• Pune, Maharashtra
कथा
अजून दिवाळी आहे

अजून दिवाळी आहे

Spread the love

अजून दिवाळी आहे. Diwali 2022

दिवस नुकताच डोक्यावर आला होता, त्यामुळे उन्हाचा चपकारा चांगलाच बसत होता. काळ्या पाषणाच्या खळग्यातून वाहणाऱ्या ओढ्याचा खळ खळ असा मधुर आवाज कानी येत होता. ओढ्याच्या मधोमध कुणी एक बाई लुगड्याचा काष्टा घालून गोचीडागत फुगलेल्या आपल्या काळ्याभोर म्हशीला न्हाऊ घालीत होती. त्यातच मधूनच म्हशीने आपली शेपटी उडवली की हवेत उडणारे पाण्याचे थेंब जणू मोत्यांगत चमकू लागायचे.

ओढ्याच्या काठाला दगडे मांडून, बायका पदर खवून नी काष्टा घालून दसऱ्याला काढलेली धुणी धपाधप आपटीत होत्या. काही बायका तर अशा काही वाकळा आपटीत होत्या जणू त्या वाकळा नसून त्यांच्या सासवाच होत्या!

अशाच एका तापलेल्या पाषणावर दहा वर्षाचा गण्या गुडघ्यात तोंड घालून वाहणारे पाणी न्याहाळीत बसला होता. सूर्याच्या किरणांमुळे पाण्यावर एक चमक उठत होती आणि ती सरळ त्याच्या डोळ्यांत जात होती. पलीकडे वरच्या बाजूला त्याच्याच वयाची काही मुले पाण्यात मस्तपैकी खेळण्यात गुंग झाली होती.

“आये, चल की अगं भूक लागल्याय मला.” तो जागेवरून उठत म्हणाला. उठताच क्षणी त्याच्या अंगातली ढुंगणावर फाटलेली खाकी विजार कमरेतून खाली घसरणारच तोच त्याने ती आपल्या करदोड्याच्या सहाय्याने पकडून ठेवली. बुडत्याला काठीचा आधार म्हणीप्रमाणे त्याच्या विजारीला करदोड्याचा आधार मिळाला होता.

“वूईसा कट काढ की जरा. ह्या एवढ्या मास्तरीन बाईच्या वाकळा आपटती धपा धपा, मग दीती तुला जेवायला.” वाकळा धुता धुता दम लागल्यागतच ती म्हणाली.

“आये, अगं कावळं वरडाय लागल्यात पोटात माज्या.” कसनूसं तोंड करीत तो म्हणाला. a hungry poor boy.

“आरं व्हय की रं माज्या लेकरा; पण धुणं झाल्याशिवाय मास्तरीन काय आन देणार न्हाय आपल्याला.” अगदी कारुण्यपूर्वक चेहरा करीत ती म्हणाली.

थोडावेळ ती गप्प राहून परत म्हणाली, “जा की तिकडं पोरांबरोबर थोडं खेळ जा.”

ajun diwali ahe अजून दिवाळी आहे
ajun diwali ahe अजून दिवाळी आहे, pictures are for illustration purpose only.

पाण्यात खेळणाऱ्या त्या पोरांवर त्याने एक उद्विग्न नजर टाकली आणि नगं ऱ्हाव दी म्हणत गण्या बिचारा आपली विजार सांभाळत पुन्हा खाली बसला आणि पाण्यात पाय सोडून पायांभोवती खेळणाऱ्या पाण्यातील छोट्या माशांची गंमत पाहत राहिला.

“काय बाय, कसली आय हाय गं तू? पोराला दुपार होस्तोवर उपाशी ठिवलंय. त्येचा का जीव वर आलाय वी?” शेजारी धुणं धुवत असलेली एक वयस्क बाई त्याच्या आईला तोंड वाकडे करीतच म्हणाली.

“आवं तसं न्हाय वं. मास्तरीन काल म्हणाली हुती उद्या दसऱ्याचं धुणं धुण दी. मग त्येचं पैसं अन मागलं पण पैसं दीती म्हणून आन दुपारचं ज्येवन बी दिन म्हणाली हाय. म्हणून म्या आज बनवलं पण न्हाय.” आई म्हणाली.

“लै सोंगाडी हाय ती मास्तरीन. तिच्या नादी नगस लागत जावू.”

“मास्तरीन कसली गं ती. नवरा मास्तर म्हणून हिला बी मास्तरीन म्हणाया लागतंय.” पलिकडून दुसऱ्याच एका बाईचा आवाज आला.

गण्या आपला पाण्यात चित्त हरवून कशात तरी विचारमग्न झाला होता. मास्तरनीच्या घरचं जेवण म्हटल्यावर काहीतरी गोडधोड असणार, एखादा लाडू असणार, तेलानं माखलेली चपाती असणार, किमान दोन तरी भाज्या असणारच असणार असा तो विचार करीत होता जणू; पण खालून काहीतरी गरम जाणवत असल्याच्या जाणिवेने तो त्यातून पटकन बाहेर आला. विजार फाटलेली असल्यामुळे तापलेल्या त्या काळ्या पाषाणाचे जोराचे चटके त्याच्या ढुंगणाला बसत होते. आईचं काही लवकर उरकायचं नाही असा विचार करीत मग तो सावकाश पाण्यात उतरला तेव्हा कुठे त्याला बरे वाटले. त्यातच त्याने हातांची ओंजळ करून दोन-तीन ओंजळी पाणीही पिऊन टाकले भुकेल्या पोटी.

धुणं धुवून झाल्यावर आई धुण्याची पाटी कमरेला लावून आणि वाकळांची बोचकी डोक्यावर घेऊन वाटेला लागत गाण्याला म्हणाली, “गण्या, निघालास का रं भाईर? भूक लागल्याय न्हवं तुला. पळ. मी चालली बग.”

गण्या लगेच पाण्यातून बाहेर आला आणि भिजल्या कापड्यांनीच तिच्या मागे जाऊ लागला.

“आयं, पाटी दी माज्याकडं.” म्हणत त्याने तिच्या कमरेची पाटी आपल्या डोक्यावर घेतलीही. मघाशी पाण्यात खेळत असलेली पोरं त्याच्या त्या फाटक्या विजारीकडे पाहून त्याची टिंगल उडवीत होती. तरीही तो त्यांच्याकडे लक्ष न देता तसाच चालत राहिला. मागून त्या पोरांचा आवाज मात्र कानी पडत राहिला. मास्तराच्या कानात कापसाचे बोळे अन् गण्याच्या ईजारीला दोन दोन डोळे. 

“बाई बाई बाई, असलं का कुणी धुणं धुतं? नसता हट्ट केला बाई मी. सांगितलं असतं कुणा दुसरीला तर बरं झालं असतं.” गण्याची आई धुणं वलणीवर घालताना मास्तरनीने तर तोंडच सोडले होते.

“आवं, झ्याक तर निघाली हायती की धुणी. तुम्ही दिलेली साबनाची अख्खी वडी संपवली म्या तर.” आई म्हणाली.

“आहाहाहा, सगळी वडी संपवली का उरलेली घरी नेली देव जाणे.”

“आवं मास्तरीन तुमची कापडंच मळकी हायती. सगळा वडा फेसाळलाय पण कापडं तुमची हाय तशीच.” गण्या तिची गंमत करीत बोलला. खरंतर त्याने लहान तोंडी मोठा घासच घेतला होता म्हणायचं. मात्र त्याच्या या बोलण्याने त्याला आता पोटाला घास मिळेल की नाही कुणास ठाऊक?

“वा रे वा, माझी कापडं घाण का? बघितलंस का किती स्वच्छ आहेत माझी कापडं?” वलणीकडे बोट दाखवीत मास्तरीन म्हणाली आणि गाण्याला हसूच फुटले. त्याच्या आईने मात्र आपले हसू दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

“मास्तरीन, तेवढं पोटाला मिळालं..” आई पुढे काही बोलणार इतक्यात मास्तरीन म्हणाली, “अगं बरं झालं पोटावरून आठवलं, भांड्यांचा नुसता खिळगा पडलाय. तेवढा आधी घासून दे. मग खुशाल जेव. काय?”

आईने हो म्हणत नाईलाजाने खाली मान घातली. गण्या मात्र भुकेल्या चेहऱ्याने तिला पाहतच राहिला.  

“गणा, आईला मदत करतोय वाटतं?” आईला भांडी धुवायला मदत करीत असताना अचानक मास्तर  तिथे येऊन म्हणाले.

“व्हय मास्तर.” गण्या खाली मान घालून म्हणाला. तितक्यात त्याच्या आईने आपला पदर डोक्यावर घेतला.

मास्तरांनी आत पहिले आणि आतच ओरडून ते म्हणाले, “अगं यांना उपाशी पोटी घालवू नको बरं?”

“हो हो. ती काळजी तुम्ही नका करू.” आतून मास्तरनीचा आवाज आला.

भांडी धुवून झाल्यावर गण्या आणि त्याची आई एका कोपऱ्यात जेवायला बसले. उद्विग्न होऊन त्याची आई एकेक घास आपल्या घशातून खाली उतरवीत होती. मात्र काही केल्या गण्याला एकही घास खाशातून खाली जात नव्हता. मानवी अहंकाराची भूक का पोटाच्या भुकेपेक्षा मोठी आहे? अहंकारात माणसाने एवढे का वाहवत जावं की त्याला पशू आणि माणूस यांतील साधा फरकही समजू नये? आणि तू? काय रे परमेश्वरा, लहान लेकरे तुझी आवडती ना रे? माझं अभागीचं सोड; पण तुलाही याची दया येऊ नये? कदाचित असल्या विचारांचे काहूर त्याच्या आईच्या मनात उठले असावे. तिच्या डोळ्यांच्या किनारी अश्रूंची भरती येऊ पाहत होती!

“आये, इटल्यागत लागतंय.” गण्या तोंड वाकडे करीत म्हणाला तसे तिचे अश्रू तिच्या गालांवरून खाली ओघळले आणि तिथून तिच्या ताटात! rotten food.

“गप्प खा बरं पोरा. उगंच हट्ट करू नगस.” तुटक्या स्वरांत ती म्हणाली.

नशिबाने पोटाच्या केलेल्या फजितीची गाथा मनात घोळवत घोळवत तिने आपला हात धुवून आपल्या पदराला पुसला आणि ती मास्तरणीला म्हणाली, “मास्तरीन, मागच्या येळचं आणि ह्या येळचं मिळून पन्नास रुपय हुत्यात बगा.”

“ठीक आहे, ये पुढच्या आठवड्यात.” मास्तरीन म्हणाली.

“आवं सणाला लागायचं हुतं. पुढच्या आठवड्यात दसरा बी संपून जाईल.”

“बरं ये दसऱ्याच्या आदल्या दिवशी.”

“ठिकाय येती.” म्हणत तिने हात जोडले आणि मायलेकरू दोघे घराबाहेर पडले. जाता जाता माय लेकरात संभाषण सुरू होतं.

“आयं, पैकं आल्यावर तुला लुगडं घी.”

“माझं लुगडं कुठं पळून न्हाय जात. तुला चांगली ईजार घिव या. साळंला कामाला ईल.”

दसऱ्याच्या आदल्या दिवशी गाण्याला आईने पैशासाठी मास्तरनीकडे धाडून दिले. मास्तरीन सहजासहजी पैसे देईल तर नवलच! तिने पाठवले गण्याला बारीक कळशी देऊन आडातून पाणी शेंदून आणायला. dussehra celebration

“गण्या? पैसं आणायला धाडला हुता ना रं तुला?” आडावर पाणी भरायला आलेल्या आईने त्याला पाहताच विचारले.

“मास्तरीन म्हणाली एक कळशी आन मग देती.” 

आईने मनात कसला तरी विचार केला आणि म्हणाली, “आन हिकडं ती कळशी आणि जा तू घरी. मी येती दिऊन आणि पैकं बी आणती. जा तू.”

दिवस मावळला तरी अजून गण्याच्या आईचा पत्ता नव्हता. गण्या उंबऱ्यावर बसून अंधारातच तिची वाट पाहत बसला होता. आई पैसे घेऊन येणार, मग आपण उद्या दसरा साजरा करणार, त्या पैशातून आईला लुगडं न् मला विजार! असे त्याच्या वयानुरूप विचारांत तो हरवून गेला होता. जणू त्याची मूर्तीच लागली होती.

लांबून अंधारातून आईची प्रतिमा जवळ येताना दिसताच तो आपल्या त्या मुद्रेतून बाहेर आला आणि जागी उभा राहिला. त्याच्या मनाला खूप आशा लागून राहिली होती.

ajun diwali ahe अजून दिवाळी आहे
ajun diwali ahe अजून दिवाळी आहे, pictures are for illustration purpose only

आई जवळ येताच त्याने उत्सुकतेने प्रश्न केला, “आये, मिळालं पैकं? उद्या पोळ्या करणार मग?”

आईने अगदी प्रेमाने त्याला जवळ घेतले आणि त्याच्या केसांतून हात फिरवीत ती जड अंतःकरणाने म्हणाली, “गण्या, पोरा दसरा न्हाय झाला म्हणून काय झालं? दिवाळी अजून हाय की पुढं!” diwali celebration.

तिच्या स्वरांतली ती उद्विग्नता ऐकून गण्या काय समजायचं ते समजून गेला. मात्र तिच्या डोळ्यांतले अश्रू त्या अंधारात ना गाण्याला दिसले ना आणखी कुणाला!

[समाप्त]

आपल्या पोस्टचे अपडेट मिळवण्यासाठी push notification चा स्वीकार करा. म्हणजे आपल्याकडून नवीन कथा चुकणार नाहीत.

अजून कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

कोजागिरी, पौर्णिमा आणि चंद्र ..!

दुर्गे दुर्घट भारी: भाग. १

दुर्गे दुर्घट भारी: भाग.२

 टिक टॉक टिक टॉक टिक

Diwali 2022,diwali, how to celebrate diwali, pahili anghol, dusri anghol, laxmipoojan, story on mother and her child, mother and her son, poor mother and son


Spread the love

3 thoughts on “अजून दिवाळी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *