
व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग २
स्वातंत्र्यदिनाची ती सकाळ फारशी काही प्रसन्न वाटत नव्हती. पहाटेपर्यंत धो-धो पडणाऱ्या त्या मुसळधार पावसाने लवासा परिसराला अक्षरशः झोडपूनच काढले होते. पावसाच्या त्या जोरदार तडाख्याने मार खाल्लेली लवासाची ती हिरवी चादर पांघरलेली डोंगराई जणू स्तब्धच झाली होती. ना प्राण्यांचा आवाज ना पक्ष्यांचा किलबिलाट. सर्व काही जणू अगदी निपचित पडल्यासारखे! शांत आणि निद्रिस्त!
पण हे काही फार काळ टिकलं नाही. याही वातावरणात चैतन्य आणण्यासाठी कार्यक्रमास्थळी सुरू असलेली देशभक्तिपर गीतेच पुरेशी होती.
आभाळात काळे ढग अजून दाटलेलेच होते आणि त्यातून चार-दोन भोके पडल्यागत पावसाचे थेंब खाली पडतच होते. ना भिजवत होते ना कोरडं राहू देत होते.
विरेनची बोट पाणी कापीत किनाऱ्याकडे झेपावली होती. डोळ्यांवर काळा गॉगल, डोक्यावर सफेद रंगाची हॅट आणि अंगात सफेद रंगाचाच मात्र गुडघ्यापर्यंतच असणारा ड्रेस घातलेली श्रीशा बोटीत उभी होती. सोबत उभा असलेला विरेनही काळ्या रंगाच्या सुटात, डोळ्यांवरती गॉगल घातलेला, तिच्यावर छत्री धरून उभा होता, एका खऱ्या सज्जन पुरुषागत!
किनाऱ्यावर पुण्याचे महापौर आपल्या पत्नीसह व उपस्थित मंडळींसह विरेनची बोट किनाऱ्याला लागण्याची वाट पाहत उभे होते. सत्तरी पार केलेले, उंचीला थोडे कमीच, डोक्यावर अॅस्कॉट कॅप Ascot Cap घातलेले आणि अंगात पूर्ण पांढरा सूट परिधान केलेले महापौर अगदी शाही थाटात उभे होते. अन् त्यांच्याच शेजारी उभ्या असलेल्या मिसेस महापौरांचा साजही काही कमी नव्हता! डोक्यावर हलक्या अशा गुलाबी रंगाची नाजुक हॅट व त्याच गुलाबी रंगाच्या फिक्कट ड्रेस मध्ये त्या जणू इंग्लंडच्या राणीच वाटत होत्या.
बोट किनाऱ्याला लागताच विरेनने बोटीतून बाहेर येऊन आपली छत्री आपल्या सुरक्षा रक्षकाकडे दिली आणि श्रीशाला उतरण्यास मदत म्हणून एक हात त्याने आदबीने पुढे केला. तिनेही आपला हात अलगद त्याच्या हातात दिला आणि सावकाश तीही बोटीतून बाहेर आली.
“बघा महापौर, कधी केलं होतं का तुम्ही आमच्यासाठी असं?” महापौरांच्या पत्नी सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात हळूच पुटपुटल्या.
“त्यासाठी एखाद्याने तसं सुंदरही असायला हवं ना.?” महापौरांनी हजरजबाबी उत्तर दिले आणि तिथे दबक्या आवाजात एक हशा पिकला.
मिसेस महापौरही काही कमी नव्हत्या. त्याही लगेच म्हणाल्या, “तुम्हाला नाही वाटत, हे सांगायला तुम्ही फारच उशीर केला?”
“आय एम जस्ट सेव्हन्टी टू और हम अभी जवान है और आप बेहद. . .” महापौर जरा मिश्किलीने म्हणू लागले तोच त्यांना मध्ये आडवत त्या म्हणाल्या,“पुरे आता. भावना पोहचल्या.”
“हॅलो मिस्टर अँड मिसेस महापौर. सॉरी मी तुम्हाला वाट पहायला लावली.” विरेन त्यांच्याजवळ येत म्हणाला.
“नो नो इट्स ओके. पाचच तर मिनिटे वेळ झाला आणि हो तुम्हा दोघांना वैवाहिक जीवनाच्या खूप शुभेच्छा.” महापौर म्हणाले. ते असे म्हणताच विरेनने श्रीशाला कोपराने खुणावून त्यांच्या पाया पडण्याची सूचना केली; पण तिने स्कर्ट घातला असल्यामुळे नकाराचा एक कटाक्ष तिने त्याच्यावर टाकला. शेवटी दोघेही त्यांचे पाय स्पर्शणार तोच त्यांनी त्यांना रोखले. महापौरांनी विरेनचा हात हातात घेतला आणि त्याला आशीर्वाद दिले तर मिसेस महापौरांनी श्रीशाला आपल्या छातीशी लावले आणि तिच्या डोक्यावरून तिची हॅट बाजूला काढून तिच्या कपाळावर प्रेमाचे एक चुंबन दिले. तिच्या गालावरून हात फिरवत त्या म्हणाल्या, “एखाद्या राजकन्येला साजेसं रूप आहे अगदी तुझं. तुला कुणाची नजर नको लगायला.”
श्रीशाला बहुतेक त्यांनी तिची हॅट काढलेली आवडलेली नसावी. तिला थोडा त्यांचा रागही आला; पण तरीही तिच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेशही नव्हता कारण, श्री व सौ महापौर यांचा स्वभावच तसा खुशमिजासी होता आणि त्यात त्यांनी तिला एका राजकन्येची उपमाही दिली होती ती तर काय कमी होती?
आपला घसा ठीक करत महापौर म्हणाले, “कुणाची नजर नाही लागणार. तुमचीच लागेल. चला आता ध्वजारोहण आहे.”
तिथून मग सगळे गप्पागोष्टी करत त्या दगडी पुलाकडे निघाले. तिथे आज महापौर स्वातंत्र्यदिनाचा झेंडा फडकवणार होते व त्यानंतर ते लवासा पर्यटकांसाठी खुले करणार होते.
“तुम्ही तर लवासाचा अगदी चेहरा मोहराच बदलून टाकलाय मि. भोसले.” चालता चालता महापौर इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाले.
“हो ना?” विरेनने विचारले.
“हो. अगदी. आम्ही आलो होतो. साधारण वीस एक वर्षे झाली असतील आणि त्यानंतर आता. वेल डन भोसले; पण हे..लवासा..आणि..हे..पर्यटन. सगळं सुचलं कसं?”
“काही नाही हो. तीन वर्षांपूर्वी हेलिकॉप्टर मधून जात असताना हे अडगळीत पडलेलं लवासा नजरेस पडलं आणि का कुणास ठाऊक लवासाने माझ्या मनात घरच केलं. आणि मग बाकी सगळं ते इथपर्यंतचा प्रवास!” विरेन उत्तरला.
बोलता बोलता सर्वजण ध्वजारोहणाच्या ठिकाणी येऊन पोहचले. ध्वजारोहणाची संपूर्ण तयारी झाली होती. कुलकर्णीनी सर्व व्यवस्था अगदी चोख केली होती. ते त्या ठिकाणी सर्वांच्या पोहचण्याची वाटच पाहत उभे होते.
“वेलकम मेयर अँड गुड मॉर्निंग सर.” कुलकर्णी महापौर आणि विरेन दोघांना एकदमच म्हणाले.
“ऑल डन?” विरेनने विचारले.
“येस सर. फक्त दोरी ओढायचं बाकी आहे.” कुलकर्णी हसत म्हणाले.
महापौरांच्या हस्ते व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीचा ध्वजारोहण सोहळा पार पडला. त्या औचित्यावर त्यांनी केलेल्या आपल्या भाषणात अख्ख्या पुण्यात तो आठवडा ‘अ वीक ऑफ फ्रीडम’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. सोबतच त्यांनी आकाशात लाल फुगे सोडून लवासा हे जाहीररित्या पर्यटकांसाठी खुले केले आणि उपस्थित सर्वांनी मग एकच जल्लोष केला.
रात्रीची पार्टी अगदी शांत पण सुरेल संगीतात सुरू होती. जागोजागी खाण्याची तसेच पिण्याचीही व्यवस्था अगदी चोख केली होती. वेटर लोक हातात पदार्थांच्या डिश आणि मद्याचे ग्लास पाहुण्यांच्या मधून फिरवत होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींनी आज हजेरी लावली होती. एकंदरीत लोक रात्रीच्या पार्टीची मौज लुटण्यात व्यस्त होते. एकमेकांशी गप्पा मारत ते मद्याचे एकेक घोट घशाखाली रिचवत होते.
पार्टीच्या बरोबर मध्यावर एका त्रिमीतीय होलोग्रॅम वरती बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीचे नृत्य सुरू होते. आपल्या परदेशातील शूटिंगच्या व्यापामुळे तिला इथे उपस्थित राहणे अशक्य असल्यामुळे तिथून तिला असे नृत्य सादर करावे लागत होते.
“अरे ये मुला, चल बाजूला हो तिथून.” तिच्या आभासी त्रिमीतीय रूपाला भाळून एक साधारण सहा वर्षीय मुलगा तिच्या आखूड स्कर्टला हात घालू पाहत असताना कुलकर्णी त्याच्यावर खेकासले.
“बट, इट इजंट रियल.” तो कुतुहलानेच म्हणाला.
“बट, शी डज नो एव्हरीथिंग.” कुलकर्णी असे म्हणताच तो गर्रकन तिच्याकडे वळला आणि परत कुलकर्णीकडे पाहत म्हणाला, “शी इज अ थिफ अंकल.”
तेवढ्यात त्याची आई त्याला शोधत तिथे आली.
“करन , तुला बाजवलं होतं ना एका जागेला बसायचं म्हणून?” ती त्याच्यावर ओरडत म्हणाली.
“लुक मॉम, शी इज अ थिफ.” तो त्या आभासी अभिनेत्रीकडे बोट दाखवत म्हणाला.
“थिप?”
“येस मॉम?”
“व्हॉट थिप?” तिने डोळे बारीक करत आणि भुवया जुळवत विचारले.
“शी स्टोल युवर अंडरवियर मॉम.” तो असे म्हणताच आसपासच्या चार-दोन लोकांचे कान तिकडे टवकारले. कुलकर्णीने आपले ओठ दाबत हसू लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तिलाही थोडं संकोचल्यागत झालं.
“व्हॉट द.. व्हॉट नॉनसेन्स! मूर्खासारखं काहीही बडबडू नकोस करण.” ती मग चिडूनच म्हणाली. आता त्याला काय कळणार चार-चौघात काय बोलायचं आणि काय नाही ते? शेवटी अल्लडच ना तो?
तेवढ्यात त्याचे उद्योगपती वडील तिथे आले आणि विचारले, “हेय, काय गडबड आहे?”
“डॅड, शी स्टोल मॉम्स अंडरवियर.” चोर-पोलिस खेळणाऱ्या लहान पोराने चोराला पकडावे तसा तो परत डोळे मोठे करून अगदी निरागस चेहऱ्याने म्हणाला आणि आजूबाजूंच्या लोकांत बारीक हशा पिकला.
“शूss शूssशूss, चूप चूप. चूप.” त्यांनी त्याला गप्प केले आणि परत कुतुहलाने त्याला दबक्या आवाजात विचारले, “अँड हाऊ डिड यू नो?”
“आय सॉ मॉम वेअरिंग अ रेड अंडरवियर अँड सेम आय सॉ ऑन हर ऑल्सो.” तो मोठ्या आवाजात तिच्याकडे बोट दाखवत म्हणाला आणि आत्तापर्यंत लोकांनी दाबून ठेवलेले हसू एका क्षणात मोकळे केले. त्याच्या आईने तर कपाळावरच हात मारून घेतला.
“करण, तू , तू , तू ना भलताच आगाऊ झाला आहेस. पहिला चल इथून तू. घरी गेल्यावर बघतेच तुझ्याकडे. चार-चौघात काय आणि कसं बोलावं काहीच कळत नाही. बापाचे लाड आणि दुसरं काय?” असे बोलतच ती त्याच्या हाताला पडकून त्याला तिथून ओढतच घेऊन निघून गेली आणि लोकही मग आपापसांत व्यस्त झाले.
त्या उद्योगपतीने मग आपली नजर इकडे तिकडे फिरवली आणि जाऊन तो त्या नृत्य सादर करणाऱ्या अभिनेत्रीच्या भोवतीने एक वेढा मारू लागला. आपल्याला कुणी पाहत तर नाही ना याची खात्री करून त्याने हळूच खाली बसत आपल्या बुटाच्या नाड्या बांधण्याच्या निमित्ताने तिच्या स्कर्टच्या आत वाकून पाहण्याचा प्रयत्न केला तोच एक आवाज कानी पडला तसा तो स्वतःला सावरत आपला घसा नीट करत आवाजाच्या दिशेने पाहू लागला. पुरुषच तो शेवटी!
“लेडीज अँड जंटलमन, मे आय हॅव युवर अटेन्शन प्लीज.? मला इथे बोलवण्यास आनंद होतोय, आपल्या प्रिय महापौरांना आणि त्यांच्या पत्नीना, अर्थातच आपल्या पार्टीचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या उपस्थितीने आजच्या या पार्टीला चार चांद लागले आहेत. मी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्याचे आवाहन करतो.” निवेदक जोडीपैकी असणारा पुरुष स्पष्ट आणि दणकट आवाजात बोलला.
काळा सूट आणि काळे बूट घातलेले महापौर आणि सोबतीला गडद हिरव्या रंगाचा गाऊन आणि पायांत सपाट सँडल्स घातलेल्या त्यांच्या सौभाग्यवती अर्थातच मिसेस महापौर एकमेकांच्या कोपरात कोपर अडकवून अगदी ऐटीतच तिथे दाखल झाले. सर्वांनी उभे राहत टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले व तिथे पोहचताच त्यांनीही उपस्थित लोकांना हातवारे करीत अभिवादन केले.
“आणि आता मी त्यांचं स्वागत करते ज्यांच्याशिवाय ही पार्टी आधुरी आहे, जे या पार्टीचे यजमानही आहेत, अ व्हेरी यंग अँड चार्मिंग असे मिस्टर आणि मिसेस विरेन भोसले. बिग क्लॅप्स फॉर देम लेडीज अँड जंटलमन.” स्त्री निवेदक खूप उत्साहाने नी तितक्याच गोड आवाजात बोलली तसे त्या दोघांचे तिथे आगमन झाले.

मरून रंगाच्या टक्सीडोमध्ये विरेन आज भलताच लोभस वाटत होता. त्याच्या पिळदार शरीरीयष्टीचे कमनीय स्नायू त्यात दाटलेले पाहून उपस्थित स्त्रियांची हृदये पाणी पाणी होऊ पाहत होती. त्याच्या हातात हात घालून तिथे दाखल होणारी श्रीशा तर सोनेरी रंगाच्या व अंगाशी व्यवस्थित चोपून बसलेल्या आणि जमिनीवर रुळणाऱ्या अशा बॅकलेस गाऊनवर कमालीची मोहक दिसत होती. मुद्दामून कुरळे केलेले केस, तिच्या रेखीव भुवया, काजळ लावलेले पाणीदार डोळे, ओठांवरती लाल लाली आणि अख्खा गळा भरून असलेला तो हिऱ्यांचा हार पाहून वाटत होते जणू आत्ताच पाण्यातून एखादी जलपरीच बाहेर आली असावी! इतकं स्वच्छ आणि नितळ सौन्दर्य!
विरनेने पार्टीला उपस्थित सर्व पाहुण्यांचे, प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले आणि सर्वांना पार्टीची मजा लुटण्यास सांगून तोही पार्टीस उपस्थित काही बड्या मंडळीच्या गाटीभेटी घेण्यास श्रीशा बरोबर निघून गेला.
“नाही नाही नाही. यांनी तर मला कधीच बाहेर देशात फिरायला नेलं नाही. सतत काम काम आणि कामच.” एका टेबलला बसलेल्या मिसेस महापौर श्रीशाजवळ महापौरांची तक्रार करत होत्या. मागे हळुवार असे संगीत सुरू होतं. त्यांच्या समोर खाण्याच्या विविध पदार्थांच्या डिशेश सजवल्या होत्या आणि ते बोलता बोलता त्यांचा आस्वाद घेत होते शिवाय जोडीला वाईन आणि शाम्पेन सुद्धा होत्या.
“तुला सांगतो विरेन, लग्नानंतर आम्ही हनीमूनला स्वित्झर्लंडला गेलो होतो. त्यानंतर बरेच दौरेही झालेत बरं का.” शेजारी बसलेल्या विरेनला ते म्हणाले.
“जसं की?” मिसेस महापौरांनी त्यांना विचारले.
“अं.. पॅरिस, पॅरिस आहे. न्यूयॉर्क आहे. जपान आहे शिवाय रशिया आणि हे आपला इस्राइल पण आहे.” महापौर जसं आठवेल तशी नावे घेत होते.
“झालं? की अजून काही आहे बाकी?” मिसेस महापौरांनी जरा खोचकच प्रश्न केला.
“अं..आफ्रिका आहे ना. अरे आफ्रिकेला कसं विसरून चालेल. ते जिराफ, झेब्रे आणि.. आणि काय गं ते?” वाईन घशाखाली घालत ते म्हणाले.
“झालं? आता बोलू मी?”
“नाही म्हटलं तर बोलणार नाही का?” मिश्किलीने ते म्हणाले.
“विरेन आणि श्रीशा, तुम्हाला सांगते मी, आय मीन आत्ता तर सांगूच शकते मी. हे सगळे परदेश दौरे जे यांनी सांगितले ना हे यांचे महानगरपालिकेचे अभ्यास दौरे होते बरं का. आता मी या दौऱ्यांत काय काय पहिले असेल याची कल्पनाच करा.”
“हे खूप चुकीचं केलं तुम्ही मिस्टर महापौर.” श्रीशा चेष्टा करण्याच्या हेतूने म्हणाली व शेजारी बसलेल्या विरेनकडे पाहत त्यालाही खिजवण्याच्या हेतूने पुढे म्हणाली, “तसं मलाही कुणीतरी हनीमूनला मालदीवला घेऊन जाणार होतं.”
“तरी म्हणत होतो मला अजून कसं काय यात ओढलं नाही कुणी.” विरेन आपले डोके खाजवत हळूच म्हणाला आणि टेबलावर हशा पिकला.
हसता हसता मिसेस महापौर आपल्या विचारात काही काळ हरवून गेल्या. कसल्यातरी विचाराने त्यांच्या डोळ्यांच्या कडा हलक्याशा पणावल्या देखील. मग आपल्या विचारांतून बाहेर येत त्या बोलू लागल्या, “ तुला सांगते श्रीशा, हे पुरुष असतात ना, थोडे कठीणच असतात मुळी. कदाचित ते समजायला थोडे अवघडच जातील, कधी खुल्याने व्यक्त होणार नाहीत, तेवढ्या खुल्याने प्रेम दाखवणारही नाहीत. त्यामुळे ते कधी आपल्याला थोडे बावळटही वाटू शकतील; पण जेव्हा त्यांच्यावर प्रेम सिद्ध करण्याची खरोखरच वेळ येते ना, दी एफर्ट्स दे टेक फॉर दॅट ना आर सिंपली अमेझिंग. रादर आय वूड से की तो तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक क्षण असतो.”
असं वाटत होतं की त्या पार्टीत आता फक्त ते चौघेच होते, इतका सन्नाटा तिथे जाणवत होता. मागे सुरू असलेले संगीतही आता अगदी पुसटसं कानी पडत होतं.
“नेव्हर मिस दोज मुमेंट्स. नेव्हर एव्हर.” त्या पुढे म्हणाल्या. मिस्टर महापौरांनी त्यांचा हात आपल्या हातात घेतला तसे त्यांनी आपले डोके त्यांच्या खांद्यावर टेकवले. विरेन आणि श्रीशा यांनी एकमेकांकडे हसत पाहिले आणि आपले डोळे मिचकावले.
“हाऊ रोमॅंटिक.” श्रीशा त्याच्याशी पुटपुटली.
“अँड वन मोर थिंग, तिच्यावर एफर्ट्स पुट करायला कधीही हयगय नाही करायची. भलेही चूक तिची का असेना, माफी मागायला बिलकुलच मागे नाही हटायचं. संसार रूसव्या-फुगव्यांनी आणि लाड-प्रेमांनी सजत आणि बहरत असतो. त्यांच्या इच्छा मोठ्या असेनात का; पण तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही त्या खुष होऊन जातात. बायका असतातच रे मुळी हळव्या!” मिस्टर महापौर विरेनला म्हणाले.
“डोन्ट अंडरईस्टीमेट वुमन पॉवर. हा.” मिसेस महापौर त्यांना बजावत म्हणाल्या आणि चीयर्स म्हणत त्यांनी आपला शाम्पेनचा ग्लास श्रीशासमोर धरला. तिही आपला ग्लास त्याला टेकवत चीयर्स म्हणाली. त्यावर सर्वजण हसू लागले.
“बरं झालं आता पाऊस बंद आहे.”
“अरे हो ना नाहीतर आजच्या या पार्टीचं काही खरं नव्हतं.”
“हं.”
“बाकी विरेनने लवासाला पूर्ण बदलून टाकलंय हे मात्र नक्की आहे हं.”
जेवण करताना लोकांच्या चर्चा रंगल्या होत्या. पावसाने विराम घेतल्यामुळे पार्टी सुरळीत पार पडत होती. तसे आभाळ मात्र भरलेलेच होते. कशाची तरी वाट पाहत.! कशाची? पडण्याची?
स्वातंत्र्यदिवस होऊन दोन दिवस झाले होते. बाहेर पाऊस असा काही सुरू होता की जणू आभाळाला मोठं भगदाडच पडलं असावं. त्यात भर म्हणजे सतत कडाडणाऱ्या त्या वीजा. वास्तविक पाहता या दिवसात वीजांचा कडकडाट नसतोच मुळी; पण का कुणास ठाऊक आज आकाशात असे काही ढग साचले होते जणू आकाश आणि पाताळ एकरूप झालं होतं.
मध्यरात्र टळून गेलेल्या त्या वेळी, असल्या पावसात तो विला बिलकुलच गायब झाला होता. वीजांचे ते वेडेवाकडे नृत्य आणि सोबतीला असणारा ढगांच्या गडगडाटांचा तो हृदयात धडकी भरवणारा आवाज एखाद्याच्या मनात धस्स करणारा होता आणि असल्या भयावह वातावरणात देखील आतमध्ये विरेन आणि श्रीशा एकमेकांत पुरते विलीन झाले होते. बाहेर पावसाच्या माऱ्याने तलावाचे पाणी जोरदार आवाज करीत होते आणि आत श्रीशाचे मादक उसासे त्यात भर घालीत होते!
सुखाच्या त्या परमोच्च बिंदुला पोहचून मग दोघेही झडून शांत होऊन एकमेकांच्या मिठीत पहुडले. अजून त्यांची हृदये जोरजोरात धडधडत होती. मात्र बाहेर तो वरूणराजा थकत होता ना ती धरती हार मानत होती.
“थॅंक्स विरू.” त्याच्या छातीवर सावकाश आपले ओठ टेकवत ती म्हणाली.
“कशासाठी?”
“थॅंक्स फॉर बीइंग विथ मी.” ती म्हणाली आणि थोडं थांबून पुन्हा ती त्याला म्हणाली, “मला प्रॉमिस कर, तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस.”
“खरंतर मलाच ते तुला म्हणायचं होतं. रियली थॅंक्स फॉर बीइंग विथ मी श्री. अँड आय मीन इट आणि प्रॉमिस मी का करू? उलट तूच मला प्रॉमिस कर की तू मला तुला कुठेही सोडून जाऊ देणार नाहीस.” तो असे म्हणताच प्रॉमिस म्हणत तिने त्याचे चुंबन घेतले व ती बिछान्यावरून बाजूला झाली आणि अंगावर आंतरवस्त्रे चढवू लागली.
“हे काय?”
“काही नाही.” शेवटी अंगावर गाऊन चढवत ती म्हणाली व बाहेर जाऊ लागली.
“आता कुठे?”
“पावसात.” ती टाचा वर करत आनंदाने म्हणाली.
“तू काय वेडी झाली आहेस का? इतक्या मुसळधार पावसात आणि तेही एवढ्या रात्री? आणि वीजा पहा किती आवाज करताहेत त्या.”
“तुला यायचं असेल तर ये. मी चाललेय. आत्ता माझी इच्छा झालीय पावसात भिजायची. बाय. ” असे म्हणत ती बाहेर पडलीसुद्धा.
“कमाल आहे हिची कधीपण कायपण इच्छा होते हिला. तेही ठीक आहे; पण पावसात भिजायला थोडीच कपडे घालून जातं कुणी?” तो एकट्याशीच पुटपुटला आणि आपल्या अंगावर गाऊन चढवू लागला.
बाहेर त्या भयानक पावसात श्रीशा आपले बाहु पसरून बिनधास्त भिजत होती. विरेन एका ठिकाणी आडोशाला आपल्या हाताची घडी घालून उभा राहून तिला न्याहाळत होता.
“तू येणार नाहीस का?” तिने ओरडत विचारले.
“काय?” त्याने विचारले. तूफान पाऊस असल्यामुळे तिचं बोलणं त्याला स्पष्ट ऐकू आलं नाही.
मग तिने हाताने इशारे करत त्याला तिच्याकडे येण्यास सुचवले.
“आज मी फक्त तुला भिजताना पाहणार आहे.” तो तिला ऐकू जाईल असं जोरात म्हणाला.
अंगावरील गाऊन बाजूला फेकून देऊन ती तिच्या क्रीडेत मग्न झाली होती आणि तो तिचं ते भिजलेलं रूप आपल्या दोन्ही डोळ्यांत असं काही साठवत होता, की जणू तो तिला शेवटचंच पाहत होता. तिच्या भिजलेल्या केसांतून टपकणारे ते पावसाचे थेंब विजेच्या लखलखाटाने जणू मोती बरसल्यासारखे भासत होते, तिच्या त्या नितळ देहावर बरसणाऱ्या पाऊसधारांचा त्याला काहीसा हेवाही वाटला कारण आजपर्यंत तिला इतक्या सलगीने स्पर्श करणारा त्याच्याशिवाय तो एकमेव पाऊसच होता!
तेवढ्यात एका कानठाळ्या बसवणाऱ्या आवाजाने लवासा परिसर हादरून गेला. क्षणात अभाळाशी अजस्र वीजांनी एक तोरणच बांधले आणि आपला थयथयाट सुरू केला. त्याचा सारा प्रकाश त्या विलावर पडला.
धो धो पाऊस, डोळ्यांची बुब्बूळे जाळू पाहणारा प्रकाश, ना दिसायला काही मार्ग त्यात कधीही न पाहिलेल्या त्या वीजा आणि एवढ्या सगळ्यात पुढ्यात उद्ध्वस्त होणारा तो विला व त्याच्यासोबत तिने पाहिलेला तो शेवटचा विरेन! तिचा विरेन! मघाच्या वचनातला विरेन, तिच्या स्वप्नातला विरेन, तिच्या सुखातला, तिच्या दु:खातला, तिच्या मिठीतला, तिच्या श्वासातला, तिच्या रोमरोमांतला विरेन, डोळ्यांदेखत डोळ्यांच्या आड होणारा तिचा विरेन! आणि हे सर्व घडत असताना पृथ्वीने देखील आपली गती मंदावली असावी. जणू काहीच उमगायला मार्ग नाही. काहीतरी अकल्पितच घडत असल्यागत!
तिच्या आर्त हाकांची ना कुणाला खबर ना कसली पर्वा. सर्वजण तसल्या आस्मानी रुद्रवतारात गाढ निद्रिस्त झालेले किंवा भीतीने तसेच पडून राहिलेले.

“विss. .रेनss ” काळजाच्या शेवटच्या स्नायूपासून ती किंचाळली आणि ती त्याच्याकडे झेपावली. तेवढ्यात एका मोठ्या आवाजासरशी कसलातरी आघात होऊन विलाचा एक स्फोट झाला आणि सर्व काही बेचिराख होऊन पाण्यात मिसळलं.
त्यासोबत श्रीशादेखील पाण्यात फेकली गेली पण आघात इतक्या जबरदस्त होता, की ती पाण्यात फेकली जाताच अर्धवट बेशुद्ध झाली. बाहेर अजून वीजांचा थयथयाट सुरूच होता. विलाच्या एकेक गोष्टी तिच्यासोबत पाण्यात खोलवर निघाल्या होत्या आणि अर्धनग्न श्रीशा देखील निपचित अवस्थेत आपले विखुरलेले केस घेऊन लेकच्या तळाशी निघाली होती.
आता आवाज फक्त तिच्या धडधडणाऱ्या हृदयाचाच येत होता. सी प्लेनचा तुटलेला पंखा शेजारून जातासरशी एका हिसक्याने ती शुद्धीवर आली आणि तिने पाण्यातच एक मोठा श्वास घेण्याचा प्रयत्न केला तसे तिच्या नाकातोंडात पाणी शिरले आणि बुडबुडे पाण्याच्या पृष्ठभागाकडे मार्गस्थ झाले.

तिने पाहिले, त्या बोटीचे तुकडे ज्यात बसून तिने विरेनसोबत पाण्याची सफर केली होती, तिने पाहिला तो मोडका बिछाना ज्यात तिने तिचे खूप नाजुक क्षण सताड उघड्या देहाने त्याच्यासोबत व्यतीत केलेले, तिने पाहिला तो बाथटब ज्यात तिने त्याच्यासोबत केलेले ते खट्याळ चाळे, तिने पाहिला त्याने तिला दिलेला तो अस्ताव्यस्त ड्रेस, तिने पाहिला तो नाजुक आवाज करणारा विंड चाईम, मात्र तिने न पाहिला, तिचाच विरेन!
विरेनच्या शोधार्थ ती आता इतरत्र पाहू लागली, हातापायांची झटाझट हालचाल करू लागली. भलेही नाकातोंडात पाणी जात असलं तरी ती त्याला हाका मारू लागली; पण प्रत्येक हाकेगणिक तिच्या फुफ्फुसांत पाणी शिरत होतं आणि सोबतच मंद होत चालली होती तिच्या हृदयाची गती!
तशातही तिला पृष्ठभागावर पडलेला तो प्रखर प्रकाश नजरेस पडत होता; पण तिच्यात आता इतके त्राण शिल्लक नव्हते, की ती पाण्याच्या पृष्ठभागावर पोहचेल. शेवटी शरीरात राहिलेले सर्व बळ एकवटून तिने तिकडे कूच केलीच!
पण आता काहीच पर्याय नव्हता. भलेही ती आपल्या हातापायांनी पाणी खाली दाबत होती, तरीही ती वरती पोहचणे शक्य नव्हते. तिच्या हृदयाची स्पंदने मंदावली होती आणि फुफ्फुसे पाण्याने भरली होती. तिच्या त्या शर्थीच्या प्रयत्नांना कुठेतरी लगाम लागू पाहत होती. शेवटचे हातपाय मारून तिने तिच्या फुफ्फुसातली उरली सुरली हवाही मोकळी केली आणि निपचित उघड्या डोळ्यांनी हाताचे बाहु फैलावून तिचा अर्धनग्न देह पाण्यात पडून राहिला. त्यातही पाण्याखाली येणाऱ्या उजेडात चमकत विरेनचे ते घडयाळ येऊन तिच्या हाताशी धडकले आणि आपोआप मनगटाशी घट्ट बसले.
पाण्याखाली एक चिडिचूप शांतता, त्यात कधीच तिच्या मंदावलेल्या हृदयाची स्पंदने विरून गेलेली. ना गाढ झोपी गेलेल्या लवासाला त्याची कानोकान खबर ना आणखी कुणाला!
ब्रह्मांडाच्या त्या निर्वात पोकळीत एखादा लुकलुकणारा तारा अचानक गायब व्हावा आणि त्याची कुणाला कल्पनाच नसावी!
साधारण तीन दिवसांनंतर लवासापासून काही अंतरावर पाण्याच्या काठी चिखलाने माखलेला अर्धनग्न असा स्त्रीदेह पालथ्या अवस्थेत पडलेला होता. दुपारची वेळ असल्यामुळे ऊन्हाने त्या देहाची त्वचा भाजून निघत होती. शिवाय किडे-मुंग्या खाद्याच्या शोधासाठी त्यावर भटकत होते आणि आकाशात शेकाटे व घारी आवाज करीत घिरट्या घालीत होते. पाण्यातील वटलेल्या झाडावर तीन-चार कावळे बसून काव काव करीत होते. जणू सर्वजण त्या मांसल देहाचे लचके तोडण्याच्या तयारीतच होते! मांसल देह? श्रीशाच होती ती!

“शss.. . . . श्र. . . श्री. . . श्रीशा? शss.. .श्र . . श्र. . . श्री. श्र. . श्रीशा? ऊ . . . ऊ . . . ठठ.. ठ . . . ऊठ.” तिच्या हातातील ते घडयाळ सुरू होऊन साद तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता; पण त्यातही खूप अडथळे म्हणजे ग्लिचेस येत होते. त्याचे कार्य पूर्वीसारखे सुरळीत होत नव्हते. तरीही घड्याळाद्वारे कंपने निर्माण करून तो तिला जागे करण्याचा प्रयत्न करत होता आणि एका क्षणी अचानक तिने आपले डोळे उघडले! ताडकन!
blog marathi, marathi moral stories, marathi pranay katha, marathi chavat katha, marathi katha, blogs in marathi, how to write a blog in marathi,+
व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकवर जा.
व्हायरस: २. अ वीक ऑफ फ्रीडम भाग १
[…] व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग २ […]