
बच्चू, माझं वजन वाढलंय का रे?
बच्चू, माझं वजन वाढलंय का रे?
किचनमधून चमचमीत पदार्थांचा वास माझ्या नाकातून फुफ्फुसात न जाता आता थेट पोटात निघाला होता. रापचिक अशी भूक लागली होती आणि आता जर पुढ्यात काही आले नसते तरी त्या नुसत्या वासावर माझी भूक भागली असती!
ह्या झाल्या म्हणायच्या गोष्टी; पण प्रत्यक्षात काही पोटात गेल्याशिवाय भूक ही भागणार कशी? आणि असे तळलेले, भाजलेले पदार्थ, त्यात त्यांचा खमंग वास! हे सांगतानाच खरंतर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय; पण बायको आतून काही घेऊन येत नाही तोवर आपण मात्र वासावरच समाधान मानायचे.

“अगं आन आन आन पटकन. ठेव इथे. पोटात नुसते कावळे ओरडायला लागलेत.” बायको हातात प्लेटा घेऊन येताना दिसताच मी उतावीळपणे म्हणालो.
“अरे, हो हो. कुठे पळून नाही जात आहे. थोडं सबुरीनं घे.” प्लेटा डायनिंग टेबलावर टेकवत ती म्हणाली.
“श्रद्धा, सबुरी तिकडे शिर्डीत. इथे पोटातले कावळे बाहेर यायची वेळ झाली अन् तू काय….” एका प्लेटमधील खेकडा भजी बचकेत घेत तिला म्हणालो आणि कुत्रं मागे लागल्यासारखा खाऊ लागलो.
“अरे, मी काय म्हणजे? आणि कसला भुक्कड आहेस तू. किती अधाशागत खातोयस रे!”
“भूक बेबी भूक. आणि हे काय? तू नाहीस का खात?” तिच्या त्या छोट्या प्लेटकडे पाहत मी विचारले.
“खातेय ना.” उदास स्वरात ती म्हणाली.
“एवढंसं? बस्स दोनच भजी?”
“भूकच नाहीये अरे.”
“उठल्या उठल्या तर म्हणाली की कडाक्याची भूक लागलीय म्हणून.”
“हो; पण नंतर गेली ती?”
“असं कसं?”
“असं कसं काय असं कसं? ती काय तुझी मावशी थोडी आहे चार-दोन दिवस राहून जायला.”
“एकवेळ माझी मावशी परवडेल; पण तुझी ती आत्या? नको रे बाबा. महिना महिना काही हलायचं नावच घेत नाही ती.” मी भजी तोंडात असताना बोललो. ती मात्र एकाच भज्याचे डिसेक्शन करून कांदा, मिरची असे घटक वेगळे करत बसली होती.
“श्र.. द्धाssची तुला अजून आठवण येते?”
“येते?” मी डोळे विस्फारून तिला म्हणालो.
“येते. मला वाटलंच होतं.” खाण्यासाठी उचलेला भजी तिने प्लेटमध्ये टाकला. टाकला कसला रागात फेकला म्हणा.
“येते नाही. येतेच्या नंतर प्रश्न चिन्ह होतं गं.”
“म्हणजे येते की नाही?”
“अगं माझी आई, नाही येत.”
“मग श्रद्धा, सबुरी असं का म्हणालास? म्हणजे येत असेलच ना आठवण.”
“ती श्रद्धा-सबुरी साई बाबांची. शिर्डी वाले साई बाबा.”
“पण आठवण आल्याशिवाय कुणी का बरं असं नाव घेईल?”
“तुला हवं तर अजून एखादा भजी जास्तीचा घे पण शांत रहा गं आई.” मी हात जोडीत म्हणालो.
“नाही नको. आजपासून मी ठरवलंय, कमी खायचं म्हणून.”
“काय कमी खायचं ते कळेल? नाही म्हणजे जेवण की..”
“मग आणखी काय?”
“माझं डोकं वाटलं मला.” मी हसून म्हणालो; पण तिची ती जळजळीत नजर पाहिली आणि हसू आवरतं घेतलं.
दोन क्षण काहीच न बोलता मग मी भजी खाऊ लागलो.
“खूप मेंटेन्ड असायची ना रे ती?” तिने विचारले.
“कोण?” मी रिस्क घ्यायला तयार नव्हतो, म्हणून मी विचारले.
“तीच रे, तुझी श्रद्धा.”
च्यायला आज हिला झालंय तरी काय? घ्यायची ठरवलंय का काय हिने आपली? मी विचारातच पडलो.
“हो, हो असायची ना.”
“फिटनेस फ्रेक हां?”
“हो हो.” मी जास्त उत्साहित होणं जाणून बुजून टाळत होतो.
“अजूनही मेंटेन्ड असेल ती?”
“नाही माहिती; पण तू का विचारतेयस हे सगळं?” मला न राहून आता शंका वाटू लागली.
“काही नाही असंच रे.”
“हे बघ आमच्यात आता काहीच नाहीये. तुला हवं तर माझं व्हॉटस् अॅप चेक कर.” मी बोलून गेलो. कर नाही त्याला डर कशाला? हं!
“बेबी.. आय ट्रस्ट यू.” ती म्हणाली. पण मला काही केल्या ट्रस्ट होईना. त्रस्तच झालो तसा मी!
“बच्चू?” ती लाडीक आवाजात म्हणाली आणि मला धस्स् झालं. ही सगळी प्रलोभनं असतात आणि आपण त्याला अजिबात बळी पडायचे नाही हे मी मनाशी पक्कं ठरवलं होतं. तरीही अगदी सावध पवित्र्यात मी नुसतं – अं केलं.
“बच्चू, माझं वजन वाढलंय का रे?” त्याच लाडीक आवाजात तिने मला विचारले. “वाढलंय काय? थोडी कमी नाहीतर दी ग्रेट इंडियन बफेलो वाटायला लागलीय.” मी आपला मनातल्या मनात म्हणालो. तोंडावर म्हणण्याची आपली काय बिशाद?
“वजन? छे छे. अजिबातच नाही वाढलं.” मी म्हणालो.
“नक्की ना रे?”
“नक्की म्हणजे काय? नक्की टक्की.”
“जा रे. खोटं बोलतोयस तू. तुझं तर ना माझ्यावर प्रेमच नाहीये.”
“म्हणजे वजन वाढलंय म्हणालो असतो तर प्रेम आहे असं म्हणाली असतीस का?”
“काही नको बोलू. वाढलंय माझं वजन. माहितीय मला. आजच मी डायट प्लान करते.” असं म्हणून ती चक्क उठून गेली.
“किटो कर किटो.” मी आपला दबक्या स्वरात म्हणालो. तिला ऐकू गेलं नसावं बहुधा; पण खिडकीत बसलेल्या त्या मांजरीने नक्की ऐकलं असावं. कारण, मी तसं म्हणताच तिने म्याव केलं. मग दोनक्षण मलाही मांजरच झाल्यासारखं वाटलं.
तसे नवरेही बायकोच्या पुढ्यात मांजरच होतात की! थांबा सांगतो का ते.
“अरे, तुझ्या अमेझोन पे वरुन एक बिल पे कर ना.” संध्याकाळी माझा असाच टाईमपास सुरू असताना ती म्हणाली.
“बिल? कसलं?”
“वेट लॉस करणार ना तर रनिंग नको का करायला?”
“हो पण त्याला थोडी पैसे द्यावे लागतात? ते तर तूच पळशील ना? की कुणाला पळायला हायर केलंस?”
“पांचट जोक बंद कर. मी रीबोकची ट्रॅक पॅन्ट Reebok Women’s Regular Sports Tights आणि आदिदासचे रनिंग शूज Adidas Women’s Adistound W Shoes घेतेय.”
“घे ना मग?”
“घेतलेत. तुझ्या अमेझोन पे ला पाठवलीय पेमेंट लिंक.”
“याला काय अर्थ आहे? माझे शूज घालून पळ.”
“आणि काय? ट्रॅकपॅन्ट पण तुझीच घालून पळू? खरंच तुझं तर ना मुळी प्रेमच नाही माझ्यावर.”
“प्रेम असल्याशिवाय कुणी आपलं शूज आणि पॅन्ट देईल का उगाच?”
“नवरे काय काय करतात आपल्या बायकांसाठी आणि हा एक नवरा आहे. साधं बिल पे करणं होत नाही याला.”
किचनमधून ताटे पडल्याचा आवाज आला.
“केलंय केलंय माझी आई. केलंय पे. भांडी नकोस पाडू.” मी दुरूनच तिला दंडवत केला.
“मी कशाला पाडू. मांजर असेल.” ती म्हणाली.
मांजर किचनमधून म्याव करत बाहेर पडताना मी पाहिली.
“बच्चू, संग ना रे माझं वजन वाढलंय का?” कपाटातली जुनी जीन्स कमरेवर खेचत ती म्हणाली. मी आपला मोबाईलमध्ये तोंड खुपसून इकीगाई वाचत आडवा पडलो होतो.
दाटकी जीन्स तिच्या कमरेवर बसतही नव्हती. चांगली चार इंच कमी पडत होती; पण तरीही मी म्हणालो, “छे. वजन कुठलं वाढायला. जीन्स जुनी झालीय ना. आकसून आली असेल.”
“हो रे. जुनीच आहे ती. अय्या, किती दिवस झाले मी जीन्सच घेतली नाही. ए मागवू का रे मी नवी?”
“अगं, आता तर म्हणालीस ना की वजन..”
“हो रे.” ती चिंतीत होत म्हणाली आणि बोलू लागली, “पण खरं खरं सांग ना, वाढलंय का रे माझं वजन?”
“हे काय सुरुय तुझं? सकाळपासून विचारतेस तू? का कुणी काही बोललं का?”
“कुणी कशाला. तूच.”
“आयला, मी? मी कधी?”
“रात्रीच तर बोलत होता ना श्रीकांतशी? खादाड, बकासुर, ग्रेट इंडियन बफेलो, जाडी वगैरे वगैरे.” ती थोडी रुसूनच म्हणाली.
“अच्छा ते होय.”
“मग. असं म्हणाल्यावर कसं वाटेल एखाद्याला?”
“अगं, ते तुला थोडीच म्हणत होतो. ते तर आमची बॉस आहे ना खडूस तिला म्हणत होतो. ते तू ऐकलं असावं बहुतेक.”
“अय्या, किती बावळट आहे मी. मला वाटलं मलाच म्हणालास.”
“छे छे. तुला नाही गं; पण तू ते डायट आणि रनिंग चालू ठेव हां!”
“होsss.; पण ऐक ना अरे.”
“मी काय म्हणत होते.”
“काय?”
“जेवण बनवायचा कंटाळा आलाय. पिझ्झा मागवूया आपण?”
तिच्या विनंतीत मला सकाळच्या नष्टया पासून ते दुपारच्या जेवणापर्यंतचा त्याग दिसला. मी मग नुसतीच मान हलवून होकार दिला.
“दोन मागव. नेहमीचे. लार्ज साईज.”
“हो.”
“विथ डबल चीज बस्ट.”
मी पिझ्झा खाऊन बाहेर गॅलरीत श्रीकांतशी फोनवर बोलत बसलो होतो; पण दबक्या आवाजात.
“कसलं काय अरे. दीड पिझ्झा खाल्ला तिने.”
“काय दीड?” श्रीकांत पलीकडून आश्चर्याने म्हणाला.
“होय. चक्क दीड. तोही लार्ज साईज. तुला सांगतो कालचा फॉर्म्युला चांगला वर्क झाला होता; पण यार सारखं बच्चू माझं वजन वाढलंय का म्हणून म्हणून मला तिने भंडावून सोडलं चक्क.”
“मग रे?”
“मग काय? खरं बोलावं तरी पंचाईत आणि नाही बोलावं तरी पंचाईत. चवळी होती रे आधी माझी बायको, आता भोपळा होतेय रे तिचा. भुक्कड झालीय नुसती अरे. कसला व्यायाम नाही ना काही नाही. ऊठ की सूट खा. बकासुर……. ” मागे वळून पाहतो तर बायको मागेच उभी होती. पलीकडून श्रीकांतचं हॅलो हॅलो सुरू होतं.
माझ्या पायाखालची फरशीच सरकली. हिने ऐकलं तर नसेल. ऐकलं असेल तर ती मला उभं आडवं फाडून खाईल आता.
“अरे बास करा ना. किती नावे ठेवाल त्या बिचरीला?”
“क्.. कोण, कोण बिचारी?”
“दी ग्रेट इंडियन बफेलो. तुझी बॉस.”
“हां हां, बॉsss स.” म्हणताना मात्र माझ्या चेहऱ्यावर बारा वाजले होते.
[समाप्त]
हे पण वाचा:
आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.
व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १
लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,
chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi wit
best stories to read,best novels to read,best romance novels of all time,content writing,story writing, copy writing,storytelling,art of storytelling,h mora
😀
🙂