
हल्ली हल्ली सुचतच नाही
हल्ली हल्ली सुचतच नाही काय लिहावं ते.
काहीतरी, थोडं का असेना पण लिहायचं ठरवून देखील लिहिलं नाही जात. तशा दोन तीन ओळी टाईप (type) करतोही मी; पण बोटे पुढे कीबोर्ड (keyboard)वर चालतच नाहीत. मग टाईप केलेल्या त्या ओळी पुसून टाकतो. पुन्हा काहीतरी लिहू असं मनाशी ठरवतो आणि…
कोलाहल माजलाय नुसता मनात. वाटतं लिहिण्यासारखं खूप काही आहे आपल्याकडे. हे लिहू ते लिहू. अमुक अमुक तमुक तमुक. अहं. प्रत्यक्षात लिहिताना मी मात्र पूर्ण ब्लँक (blank). रिकाम्या ग्लासागत (glass).

ग्लासातला चहा संपल्यावर त्या खरकट्या ग्लासाभोवती त्या चारदोन माशा घोंगावतात ना तसे विचार माझ्या मनाभोवती घोंगावताहेत; पण पुढे काही मोठ्ठं लिहावं यासाठी तूर्तास तरी कोणताच विचार माझ्या मनावर विराजमान मात्र होत नाही.
एक निर्वात पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतंय. आणि त्या पोकळीत माझं मनयान दिशाहीन प्रवास करीत असल्यासारखं कधी या दिशेला तर कधी त्या दिशेला उगाच आपली मार्गक्रमणा करताना दिसत आहे.
प्रत्येक फुलात काही मध नसतो, काही फुलांवर असंच बसून यायचं असतं हे मधमाशीला बरोबर ठाऊक असतं. कारण कधी कधी नुसतं बसणं देखील त्या फुलाचं फळात रूपांतर करीत असतं.
पण मग म्हणून काहीही का लिहावं? पण काहीच न लिहिण्यापेक्षा काहीतरी लिहिणं कधीही उत्तमच ना! न लिहिताना होणारी अस्वस्थता जर काहीतरी लिहून दूर होणार असेल तर मी लिहायलाच हवं.
पण समोर उभ्या असलेल्या त्या अजस्त्र आणि अभेद्य भिंतीचं काय? ती जमीनदोस्त झाल्याशिवाय तिच्या पल्याड अडलेले विचार, विषय मुक्त कसे होतील?
लहानांच्या गोष्टी, मोठ्यांच्या कथा, हळव्या कथा, रडव्या कथा, मादक कथा, प्रेम कथा, भय कथा, काही अशाच कथा. काही कविताही! त्याही प्रेम, आशा आणि निराशेच्या. कधी चैतन्याच्या, उत्साहाच्या वगैरे वगैरे! खूप काही अडवून टाकलंय त्या भिंतीने. मी तीही करेन जमीनदोस्त.
लहानपणी आत्त्या कितीतरी गोष्टी सांगायची. आम्ही मांडी घालून तिच्या शेजारी ऐकत बसायचो. किती खजिना होता तिच्याकडे. अफाट नी भन्नाट. रोज नवी राजकुमारी, रोज नवा राजकुमार. नवा राक्षसही रोजच! रोज एक नवंच राज्यही! बाबो!
तासनतास ऐकत बसायचा तेव्हा कधी कंटाळा आला नाही. ना आत्या कधी सांगायची कंटाळली. ज्या ज्या वेळी वाटलं आता सांगायला काही नाही त्या त्या वेळेस तिनं नवंच काही निर्माण केलं.
कधी कधी वाटतं, तीला लिहीता वाचता येत असतं तर आज केवढा अस्सलिखित खजिन्याचा वारसा मला जतन करण्यासाठी लाभला असता. आता त्या गोष्टी नीटशा आठवत देखील नाहीत!
तिच्या पुढ्यात कधी नसेल का ठाकली अशी भिंत? कशी केली असेल तिने तिला भुईसपाट? विचारायला हवं.
प्रेमावर (love) लिहिलेलं आवडीनं वाचतात लोक. त्याहीपेक्षा मादक लिहिलेलं. बायकांचे विषयही चांगलेच वाचले जातात. मुळात बायकाच बायकांवरचे लिखाण जास्त वाचतात. उगाच नाही बाईच बाईला समजून घेत! पांचट लिखाणाला तर लोक ढुंकूनही पाहत नाहीत. पण विविध विषयांवर लिहिलेलं वाचायला वाचकांचे विविध वर्ग आहेतच.
शेवटी एका लेखकाला लिहिण्यासाठी त्याला प्रोत्साहन देणारा वाचक त्याच्यासोबत असणं आवश्यक आहे. वाचकांशिवाय लेखक भिकारीच!
हायस्कुलला (a high school) असताना एक बऱ्याच पुढच्या वर्गातला पोरगा कविता करायचा. कधीमधी तो कागदावर उतरवून आणून वाचायला पण देई. एके दिवशी मात्र जुना पेपर (paper) नजरेखालून घालताना त्याच्या कवितेतील शब्द नजरेस पडले. तेही निरनिराळ्या कवितांत. लेकाचा या कवितेतून एक ओळ उचल त्या कवितेतून एक ओळ उचल असे करत आपली कविता रचत होता. आणि फारच चोरी नको म्हणून मग आपल्या अंगची एखादी पांचट ओळही तीत घुसडीत होता. असो, त्या महाशयांना कविता लेखनात मोठ्या गटात पाहिलं बक्षिसदेखील मिळालेलं होतं. त्यामुळे मी काही त्याचे बिंग फोडले नाही ना त्याला काही बोललो. म्हटलं ती कला तर काही कमी आहे?
सगळ्यात भारी लेखक त्यावेळी असायचे ते जे पोरींना प्रेमपत्र लिहायचे. रविवारी मसुदीजवळ बोकड कापलेले असायचे तेव्हा तिथून कशीबशी रक्ती घेऊन यायचे आणि आपल्याच रक्ताने हे प्रेमपत्र आपण कसं लिहिलंय हे पोरीला पटवून द्यायचे. बिचाऱ्या पोरीपण रक्ताने लिहिलेले आपले नाव पाहून हळव्या व्हायच्या. कधी डोळ्यांत असावे आणायच्या. तरीपण चांगला आठवडाभराचा अवधी घेऊन आपला होकार कळवायच्या. कधी पत्रातून तर कधी नुसत्या डोळ्यांनीच!
आता कुणी कुणाला पत्र तसं लिहीतही नाही. नाहीतर पूर्वी पोस्टात पत्रांचा खच पडलेला असायचा. पोस्ट ऑफिस (post office) बाजूलाच असल्यामुळे मला ते दिसायचं. मग व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रमाणे पत्रांचे मजकूर असायचे. आता इतरांची पत्रे वाचू नयेत पण कोण काय लिहितो याचं कुतूहल असायचंच ना! वाचायचोच- मंबैला (mumbai) लै बक्कळ पाऊस पडायला लागलाय, पार अंग शेवाळल्यागत झालंय. म्हातारी काय टपकंना झालीय. मुळव्याधानं (piles)तोंड वर काढलंय. म्हैस गाभण राहिलीय का? अमक्याची पोरगी पळून गेली. तमक्याला एड्स (AIDS)झालाय. पाटलाचं म्हातारं टपकलं का? दत्ताची गाय हाय तशी गाय विकत आणली. वार्षिक परीक्षेला एवढे तेवढे मार्क मिळाले. इत्यादी इत्यादी!
किती काही लिहिण्यासारखं असतं लोकांकडे? मी मात्र या महिन्यात साधा एक ब्लॉगही लिहू नये? मागच्या महिन्यात देखील एकच ब्लॉग (blog) लिहिला होता. असं करून कसं चालेल? लिहीत राहिलं पाहिजे. वाट्टेल ते लिहिलं पाहिजे. सुचेल ते लिहिलं पाहिजे. लिहिलं पाहिजे! कधी कुणाला काय आवडेल काही सांगता येत नाही. अगदी एक वाक्य देखील कमान सांभाळू शकतं, म्हणून लिहिलं पाहिजे!
आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.
व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १
लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
मॅरेज मटेरियल Marriage Material
मी मॅरेज मटेरियल mi marriage material
ती आणि ती A lady and a prostitute
न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night
chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi with moral
marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,
रक्षाबंधन विषयी संपूर्ण माहिती नक्की वाचा.