• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट

व्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट

Spread the love

एम आय डुईंग ग्रेट? Am I doing great?

नवी दिल्ली. New Delhi

संसद भवनात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची एक बैठक सुरु होती. विविध खात्यातील मंत्री  आणि त्यांचे सचिव पण त्या बैठकीस उपस्थित होते. ते आपापल्या खात्यातील केलेल्या कामांची माहिती पंतप्रधानांना देत होते; शिवाय काही समस्या असतील तर त्याही ते मांडत होते.

पंतप्रधान शांतपणे त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेत होते आणि आपल्या सचिवाला त्या क्रिस्टल पॅड वरती नोट करून घ्यायला सांगत होते. शक्य तितक्या समस्यांचे समाधान ते तिथल्या तिथेच करत होते. वेळप्रसंगी ते खूप नम्र तर कधी ते तितक्याच कठोर आवाजात एखाद्या मंत्र्याला खडसावत पण होते.

“मिस्टर अय्यर, अगेन आय एम टेलिंग यु. धिस इज बियॉन्ड टॉलरेशन. अर्थव्यवस्था खूप कठीण काळातून जात असताना तुम्ही फंडच्या फंड मंजूर करून घेताय आणि कामाच्या नावाने ठण ठण गोपाळ? इन्फ्रास्ट्रक्चरची कामे कधीपासूनची तशीच्या तशी खोळंबलेली असताना तुम्ही काय झोपा काढत आहात का? आधीच माझा खूप फंड मला MV ४८ साठी वळवावा लागतोय आणि त्यात…” ते पुढे काही तरी बोलणार होते; पण त्यांनी आपले शब्द मागे घेतले.

“सॉरी सर.” अय्यर मान खाली घालत म्हणाले. खोलीत एकदम सन्नाटा पसरला.

“ओह, डोन्ट बी सॉरी अय्यर. प्लिज. संसदेचं पावसाळी अधिवेशन पुढच्या आठवड्यात येऊन ठेपलंय. विरोधकांना काय उत्तरे देणार आपण? डेडलाईन्स वाढवून हव्यात म्हणे. नॉट पॉसिबल अय्यर, नॉट पॉसिबल.” ते म्हणाले.

“बट सर….” अय्यर काही बोलणार तेवढ्यात ते परत म्हणाले. “प्लिज डोन्ट चेक माय पेशन्स. शो मी रिजल्ट. आय विल रिवॉर्ड यू.”

“येस सर.” अय्यर म्हणाले.

“नाहीतर मला तो फंड लोकांच्या हेल्थकेयरसाठी वळवावा लागेल. लोकांच्या खूप समस्या आहेत. लोकांचे जीव जातायत माझ्या. त्यात भर म्हणून की काय काल-कॉर्प ने डोसच्या किंमती पण वाढवल्या आहेत.” पंतप्रधान हताश होऊन बोलले. क्षणभर कुणी काहीच बोललं नाही. काल-कॉर्पबद्दल कोण बोलणार?

“सर, मला वाटतं डोसच्या किंमती वाढवणे किंवा कमी करणे हा काल-कॉर्पचा वैयक्तिक विषय आहे. तुम्ही हेल्थकेयरसाठी वाढीव पॅकेज द्यावं याबाबत मी बोलणारच होतो; पण आता विषय निघाला म्हणून विषय धरून बोललो.” शहा बोलले. नुकतीच कालभद्रच्या कृपेने त्यांना हेल्थ मिनिस्ट्री मिळाली होती.

“शहा, आपण जनतेचे सेवक आहोत. काल-कॉर्पचे नाही. उगीच जनतेचा रोष ओढवून घेऊ नका. एकदा वानवा पेटला की ओल्याबरोबरच वाळलंही जळतं.. ध्यानात असू द्या.” पंतप्रधान म्हणाले. शहाचा तर चेहराच उतरला होता. चपराक बसल्यासारखा.

“सी यु इन मान्सून सेशन. मिटिंग ओव्हर.” असं म्हणून पंतप्रधान खुर्चीतून उठले आणि मिटिंग रूम मधून बाहेर पडले. त्यांचा सचिवही त्यांच्या मागे भराभर चालत गेला.

काही अंतर चालून आल्यावर सचिव पंतप्रधानांच्या सोबत चालू लागला. चालता चालत तो त्यांना म्हणाला, “सर, आय एम सॉरी. लहानतोंडी मोठा घास घेतोय; पण जर तुम्हाला माहीतच आहे की तुमचे मंत्रिमंडळ भ्रष्ट बनत चाललंय तर तुम्ही त्याला आळा का नाही घालत? आफ्टरऑल, यु हॅव ऑल पॉवर्स इन युवर हॅन्ड्स.” 

त्यांचा चेहरा गंभीर झाला. पंतप्रधान जरा विचारात पडले आणि एक स्मित हास्य करत म्हणाले, “तुला नवीन पंतप्रधान पाहायची घाई झाली वाटतं? रांग आहे माझ्या मागे अख्खी. यू नो इट बेटर.”

“सॉरी सर. मला तसं नव्हतं म्हणायचं? यु आर डुईंग ग्रेट सर.” तो म्हणाला. पंतप्रधानांनी त्याच्याकडे नुसते पाहिले. ते काहीच बोलले नाहीत.

          “सुपरमॅन सारखं कुणी तरी हवं होतं जगात. जगाचे खूप सारे प्रॉब्लेम्स निकालात निघाले असते.” तो म्हणाला.

“आता थोड्यावेळापूर्वी तर म्हणालास की माझ्याकडे सर्व पॉवर्स आहेत म्हणून. तरीही सुपरमॅन? ऐनीवेज लोकांना परिस्थितीतून बाहेर पडायला सुपरमॅनची गरज भासत असेल तर याचा अर्थ असा होतो की आय एम नॉट डुईंग  ग्रेट. हे माझं अपयश म्हणावं लागेल.” पंतप्रधान थांबले व उद्विग्न होऊन म्हणाले. सचिव बिचारा बोलून फसला होता.

“पण तुला एक सांगतो, जसं निराशेच्या गर्तेत असतानाच माणसाला आशेचा किरण दिसतो आणि मग तो त्याला त्यातून बाहेर काढतो. त्यासाठी सुपरमॅनच यावा असं काही नसतं. साधारण मनुष्य पण कधीकधी असं असामान्य काम करून जातो की जे सुपरमॅनच्या तुलनेचं असतं.” पंतप्रधान त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाले आणि पुढे चालू लागले. सचिव मात्र त्यांच्याकडे बघतच राहिला.

काल-कॉर्पचा एक ट्रक रात्रीच्या अंधारात कडेकोट सुरक्षेत पुण्याहून मुंबईकडे निघाला होता. दहा पदरी असूनही मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पूर्वीसारखा गजबजलेला मात्र नव्हता. त्यात रात्र असल्यामुळे एखादेच वाहन जाताना नजरेस पडत होतं. पावसाळा सुरु होऊनही महिना झालेला होता; पण दोन दिवस मात्र पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पौर्णिमेचा चंद्र आज नीट दिसत होता. खंडाळा घाटात नुसता धबधब्यांचा आवाज कानी येत होता. इकडे अश्वथ अमृतांजन ब्रिजवरती उभा होता.

ट्रक ब्रिजच्या दिशेने येऊ लागताच ताराने त्याला सावध केले. ताराचा सावध होण्याचा इशारा येताच  त्याने सुब्बूला विचारले, “सुब्बू, ट्रक ब्रिज जवळ येतोय. तूझा स्टेटस काय आहे?”

“ट्रक माझ्या टप्प्यातच आहे. तू फक्त सांग.” सुब्बू म्हणाला.

“ओके,” असे म्हणत त्याने आर्याला विचारले, “आर्या…” 

“आय एम ऑल सेट.” तो पुढे काही बोलायच्या आधीच आर्या स्नायपरच्या दुर्बिणीतून पाहत नेम धरत म्हणाली.

“टार्गेट ब्रिजच्या जवळ. टार्गेट ब्रिजच्या जवळ.” ताराने इशारा केला. तोच ट्रक ब्रिजच्या जवळ आला. त्याच्या पुढे एक कार आणि मागे एक कार असा एकंदरीत तो ताफा होता. अश्वथने आता एकदम धावण्यास सुरवात केली. ट्रक ब्रिजखालून पार होतो न होतो अश्वथने जोरात ब्रिजवरून खाली उडी घेतली आणि तो ट्रकच्या वर पडला. तो ट्रकवर पडल्याचे मागील कारमधील सुरक्षारक्षकांना दिसला. ते सावध होऊन त्याच्यावर गोळ्या चालवू लागले.

virus marathi katha

आर्या आधीच नेम धरून बसली होती. अचूक निशाणा साधत तिने त्या कारच्या चालकाला अचूक टिपले व ताबा सुटल्यामुळे ती कार दुभाजकावर आदळून पलट्या खात पलीकडच्या लेनमध्ये जाऊन पडली.

ट्रकचा चालक आता सावध झाला होता. अश्वथला खाली पाडण्यासाठी तो ट्रक इकडेतिकडे वळवू लागला. अश्वथ ट्रकच्या वर तोल सांभाळण्यासाठी कसरत करू लागला. तेवढ्यात चालकाच्या केबिनमधून एकजण वरती चढला व अश्वथशी हातापायी करू लागला. दोघांमध्ये जोरदार सामना रंगला होता.

“आर्या, निशाणा साधू शकशील?” त्याने लढता लढता विचारले.

“मी प्रयत्न करतेय.” ती म्हणाली. अचूक निशाणा टिपण्यास तिला अडचण येत होती. गोळी अश्वथलापण लागू शकत होती.

“सुब्बू , हीच ती वेळ.” अश्वथ सुब्बूला म्हणताच सुब्बू एक कार घेऊन अचानक मागून प्रकटला. जोरात कार त्या ट्रकच्या पुढे असलेल्या कारच्याआडवी घातली, तशी ती कार त्याच्या कारवर चढली आणि पलट्या खाऊ लागली. ट्रक चालकाने आता एकदम जोराचा ब्रेक लावला आणि इकडे आर्याने गोळी सोडली. दोघेही ट्रकवरून पुढे पडले. गोळी नेमकी कुणाला लागली हे कुणालाच समजलं  नाही. आर्या स्नायपर गुंडाळून मोटारसायकल काढून सरळ तिकडे सुटली. तिला वाटले की गोळी अश्वथला लागली. सुब्बूलाही वाटले की गोळी अश्वथला लागली. तो गाडीतून उतरून धावतच त्याच्याकडे आला. ट्रककडे पाय करून अश्वथ पडला होता. सुब्बू त्याच्याजवळ येऊन त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागला.

इकडे ट्रकच्या चालकाने पल्स गन उचलली व काहीतरी विचार करून ठेवून दिली व साध्या बंदुकीत मॅग्झिन घातले व नेम धरण्यासाठी समोर पहिले आणि अचानक गोळीचा ठाय असा आवाज झाला. सुब्बू वर पाहू लागला. अश्वथने ट्रकचालकाला गोळी झाडली होती. तो जिवंत आहे हे पाहून सुब्बू मात्र फार खुश झाला. त्याने आधार देत त्याला उभे केले.

          आता आर्याही तिथे पोहचली. अश्वथला सुखरूप पाहून तिचा जीव भांड्यात पडला. पाण्याने गच्च अशा डोळ्यांनी ती धावतच त्याच्याकडे आली आणि त्याला मिठी मारली. अश्वथने तिला उचलून घेतले आणि दोघेजण चुंबन करू लागले. सुब्बू आपले डोळे पुसत बाजूला झाला.

सुब्बूने ट्रकमधील एक पेटी बाहेर काढली आणि आपल्या कारमध्ये ठेवून दिली व म्हणाला, “तुमचं झालं  असेल तर निघायचं लैला-मजनू? पोलीस यायच्या आत?”

अश्वथने सुब्बूला कारमधून येण्यास सांगितले व तो आणि आर्या मोटारसायकलवर पुण्याच्या दिशेने सुटले.  

हिंजवडीत उभ्या असलेल्या एका वरचढ एक अशा गगनचुंबी इमारती रात्रीच्या चंद्रप्रकाशात जणू अशा काही भासत होत्या की काळोख्या गुहेत एखाद्याने सावकाश उजेड पाडावा आणि आतील मौल्यवान स्फटिकांचा प्रकाश सर्वत्र उत्सर्जित व्हावा!

मध्यरात्र टळून गेली असताना प्रोटोडॉनच्या त्या मजल्यावर एवढ्या रात्री अजून उजेड होता. आपल्या केबिनमधील त्या अद्ययावत खुर्चीत पाठमोरं बसून एक बाई होलोग्रामवर काहीतरी उद्योग करत बसली होती. अगदी गढून गेली असल्यागत.

अचानक तिच्या केबिनचा दरवाजा उघडून एक रोबोट आत आला  आणि पाठमोरा उभा राहत तो बोलू लागला, “श्रीशा, तुझी झोपण्याची वेळ केव्हाची टळून गेली आहे.”

त्याच्या तशा आत येण्याने ती एकदम गर्रकन त्याच्याकडे फिरत म्हणाली, “थॅंक्स विरेन, बट निड सम मोअर मिनिट्स.”

होय, ती श्रीशा, श्रीशाच होती. साठीतली. प्रोटोडॉनची सर्वेसर्वा!

“तुझा हेल्थ इंडेक्स खाली आला आहे.” हुबेहूब विरेन सारखा दिसणारा तो रोबोट आपल्या रोबोटिक आवाजात म्हणाला.

“विरेन?” ती त्याला गप्प करण्याच्या हेतूने म्हणाली.

“आणि या महिन्यात ही पाचवी वेळ आहे असं होण्याची. जर माझं ऐकलं नाही तर मला तुला उचलून न्यावं लागेल तुझ्या शयनकक्षात.” रोबो विरेन म्हणाला. त्याच्या त्या बोलण्यावर तिने फक्त एक नाखुशीचा कटाक्ष त्याच्यावर टाकला.  

[to be continued…]

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *