
गंडी अण्णा: भाग २
(mutton)
(mutton chop)
(how to cook lamb chops)
म्हसोबावरती जाऊन दोन्ही अण्णांनी पाहुण्याची जत्रा जोरदार खाल्ली. गंडी अण्णाने तर हा हूं हा हूं करत चांगलं अर्धा किलो मटण फस्त केलं. चाप आणि काळीज तर त्याने आवर्जून मागून घेतले होते. पोकळ मटण खाण्यात काय मज्जा नाही म्हणून त्याने सुरवातीलाच पाहुण्याला नळ्या वाढायला सांगितल्या होत्या. शिवाय ताटं लावताना आधी बोकडाचा नैवद्य त्याने सर्वप्रथम ताटांना लावायला सांगितले होते. चांगल्या तीन पितळी रस्सा त्यावर तीन पळ्या लालभडक असा कट, त्यावर पिळलेले रसरशीत असे पिवळेजरत लिंबू , सोबतीला मीठ लावलेला कांदा आणि अशा रश्श्यात कुस्करलेल्या दोन ज्वारीच्या भाकऱ्या व अखंड ताटातून वरती नाकाकडे उठणाऱ्या वाफांचा घमघमाट असा हा गंडी अण्णाचा म्हसोबावरच्या जेवणाचा थाट आणि त्यात आसपासच्या अनेक जत्रांचा सुटलेला रश्श्यांचा घमघमाट पाहून कुणाच्या तोंडाला पाणी नाही सुटले तर नवलच!
शेवटी दोन पळी रस्सा पितळीत घेऊन, त्यावर लिंबू पिळून व चिमूटभर मीठ टाकून गंडी अण्णाने पितळी तोंडाला लावली आणि फुर्रर्र फुर्रर्र घोट घेत त्याने तो पिऊन पण टाकला आणि वरती एक समाधानाची ढेकर पण देऊन टाकली.!
जेवण झाल्यावर पाहुण्यांशी थोडावेळ गप्पागोष्टी करून ते दोघेही परत जाण्यास निघाले व जाता जाता म्हसोबाच्या देवळात दर्शनासाठी गेले. दर्शन घेऊन, कपाळाला म्हसोबाचा अंगारा लावून ते देवळाच्या बाहेर आले आणि तिथे त्यांना गावातील हसनभाई भेटला. हसनभाई आणि हुसैनभाई दोघे भाऊ तिथे बोकडे कापण्याचे काम करायचे.
“काय राम अण्णा, आज हिकडं कायकू?” हसनभाईने विचारले.
“आलतो जत्रा जेवायला, पाहुण्याची.”
“मग जेवला का नाय? का डायरेक्ट आधी देवळात?”
“आधी पोटूबा अन मग म्हसूबा, हासण्या.” गंडी अण्णा मध्येच बोलला.
“लगा, म्हसूबा नसतंय इठूबा असतंय ते.” राम अण्णा म्हणाले.
“असुद्या की अण्णा, अभि वो म्हसुबा पे हिच है.” हसनभाई हसून म्हणाला आणि ते तिघेही हसू लागले.
“हसन्या, ऐतवारी मसुदीवर एखादं बोकाड कापणार हाय का?”गंडी अण्णाने विचारले. गावात मुसलमानांची दोन-एक कुटुंबे होती. ती जिथे वास्तव्यास होती त्या जागेला गावकरी मसुदी म्हणायचे. दर रविवारी तिथे एक-दोन बोकडे कापली जायची आणि त्याचे वाटे पाडून ते गावकऱ्यांना विकले जायचे.
“लगा गंडी अण्णा, आत्ताच खाल्लं न्हाय तवर तेरेकु अजुन मटनहिच खाने का है? काय राम अण्णा अजुन थोडी हड्डी चारणे का ना इसकू.”
“लगा भै, नरडीला येस्तोवर चारलंय की.” राम अण्णा म्हणाले.
“फिर?”
“भै, लगा पोरगं सारखं अण्णा मटान, अण्णा मटान करतंय. म्हटलं एकदा चारावंच त्येच्या आयला त्येच्या. मग हू दी खर्च!”
“किती? किलोभर करू का?”
“हे! किलोभर काय करायचंय? अर्धा किलो दी.”
“काय लगा, नुसताच तुझा हू दी खर्च हाय वी?”
गंडी अण्णा काहीच बोलला नाही.
रात्री जेवायला बसल्यावर घरात नुसता दारूचा वास सुटला होता. गंडी अण्णा स्वतःला सावरत जेवण करत होता. शेजारी गण्या मुकाट्यानं खात होता तर त्याची आई रागातच भाकऱ्या थापत होती.
“बाई, काय करायचं ह्या माणसाचं? ह्याला दिस कळंना ना रात कळंना. उठ की सूट दारू ढोसतंय नुसतं.” भाकरीचं पीठ मळता मळता ती गंडी अण्णावर खेकासली.
“व्हंय, तुझ्याच पैशाची ढोसतुया मी. फकड्या स्वतःच्या पैशाची पितूया. कुणाचा काय संबंध नाय आपल्याला बोलायचा. मग हू दी खर्च.” जड जिभेने तो बोलला.
“स्वतःच्या पैशाचा मूत बरा पेत नाय.”
“लय बोलू नगस. जीभ हासडून दिन हातात.”
“आये, दुपारी अण्णा इजारीत मुतलं हुतं.” मुताचा विषय निघाला तसा गण्या मध्येच बोलला.
“गैबान्या, गप खा की.” पाठीत जोराचा धपका घालत गंडी अण्णा त्याला म्हणाला.
“काय कळा आल्याय. पोरगं मार खातंय अन बाप मुततुया.” तव्यात भाकरी टाकत गण्याची आई म्हणाली.
“आसूदी आसूदी तू भाकरी वाढ.” गंडी अण्णा म्हणाला.
“म्हसुबावर काय कमी मटण हादडलं का? अजून वाढ म्हणताय?”
“अण्णा मटान.” मटणाचा विषय निघताच गण्या परत बोललाच.
“गाबड्या, काय मटान मटान लावलंय रं?”
“मग आणून द्यायचं थोडं. ढोसायची थोडी कमी दारू. पोरगं कधीपास्नं मागं लागलंय मटणासाठी; पण या माणसाला काय बी पडलं नाय त्येचं. पोराच्या नादानं आमालाबी दोन घास खायला मिळत्याली. आमालाबी खाऊ वाटतंच की. काय हौस म्हणून राहिली नाही बाई ह्या घरात.” पदर तोंडाला लावून ती म्हणाली.
“बास करती का आता?” असे म्हणून त्याने थोडा श्वास घेतला आणि म्हणाला, “ऐतवारी अर्धा किलो दी म्हणून सांगितलंय हसनभैला. मग हू दी खर्च.”
“अण्णा मटान.” गण्या जोरातच चेकाळला. आता या रविवारी त्याला मटण खायला मिळणार होते. हात धुवून तो खुशीतच बाहेर निघून गेला. काही क्षण तिथे शांतता होती. गण्याच्या आईने तिच्यासाठी ताटात जेवण घेतले. गंडी अण्णाने हळूच तिच्याकडे पहिले आणि म्हणाला, “मी काय इजारीत मुतलू बितलू नव्हतू काय. ते आपलं चंबूरच्या खाली घसरून पडलू हुतु म्हणून….”
गण्याच्या आईने त्याच्याकडे नुसते पहिले. ती बोलली काहीच नाही.
आज रविवारी गण्याची आई लवकर उठली होती. लवकर उठून ती मटणाच्या मसाल्याच्या तयारीला लागली होती. मटण चिरण्यासाठी तिने विळी घुवून पालती घातली, उखळात तिने खोबरे कुठून घेतले आणि घराच्या छताला अडकवलेल्या लसणाच्या झुंबडयातून लसणाचे दोन गड्डे काढून तिने गण्याच्या समोर ते सोलायला दिले व हातात साडी-परकर घेऊन ती अंघोळीला निघून गेली. गण्या डोळे चोळत लसूण सोलू लागला आणि दाराकडे नजर लावून गंडी अण्णाच्या येण्याची वाट पाहू लागला.
गंडी अण्णाही दिवस उगवायच्या आधी घरातून बाहेर पडला होता; पण मसुदीकडे जाण्याआधी तो छोट्याच्या पानपट्टीवरून सरमाडी टाकूनच तिकडे गेला होता. मसुदीकडे येऊन तो तिथल्या खडकावर गुडघ्यात डोके कोंबून तोल सावरत बसला होता. हसन व हुसैनभाई दोघांनी चांगली तयार अशी दोन बोकडे कापून चिलारीच्या झाडाला उलटी लटकवली होती व त्यांची कातडी काढण्याचे काम सुरु होते. हळूहळू मटणासाठी एकेकजण तिथे जमू लागला होता. आसपास चार-दोन कुत्रीही तिथे घुटमळत होती.
कातडी काढून झाल्यावर त्यांनी बोकडांचे मटण मोठ्या भगुल्यात कापून घेतले आणि शेजारी अंथरलेल्या फारीवर नेऊन तिथे ते वाटे घालू लागले. फारीवरती माशांचे घोंगावणे सुरु होते. फारीच्या एका बाजूला बसून म्हातारा कासीम मामू सुरा घेऊन तयारच होता. तिघांनी मिळून मटणाचे वाटे पाडले. सगळ्या वाट्यांत वजनाप्रमाणे काळीज, चरबी, वझडी, हड्डी, चाप इ. भागांची वाटणी ते करीत होते आणि त्या त्या नुसार ते लोकांना वजन करून, पिशवीत भरून देत होते.
“हसनभै, आज देणार हाय का?” गंडी अण्णाने गुडघ्यातून तोंड बाहेर काढून विचारले.
“यि की पुढं.” हसनभाई म्हणाला. मग गंडी अण्णा तिथे जाऊन बसला. हसनभाई तागडीत मटण टाकून तो ते जोखू लागला.
“भै, लगा काळीज-बोकं टाक की अजून.”
“डाल्या है की, देख तो.”
“उलिसं टाक की अजून.”
हसनभाईने छोटा काळजाचा तुकडा कापून तागडीत टाकला.
“थोडी आतडी बी टाक.”
“लगा, बघायला गेलं तर अर्धा किलो मटण खरीदेगा अन ये डाल वो डाल.”
“ये मामू , सांग की लगा.” गंडी अण्णा कासीम मामूकडे पाहत म्हणाला. मामूने हसनभाईला डोळ्याने इशारा केला तसे त्याने तागडीत थोडी आतडी टाकली. अर्धा किलो मटण जोखून त्याने ते मटण पिशवीत भरून तिला गाठ मारून ती पिशवी गंडी अण्णाच्या हातात ठेवली आणि म्हणाला, “नीट घिऊन जा नायतर पाडशील वाटंत.”
गंडी अण्णा भुईवर हात टेकून उठला आणि भेलकांडातच घराकडे निघाला.
मटणाचा सगळा मसाला, बाकी सगळी तयारी करून दरवाजात बसून त्याची बायको आणि गण्या गंडी अण्णाची वाट पाहत बसले होते; पण अजून त्याचा काही पत्ता नव्हता. शेवटी वैतागून गण्याच्या आईने गण्याला मसुदीकडे पाठवून दिले.
गण्याही धावतच घराबाहेर पडला आणि मसुदीकडे जाणाऱ्या बोळात शिरला. बोळात शिरताच धावता धावता तो एकदम चालू लागला. त्याची नजर कशावर तरी स्थिरावली होती आता. नजर स्थिर करून तो एकेक पाऊल पुढे टाकत होता. एक कुत्रं मटणाची पिशवी फोडून ती आपल्या दोन्ही पंजात पकडून खाली बसून मस्तपैकी मटणावर ताव मारत होतं आणि बाजूलाच गंडी अण्णा जमिनीवर लोळत पडला होता.
गण्या गंडी अण्णाजवळ जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, “अण्णा मटान….! “
[समाप्त.]