
दीन दिन दिवाळी
दीन दिन दिवाळी..!
भल्या मोठ्या घमेल्यात त्याने हिरव्या जरजरीत भाजीच्या leafy green vegetables पेंडया टाकल्या. पेंडया कसल्या त्या, हिरवीगार लुगडी लेऊन कुंभमेळयाच्या kumbhmela कुंडात डुबकी मारणाऱ्या भाविकच जणू त्या!
अगदी खळखळ घुसळीत त्याने त्या चांगल्या धुवून काढल्या आणि सपासप झाडून मग त्याने त्यांचे पाणी पण नितळले. घमेल्याच्या तळाशी मात्र तो मातीचा गाळ आता त्या शुभ्र मुळांविना कसा एकटा एकटा वाटत होता.
त्या मुळांचे आणि मातीचे जणू सख्यच जमले होते काही; पण आता त्याचा आणि त्या मुळांचा सलोखा काय तो इथवरच! त्यानंतर या घामेल्यातले पाणी तो जिथे कुठे फेकून देईल तिथून परत त्या गाळाने एक नवीन मुळ शोधायचे आणि त्या मुळाला मग त्याने वरती एका वेलीत, वृक्षात आणखी कशाकशात रूपांतरित करायचे. आयुष्याचे हे फेरे त्या मातीच्या गाळाला तर कुठे चुकले आहेत ते तुम्हाआम्हाला चुकतील?

त्यात त्या शेतकऱ्याला तर नाहीच नाही. कुणाच्या तरी मुखात आपण पिकवलेल्या अन्नाचे दोन घास जावोत आणि एखाद्याचा जठराग्नी शमविण्यास आपलाही हातभार लाभो एवढीच काय ती त्याची तुच्छ अपेक्षा! तीही तटपुंजा अशा मोबदल्यात.
मग काय, काम काम आणि नुसतं काम. त्याच्या जोडीला घाम घाम आणि घामच घाम, खारट घाम, तुरट घाम, नाकावरल्या लवांत घाम, कानांमागल्या घळईत घाम, दाढीमधुनी झिरपता घाम, काखेमधला चिखल तो घाम. तरीपण हाती न लाभतो एकही छदाम!
पेंडयांच्या जुडग्यातले उरले सुरले पाणी नितळून त्याने त्या एका ओल्या बारदानात भरून दिल्या. शंभरेक पेंडया असतील चांगल्या. भल्या पहाटेच उद्या मग तो जाईल आटपाडीला आणि येईल विकून त्या. येईल पैसा मग आणि मग होईल त्याची दिवाळी! गरिबाची दिवाळी! दीनाची दिवाळी!
सगळं झाल्यावर मग तो आत माळीत येऊन पडला एकदाचा. त्या अंथरूणात. चादर ओढून. चादर कसली ती. चादर कमी अन् तिला भोकंच जास्त. त्याच्या नाशिबाचा जणू आरसाच होती ती. अलीकडे हा, मध्ये दोन लेकरं. एक पोरगी अन् एक पोरगा. आणि त्यांच्या पल्याड त्याची कारभारीन. सावळीच होती जरा; पण गुणानं जणू शुभ्र कमळच! त्याच्या नाशिबाच्या चिखलात उमळलेले. types of lotus
“झोपली वी पोरं?” त्यानं त्यांच्यावर नजर टाकून बायकोला विचारलं.
“सुट्ट्याच हायत्या तर दिसभर हिकडं पळ, तिकडं पळ. पायाला काय आराम घेत्याली तर भागलं.” बायको एका अंगावर होत त्याला म्हणाली.
त्याने हाताचा टेकू करत आपल्या डोक्याला त्याचा आधार दिला आणि लेकरांवर एक नजर टाकीत त्यांच्यावरून मायेने आपला हात फिरवला.
“असाच मायेचा हात आणखी कुणाच्या तरी वरून फिरला तर त्याला किती बरं वाटंल.” ती काहीसा हट्ट करण्याच्या हेतूने म्हणाली.
“नेमकं त्याला की तिला?” त्याने तिची चेष्टा करत विचारले तशी ती आपला खालचा ओठ दातांत पकडून लाजलीच! नव्या नवरीगत अगदी. त्याने मग सावकाश आपला हात तिच्याकडे नेला आणि तिच्या गालांवर अलगद ठेवून दिला. तिने आपले डोळे बंद करून घेतले. लाजेनेच!
हात गालावर ठेवून तो हाताच्या अंगठ्याने तिचा गाल कुरवाळीत होता. त्याच्या त्या खरबडीत हाताचा स्पर्शही आता तिला मुलायम भासत होता. मखमलीगत! त्याच्या स्पर्शाने रोमांच उभारू लागताच तिने त्याचा हात आपल्या गालाच्या आणि खांद्याच्या मध्ये पकडून ठेवला.
क्षणभर कुणीच काही बोलले नाही. तोही गप्प. तीही गप्प. आपापल्या विचारांत. माळीत काय तो निजलेल्या लेकरांच्या श्वासांचा आणि त्या मिणमिणत्या दिव्याच्या ज्वालेशी खेळणाऱ्या दोन पाखरांच्या पंखांचा आवाज. एक चुकीची झेप आणि क्षणांत आपलं भस्म, याची त्या जीवांना काय कल्पना? बिचारे!
“दिवाळी दोन दिसावरच आली की.” शांततेचा भंग करीत ती म्हणाली.
“शंभरेक पेंडया असत्याल भाजीच्या, नै का?” त्यानं प्रश्न केला.
“पोरांना कापडं घ्यायला लागत्याल. . . आणि मला. .” ती बोलता बोलता थांबली.
“यापाऱ्याला दिलं तर पाचशे रुपय दिल त्यो.”
“ऱ्हाऊ द्या मग मला घ्यायचं. पुढच्या येळाला बघू.”
“अन् बसून इकलं तर हजारेक रुपय लागत्याल हाताला.”
“बगा आता मग तुमी ठरवा. माझी काय तक्रार नाय. निदान लेकरांना तर कापडं घिव या.” ती एक उसासा टाकीत म्हणाली. मंद उजेडात तिच्या डोळ्यांत तराळलेल्या अश्रुंच्या त्या सुवर्णछटा त्याच्या नजरेतून काही चुकल्या नाहीत.
रात्रीचं बारदान सायकलच्या मागे लादून अरुणोदयापूर्वी घरातून निघून तो आणि त्याचा मुलगा मजल दरमजल करीत पोहचले एकदाचे आटपाडीला. नुकतीच पडू पाहणारी थंडी जणू धुक्याची चादरच विणू पाहत होती सभोवती. सौम्य गारठा अंगी जाणवत असला तरी अजून काही शेकोट्या मात्र पेटलेल्या नव्हत्या. पेटला होता तो त्याच्या अंतःकरणातील वणवा! वणवा उद्याच्या चिंतेचा, सोबत आणलेल्या भाजीच्या विकण्याचा, वणवा तिच्या खर्चाचा अन् हाती लागणाऱ्या रुपड्यांचा!
कोवळी किरणे झेलीत व आपली सायकल ढकलतच तो आपल्या पोरासह बाजारात शिरला. सायकलच्या पुढ्यात नळीवर बसून त्याचा पोरगा बाजारातील ती लगबग कुतूहलाने पाहत होता. एका ठिकाणी चांगली जागा हेरून त्याने बारदान सोडले आणि दोघांनी भाज्या विकायला मांडल्या. हिरव्या भाज्या, कोवळ्या भाज्या, हरित पानांच्या रसरशीत भाज्या. दिवाळीचा त्याच्या आधार भाज्या, लेकरांचा कपडा भाज्या, बायकोचं त्याच्या नटणं भाज्या!

सूर्याची कोवळी किरणे जसजशी गरम उन्हे देऊ लागली तशी बाजारात लोकांची गर्दी वाढू लागली. भाज्यांच्या ढिगाकडे पाहत त्याने त्यातील दोन पेंडया उचलून आपल्या हातांत घेतल्या. त्यांवरून एक नजर टाकली. डोळे बंद करून मनात कसलातरी विचार करून तो जागीच उभा राहिला. पुन्हा एकदा दोन्ही हात पुढे करून भाज्यांवर त्याने नजर फिरवली. पुन्हा डोळे बंद. समोर ते चित्र. त्यानं पाहिलं. नव्या सदऱ्यात पाटावर टोपी घालून बसलेला त्याचा पोरगा. नव्या कापडांत केसांच्या दोन वेण्यांना लाल रिबणी लाऊन गुढग्यावर बसून त्याला ओवाळणारी त्याची पोरगी. चौकटीतून हळूच नव्या लुगड्याचा पदर तोंडाशी धरून आनंदाने त्यांना पाहणारी त्याची बायको.
झपकन त्याचे डोळे उघडले. नजर समोर गर्दीवर सैरभर फिरली. आपसूक हात वरती गेले आणि हातांतील भाज्यांच्या पेंडया हवेत नाचू लागल्या. खरसुंडीच्या यात्रेत सासणकाठ्या नाचतात तशा अगदी!
एका दीर्घश्वासासरशी त्याच्या घशाचे स्नायू ताणले गेले. नाकपुड्या तणल्या गेल्या आणि बेंबीच्या देठापासून तो ओरडू लागला, ‘भाssजीय्य. . . हेss, घ्या. . .घ्या. . .घ्या. ताssजीय्य. . .भाssजीय्य. . . घ्या. . .घ्या. . .घ्या.’
त्याचं लेकरू. मान वर करून त्याला पाहत होतं. हवेत नाचणाऱ्या भाज्या, बापाच्या जबड्याची होणारी हालचाल, काखेत उसवलेला त्याचा सदरा, हात वर झाल्यामुळे भोकं पडलेल्या बनेलातून दिसणारी त्याची बेंबी! सारं सारं काही तो पाहत होतं . आ वासून. आपल्याच विचारांत हरवलेला.
मनात जणू तो विचारच करीत होता, उद्या बाजार म्हणून काल रात्री ह्यो माझा बाप दिस मावळायला लागबगीनं आईला घेऊन रानात गेला, अंधार पडोस्तोवर भसाभस भाज्या उपसून सायकलीवर टाकून ढकलीत घरी आणल्या. निवडून तिच्या पेंडया बांधल्या. चांगल्या धुवून त्या बारदानात भरल्या आणि आज झोप पूरी होते न होते तोवर पहाटे त्या घेऊन तो बाजारात पण आला. आता हितं आला तरी बी त्याला ते इकायला आपला घसा फोडायला लागतोच आहे. कशासाठी? त्याच्या बायका-पोरांची दिवाळी diwali celebration नीट व्हावी म्हणून; पण या नादान गर्दीला त्याच्या त्या ओरडण्यामागचा अर्थ तरी कळत असंल का?
कळत असंल का त्यांना, त्याचं रात्री-अपरात्री जाऊन पिकाला पाणी देणं? कळत असंल का त्यांना, अवकाळी ढग दाटून आल्यावर त्याच्या डोळ्यांत पाणी उभा राहणं? आणि पावसाच्याच प्रतीक्षेत डोळ्यांतलं पाणी आटेस्तोवर त्याची वाट पाहणं, कळत असंल?
सूर्य डोक्यावर आला तरी अजून त्याच्या निम्म्या भाज्या पण विकून झाल्या नव्हत्या. ओरडून ओरडून तर त्याचा घसा मिळून आला होता अन् तोंडाला पण पडली होती कोरड. पोटात तर कावळ्यांची global hunger index सुरू होती एकच ओरड! काव काव काव काव. . . खाव खाव खाव खाव!
वाळून गेलेल्या भाकरीचे तुकडे तेल-चटणीसोबत चावताना पोरगा बापाच्या डोक्यातून वाहणाऱ्या घामाच्या धारा पाहत होता. पाहत होता तो त्याचे तोंड सुकताना. पाहत होता तो त्या भाज्या देखील सुकताना. पाहत होता तो तरीही आपल्या बापाला त्या विकताना. उन्हात भिजताना, दबताना, पिचताना आतच आत रडताना; पण लढताना!
मावळतीच्या सूर्याची चाहूल लागताच उरल्या सुरल्या भाज्या मिळेल त्या भावात विकून तो पोरासकट शिरला एकदाचा आटपाडीच्या पेठेत. तिथून मग मशिदीपास्न तो शिरला आत. थेट चांडवलेच्या कापड दुकानातच!
मग नव्याकोऱ्या वासाच्या कापडांच्या अन् रंगबेरंगी रंगांच्या पिशव्या घेऊनच तो दुकानाबाहेर पडला आणि लागला परतीच्या वाटेला. दाटू लागलेल्या अंधारात सायकलच्या हॅंडलला अडकवलेल्या पिशव्या हेलकावे खात होत्या तर मागे क्यारेजवर बसून त्याचा पोरगा झोपेच्या तंद्रीत झोले खात होता. शेवटी मजल दरमजल करीत ते पोहचले आपल्या मुक्कामी! तो मात्र दमून, भागून अगदी शिणून गेला होता; पण समाधानी होता खरा! च्यायला, शेतकरी लेकाचा!

दिवे लावताना, आंघोळ घालताना, त्या दिवशी तो पाहत बसला होता त्याची पोरगी त्याच्या पोराला भाऊबीजेला ओवाळताना, बायकोला चोरून नव्या लुगड्याच्या पदराला आनंदाश्रू टिपताना. तो पाहत बसला होता त्यांना celebrating diwali दिवाळी करताना, दिवाळी घडताना, दिवाळी जगताना. मात्र त्याचा पोरगा, ओवाळणीच्या ताटाआडून पाहत बसला होता आपल्या बापाला फाटक्या बनेलातून पोट खाजवताना! समाधानाने हसताना, सोबत काहीतरी त्यागताना! दीनाला दिवाळी करताना!
[समाप्त]
अजून कथा खालील लिंकवर जाऊन वाचा:
कोजागिरी, पौर्णिमा आणि चंद्र ..!
[…] दीन दिन दिवाळी […]
[…] दीन दिन दिवाळी […]
छान माहिती सर
संगणक बेसिक माहिती आणि तंत्रज्ञान माहिती नक्की बघा.