
व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग १
सकाळची कोवळी किरणे तिच्या रेशमी केसांवरती पडली होती आणि त्या किरणांत न्हाऊन निघालेले तिचे ते सुंदर रूप तो एका अंगावर होऊन न्याहळत होता. झोपेतून उठतानाही एखादी स्त्री जर सुंदर दिसत असेल तर समजून जा की तिच्या सौंदर्याचं काही मोजमापच नाही!
“खरंच!” तो हसत पुटपुटला.
“अं..?” तिने जागे होत त्याला प्रतिसाद दिला आणि डोळे उघडून आपले बाहु पसरून आळस देण्याचा प्रयत्न केला, “काही म्हणालास का?”
“यू लुक ब्युटीफुल.” तो पटकन म्हणाला.
“अँड यू लुक हॉरिबल.” आपला खालचा ओठ दातांत घेत तीही तेवढ्याच तत्परतेने म्हणाली.
“थॅंक्स फॉर कॉम्प्लिमेंट.” तो तिच्या जवळ येत म्हणाला.
“ओय हॅलो, मी तुला काही कॉम्प्लिमेंट नाही देत आहे, प्लीज.”
“मग एक किस दे मला.”
“तू ना खूप आगाऊ झाला आहेस हल्ली.” असे म्हणून तिने त्याला एक जोराचा चिमटा काढला.

इंद्रप्रस्थातील एखादी अप्सरादेखील इतकी मोहक दिसली नसती जितकी झोपेतून उठूनही श्रीशा सोज्वळ आणि सुंदर दिसत होती. श्रावणातल्या सरींचा थेंबवर्षाव जसा कमलपर्णाना भिजवू शकला नव्हता तशीच रात्रीची ती निद्रा देखील तिच्या सौंदर्याला गालबोट लाऊ शकली नव्हती. प्रत्येक रातीच्या नंतर तिच्या सौंदर्याची कळी मात्र आणखीनच जास्त खुलू पाहत होती.
मधले काही दिवस असेच निघून गेले होते. विरेन आणि श्रीशा यांनी आपल्या हनीमूनची चांगली मजा लुटली होती. त्यांचा प्रत्येक दिवस एकमेकांच्या बाहुपाशात सुरू होऊन संपायचाही एकमेकांच्या बाहुपाशातच!
या काळात दोघांनी एकमेकांवर भरभरून प्रेम केले होते. नुसते मनानेच नव्हे तर आता ते शरीरानेही पुरते एकमेकांत भिनले होते, एकरूप झाले होते. श्रीशाला आता त्याला एक क्षणही आपल्या नजरेआड ठेवणे अवघड झाले होते आणि विरेनची अवस्थाही तिच्याहून काही वेगळी नव्हतीच!
आपली कामे आटोपून तो तिच्यासाठी उपलब्ध असायचाच आणि नसला तरीही ती त्याला भाग पडायची. पुरुषाची कधी त्याच्या स्त्रीच्या पुढ्यात डाळ शिजलीय का किंवा शिजेल काय? मग तो कितीही नर असला तरी नारी ती शेवटी नारीच!
शरीरसुखासाठी ते आता ना कोणत्या संधीची वाट पाहत होते ना त्यांना त्यासाठी कोणतं निमित्त हवं होतं. ते एकमेकांच्या जवळ यायचे आणि कपड्यांचा अडसर केव्हा दूर व्हायचा हे त्यांचं त्यांनाच समजायचं नाही. एकमेकांच्या आधाराने वाढणाऱ्या वेलींना कुठे जाणीव असते का की आपण एकमेकांत गुरफटून कुठल्या कुठे निघून आलोय त्याची? त्यांना फक्त वाढणं माहीत असतं आणि परिणाम? त्यांची चिंता विश्वात्मा करेल! तोपर्यंत वेलींवर फुले येऊन त्या बहरलेल्या पण असतील!
मधल्या काळात तिनेकदा धो-धो पाऊस कोसळला होता आणि त्या कोसळणाऱ्या पावसात त्यांनी प्रणयाची मजा लुटली नसेल तर नवलच! त्यांनी एकमेकांच्या सताड उघड्या देहांवरून नागमोड्याने ओघळणाऱ्या कित्येक जलधारांचे ते मधुर ओघळ आपसूक प्राशन केले होते. तेही थरथरत्या ओठांनी, बोचऱ्या शहाऱ्यांनी नी मादक सुस्कारांनी!
“एक विचारू?” विरेनने विचारले.
तिने होकारार्थी मान हलवली.
त्याने तिचे केस कुरवाळत कसला तरी विचार केला आणि म्हणाला, “नको, नंतर विचारेन.”
“नंतर तुला संधी मिळेन न मिळेल. विचार विचार.” तिने एक डोळा मिटत त्याला खिजवले.
“नेक्स्ट टाईम .” असे म्हणत त्याने तिच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले आणि तो बिछान्यातून उठणार तोच तिने त्याला त्याच्याकडे खेचले आणि त्याच्या ओठांचं एक जोराचं चुंबन घेतले.
“मला तुला काहीतरी सांगायचंय.” त्याच्या ओठांतून आपले ओठ सोडवत ती नाजुक स्वरात म्हणाली पण; त्यात एक हलकीशी उदासी होती.
“गुड न्यूज?” आपले ओठ दाबत आणि डोळे बारीक करत त्याने विचारले.
“चल रे, इतक्या लवकर थोडी समजते ती?” त्याच्या गालावर एक टिचकी देत ती म्हणाली.
“मग?”
“अंss ..” त्याला आज सांगायचंच म्हणून पक्का विचार करून ती बोलू लागली, “अॅक्च्युअली, आय हॅड ए बॅड ड्रीम दॅट नाईट.” असं म्हणत ती थांबली. तिला त्या स्वप्नाबद्दल आणखी काही आठवायचं नव्हतं मुळी पण; विरेनला तर ती सांगूच शकत होती.
“हाऊ बॅड?” त्याने कुतुहलाने विचारले. त्यालाही उत्सुकता होती की असं कोणतं स्वप्नं हिने पाहिलं होतं ज्यामुळे तिचं वागणं कधी कधी अनपेक्षित वाटायचं.
“ते नाही सांगता येणार; पण ना मी खूप घाबरले होते. सादला चांगलंच माहीत आहे.”
“बरं, काय पाहिलंस तू स्वप्नात? माझा जीव तर नाही ना घेतलास? ब्रेकिंग न्यूज,हनीमूनच्या बहाण्याने बायकोने काढला आपल्याच पतीचा काटा!” तो तिची चेष्टा करण्याच्या बहाण्याने म्हणाला खरा; पण तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या पाहून तो शांत झाला.
“रियली ?” त्याने आपलं हसू बाजूला सारत प्रश्न केला तशी तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि ती आसवे गाळू लागली.
“हे.. शांत हो. शांत हो. प्लीज. मला सांगशील काय पाहिलं नेमकं स्वप्नात?” त्याने तिला विश्वासात घेत विचारले.
“मी तुला खूप शोधत होते, खूप हाका देखील मारल्या मी पण तू कुठेच नव्हतास.” ती गंभीर होऊन त्याला सांगू लागली.
“म्हणजे? तू काय म्हणतेयस मला तर काहीच कळत नाहीये. प्लीज, जरा नीट सांगशील मला? कळेल असं?”
“मी खोलवर पाण्यात पडले होते आणि माझा श्वासही बंद झाला होता. जेव्हा जाग आली तेव्हा पाहिलं तर आपला विला, सी प्लेन सर्व उद्ध्वस्त होऊन माझ्यासोबत तळाशी जात होतं. पाण्यात अचानक मला जाग आली आणि पाहिलं की तू आसपास कुठेच दिसत नव्हतास. मी श्वास घेण्याचा प्रयत्न केला पण..”
“पण काय श्री?”
मग श्रीशाने त्याला जसेच्या तसे आपलं स्वप्न सांगितलं. त्यानेही ते शांतपणे ऐकून घेतलं.
“.. त्यामुळे मी खूप घाबरले होते विरू. मला कसली तरी अनामिक भीती वाटत आहे तेव्हापासून. मी खूप आवाजही दिला रे तुला पण; तू मात्र..” असे म्हणत ती जास्तच रडू लागली होती.
“ये अगं, शांत हो. मी आहे ना आता इथे. बघ. रडू नकोस. ते एक साधं स्वप्नच तर होतं. रीलॅक्स, सगळं ठीक आहे.” तो तिचे अश्रू पुसत तिची समजूत काढू लागला.
“मला कधी कधी खूप भीती वाटते रे विरू. तू माझ्यापासून दूर तर जाणार नाहीस ना? मला प्रॉमिस कर तू मला सोडून कुठे कुठे जाणार नाही, तू कायम माझ्यासोबत राहशील. राहशील ना रे? राहशील ना रे विरू? बोल ना?” तिने एखाद्या लहान मुलीसारखा हट्ट करत त्याला विचारले.
“लुक हीयर आय एम. अगदी तुझ्या डोळ्यांसमोर.”
“तरीपण मला प्रॉमिस कर.”
“ओके बाबा, प्रॉमिस. आता खुश?” तो तिचे दोन्ही गाल अगदी प्रेमाने ओढत म्हणाला. तिने फक्त होकारार्थी मान हलवली.
“हे असं खुश असतं का?” त्याने असं विचारताच तिने आपले अश्रू पुसत त्याला जोराची मिठी मारली आणि म्हणाली. “आता ठीक आहे?”
“हो. आणि ते स्वप्न वगैरे इतकं मनावर नको घेऊ. एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा. सगळीच स्वप्ने काही खरी होत नसतात. भिगी बिल्लीच आहे नुसती माझी बायको.”
“मग या बिल्लीचा पंजा पाहायचा आहे का?” हाताचा पंजा करत तो त्याच्यावर रोखत तिने त्याला विचारले.
“नको नको. एकवेळ आम्ही वाघनखे सहन करू पण तुमचे पंजे? राणी सरकार, तुमच्या लेखी दुसरी कोणती शिक्षा असल्यास ती आम्हांस द्यावी पण ही नको. राणी सरकार, ही नको!”
“एखादी शेवटची इच्छा?” मग एखाद्या राणीसारखा रुबाब झाडत तिनेही त्याला विचारले.
“आपल्या हातून बनलेल्या एकदम कडक अशा कॉफीचे फुरके मारीत आम्हाला आमची गर्दन आपल्या स्वाधीन करण्याची इच्छा आहे. मग तुम्ही खुशाल त्यावरून आपला पंजा फिरवा.”
“भोसले तुम्ही तर इतिहासात हरवलात.”
“सह्याद्रीचा सिंह गर्जतो..शिवशंभू राजा…”
“बाहेर या राजे, बाहेर या. कॉफी हवीय ना? मी आलेच.” असे म्हणत ती बिछान्यातून उठून पटकन कॉफी बनवायला निघून गेली. विरेन मात्र शांत होत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कसला तरी विचार करत पाहतच राहिला.
दरम्यानच्या काळात काही मोजक्या पर्यटकांना लवासाला परवानगी दिली गेली होती. त्यांच्या आणि काही प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार होता. त्यामुळे आता तिथे काहीशी पर्यटकांची वर्दळ ही होतीच!
विरेन कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात मग्न होता आणि तेही त्या सूचना व्यवस्थितपणे ऐकून घेत होते. स्वातंत्र्यदिन अगदी उद्यावर येऊन ठेपला होता तरीही त्यांची काहीशी कामे अजून बाकी राहिली होती. त्यात भर म्हणून त्याने उद्या रात्री सर्वांसाठी एक शानदार पार्टीचं आयोजनही केलं होतं. त्यामुळे उद्या सकाळचा स्वातंत्र्योत्सवाचा कार्यक्रम आणि रात्रीची ती पार्टी अशा दुहेरी बंदोबस्तात तो व्यस्त होता.
तो स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणचा आढावा घेत होता पण; त्याच्या त्या कार्यात त्याला मघाचपासून सतत एक अडथळा येत होता आणि तो अडथळा दूसरा तिसरा कोणता नसून त्याची श्रीशाच होती.
तिकडून त्याच्या विलाच्या इथून ती मुद्दामूनच आरशाचा उजेड त्याच्या तोंडावर पाडीत होती. त्याच्या तोंडावर पडणाऱ्या त्या उजेडाने जणू त्याची चांगलीच फजिती लावली होती. त्याची सततची होणारी फसगत पाहून मात्र त्याच्या सोबतचे लोक एकमेकांना खुणावत आपलं हसू दाबू पाहत होते. भले त्याची जरी फजिती होत असली तरी त्याला तिचं ते वागणं मात्र बिलकुलच खटकलं नव्हतं ना त्याला तिचा राग येत होता. शेवटी सुवर्णमृगाच्या लीला पाहताना एकवेळ तुमचे डोळे दिपतीलही मात्र त्याचा तुम्हाला त्रास तो कसला?
दुपारनंतरची उन्हे आता तिरपी झाली होती आणि सूर्याला जणू डोंगराआड जाण्याची घाईच झाली होती. जशी काय डोंगराआडून त्याची प्रेयसीच त्याला बोलावीत होती आणि हे महाशय तिला भेटण्यास अगदी व्याकुळच झाले होते.
होय, त्या क्षितिजाच्याही पल्याड एक वेडी रात्र रोज त्याची वाट पाहत उभी असते जी त्याच्या भेटण्याने जणू दही दिशा प्रकाशमान होऊन जाते अगदी! पण त्याच्या दूर जाण्याने पुन्हा तिच्या आयुष्यात अंध:कार पासरणार आहे याची तिला काय जाणीव नसावी? असेलही पण; फिरून तोच तिच्या आयुष्यात प्रकाश टाकायला मावळतीच्या दिशेने येईल याची तिला पुरेपूर खात्री असते आणि म्हणूनच काय की तिलाही त्याची वाट पाहणं आवडत असावं!
श्रीशा जणू काही ती रात्रच होती जी अगदी दुपारपासून विरेनच्या येण्याची वाट पाहत विलाच्या बाहेर सतत येरझाऱ्या घालीत होती.

जसजसा खाली जाईल तसतसा सूर्य आपल्या अंगावर तांबूस रंग चढवित होता. घटकानुघटके तो तांबूस रंग अधिकच उठून दिसत होता आणि तोही दानशूर असल्यागत आपला रंग क्षितिजावरती मुक्तपणे उधळीत निघाला होता, भगवी वस्त्रे अंगावर चढविलेल्या एखाद्या तपस्वी मुनीगत! फरक एवढाच होता की, हा सूर्यमुनी आपली तपस्या संपवून आपल्या रातराणीला भेटावयास निघाला होता.
मावळतीची चाहूल लागताच इकडे विरेन आपल्या लोकांना उद्यासाठीच्या सूचना पटापट देऊ लागला. उद्याची सगळी तयारी जवळपास पूर्ण झाली होती पण तरीही त्याला उद्याच्या बाबतीत कसलीच उणीव नको होती. त्यामुळे तो सतत आपल्या कर्मचाऱ्यांना सुचनांवर सूचना देत होता. खरंतर अगदी कमी वयातच तो खूप साऱ्या जबाबदाऱ्या खूप खुबीने पार पाडीत होता, जणू हा त्याचा उपजत गुण असल्यागतच!
“ठीक आहे, आता यावर कुणाला काही शंका?” त्याने कर्मचाऱ्यांना विचारले. त्यावर कुणीच काही बोलले नाही.
“काय झालं? कुणाला काही सुचवायचं असेल तर तेही आत्ताच सुचवा. ऐनवेळी फसगत नकोय मला.” तो पुढे म्हणाला. “तर काही शंका?”
“नो सर.”सर्वजण एका सूरत म्हणाले.
“दॅट साऊंड्स ग्रेट.” असे म्हणत त्याने आपल्या घड्याळात पहिले आणि म्हणाला, “तर उद्याच्या ध्वजारोहणाला भेटूया मग. आणि काही महत्वाचं असेलच तर कुलकर्णींना सांगा. ते मला बोलतील. काय कुलकर्णी, बरोबर ना?”
कुलकर्णी हे एक पन्नाशी पार केलेले त्याचे अत्यंत विश्वासू असे कर्मचारी होते. श्रीशाच्या गैरहजेरीत तेच बाकी कामे हाताळत असत पण; तांत्रिकदृष्ट्या सोप्पी.
“होय सर. मी तुम्हाला कळवेन.” कुलकर्णी उत्तरले.
त्याने हातातील घड्यालचे एक बटन दाबले आणि म्हणाला, “साद?”
“येस विरेन.?”
“बोट मागव.”
“हो, मी लगेचच मागवतो.” असे म्हणत साद शांत झाला.
मग बाकीच्या कर्मचाऱ्यांना जायला सांगून लेकच्या मधून जाणाऱ्या दगडी पुलावरून विरेन चालत जाऊ लागला. त्याच्यामागोमाग कुलकर्णी भरभरा पाऊले टाकीत त्याच्याशी बोलण्यासाठी येत होते.
“सर सर. सर, मला आणखी एक विचारायचं होतं” मोठा श्वास घेत कुलकर्णी म्हणाले तसा विरेन थांबला. तिकडे श्रीशा त्याची वाट पाहत होती आणि कुलकर्णी आता त्याचा वेळ घेणार म्हणून त्याने थांबत नाखुषीने त्यांच्यावर एक कटाक्ष टाकला आणि विचारले, “काही महत्वाचं असेल तर बोला, प्लीज. नाहीतर मी निघत आहे.”
“तसं काही जास्त महत्वाचं नाही.”
“ठीक आहे. मग आपण त्यावर नंतर बोलू. मला आधीच उशीर झाला आहे.” घड्याळात पाहत तो म्हणाला.
“ओके सर, पण..”
“पण काय आता?”
“काही नाही सर.”
“कुलकर्णी..?”
“ म्हणजे सर, मला असं विचारायचं होतं..”
“हं.”
“की तुम्ही स्वतः एवढं प्रगत तंत्रज्ञान वापरत असून पण हे असं जुनं घडयाळ का वापरता?”
“का? हे काय चुकीची वेळ दाखवतं का?”
“नाही. पण..”
“हे पहा कुलकर्णी, वेळ ही शाश्वत आहे.” असे म्हणत त्याने आपला हात समोर केला आणि म्हणाला, “आत्ता घड्याळात सव्वा सहा वाजत आहेत पण; त्या माझ्यासाठी. तुमच्या बाजूने पाहिलं तर त्यात साधारण पाउणे बारा वाजलेले दिसतील. तसंच अजून कुणासाठी ती वेगळी वेळ असेल. माझ्यासाठी नाही,तुमच्यासाठी नाही; पण तिसऱ्याच कुणासाठी तरी. ”
“काही समजलं नाही सर.” कुलकर्णी कपाळावर आट्या पाडीत म्हणाले.
विरेनने एक त्यांच्याकडे पाहत एक स्मितहास्य केले आणि म्हणाला, “कधी कधी वेळ ही वेळेच्याही पलिकडची वेळ दाखवते. पण थांबा कुलकर्णी, तुम्ही मला यासाठी थांबवलंत?”
कपाळावरच्या आट्या तशाच ठेवत कुलकर्णी म्हणाले, “नो सर, मी नंतर विचारेन तुम्हाला. मी निघतो आता. उद्या भेटू. बाय बाय.” आणि त्यांनी तिथून चक्क काढता पाय घेतला.
हिरव्यागार डोंगराच्या कडा नुकत्याच लालेलाल भास्कराने चुंबल्या होत्या. पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्यांकडे कूच करीत होते. मधूनच एखादा डॉल्फिन पाण्यातून उसळी मारीत होता. जंगलातून प्राण्यां-पक्षांचा मस्त गोंगाट कानी पडत होता. पर्यटकांचा काहीसा जल्लोषही दुरून ऐकू येत होता.
मघाचपासून एकट्या असलेल्या हंसीणीच्या सोबतीला आता तिचा हंसदेखील आला होता आणि मग तो देखणा हंसाचा जोडा एकमेकांच्या गळ्यांत गळे घालीत शानदार जलक्रीडा करण्यात मग्नही झाला होता. मावळतीचा तो क्षण मात्र श्रीशा थोड्याशा निराशेनेच आपल्या डोळ्यांत साचवत होती, कारण तिचा हंस अजूनही परतला नव्हता.
सायंकाळचा थंडगार वारा तिच्या अंगाला स्पर्शून तिचे लव उभारीत होता. वाहणाऱ्या त्या वाऱ्याने पाण्यावर उत्पन्न होणाऱ्या त्या नाजुक लाटा आणि त्यांवर पडणारे मावळतीचे सूर्यकिरण जणू तिच्यासमोर सुवर्णमन्यांची मुक्तपणे उधळणच करताहेत असा भास होत होता. पाण्यावरून परावर्तित होणाऱ्या त्या प्रकाशाने तिची कांती जणू उजळूनच टाकली होती. वाऱ्यासवे मुक्त बागडणारे तिचे रेशमी केस जास्तच चमकत होते. एखाद्या राजाने आपल्या राणीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी तिच्या जिवंतपणी तिची सुवर्णमूर्ती बनवून आपल्या शय्यागृहात सजवावी तशी श्रीशा भासत होती. अगदी सोनसुंदरीच जणू!

विरेनची बोट जवळ येताना दिसताच तिने आपली मान झटक्याने दुसरीकडे वळवली आणि हाताची घडी घालीत गाल फुगवून तिने आपला सगळा राग नाकाच्या शेंड्यावर एकवटला. विरेनला दुरूनच तिचा अंदाज लागला होता. तिने आपला रुद्रावतार धारण करण्याअगोदर त्याला तिला मनवायचे होते पण; तीही काही कमी नव्हती. तिनेही मनाशी पक्के केले होते की आज आपल्या पुढ्यात त्याची कसलीही डाळ शिजू मात्र द्यायची नाही.
बोटीतून उतरून विरेन चालत श्रीशाकडे येऊ लागला. तिने हलकेच डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्यावर एक कटाक्ष टाकला. मागून येऊन त्याने आपले बाहु तिच्या कमरेभोवती लपेटले आणि तो आपले ओठ तिच्या खांद्यावर टेकवणार तोच तिने आपले खांदे झटकले. त्याने पुन्हा प्रयत्न केला. तिने पुन्हा दाद दिली नाही पण; तो प्रयत्न करीतच राहिला. मात्र त्याच्या प्रत्येक प्रयत्नाअंती ती मेणासारखी पाघळत होती.
तिला आपल्या बाहुंत घट्ट पकडून त्याने आपले तोंड तिच्या काना जवळ नेले व नाकातून एक सुस्कारा टाकला तसे तिच्या रोमरोमातून एक लहर संचारली. तिच्या गालावर आता लाली पसरली होती.
अगदी तिच्या कानाला आपले ओठ लावून तो गर्द आवाजात पुटपुटला, “समोर ती हंसीन दिसत आहे ना?”
“हं.” ती सावकाश बोलली.
“तिच्यात आणि तुझ्यात एक फरक आहे.”
“काय?”थरथरत्या ओठांतून भरलेल्या श्वासासोबत तिचा शब्द बाहेर पडला.

“आपल्या नाकाच्या शेंड्यावर राग आणायला तिच्या नाकाला शेंडाच नाही.” असे म्हणून तो हसू लागला तसा तिने आपला कोपर त्याच्या पोटात मारला. मग थोडीशी सैल झालेली मिठी घट्ट करत त्याने तिला उचलून घेतले आणि दोघे हसत एकमेकांना चुंबू लागले. तिचा खोटा रुसवा मात्र पडू लागलेल्या अंधारात केव्हाचाच अलगद विरून गेला होता.
क्षितिजापल्याड तो अग्नीचा गोळा अंधाराला भेटावयास निघून गेला होता आणि इकडे हा मदनाचा गोळा आपल्या सजनीला कवेत घेऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत होता.
[to be continued..]
ब्लॉग मराठी ,blog marathi, marathi pranay kataha, marathi chawat kataha, marathi chavat katha, how to start a blog in marathi, how to earn money writing a blog, marathi katha, marathi stories, marathi moral stories
व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकवर जा.
[…] व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग १ […]
[…] व्हायरस: २. अ वीक ऑफ फ्रीडम भाग १ […]