• Pune, Maharashtra
कथा
दुर्गे दुर्घट भारी: भाग. १

दुर्गे दुर्घट भारी: भाग. १

Spread the love

दुर्गे दुर्घट भारी.. 

“समू?” आई समीक्षेला स्वयंपाक घरातूनच हाका मारीत होती, “अगं उठलीस का? पोरीच्या जातीने असे झोपून राहणे बरे दिसते का?”

दहा वाजून गेले होते आणि समीक्षा अजूनही अंथरूणाशी खिळून पडली होती. त्यात आज रविवारचा दिवस असल्यामुळे तिला तर निमित्तच मिळालं होतं. ती काही बारा वाजायच्या आत उठणार नव्हती; पण तिला असं सुखाने झोपू देईल ती तिची आई कसली? कडक लक्ष्मीच होती ती!

समीक्षेच्या ऑफिसला आज सुट्टी असली तरी आईच्या ऑफिसला कसली आलीय सुट्टी? स्वयंपाकघरातून मघाच पासून तिची नुसती लगबग सुरू होती आणि त्या लगबगीतही पन्नासएक हाका तिने तिला मारल्याच असतील.  स्वयंपाक घर हेच बायकांचं ऑफिस आणि तेच त्यांचं.. अगदी आदिम काळापासून!

“काय बाई, आठवडाभर नुसते काम काम आणि काम, म्हटलं सुट्टीच्या दिवशी तर हिची मदत होईल; पण नाही.  हिला तर आपली झोपच प्यारी.” आई भांडी वाजवत तिला ऐकू जाईल असं बोलत होती. “कुंभकर्णाची मुलगी होती की काय मेली. साधं ओ पण नाही देत.”

“अगं, कशाला त्या कुंभकर्णाचा बिचाऱ्याचा अपमान करतेय, लग्न झाल्यापासून एक दिवस तर कधी उशिरापर्यंत झोपू दिलं आहेस का मला? म्हटलं रिटायर झाल्यावर तरी. . . पण नाही, ओ कोथिंबीर संपलीय घेऊन या, ओ तेवढं तेल संपलंय घेऊन या, रोज हे ते हे ते . आज तर इडलीच्या चटणीसाठी खोबरे आणा आणि घेऊन आलो तर म्हणे ओल्या नारळाचं. परत दुकानात जा आणि आणा.” वर्तमानपत्र वाचता वाचता समीक्षाचे बाबा आपल्या विनोदी स्वभावात म्हणाले.

“अहो थोडा दम घ्या. नाहीतर दमा बीमा व्हायचा.”

“तसा कसा होईल? तू असताना त्याची काय मिजास आहे? मागे खोकला झाल्यावर म्हटलं थोडी रम तरी प्यायला मिळेल; पण नाही. हिच्या धाकाने तोही बिचारा दोन दिवसात गायब.”

“का हो, म्हणजे मी दम्यापेक्षाही वाईट आहे का हो?” आई म्हणाली आणि नवऱ्याकडून काही तरी प्रतिसाद येईल या आशेने आपले काम थांबवून तिने तिकडे कान टवकारले; पण तिचा अपेक्षाभंग झाला.

गॅसवर शिजत असलेल्या इडलीच्या भांड्यातून वाफाचे नुसते फवारे लागले होते. तिने एका एका पातेल्यातल्या खोबऱ्याच्या चटणीला एक तडतडीत फोडली दिली आणि अखंड घरभर त्या फोडणीचा खमंग वास पसरला.

आता समीक्षेला शेवटची हाक मारावी आणि ती उठली नाही तर एक पाण्याने भरलेला ग्लास तिच्या तोंडवर नेऊन मारावा असा विचार करून आईने मागे फिरत हाक दिली, “शमे उठणार आहेस की …..”

मागेच उभ्या असलेल्या शमीक्षेकडे पाहून ती एकदम दचकली आणि पुढे हाक मारायची सोडून जोरात ओरडली.

“काय झालं आई असं दचकायला? मीच तर आहे.” समीक्षा बोलली.

“नाही म्हटलं नवरात्रीच्या तोंडावर साक्षात महिषासुरमर्दिनीच प्रकटली की काय पुढ्यात! असे अक्राळविक्राळ रूप घेऊन.”

Durge Durghat Bhari
Durge Durghat Bhari : Image is for illustration purpose only

“वॉव आई, म्हणजे नवरात्री सुरू होतायत! कधी, केव्हा?” ती आनंदाने उड्याच मारू लागली. दांडिया मध्ये जसं नाचतात तसे नाचत ती म्हणाली, “आता गरबा-दांडियाला धम्माल येणार.”

“आधी आपला अवतार नीट कर जा. जा. जा तिकडे फ्रेश होऊन ये. विस्कटलेले केस घेऊन आलीय माझ्या पुढ्यात. बत्तीच गूल व्हायची बाकी होती माझी.” असे म्हणत तिने तिला बाथरूमचा रस्ता दाखवला आणि आपल्या तोंडाचा पट्टा तसाच सुरू ठेवला, “कसं होणार आहे सासरी गेल्यावर देवालाच ठाऊक. वाचव रे परमेश्वरा.”

“आई?” दात घासत ती बेसिनजवळून तिने भरलेल्या तोंडाने हाक दिली.

“अं?’ तिने प्रतिसाद दिला.

“त्यापेक्षा तुम्ही घरजावईच शोधा ना. म्हणजे मला उशिरा उठता येईल आणि बाबांच्या सततच्या दुकानाच्या चकरा पण कमी होतील. काय हो बाबा?” एका हातात ब्रश पकडून आणि दूसरा हात कमरेवर ठेवून फेसाळलेल्या तोंडाने तिने विचारले; पण बाबांना वर्तमानपत्रातून फुरसत असेल तर ते उत्तर देतील!

“काय हो, कशा झाल्यात इडल्या?” नाष्टा करता करता आईने समीक्षेच्या बाबांना विचारले. त्यावर त्यांनी नुसती होकारार्थी मान हलवली. त्यांच्या इतक्या थंड प्रतिसादाचा आईला मात्र चांगलाच राग आला. रागाने लालबुंद झालेले तिचे नाक पाहून समीक्षा मात्र इडली खाता खाता हसू लागली आणि मग आगीत तेल ओतावं तशी आई भडकली तसे सर्रकन बाबांच्या हातातील वर्तमानपत्र हिसकावून तिने टेबलावर आपटले.

“इडली खूप छान झालीय आणि खोबऱ्याची चटणी तर आहाहा. . . लाजवाब.” बाबा वेळ मारून नेण्यासाठी बोलून गेले.

“आता मला काही एक ऐकायचं नाही. तुमची वेळ संपली केव्हाची.” ती तावातावाने म्हणाली.

“काय हो बाबा, सतत पेपर मध्ये नाक खुपसून बसायचं. वाचून वाचून पार पाठ करता की काय तुम्ही. आईकडे पण लक्ष असू देत जा की.” समीक्षा आईची बाजू घेत तिला थोडं बरं वाटावं अशा सुरात बोलली.

“अगं काही नाही गं. ती सिद्धांतची बातमी आलेली ती वाचत होतो.” बाबा असे म्हणताच तिचा चेहरा एकदम ओशाळला. इडलीचा घेतलेला घास तोंडातच ठेवून ती तशीच बसून राहिली, एखाद्या पुतळ्यागत! टेबलावर एकदम शांतता पसरली. हळूहळू तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या!

“तुम्हाला तर खरंच काही कळतच नाही मुळी. कुठे काय विषय काढावा याचं पण भान नाही. तिला या गोष्टीचा त्रास होतो याची कल्पना आहे ना तुम्हाला?” आई वैतागूनच म्हणाली.

“अगं पण आता त्या गोष्टीला दोन वर्षे झाली. म्हणजे या नवरात्रीला होतील. बिचाऱ्याने असं स्वतःला संपवायला नको होतं.”

“ते काहीही असलं तरी तो तिचा बॉयफ्रेंड होता ना? मी म्हणते कशाला काढायचा परत तो विषय?”

“आई सोड ना तो विषय. उगाच बाबांवर नको चिडू. त्यावेळी त्याने असं नको करायला हवं होतं, नाहीतर आज तो आपल्यात असता आणि राहिलं मला काही वाटायचं, तर मी विसरलीय हे सगळं केव्हाचं. मी खूप पुढे निघून आलीय त्यातून. चिल. . . छानपैकी नाष्टा करा. प्लीज.” शेवटी समीक्षा न रहावून बोललीच; पण तिच्या मनात काहीतरी होतं अजून जे ती कुणालाच सांगू शकत नव्हती. अगदी कुणालाच!

“पण बाबा तुम्ही मघाशी खोबऱ्याची चटणी लाजवाब झालीय म्हणालात. खरं खरं सांगा ना कशी झालीय?” काहीतरी करून विषयांतर केले पाहिजे म्हणून समीक्षेने प्रश्न केला आणि तिचे आईबाबा एकमेकांकडे खुळ्यागत पाहू लागले.

दुपारनंतर समीक्षेच्या खोलीत ती तिच्या आईच्या पुढ्यात बसली होती आणि आई तिच्या बेडवर बसून तिच्या केसांना तेल लावत होती. किती छान असतं ना मुलीचं लग्नाआगोदरचं आयुष्य! आईकडून सर्व हट्ट पुरवले जातात. आणि आईपुढे मुद्दामून हट्टही धरता येतात. लाजता येते, रूसता येते, चिडता येते, चिडवता येते, खेळता येते, बागडताही येते! आणि सासरी गेल्यावर-

“सासरी गेल्यावर येशील का गं आई माझ्या केसांना तेलपाणी करायला?” काहीशी लाडात येत तिने विचारले.

“येईन की; पण काय गं सकाळीच तर म्हणालीस की घरजावई मुलगा पहा म्हणून.” तिने तिची गंमत करत म्हटले आणि मग दोघीही हसू लागल्या.

थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. एक हळुवार शांतता होती खोलीत. खाली रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांचा आवाज तेवढा कानी पडत होता आणि तेल लावताना होणाऱ्या आईच्या बांगड्यांचा एक आवाज.

समीक्षा कसल्यातरी विचारात हरवून गेली होती. आपल्या खोलीच्या उघड्या खिडकीतून दिसणाऱ्या बाहेरील जांभळाच्या झाडावर तिची नजर खिळली होती. बऱ्याच वेळाची शांतता भंग करण्याच्या हेतूने आईनेच प्रश्न केला, “काय गं, लग्नाच्या विचाराने तू तर हरवूनच गेलीस.”

“तसं काही नाही हं आई. मी तर दुसराच विचार करतेय.” आपली ती शांत मुद्रा भंग करत ती म्हणाली.

“कसला गं तो?”

“तू मला सकाळी महिषासुरमर्दिनी म्हणालीस त्याचा विचार करतेय.”

“नाहीतर काय म्हणणार? कसले विस्कटलेले केस घेऊन माझ्या पुढ्यात उभी राहिलीस. तुझ्या हातात त्रिशूळ नव्हता; तरीपण काळजात काहीतरी घुसल्यासारखं वाटलं बघ.” ती अगदी हसत म्हणाली.

“काय होती तिची स्टोरी? सांग ना मला.” ती हट्ट करत म्हणाली.

“काय गं तुम्ही आजकालच्या मुली. नवरात्रीत गरबा, दांडिया खेळाल रात्रभर; पण तो नवरात्र उत्सव साजरा का करतात हेच नसणार माहीत  तुम्हाला. आमच्या वेळी असं नव्हतं बाई काही!”

“आता हे आमच्यावेळी पुराण नको ना चालू करू आई. मला महिषासुरमर्दिनीची कथा सांग.”

“लहानपणी तर सांगितलेली तुला.”

“मग आता मोठेपणीही सांग. थोडक्यात पण चालेल.” असे म्हणत ती उठून तिच्या शेजारी आडवी झाली आणि तिने आपले डोके तिच्या मांडीवर ठेवून दिले.

“बरं बाई ऐक.” असे म्हणून तिने महिषासुरमर्दिनीची कथा सांगायला सुरवात केली, “- – – आणि मग त्या महिषासुराला हरवण्यासाठी दुर्गेने तब्बल नऊ दिवस युद्ध केले आणि अशा महाभयंकर युद्धानंतर दुर्गा देवीने मग दहाव्या दिवशी त्या आसुराचा वध केला, महिषासुराचा वध. त्यावरून तिचे नाव पडले, महिषासुरमर्दिनी!”

“आय सी.” हनुवटीला हात लावत समीक्षा म्हणाली.

“आणि म्हणून चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून नवरात्र साजरा करण्याची परंपरा सुरू झाली अशी ही पुराणकथा आहे. कळलं?” कथा सांगून झाल्यावर मात्र तिने एक लांब श्वास घेतला.

“आणि तुझ्या महिषासुरमर्दिनीने असं काही केलं तर?” समीक्षेने कुतुहलाने विचारले.

“तर लोक माझ्या लेकीला दुर्गेचा अवतार म्हणतील.” असे म्हणत तिने तिला कवटाळले.

रात्री उशिरापर्यंत समीक्षा जागी होती. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती लॅपटॉपमधील जुने फोटो पाहत होती आणि जणू आपल्या भूतकाळातच हरवून गेली होती. भूतकाळ हा असा असतो ज्याच्या चांगल्या आठवणी माणसाला सदैव मोरपंखांच्या गुदगुल्या देऊन जातात तर वाईट आठवणी मोराच्याच पायांच्या नखांचे खोल ओरखडे देऊन जातात.ज्यांच्या जखमा तर भरून येतील; पण आठवणी कायमच वेदना देत राहतील.  

लॅपटॉप झाकून ठेवून ती झोपण्यासाठी आडवी झाली खरी; पण काही केल्या तिला झोपच येईना. ती आपली कूस सतत बदलत राहिली पण आईची ती वाक्ये तिच्या मनःचक्षूवरती सतत पिंगा घालत होती- ‘नवरात्रीच्या तोंडावर साक्षात महिषासुरमर्दिनीच प्रकटली की काय पुढ्यात- तर लोक माझ्या लेकीला दुर्गेचा अवतार म्हणतील.’

[पुढचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर जा]

दुर्गे दुर्घट भारी: भाग.२

गोदा म्हातारीची कथा इथे वाचा: blog marathi, indian festivals,

गोदा म्हातारी: भाग १

tags:

durga pooja, durga puja 2021, mutual fund agent list, kotak mf advisor, mutual fund advisor online, म्यूचुअल फंड, brokerage firm, marathi story, marathi story pdf, small marathi story, marathi short stories, marathi story writing, blog writing in marathi, blog writing in marathi, blogging in marathi, marathi stories, marathi goshti, short story in marathi with moral, small story in marathi, moral stories for adults, moral stories in marathi,


Spread the love

5 thoughts on “दुर्गे दुर्घट भारी: भाग. १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *