला आणि तिथेच लपून राहिला.
गामा झोपल्याचे पाहत अश्वथ आत घरात आला. बेसावधपणे तो आत येताच साम्ब्राने त्याच्या डोक्यावर जोरात वार केला तसा अश्वथ डोके पकडून खाली जमिनीवर पडला. नेमका काय प्रकार झाला हे त्याला समजलेच नाही. काहीशी काळपट आणि धूसर आकृती मात्र त्याला त्याच्या खोलीत हललेली काय ती दिसली शेवटची!
आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १
People also search for-