• Pune, Maharashtra
कथा
भाऊबीज भाग १

भाऊबीज भाग १

Spread the love

भाऊबीज

काय आप्पा, अहो बहिणीचं राहिलं; पण निदान दाजीची पत-प्रतिष्ठा, इज्जत-खानदान बघून तरी आपल्या बहिणीला भाऊबीज द्यायची. का तसली बी रीत न्हाय तुमच्याकडं?” नुकतेच जिल्हा दूध संघाचे चेअरमन झालेले रावसाहेब आप्पाला म्हणाले.

त्यांचे ते बोलणे ऐकून आप्पा पाटावरच एखादा पितळेचा पुतळा बसावा तसे स्तब्ध झाले नुसते. स्तब्ध कसले जागचे गोठूनच गेले म्हणा ना! पण पोरीच्या माहेरच्यांनी तिच्या सासरी जाऊन किमान जिभेवरती ताबा ठेवावा हा अलिखित नियम आठवून ते तसेच खाली मान घालून बसून राहिले. तोच कानात कुणीतरी उखळत्या शिस्याचा रस ओतावा तसे कानाचे पडदे जाळीत आक्काचे शब्द आप्पाच्या पार मेंदवाला जाऊन चिकटले.

“आप्पा, चांगली बहिणीच्या माहेरची लाज राखलीस. असली दरिद्री भाऊबीज bhaidooj द्यायची होती तर इथवर यायचे कष्ट तर कशाला घ्यायचेस? नसता आलास तरी चाललं असतं. अपमान तरी झाला नसता माझ्या माहेरचा.”

शब्द मेंदवाला भलेही जाऊन चिकटले असतील; घाव मात्र काळजावर बसला होता. डोळ्यांत टचकन पाणीच तराळले आणि पाण्यात तिचे बालपण, बालपणात त्याने तिचे पुरवलेले एकेक हट्ट. तिचे ते तारुण्य, तारुण्यात पुरवलेले तिचे हरएक नखरे. तिचे लग्न आणि लग्नात पुरवलेल्या तिच्या एकनएक इच्छा. सारं सारं काही त्या अश्रुंच्या रूपात नयनपटलांवर झपाझप पुढे सरकत होतं.

अश्रुंच्या त्या जलाशयाला आता त्याच्या डोळ्यांचे बांध जास्त वेळ रोखून धरणार नाहीत याची जाणीव होताच तो तिच्यासाठी आणलेली साडी समोर धरत बोलला, “गरीब भावाकडून एवढ्या वेळेस ही ओवाळणी बहिणीनं. . .” 

“ठेव ती ओवाळणी तुझ्याकडेच आणि हो पुढच्या भाऊबीजेला नाही आलास तरी चालेल. समजेन. . .”    

तिचे पुढचे शब्द ऐकण्याआधीच एसटी जोरात खड्ड्यात आदळली आणि झटक्यासरशी आप्पा जागे झाले. पाठीच्या मणक्याला जरा कळ बसलीच; पण मघाच्या स्वप्नातल्या त्या कळेहून ती काही मोठी नव्हती! याचेच काय ते समाधान आप्पांच्या चेहऱ्यावर उमटले असावे.

मांडीवर घट्ट पकडलेल्या पिशवीची पकड सावकाश सैल करीत त्यांनी तिचे तोंड उघडले आणि त्यातून आपल्या बहिणीसाठी आणलेली साडी थोडीशी बाहेर काढली. मोरपंखी रंगाच्या त्या साडीला चांगले सोनेरी काठ कसे शोभून दिसत होते, शिवाय साडीचे ते तलम कापड हाताला अगदी मऊ मऊ भासत होते. आणि हाताला ती जाणवणारी ऊब? ती तर भावाची आपल्या बहीणीवर असलेल्या मायेचीच होती! तिथे कसला आलाय गरीब-श्रीमंतीचा जोखा?

त्या साडीवर मायेचा हात फिरवीत आप्पाची नजर एसटीच्या msrtc news खिडकीतून बाहेर झपाझप मागे पडणाऱ्या त्या झाडांना पाहत होती. तसंही आटपाडीच्या atpadi news त्या रस्त्याला चिल्लारीच्या झाडांशिवाय दुसरी झाडे नजरेस पडणे थोडे दुरापास्तच! त्यात थोडी अजून पलीकडे नजर गेली की उघड्या माळरानाची ती कुसळे काय ती नजरेस पडतील. कुठे कुठे मग नाही म्हटलं तर चिट्टया बोरींची झुडपेही नजरेतून काही चुकायची नाहीत. आणि असल्या रणरणत्या उन्हात मग कुणी धनगर डोक्याला लाल पटका लाऊन, खांद्यावरील आडव्या काठीवर आपले बाहु विसावून निवांत आपली मेंढरे राखीत उभा असलेला दिसेल तर कुणी गुराखी सावलीत चवड्यावर बसून गुरे हाकताना नजरेस पडेल.

वरचेवर बसणारे एसटीचे धक्के आणि खिडक्यांच्या सैल काचांचा तडतड तडतड आवाज आतमधील प्रवाशांचे यथेच्छ मनोरंजन करीत होते. दरवाज्याजवळील सीटवर बसून कंडक्टर सारखा जांभया देत होता. एका सीटवर लेकुरवाळी बाई तोंडावर पदर ओढून आपल्या बाळलाही पदराआड घेऊन दूध पाजीत होती बहुतेक. कुणी एखादा प्रवासी सीटला डोके टेकवून तोंड वासून झोपला होता. निश्चिंत अगदी. संसारगाडा ओढताना पार दमछाक झालेली होती जणू त्याची!

“दिवाळी घेऊन चालला वाटतं?” शेजारी बसलेल्या प्रवाशाने साडीच्या आडून पिशवीत दिसणाऱ्या लाडू-चिवड्याकडे पाहत आप्पाला विचारले.

त्याने तसे विचारताच आप्पाने साडी आत सारून दिली आणि पिशवीचे तोंड बंद करीत ते महणले, “हं. चाललोय भाऊबीजेला.”

“आटपाडीला?”

“अहं, डिगीजीला.”

“दिघंचीला?”

“हं. डिगीजीला.” आप्पा म्हणाले आणि पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागले. मग त्या प्रवाशाने पुढे काही प्रश्नच केला नाही.

खिडकीतून बाहेर पाहता पाहता त्यांचा कधी डोळा लागला काही कळलेच नाही. जाग आली ती थेट आटपाडीत शिरल्यावर बसलेल्या एका जोराच्या धक्क्याने. तेवढ्यात कुणी एकाने मागून ड्रायवरचा शिव्यांची लाखोली वाहून त्याचा उद्धार करूनच टाकला.

“इष्टी नुसती खटारा झालीय. असल्या वाहनांना भंगरात दिलं पाहिजे.” शेजारील प्रवासी दात- ओठ खात म्हणाला. बिचाऱ्याचा कपाळमोक्ष झाला होता नुकताच! प्रसाद म्हणून उजव्या कपाळावर सुपारीएवढा गोलठील टेंगूळ मिळाला होता आणखी!  

डुलत झुलत अगदी ऐटीतच गाडी आटपाडी स्टँडमध्ये atpadi bus stand शिरली आणि ड्रायवरने st driver strike ब्रेक दाबताच कुईई करीत ती थांबली. प्रवासी आपापले समान घेऊन पायऱ्या उतरू लागले.

“इष्टी किती बी खटारा झाली तरी बी ती तुम्हाला इच्छित स्थळी घेऊन आली ही बी काय कमी न्हाई सायब.” आप्पा बसल्या जागेवरून आपल्या शेजारून उठून जाणाऱ्या प्रवाशाला म्हणाले. तो मात्र त्यांच्याकडे नुसता पाहतच तिथून निघून गेला. खाली एसटीच्या पायऱ्या उतरताना देखील तो सीटवर तशाच बसून राहिलेल्या आप्पांकडे पहायला विसरला नाही. आप्पा मात्र खिडकीला डोके टेकवून दिघंचीला गाडी लागते त्या रिकाम्या फलाटाकडे पाहत बसले होते.

काही वेळानंतर एक सूचना कानी पडताच आप्पांची ती मुद्रा लोप पावली.

‘गाडी. . .क्रमांक. . .१७६०, गाडी क्रमांक १७६०, आटपाडी-दिघंची. तीन वाजता सुटणारी बस फलाट क्रमांक चार वर थांबलेली आहे. गाडी क्रमांक १७६०, आटपाडी-दिघंची. फलाट क्रमांक चार वर थांबलेली आहे.’

सूचना अजून सुरूच होती तोपर्यंत गाडी पकडायला लोकांची एकच धांदल उडाली. गाडीच्या दरवाज्यात लोकांनी एकच गर्दी केली.

सूचना ऐकताच आप्पा सोबत आणलेली पिशवी घेऊन त्या गाडीमधून खाली उतरले आणि फलाट क्रमांक चारला उभ्या असलेल्या गाडीत चढून जाऊन बसले. आटपाडी-दिघंची.

दिवाळी सणामुळे गाडीत चांगलीच गर्दी होती. आप्पा जागा शोधत शोधत पार मागे येऊन एका बाईच्या शेजारी जाऊन बसले. बाई? बाई कसली ती. ती तर भलतीच हिडिंबा दिसत होती. कानाला नोकीयाचा फोन लाऊन अख्ख्या एसटीत ऐकु जाईल इतक्या मोठ्या आवाजात पलीकडे कुणालातरी बोलत होती. त्यात अर्ध्याच्या वर सीट तर तिनेच व्यापून टाकलं होतं आणि जे काही शिल्लक राहिलं होतं त्यावर तिचं ते कार्ट आणि आप्पा अवघडूनच बसले होते अगदी.

“नाय नाय नाय आये, मला काय हे पटलं नाय बग आजाबात. मागच्या टाइमाला तू मनधरणी केली म्हणून म्या गप बसली. आत्ताच्या टाइमाला पण असंच? मला वाटलं हुतं निदान ह्या दिवाळी तर मला भाऊ नऊवारी घिल; पण नाय. घिऊन घिऊन दोनशे रुपड्याचं कापड घेतलं. अगं माजं सोड गं. पण भाच्याला तर काय हाय का नाय?” बाई कुत्रं मागे लागल्यागत अशी काही बोलत होती की तिच्या जिभेचा पट्टा काही थांबतच नव्हता. आप्पा बिचारे एक नाही दोन नाही. तसेच तिच्याकडे बघत राहिले. सोबत पुढच्या सीटवरून माना वळवून बघणारे बायका-पुरुषही होतेच जोडीला.

“ओ तुमी पुढं बगा ओ.” आप्पाला असे म्हणत ती पुन्हा फोनवर बोलू लागली, “भाच्याचं काय म्हंजी? मामाकडं येताना पोरगं किती खुश हुतं. मामा मला फूल बाह्याचा शर्ट अन् फूल पॅन्ट घेणार म्हणून किती आनंदानं सांगत हुतं समद्यांना. त्येला बी हाप पॅन्ट अन् हाफ शर्टावर धाडलं. आये पुढं मागं त्येला एखादी पुरगी बिरगी झाली तर म्हणावं माज्या लेकाशिवाय जावाय मिळणार न्हाय म्हणून सांग त्येला.” 

पोराला आपल्याकडे ओढीत तिने त्याचा एक मुका घेतला. मागे वळून बघणाऱ्या अजून चार-दोन माना वाढल्या. आप्पा तर आता पापणी देखील पाडीत नव्हते.

“बहिणीला माहेरी बोलवून असा अपमान करायचा हुता तर माणसानं बोलवू नये. बहिणीची काय इज्जत हाय का नाय. बरं तिची नाय तर आपल्या दाजीची कायतर इज्जत, मान म्हणून तर? पुढच्या टाइमाला असलं काय हुणार असंल तर मी आत्ताच शाप सांगून ठिवते, मला बोलवायचं नाय दिवाळीला. मी समजून जाईल मला भाऊच नव्हता म्हणून.” ती नाक तनवूनच म्हणाली.

मात्र तिच्या अशा त्या बोलण्याने इकडे बाजूला बसलेल्या आप्पांच्या काळजात एकदम धस्स झालं. त्यांना पुन्हा पुन्हा ते स्वप्न आठवू लागले आणि आठवू लागले ते त्या बाईचे नी त्यांच्या बहिणीचे ते शब्द. काळीज गोठवणारे!

आप्पा मग ताडकन जागचे उठले आणि गर्दीतून वाट काढीत पुढे दरवाज्यात पोहचले. हातात ती पिशवी घेऊन. कंडक्टरच्या अगदी पुढ्यात.

“बोला. तिकीट बोला.” कंडक्टर आप्पाकडे पाहत म्हणाला. msrtc online bus ticket booking

“तिकीट.” आप्पा खुळ्यागतच बोलले.

“अहो, तिकीट बोला म्हटलं तिकीट.” मग कंडक्टर काहीसा चिडूनच म्हणाला.

तरीही आप्पा म्हणाले, “बोललो की तिकीट.”

कपाळावर हात मारीत त्याने आप्पाला विचारले, “जाणार कुठं?”

“डिगीजी.” 

“पाच रुपय दी अन् बस जाऊन मागं.”

“आलू धार मारून.” असे म्हणत आप्पा पायऱ्या उतरून खाली उतरले देखील.

“इष्टी लै येळ थांबणार नाय.” कंडक्टर ओरडला.

लगबगीने जाऊन आप्पांनी नळाचे गार पाणी सपासप तोंडावर मारून घेतले आणि आपल्या पंचाने तोंड पुसत ते त्या एसटीकडे पाहत तसेच उभे राहिले. कानांवर आगारमास्तरच्या त्या सूचना कानी पडत होत्या. एसटीची बेल, प्रवाशांचा गोंगाट, त्या बाईची अन् बहिणीची वाक्ये. सारे सारे आवाज हळू हळू मोठे आणि स्पष्ट होत होते. आप्पांना तर भोवळच यायची बाकी होती.

शेवटची बेल देऊन एसटी धुरळा उडवीत दिघंचीच्या दिशेने मार्गस्थ झाली. आप्पा मात्र तिच्या धुरळ्याकडे पाहत राहिले.

[पुढे सुरू राहील]

माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

lekhani sangram
lekhani sangram

कथेचा पुढचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

भाऊबीज भाग २

लेखणी संग्रामच्या अजून कथा खालील लिंकला जाऊन वाचा.

दीन दिन दिवाळी

अजून दिवाळी आहे

कोजागिरी, पौर्णिमा आणि चंद्र ..!

bhaubeej ani st
bhaubeej ani st, oictures are for illustration purpose only

Spread the love

13 thoughts on “भाऊबीज भाग १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *