
कळी खुलू दे
कळी खुलू दे..!
सकाळची प्रार्थना उरकून पोरं-पोरी रांगेत एकापाठोपाठ एक अशी आपापल्या वर्गात जाऊन बसली.
जाता जाता एकमेकांच्या खोडी केल्या नाहीत तर ती मुलं कसली? कुणी समोरच्याच्या डोक्यावरची टोपी उडवून लावली, कुणी समोरच्याच्या पायात पाय अडकवून त्याला पाडण्याचाही प्रयत्न केला. तर कुणी जास्तच टवाळखोर पोराने एकाची करडोद्याच्या आधाराला कशीबशी टिकून असलेली खाकी चड्डी ओढली देखील. Indian rural schools
“ओ सर, ही माजी चड्डी वडतंय बगा.” तो आपली चड्डी सावरत ओरडला. तसा पोरांत दबक्या आवाजात हशा पिकला.
“कोण हाय रं तो हरामखोर? कसं हुतंय म्हणावं?” पीटीच्या शिक्षकांनी शिट्टी वाजवतच विचारले.
पोरीही त्यात कमी नव्हत्या काही! हळूच एकमेकींच्या झिंज्या ओढ, रिबनी ओढ असले उद्योग त्यांचेही चालूच होते. नकळत अगदी.

पाचवीचा वर्ग कसा अगदी गच्च भरला होता. वर्गशिक्षक हजेरी घेण्यात व्यस्त होते. बाकींच्या वर्गावर अजून वर्गशिक्षक हजर झाले नसल्यामुळे त्यांचे पाढे, इंग्रजी शब्दार्थ अशी जोरदार उजळणी सुरू होती. पोरांची नी पोरींची नुसती जुगलबंदी सुरू होती म्हणा ना! सगळे कसे बेंबीच्या देठापासून ओरडून उजळणी करीत होते. उद्देश हाच की पलीकडे हेडमास्तराच्या खोलीपर्यंत आवाज गेला पाहिजे आणि त्यांची शाबासकी मिळाली पाहिजे.
शिक्षकांची शाबासकीची थाप पाठीवर मिळवणे हे विद्यार्थीदशेतील खासकरून किशोरवयीन मुलांना खूप आवडते. मग त्यासाठी मुद्दामून का होईना शिक्षकांना गृहपठाची आठवण करून देणे, विसरलेल्या चाचणीची आठवण करून देणे, प्रश्नोत्तरे घ्यायची आठवण करून देणे असे उद्योग वर्गातील पुढच्या बाकडावरची पोरं करताना सर्वत्र आढळून येतील. पोरी त्यात काकणभर पुढे असतील अजून!
“गणपत भोसले?” बाकीच्या वर्गांतील गदारोळीत देखील वर्गशिक्षकाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता पोरांना.
“हज्जर.” गणपा म्हणाला.
“सर कोण म्हणणार रे म्होरं, कारट्या?”
“सर.”
“दीड शहाणंच हायस. बस खाली.” वर्गशिक्षक डोळे वटारीत म्हणाले आणि पुढे हजेरी घेऊ लागले, “बाळू चव्हाण?”
त्याने नुसता हात वार केला.
“का रं, बा निवडणुकीला उभा राहिलाय का तू?” वर्गशिक्षक तसे म्हणाल्यावर बिचारा हात खाली घेत ‘हजर सर’ म्हणाला मग.
“सुविद्या पवार?”
“हजर सर.” पार कोपऱ्यातून अगदी बारीक आवाजात तिने म्हटले. पाचवीच्या वर्गातील सर्वांत मोठी विद्यार्थिनी ती. दोनदा नापास झाल्यामुळे परत अजून याच वर्गात आली होती. दिसायला सावळी, अंगाने जणू वयात येऊ पाहतेय अशी. केसांची एक वेणी घातलेली ती पण आठ-पंधरा दिवसांपूर्वी. आणि त्यांना तेल? इथं चपातीला तेल लावायला मिळायची पंचाईत, केसांना कधी लावणार? त्यात अजून अंगावर घातलेला तो झगाही ठिकठिकाणी हातावर शिवलेला.
“पवार, कुठं हुतीस काल?”
“सर, कापूस येचायला गिलती.”
“पुढच्या वर्गात जायचं हाय का न्हाय? का हितंच बसायचं हाय? का रानात कापूस येचत बसायचं हाय?”
तिने खाली बघत नुसती मुंडी हलवली. माना वळवळवून पाहणाऱ्या काही पोरींनी तर नाके मुरडली तिला पाहून.
“काय नंदीबैलागत मान हलवतेय नुसती. तुझं नाव सुविद्या न्हाय कुविद्या ठिवायला पाहिजे हुतं घरच्यांनी! एवढा आरक्षणाचा फायदा मिळतोय; पण तुम्ही उचलणार न्हाय. बस खाली.” वर्गशिक्षक असे म्हणताच वर्गात एकच हशा पिकला. त्यांनी मग पुन्हा मोठ्या आवाजात दरडावून त्यांनी वर्ग शांत केला.
पहिला तास संपल्याची घंटा वाजताच वर्गशिक्षक वर्गाबाहेर पडले आणि पाटील मॅडम आत आल्या. गणिताच्या. सगळा वर्ग उभा राहत गुड मॉर्निंग मॅडम म्हणाला खरा; मात्र मॅडमनी बसा म्हणताच वर्गातील पाच-सहा पोरं-पोरी मिळून खाली बसले. बाकी सगळे उभा होते.
जे खाली बसले होते त्यांनी कालचा गृहपाठ पूर्ण केला होता आणि उभा राहिलेले मग सांगायलाच नको! नित्यनियमाने ते एकेक छडी खाऊन खाली बसतील मग!
मॅडमनी हातात छडी घेऊन ओळीने प्रसाद वाटपाचे काम सुरू केले. तेव्हा मागे उभ्या राहिलेल्या पोरांच्या हसण्याचा आवाज झाला.
खिडकीतून कुणीतरी बाई सतत डोकावून पाहत होती आणि ‘ईद्दे. . . ईद्दे’ म्हणून बारीक आवाजात तिला पाहून हाका मारीत होती.
“कोण आहे रे तिकडे?” मॅडमने पोरांना विचारले.
पोरंही हसतच म्हणाली, “म्याडम, सकु हाय सकु.”
मग मॅडम तिथे येत म्हणाली, “कोण पाहिजे सकु?”
“ईद्देकडं काम हाय.” सकु म्हणाली.
“कुठल्या ईद्देकडं? या वर्गात कोण ईद्या बिद्या नाय.” मॅडम असे म्हणताच सुविद्या मोठ्याने म्हणाली, “मॅडम ती माझ्याकडं आलिया. आय हाय माजी ती.”
मॅडम मग सखूकडे पाहत म्हणाल्या, “अगं मग दरवाज्यातून यायचं सखू. खिडकीतून कशासाठी? ये बरं दरवाजात.”
खिडकीतून डोकावणारी सखू आता वर्गाच्या दरवाजात येऊन उभी राहिली. दिसायला अगदीच सुविद्यागत होती. काळीच. दात आणि डोळे तेवढे पांढरे. अंगावर चुरगळलेली साडी. तिचाच पदर डोक्यावरून घेऊन खांद्याशी लपटलेली ती अनवाणी पायाने गावातून दीड किलोमीटर पोळत्या भुईचे चटके सोशीत आली होती. गळ्यातील मंगळसूत्राशिवाय दागिना म्हणून अंगावर दिसला तर शप्पथ! साधी बांगडी सुद्धा नव्हती!
दरवाजात उभी राहून ती सुविद्येला नजरेनेच खुणावू लागली चलण्यासाठी. तीही मग ती वायरची पिशवी हातात घेऊन पुढे आली.
“जास्त महत्वाचं काम आहे का?” मॅडमनी विचारले.
“पावणी, पावणी आल्याती घरी.” सखू म्हणाली.
“अगं सखू, पाहुणी रावळी तर येतच राहतात. असल्या कारणांसाठी पोरीला कशाला न्यायचं? शाळा बुडती ना मग.” मॅडम म्हणाल्या.
“तिला बगायला आल्याती पावणी.” सखू म्हणाली. मॅडमला आता पुढे काय बोलावे काहीच सुचेना. हातात छडी पकडून त्या एखाद्या पुतळ्यासारख्या स्तब्ध झाल्या. मनात विचारांचे काहूर माजलेले. पोरीचं वय ते काय? चाललेत लग्न लावायला. शरीर म्हणजे काय अजून समाजण्याच्या फार दूर आहे ती. तोवर देतील कुणालातरी त्याचे लचके तोडायला. आता कुठे ती कळी उमलू पाहतेय आणि देतील अशीच तिला मग कुणालातरी कुस्करायला. तिचा गंध नी सुगंध ओरबाडायला!
तारुण्याच्या उंबरठ्यात ती अजून पोहचायची आहे. त्या उंबरठ्यापलीकडे एक उद्यान आहे ज्यात तिला मनसोक्त खेळायचं आहे, बागडायचं आहे, गीते गायची आहेत नी काव्ये रचायची आहेत. फुलपाखरू होऊन थोडं-थोडकं का असेना पण तारुण्य जगायचं आहे. मग का निघालेत त्या फुलपाखराचे पंख छाटायला? का हवा आहे तारुण्या आधीच तो वात्सल्याचा पान्हा? का ऐन तारुण्यात कडेवरती ती ओझी हवीत? का हवीत?
“मॅडम जाऊ?” सुविद्येच्या त्या निरागस प्रश्नाने मॅडमची ती तंद्री तुटली आणि त्या भानावर आल्या आणि त्यांनी सखुला विचारले, “मुलगा काय करतो?”
“मुलगा कुठला नशिबी मॅडम. थडर हाय एक विधुर झालेला.” सखू बोलून गेली. मॅडमच्या काळजात तर एकदम धस्स झाले. खूप कारुण्यपूर्वक चेहऱ्याने त्या सखुला म्हणाल्या, “सखू, कशाला हे? आई आहेस की अगं.”
“पोटाची लै आबदा उठतीया म्याडम. हिच्या पाठीवर अजून चार लेकरं हायती. ही गिली म्हंजी हिच्या पोटाचं पण मिटंल अन् मागच्यांची बी वडाताण कमी हुईल.” ती बोलत होती आणि मॅडम ऐकत होत्या. वर्ग सगळा चिडीचुप झाला होता एकदम.
“चल गं.” असे म्हणत सखुने तिच्या दंडाला पकडले आणि दोघी जाण्यासाठी वळल्या.
“मॅडम जाऊ?” सुविद्येनं पुन्हा प्रश्न केला.
मॅडमला पुन्हा तंद्री लागण्यासारखे झाले; पण वेळीच सावरत त्या बडबडू लागल्या, “बालविवाह. कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह आहे हा. गुन्हा करतेय सखू तू, तू गुन्हा करतेय. कळी आहे गं ती, कळी. खुलू दे, उमलू दे, सुगंध पसरवू दे तिला!”
मॅडम बोलत राहिल्या आणि त्या दोघी पायऱ्या उतरून गेल्याही.
“मी. मी हेडमास्तरांच्या कानावर घालते. मी नाही होऊ द्यायची. बालविवाह. गुन्हा आहे.” असे म्हणत मॅडम तरातरा हेडमास्तरांच्या खोलीकडे चालू लागल्या. चालता चालता त्यांची नजर लगबगीने निघालेल्या त्या दोघी मायलेकींवर पडली आणि मॅडम जागीच थांबल्या. पोरीला छातीशी धरून तिच्या डोक्यावर पदर देऊन ती माय कावरी बावरी होऊन तापलेली डांबरी तुडवीत गावाच्या दिशेने निघाली होती. पोटासाठी पोटच्या गोळ्याची पाठवणूक करणार होती ती!
काल भारताच्या करनाम मल्लेश्वरीने सिडनी olympic games ऑलिंपिक olympic मध्ये कास्य पदक जिंकले म्हणून संध्याकाळी शाळा सुटल्यावर पीटीचे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना सांगत होते. मॅडम अजूनही गळ्यातील मंगळसूत्राशी चाळा करीत सुविद्येच्या विचारातच हरवलेल्या तिथे नुसत्या उभ्या होत्या.
त्यानंतर ती कधी शाळेत दिसली नाही की मॅडमची नी तिची गाठ पडली.!
[समाप्त]
लेखणी संग्रामच्या अजून कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
[…] कळी खुलू दे […]
छान…..
Visit our blog too – https://www.bedunechar.in
thanks
[…] कळी खुलू दे […]
[…] कळी खुलू दे […]
heart touching
thanks