• Pune, Maharashtra
कथा
गोदा म्हातारी: भाग २

गोदा म्हातारी: भाग २

Spread the love

goda mhatari
goda mhatari

मनात कसलातरी विचार करून तो व्यापारी तिला म्हणाला, “दहा पैशाला एक अंडं हाय म्हातारे, तेवीस अंड्यांचं दोन रुपय अन तीस पैसं हुत्यातं.” असं म्हणून त्याने खिश्यातुन दहा-दहा पैशांची चिल्लर बाहेर काढून तिच्या हातात ठेवली.
         “मोजून घी बाय.”
         “मला अडाण्याला काय जमणार हाय मोजायला? तू इस्वासानं मोजून दिलं म्हंजी बास की.” असे म्हणत तिने ओंजळीत ती चिल्लर घेतली आणि तशीच ती ओंजळ मस्तकाला लावली व कमरेचा बटवा सोडून त्यात टाकून दिली. व्यापाऱ्याने अंडी आपल्या पिशवीत घातली आणि तो तिथून निघून गेला. गोदा म्हातारीने पिशवीतली राख मागे टाकली आणि उठून पिशवी झाडून ती आत बाजारात शिरली.


घ्या शेपू घ्या शेपू ,घ्या गवार ,घ्या कुथमीर ,वांगी घ्या ,तंबाटी घ्या तंबाटी– शेतकरी जोरजोरात ओरडत आपला माल विकत होते. भाजीपाला खरेदी करायला आलेले लोक घासाघीस करीत खरेदी करीत होते. गोदा म्हातारी बाजारात घुसली ती सरळ भज्याच्या घाण्यासमोरच जाऊन उभी राहिली. घामाघूम झालेला वाणी हातात झाऱ्या पकडून उकळत्या तेलातले भाजी हलवत होता.
          “तरी म्हणलं म्हातारी अजून आली कशी न्हाई.” गोदा म्हातारीला समोर पाहून तो म्हणाला व तोंडावर आलेला घाम फडक्याने पुसला आणि एका पेपरात मूठभर भजी तिला खायला दिले. म्हातारीने तिथेच सावलीला बसून भजी खाल्ले आणि पैसे देऊन भाजीपाला घ्यायला निघून गेली.
          भाजीपाला घेऊन ती आता किराणा घ्यायला तिच्या नेहमीच्या दुकानात शिरली. दुकानदाराने काही न विचारता तिला नेहमीचा किराणा माल पिशवीत भरून दिला. तेव्हा म्हातारीने बटव्यातून उरलेले सगळे पैसे काढून त्याच्या समोर ठेवले. दुकानदाराने ते पैसे मोजून घेतले आणि म्हणाला, “म्हातारे, ह्या येळेस बी धा पैसं कमी दिलं तू.”
          “का रं बाबा, सामान महाग बीग झालं का काय?”
          “महाग काय बी न्हाई झालं. तूच पैसं कमी दिल्यातं. गेल्या येळेस बी कमी आणि आत्ताबी कमी.”
          “पडलं असत्यालं कुठंतर बाजारात. पुढच्या येळेस सगळं दिती.”
          डोक्यावर बाजारची पिशवी घेऊन म्हातारी आता शंकर अण्णाच्या बैलगाडीकडे आली. आण्णा बाजाराच्या पिशव्या बैलगाडीत टाकून, हातात बैलांचा कासरा पकडून म्हातारीची वाटच पाहत होते.
          “लै उशीर केला म्हातारे. बैलं तान्ह्याजली हायती माझी. चढ लवकर.”
          म्हातारीने डोक्यावरची पिशवी बैलगाडीत ठेवली आणि तीही आत चढून बसली. शंकर आण्णाने परत चाबकाची घुंगरे वाजवली आणि कासऱ्याला हिसका दिला तशी बैलगाडी गावच्या दिशेने निघाली. बराच वेळ झालं म्हातारी काही बोलली नाही म्हणून शंकर आण्णाने तिच्याकडे पाहत तिला विचारले, “म्हातारे लै गप्प हायस. अंडी खपली न्हाईत का?”
          त्यावर म्हातारी त्याला काहीच बोलली नाही. उलट डोक्याला हात लावून ती बावकाडाला टेकून बसूनच राहिली. छोटी जयश्री बाजारातून घेतलेल्या भिंगरीसोबत खेळात होती. म्हातारीने आपल्या गळ्यातील बत्तीस मण्यांच्या बोरमाळेला हात घातला आणि हळूच पदराआडून माळ बाहेर काढून तिने ती जयश्रीला दाखवत विचारले, “जयडा, ह्या बोरमाळत किती मणी हायतं तेवढं मोजून दिती का गं माझी बाय?”
          जयश्रीने हातातील भिंगरी फिरवायची थांबवली आणि ती तिच्या पुढ्यात येऊन बसली आणि एकेक करून बोरमाळेतील मणी मोजू लागली. त्या लहान पोरीची हुशारी पाहून म्हातारी अगदी सुखावून गेली होती.
          “…… तीस… एकतीस… आणि बत्तीस. बत्तीस मणी हायतं.” मणी मोजायचे संपले तसे ती म्हातारीला म्हणाली.
          “संकरा, पोरगी मास्तरीण हुनार बघ मोठी हुन.” ती मोठ्यानेच म्हणाली. तिला एक विलक्षण आनंद झाला होता.
          “मास्तरीण नगस म्हणू म्हातारे, म्याडम म्हण म्याडम. म्याडम करणार हाय मी तिला.”
          “कर कर बाबा. लै हुशार हाय लेकरू.” असे म्हणत तिने आपली बोटे कानाजवळ मोडून तिची मया केली आणि आपल्या पिशवीतील एक केळ काढून तिच्या हातात ठेवलं.
          “माझी म्याडम हुशील का?” तिने छोट्या जयश्रीला विचारले. कदाचित म्हातारीचा प्रश्न तिला काळाला नसावा. ती स्मितहास्य करत गोड म्हातारीकडे पाहतच होती.
          “जयडा, हुशील का माझी म्याडम? शिकवशील का मला?” म्हातारीने पुन्हा तिला विचारले. जयश्रीने तिला होकारार्थी मान हलवली.
          “संकरा, तुझी लेक म्याडम झाली बरं का.”
          “म्हातारे, मला काय बी कळत न्हाई तू काय म्हणत्यायती.”
          म्हातारीने जयश्रीला जवळ घेतले आणि तिला म्हणाली, “तुला रोज एक अंडं दिन मी. दिस मावळला की येत जा माझ्याकडं.”
          बघता बघता बैलगाडी म्हातारीच्या खोपीसमोर येऊन उभी राहिली. म्हातारी पिशवी घेऊन गाडीतून खाली उतरली आणि जयश्रीला संध्याकाळी येण्याची आठवण करून देऊन ती खुराड्याकडे आली. खुराड्यातील कोंबड्यांनी घातलेली अंडी काढून घेऊन कोंबड्या सोडून देऊन ती हातातील अंड्यांकडे पाहत आत खोपेत आली.
          दिवस मावळू लागला होता. गोदा म्हातारी शेणाने सारवलेल्या भुईवर हात ठेवून, आत खोपीत बसून जयश्रीच्या येण्याची वाट पाहत बसली होती. साधारण अर्ध्या तासाने जयश्री हातात पाटी-पेन्सिल घेऊन तिच्याकडे येताना तिला दिसली तशी ती लगबगीने जागेवरून उठली आणि वरती घडी घालून ठेवलेले घोंगडे खाली अंथरून उभी राहिली.
          आता जयश्री रोज न चुकता तिला शिकविण्यासाठी तिच्या खोपीत येत होती आणि गोदा म्हातारीही न चुकता तिला कबूल केल्याप्रमाणे रोज एक अंडे देतच होती. कधी उकडलेले अंडे तर कधी अंड्याची पोळी!           दिवसामागून दिवस जात होते. जयश्री कधी हातात काठी घेऊन तिला शिक्षा देई, तर कधी पाठीवर शाबासकीची थापही मारी, गोदा म्हातारीही कधी चुकलं म्हणून स्वतःचे कान पकडी तर कधी थोडी अवघड आकडेमोड करून जयश्रीला चकित करी. म्हणतात ना शिक्षण घ्यायला वय लागत नाही, तसेच शिक्षण द्यायलाही वय लागत नाही!
          आज पुन्हा शनिवार होता. गोदा म्हातारी पुलावर अंडी विकायला बसली होती. कडाक्याचं ऊन होतं. तिने आपला पदर डोक्यावर ओढला होता.
          “म्हातारे, आज किती अंडी आणल्याती?” त्या व्यापाऱ्याने खाली बसत तिला विचारले.
          “दहा अंडी पाच वेळा आणि वर सा अंडी.”
          तिने असे म्हणताच त्याने खिश्यातुन परत दहा पैशाची चिल्लर बाहेर काढली आणि मोजून तिच्या हातात ठेवून दिली, “हि घी पाच रुपय आणिसाट पैसं.”
          म्हातारीनं आपली ओंजळ पुढे करत पैसे आपल्या हातात घेतले आणि कपाळाला लावले.
          “काय म्हातारे, आज लै अंडी आणली. कोंबड्या वाढवल्या का काय?” असे म्हणून तो व्यापारी तिथून उठला आणि जाऊ लागला तेवढ्यात म्हातारीने त्याला थांबवले आणि जवळ बोलावून घेतले. म्हातारी आता एकेक नाणं मोजू लागली होती तसा त्याचा चेहरा उतरू लागला.
          “चार रुपय ऐंशी… चार रुपय नव्वद…आणि पाच रुपय. वरचं साठ पैसं तर तू दिलंच न्हाइतं मला.”
          खजील होऊन व्यापाऱ्याने खिश्यातुन हळूच साठ पैसे काढून तिच्या हातात ठेवले आणि तो तिथून उठून जाऊ लागला; पण ती बोलू लागताच तो तिच्याकडे पाठ करून तसाच उभा राहिला.
          “तू इचारलं हुतं न्हवं कोंबड्या वाढवल्या का म्हणून. न्हाय, म्या कोंबड्या न्हाय वाढवल्या. म्या ग्यान वाढवलं माझं, ग्यान.”
           हसता हसता गोदा म्हातारीचे दातवानाने काळे झालेले दात तिचा आनंद सांगायला पुरेसे होते….!

[समाप्त]


Spread the love

3 thoughts on “गोदा म्हातारी: भाग २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *