• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.!

व्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.!

Spread the love

श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.! Marathi Katha, Marathi story, marathi fiction

पारदर्शक स्क्रीनवरती transparent screen एका न्यूज चॅनेलवर news channel कालच्या चोरीची बातमी सुरु होती. विशेष म्हणजे बातमी देणारी लेडीबॉट ladybot खूप नम्रतेने आणि अदबीने बातमी देत होती.

कालभद्र त्या स्क्रीनकडे पाहत आपल्या काल-कॉर्पच्या ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. म्हातारा तसा बिलकुलच चिंतेत वाटत नव्हता; पण कालच्या त्या चोरीने त्याला थोडंसं विचलित मात्र जरूर केलतं. कुबड काढून तो आपल्या चष्म्याच्या वरच्या भागातून तो ते सर्व पाहत होता, अगदी हरवून गेल्यासारखा!

ऑफिसची खोली भव्य होती. फक्त पांढरी खुर्ची, एक पांढरा टेबल, त्यावरती एक होलोग्राम कॉम्पुटर बस्स एवढंच काय ते होतं त्या खोलीत. शिवाय त्याच्या पाठीमागे भिंतीवर एक भव्य अशी फ्रेम होती, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगत असल्याची. बाजूच्या काचेतून बाहेरील उंच इमारती दिसत होत्या.

“सर, तो आलाय. कॅन आय सेंड हिम इन?” कालभद्रची सेक्रेटरी वेदिका त्याच्या होलोग्राम कॉम्पुटरवर येऊन म्हणाली. कालभद्रने फक्त होकारार्थी मन हलवली व तो हातातील घड्याळाकडे पाहू लागला.

एक चाळीशीतील, उंचपुऱ्या बांध्याचा आणि अंगावर स्नायूंच्या बेडक्या निघालेला व्यक्ती दारातून आत आला व कालभद्रच्या टेबलासमोर येऊन उभा राहिला. पाठमोरा!

the kaalbhadra, images are for illustration purpose only
the kaalbhadra, images are for illustration purpose only

त्याच्या रागट चेहऱ्यावर काहीतरी लागल्याच्या जुन्या खुणा होत्या. अशातच त्याने घातलेला काळा गॉगल पाहून कुणीही त्याला हैवान म्हटले नसते तर नवलच. तो तोच मनुष्य होता जो अश्वथ आणि सहकाऱ्यांचा पाठलाग करत होता!

कालभद्र आता आपल्या कॉम्पुटरवर काहीतरी कामाचे पाहत होता. तो येऊन त्याच्यासमोर उभा आहे याची त्याला कल्पना होतीच. काही क्षण कालभद्र काहीच बोलला नाही ना तो. तो फक्त आपले हात आपल्या कमरेच्या मागे एकमेकांत पकडून ताठपणे कालभद्रच्या बोलण्याची वाट पाहत होता!

“तुला कुणाची भीती वाटते का साम्ब्रा?” मघाचपासूनची असलेली शांतता भंग करत कालभद्रने कॉम्पुटरकडे पाहत त्याला विचारले. होय त्याचे नाव साम्ब्रा होते. साम्ब्रा!

“नाही.” खणखणीत पण तेवढ्याच घोगऱ्या आवाजात साम्ब्राने उत्तर दिले. त्याच्या या उत्तरावर मात्र कालभद्रने एक न कळण्याएवढे कुत्सित हास्य केले.

“हं …लोकं घाबरतात का तुला?” कालभद्रने विचारले.

“एनी डाऊट?” त्याने कालभद्रला विचारले. कालभद्र खुर्चीतून उठला आणि त्याच्याकडे येत म्हणाला, “तुझ्याबद्दल माहिती असूनपण लोकं तुला घाबरत नसतील तर अशा लोकांना तू काय म्हणशील?”

“मूर्ख. अज्ञानी.” क्षणाचाही विलंब न करता तो उत्तरला. कालभद्र आता त्याला पाठमोरा झाला आणि त्या पारदर्शक स्क्रीनवरील बातमी पाहत म्हणाला, “काही लोकांचं अज्ञान दूर करणं गरजेचं आहे. नाहीतर लोकांना आपली भीती राहणार नाही, यू नो?”

साम्ब्रा कालभद्रकडे येत म्हणाला, “तुम्ही निश्चिंत रहा सर. ती आता माझी जबाबदारी आहे.

“देन गो.” कालभद्र म्हणाला. साम्ब्रा आता बाहेर पडू लागला.

“मला त्यांच्यात काही रस नाही; पण त्यांचं अनुकरण परत कुणी करता कामा नये.” कालभद्र म्हणाला. साम्ब्रा जाता जाता दरवाजातच थांबला. त्याने आपल्या डोळ्यांवरचा गॉगल काढला. त्याच्या डाव्या डोळ्याचे बुब्बुळ पूर्णपणे पांढरे होते आणि त्यावरही जुनाट जखमेच्या खुणा होत्या. आता मात्र तो खराखुरा हैवान वाटत होता. त्याने परत गॉगल चढवला व चालू पुढे लागला.

“ब्लडी डिमन, भीत नाही म्हणतो कुणाला. हं.. मला घाबरायला हवा तो. घाबरायला हवा.” कालभद्र मात्र तो गेल्यावर स्वत:शीच एक तिरस्कारदर्शक हास्य करत पुटपुटला.

तिघेही एका निर्मनुष्य इमारतीत आले होते. रात्री चोरलेली ती पेटी ते खोलण्याचा प्रयत्न करत होते. डिजिटल लॉक असल्यामुळे त्यांना अडचणी येत होत्या. सुब्बू पेटीला कान लावून एक बोट तोंडावर ठेवलेल्या अवस्थेत होता. बहुतेक त्यांचा बराच प्रयत्न करून झाला होता. तरीही सुब्बू कुणाला पेटी खोलण्यासाठी देत नव्हता. जणू त्याला दांडगा विश्वास होता की तोच पेटी खोलू शकतो!

इकडे साम्ब्राला त्याच्याकडे असलेल्या उपकरणावर त्या पेटीचा ठावठिकाणा मिळाला होता. तो लगेच त्या उपकरणाला अनुसरून त्या इमारतीकडे निघाला.

अचानक ग्राइंडर सुरु झाल्याचा आवाज झाला. अश्वथने आणि सुब्बूने मागे वळून पहिले. आर्या हातात मेटल कटर घेऊन उभी होती. आता ते दोघेही त्या पेटीपासून बाजूला झाले. आर्याने जवळ जाऊन लॉक तोडून पेटी उघडली.

“मी अगदी उघडणारच होतो.” सुब्बू म्हणाला. पेटीत फोमच्या कप्प्यांत डोसच्या खूप साऱ्या छोट्या छोट्या कुप्या होत्या. इतक्या कुप्या पाहून सुब्बू आनंदाने उड्या मारू लागला. तो आनंदाने उड्या मारत म्हणाला, “घबाड लागलंय हाताला आपल्या! इतके डोस मिळाले आहेत की मी म्हातारा होऊन नक्की मरेल आता!”

“कुणाचं काय तर कुणाचं काय.” आर्या निरूत्साहाने म्हणाली.   

इतक्यात ताराने अश्वथला सावध केले, “घुसखोर चेतावणी. घुसखोर चेतावणी.” पेटीतील कुप्या फोम सहित उचलून तिघांनी तिथून पळ काढला.

साम्ब्राने तिथे येऊन पाहिले तर पेटी रिकामीच होती. आसपास एक नजर भिरकावली तर कुणाचाच पत्ता नव्हता. तोच त्याला खालून मोटारसायकलींच्या निघण्याचा आवाज त्याला आला. त्याने लगेच धावत जाऊन मोकळ्या खिडकीतुन खाली पाहिले; पण तोपर्यंत ते तिघेही तिथून निसटले होते.

आपल्या दानवी चेहऱ्याने साम्ब्रा मात्र शून्यात नजर लावून खिडकीतून खाली पाहू लागला.

ते तिघेजण तिथून निघून थेट अश्वथच्या घरी पोहचले. आत जाताच अश्वथ आपल्या बिछान्यावर पडला. आर्याही त्याच्या पोटावर डोके टेकवून पडली. सुब्बू कुप्या घेऊन आत आला. अश्वथने मनगटावरील होलोग्राम सुरु केला आणि त्याच्या ड्रोनने काही चित्रण केलंय का ते पाहू लागला.

“पोलीस होते का रे अश्व्या?” सुब्बूने हातातली कुप्या ठेवत विचारले.

“पोलीस नाही; पण हा दुसराच कुणीतरी आहे.” अश्वथ उठत होलोग्रामकडे पाहत म्हणाला. आर्याही उठून पाहू लागली.

“दूसरा? कोण?” सुब्बू विचारात पडला.

“कुणीतरी आपला पाठलाग करतंय.” आर्या  म्हणाली.

“कालभद्रचा माणूस असू शकतो.” अश्वथ चिंतेने म्हणाला.आता तिघेही चिंतेत पडले होते.

“तरी म्हणत होतो काल-कॉर्पच्या नादी नको लागायला. कालभद्रबद्दल माहिती होती तुला.” सुब्बू घाबरून म्हणाला.

“मग आता पुढे काय?” आर्याने विचारले.

“पुढे…… आय डोन्ट नो.” अश्वथ म्हणाला.

“अशव्या, भावा मला वाटलं होतं आपल्या म्हातारपणाची सोय झाली म्हणून; पण हा कालभद्र मागे पडला की काळ होऊन मागे लागेल रे आपल्या. यू नो हाऊ रुड ही इज!” सुब्बू तोंड वाईट करत म्हणाला.

“तो रुड असला तर आपण पण डुड आहे!” अश्वथ हसत म्हणाला; पण त्याच्याही डोळ्यांत आपण भलत्याच व्यक्तीशी पंगा तर नाही ना घेतला अशीच काहीशी भावना होती.

सप्टेंबर ३, २०८४.

आज गणपती आगमन होते. अश्वथ, आर्या व सुब्बू तिघेही शनिवार वाड्याजवळ मिरवणूक पाहण्यासाठी आले होते. सदाशिव पेठेकडे फारसे कुणी राहत नव्हतेच; पण अजूनही पुण्याच्या पेठांतील मानाच्या गणपतींचे अस्तित्व मात्र टिकून होते. त्यामुळे उत्सवासाठी का होईना वर्षातून एकदा तरी लोक तिथे जमत असत.

आज तिघांनीही मात्र धमाल केली होती. मनसोक्त नाचले होते. ढोलताशा पथकांचा जमाना हळु हळु हद्दपारच झाला होता एव्हाना. फक्त एखाद-दुसरं बाकी होतं. त्यांचाच काय तो आवाज होता. बाकी लोकांनी तर कानात पॉड्स घालून रेकॉर्डर्सवर ठेका धरला होता. जुन्या काळातला पाहणारा कुणीही म्हणाला असता की हे लोक ढोल-ताशे किंवा डीजे शिवाय शांततेत कसे काय नाचतायत?

“अश्वथ, मला निघावं लागेल.” आर्या  म्हणाली.

“हो, वेळ खूप झालाय आपण निघूया.” असं म्हणून त्याने सुब्बूला निघण्यासाठी इशारा केला.

तिघेही आता गर्दीतून बाहेर निघू लागले. आर्याने अश्वथच्या दंडाला पकडले होते आणि चालत होती. तितक्यात सुब्बूला कशाचीतरी आठवण झाली आणि त्याने अश्वथला विचारले, “क्रिप्टोमनीचे crypto money ते उपकरण व्यवस्थित आहे ना? शेअर्स आहेत त्या म्हाताऱ्याचे त्यात.”

“अरे यार, त्या दिवशी तू ते माझ्याकडे फेकले आणि त्याचे तुकडे झाले राव.” अश्वथ त्याला म्हणाला आणि अचानक त्याला तुकड्यावरून काहीतरी आठवले व तो चालत चालत थांबला. जवळच असलेल्या ढोल-ताशा पथकाचा आवाज कानी येत होता. तो अचानक का थांबला हे या दोघांना कळेना.

शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण…! श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण…! श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.” ही त्या उपकरणातील व क्रिप्टोरूपी देणाऱ्या माणसाची वाक्ये त्याच्या कानात आवाज करू लागली आणि तो म्हणाला, “दगडूशेठ, दगडूशेठ गणपती. दगडूशेठ गणपती. सुब्ब्या, दगडूशेठ गणपती.”

“हो पण थोड्यावेळापूर्वीच जाऊन आलोय आपण.” सुब्बू म्हणाला. अश्वथ काय म्हणतोय त्याला काही समजत नव्हते. आर्याला पण काही समजले नव्हते.

आता अश्वथ मागे वळला आणि दगडूशेठ गणपती मंदिराकडे भराभर जाऊ लागला. सुब्बू आणि आर्याही त्याच्या मागे निघाले. चालता चालता ते कधी धावू लागले हे त्यांनापण समजले नाही; पण अश्वथला कशाचा तरी धागा सापडला आहे हे त्यांना समजत होतं. तो आपला भराभर चालत होता..! काहीतरी उमगल्यागत!

To be continued…

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *