• Pune, Maharashtra
कथा
गोदा म्हातारी: भाग १

गोदा म्हातारी: भाग १

Spread the love

         गोदा म्हातारी

गोदा म्हातारी
गोदा म्हातारी

गोदा म्हातारी

खुराड्यातूनच कोंबड्याने जोराची बाग दिली, तशी गोदा म्हातारी झोपेतून जागी झाली. उशाखाली ठेवलेली काडेपेटी बाहेर काढून तिने काडी पेटवली आणि त्या पेटत्या काडीने तिने खोपीच्या आधारासाठी रोवलेल्या लाकडाला अडकवलेल्या कंदीलाची वात पेटवली, तसा तिच्या खोपीत उजेड झाला. त्या उजेडात तिच्या हातातील काचेची कांकणे जशी चमकली तसे तिचे सुरकुतलेले सावळे हात अधिकच उठून दिसले. खुराड्यातून कोंबडा बाग देतच होता. त्याची बाग देऊन झाली की लांबून कुणाच्यातरी खुराड्यातून दुसरा कोंबडा बाग देई, त्याची बाग देऊन संपते न संपते तोच तिसरा कोंबडा अजून दुरून बाग देण्यासाठी सज्ज असायचा.
          अजून तांबडं फुटलं नव्हतं. गोदा म्हातारी खोपीचं कुडाचं दार उघडून हातात कंदील घेऊन बाहेर आली आणि चुलीसमोर येऊन बसली. चुलीच्या दगडाला लावून पालतं घातलेलं आणि सारखं पाणी तापवून काळं पडलेलं भगुलं तिने चुलीवर ठेवलं. चुलीच्या बाजूला ठेवलेल्या चिल्लारीच्या वाळलेल्या काटक्या आणि शेंगा तिने थरथरत्या हाताने चुलीत कोंबल्या आणि तिथेच दगडाच्या फटीत कोंबून ठेवलेल्या पेपराची एक चिटोरी बाहेर काढून तिने ती कंदीलाच्या वातेला लावून पेटवली आणि परत ती चुलीत घातली. शेजारी ठेवलेली फुकारी आपल्या तोंडासमोर धरून ती तिच्या जीर्ण झालेल्या फेफड्यांतून हवा फेकू लागली तशी चूल पेटू लागली.
          चूल चांगली पेटली आहे हे पाहून ती उठून आत गेली आणि एका हातात दातवण पावडर आणि एका हातात पाण्याने भरलेली छोटी कळशी घेऊन ती बाहेर आली. चुलीवरच्या भगुल्यात तिने ती कळशी ओतली आणि चवड्यावर बसूनच ती चुलीसमोर बसून दात घासू लागली.
          आज शनिवार, आटपाडीच्या बाजाराचा वार होता. दर शनिवारी गोदा म्हातारी, आठवडाभर तिच्या कोंबड्यांनी घातलेली अंडी घेऊन बाजारात विकायला जायची. बरोबर पावणे सातला शंकर आण्णाची बैलगाडी तिच्या दारातून बाजाराला जायची. त्यामुळे त्यांच्या बैलगाडीत बसून बाजाराला जाण्यासाठी तिची एवढी गडबड सुरु होती. तशी दर शनिवारी तिची अशी धांदल उडतच असे!
          आता बऱ्यापैकी उजाडले होते. आकाशाची काळी चादर आता हळू हळू सफेद होऊ लागली होती. म्हातारीने चुलीतला जाळ आत सारला, चिंपाटात पाणी ओतले आणि तोंडातील दातवानाच्या काळ्या पिचकाऱ्या मारीत ती मागे चिल्लारींच्या झुडपात परसाकडंला गेली.
          आत खुराड्यात कोंबड्यांच्या कलागती सुरु झाल्या होत्या. त्यांना कधी एकदा खुराड्यातून बाहेर पडतोय असे झाले होते. त्यांचे कुक्कुडने, कलागती आणि पंखांचे फडफडणे याने तो करंजाच्या फोकांनी बनवलेला खुराडा थरथरत होता.
          चुलीतला जाळ आता विझला होता. म्हातारीने लगबगीने येऊन चिंपाट टेकवले व खोपीत जाऊन एका चिपट्यात कोंबड्यांना दाणे घेऊन बाहेर आली. खुराड्याजवळ येऊन तिने चिपट्यातील दाणे हाताने आजूबाजूला विस्कटले आणि खुराड्यावर झाकलेल्या लोखंडाच्या पाटीवरचा काळा धोंडा बाजूला ठेवला व खुराड्यात हात घालून तीने पहिल्यांदा तो कोंबडा सोडून दिला. आता खुराड्यात हात घालून ती एकेका कोंबडीचे दोन्ही पंख हातात पकडून तिला बाहेर काढत होती आणि आपल्या करंगळीने ती आज अंडे देईल की नाही ते तपासून पाहत होती. अंडे देणारी कोंबडी ती परत खुराड्यात टाकत होती. तीन कोंबड्या खुराड्यात ठेवून त्यांना दाना-पाणी ठेवून तिने तो खुराडा बंद करून दिला आणि चुलीकडे जाऊन गरम पाण्याने हात धुवून तिने ते गरम पाण्याचं  भगुलं बादलीत पालतं केलं व आत खोपीत कपडे आणायला गेली; ती एका हातात लुगडे व दुसऱ्या हातात चहाचं भगुलं घेऊनच बाहेर आली. काटकाने चुलीतील आर बाहेर ओढून तिने ते चहाचं भगुलं त्या आरावरती ठेवून दिलं आणि बादली उचलून ती, काटकांचाआधार देऊन, लुगड्याच्या फडक्यांनी बनवलेल्या मांडीएवढ्या उंचीच्या नहानीकडेअंघोळीला गेली. बाहेर मोकळ्या सोडलेल्या कोंबड्या मोठ्या आनंदाने आपल्या चोचीने दाणे टिपत होत्या.
          पूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं. पक्षांचा किलबिलाट सुरु झाला होता. बाजाराला जाण्यासाठी लोकांची लगबग सुरु झाली होती. अंघोळ उरकून म्हातारी अंगावर लुगडं गुंडाळून आत गेली. शंकर आण्णाची बैलगाडी कधीही दारात येईल म्हणून तिची पळापळसुरु होती. लुगडे नेसून, पिकलेल्या केसांचा बुचडा बांधून तिने डेऱ्यात, राखेत घालून ठेवलेली अंडी एकेक करून आपल्या कापडी पिशवीत टाकली आणि अंडी फुटू नयेत म्हणून डेऱ्यातूनच चांगल्या दोन ओंजळी राखही तिने त्या पिशवीत टाकून दिली व पिशवीला गाठ मारून, राखेचे हात झाडून ती खोपीतून पिशवी व सोबत बशी घेऊन बाहेर आली. आरावरच्या भगुल्यातला चहा उकळला होता. पेपराच्या घड्या करून तिनं चहाचं भगुलं त्यात पकडलं आणि अलगदच बशीत चहा ओतला. गाळून न घेताच!
          चवड्यावर बसून, दोन्ही हातांच्या मध्ये आपले गुडघे घेऊन गोदा म्हातारी कोऱ्या चहाचे फुरके मारत बसली होती, तेवढ्यात घुंगरांचा आवाज करत शंकर आण्णाची बैलगाडी तिच्या दारातच आली.
          “उरकलं का न्हाई, म्हातारे?” बैलाचे कासरे ओढत बैलगाडी थांबवत शंकर आण्णाने मोठ्या आवाजात विचारले. सोबत त्याची नऊ वर्षाची मुलगी जयश्रीही आज गाडीत बसून त्याच्यासोबत बाजाराला निघाली होती.
          “झालं, दोनच घोट राहिल्यात. तू घेणार का?”
          “नकू, आत्ताच निघताना ईडा टाकलाय तोंडात.”
          म्हातारीनं चहा पिऊन बशी पाण्याने विसळली आणि खोपीच्या दारातूनच आत सारून दिली व झापड आडवी लावून अंड्यांची पिशवी घेऊन ती बैलगाडीकडे आली.
          “का गं जयडा, आज साळंला दांडी वी?” पोत्याला टेकून बसलेल्या जयश्रीला पाहून ती म्हणाली. पायात घुंगरांचं पैंजण,अंगावर लुगड्याच्या कापडाचा परकर, वरती त्याच कापडाची चोळी, मनगटावरच्या दोन-दोन हिरव्या बांगड्या, खोबरेल तेलानं चपचपीत अशा केसांच्या दोन वेण्या, त्या वेण्यांच्या टोकाला लाल रिबनी, डोळे भरून तिच्या आईने लावलेले काजल, कपाळाला लावलेला गंध आणि गालावर जास्तीची थापलेली पावडर व कानात लोंबणारी, सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारी ती नाजूक डूलं पाहून गोदा म्हातारीला जयश्री जणु रखुमाईचं रूपच वाटली!
          “आण्णा आज मला बाजार दाखवणार हायतं म्हणून काल बयला सांगून आल्याय, आज साळा बुडवणार हाय म्हणून.” जयश्री म्हणाली.
           गोदा म्हातारीने अंड्यांची पिशवी आत ठेवली आणि एक पाय मागे लोंबकळणाऱ्या धटावर देऊन एका हाताने गाडीच्या बावकाडाला पकडून ती बैलगाडीत बसली.
          “बसली का म्हातारे?”
          “बसली बसली. जाऊ दी गाडी आता.” म्हातारी असं म्हणताच शंकर आण्णाने खांद्यावरच्या चाबकाच्या घुंगरांचा आवाज केला व कासरा ओढला तशी बैलगाडी आटपाडीच्या दिशेने निघाली.
          बैलगाडी आता गावकुसाबाहेर पडली होती. शंकर आण्णा तोंडातील पानाच्या लालबुंद पिचकाऱ्या मारत कासरा पकडून बसले होते. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांच्या कानामागून घामाच्या धारा लागल्या होत्या.
          “संकरा, लेका म्हातारीच्या हातचा कोरा च्या पिव न्हाई वी वाटत तुला?”
          “च्या काय पाजत्याय म्हातारे? एखादा कोंबडा काप की लेकासाठी.”
          “कोंबडा? न्हाय रं बाबा. एकटाच बापय हाय त्यो माझ्या कोंबड्यांत. बेण्याला ठिवलाय. कुंबडी बिंबडी कापायची आसंल तर सांग.”
          “कुंबडी कापल्यावर तुला मग अंडी कुठली गं मिळत्याली?”
          “खुडूक हाय की एक”
          “काय म्हातारे, खुडूक कोंबडी चारती का मला?”
          “बरं बाबा, पुढच्या येळंला तुझ्यासाठी पेशल कोंबडा ठेवते.”
          “आण्णा, मला बी खायचाय कोंबडा.” त्यांचं बोलणं एकूण जयश्री मध्येच बोलली.
          बैलगाडी आटपाडीच्या पुलावर येताच गोदा म्हातारी खाली उतरली आणि अंड्यांची पिशवी घेऊन पुलावरून पुढे चालत गेली. शंकर आण्णाने पुलावरून बैलगाडी खाली ओढ्यात उतरवली आणि पुढे नेऊन सुकलेल्या ओढापात्राच्या मैदानातउभी केली. अजून बऱ्याच बैलगाड्या येणे बाकी होत्या. ओढ्यात शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरला होता तर वरती शेतकरी माळवं, धान्य घेऊन येत होतेआणि बाजार पटांगणात उत्तरेश्वर मंदिराशेजारी आपापल्या जागा पकडून बसत होते. मग कुणी व्यापारी येऊन त्यांच्याशी शेतमालाचे सौदे करीत होता.
          गोदा म्हातारी पूल ओलांडून दुसऱ्या बाजूला आली आणि पूल संपताच त्याच्या कडेला कापडी पिशवीची गाठ सोडून राखेतून अंडी बाहेर काढून, डोक्यावर पदर ओढून विकायला बसली. किरकोळ गिऱ्हाईकाला अंडी विकण्यापेक्षा ती व्यापाऱ्यालाच विकणे पसंद करत असे कारण दिवसभर बसून एकेक अंडे विकत बसण्यापेक्षा व्यापाऱ्याला सगळीच अंडी एकदम विकली जात होती. पण मग तो व्यापारीही मोठा चलाख होता. सकाळी लवकर येऊन चढेल किंमतीत अंडी घेण्यापेक्षा तो दुपार होण्याची वाट पाहत असे. दुपार झाली की उन्हे तापू लागत आणि मग म्हातारीला आपली अंडी मिळेल त्या भावात विकून तिथून पाय काढता घेणे भागच असे. मात्र तोपर्यंत गोदा म्हातारी समोर अंडी ठेवून उन्हाचे चटके सोसत त्या व्यापाऱ्याची वाट पाहत तिथेच बसून राही.
         उन्हं डोक्यावर येताच तिचा नेहमीचा व्यापारी तिथे आलाच!
         “किती अंडी आणल्याती म्हातारे?” त्याने तिच्या समोर बसत विचारले.
         “दोन वेळा दहा आणि तीन हायती. किती हुत्यालं सांग बाबा. लै उन्हाचा काव हाय. थांबाया नकू हितं.”
         मनात कसलातरी विचार करून तो व्यापारी तिला म्हणाला, “दहा पैशाला एक अंडं हाय म्हातारे, तेवीस अंड्यांचं दोन रुपय अन तीस पैसं हुत्यातं.” असं म्हणून त्याने खिश्यातुन दहा-दहा पैशांची चिल्लर बाहेर काढून तिच्या हातात ठेवली.
         “मोजून घी बाय.”

 

[पुढे सुरू राहील.. ]


Spread the love

4 thoughts on “गोदा म्हातारी: भाग १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *