• Pune, Maharashtra
कथा
स्वर्गाची शिडी!

स्वर्गाची शिडी!

          मध्यरात्र उलटून खूप वेळ झाला होता. किशनला आता एक पाऊलही पुढे टाकणे कठीणझाले होते. खांद्यावर दीड वर्षाची मुलगी, सोबत चार वर्षाचं पोरगं आणि डोक्यावर छोटंसं गाठोडं घेऊन त्याच्याइतक्याच जड पायांनी रेल्वेच्या पटरीवरून चालणारी त्याची बायको, यांना घेऊन तो दिवस मावळायला जालन्याहून औरंगाबादेच्या दिशेने निघाला होता.                                                                                                                        शेवटी सटाणा परिसरात आल्यावर त्याच्या मुलाने रुळावरच आपले अंग टाकून दिले, तेव्हाच किशनने थांबण्याचा विचार केला. थोडावेळ आराम करून पुन्हा लगेच पुढच्या प्रवासाला निघायचे असे मनात पक्के करून त्याने रेल्वे रुळावरच मुक्काम ठोकला.
          काही वर्षांपूर्वी तो मध्यप्रदेशातून आपल्या कुटुंबासहित जालन्याला एका कंपनीत कामाला म्हणून आला होता. लॉकडाऊनमुळे कंपनीची कामे ठप्प झाली होती आणि त्यात भर म्हणून वाहतूकही ठप्प झाली होती. त्यामुळे तो इकडे अडकून पडला होता. जवळ असणारे पैसे संपू लागल्यावर त्याच्या कुटुंबाची आता खाण्यापिण्याची वाताहत होऊ लागली होती.                                                                                                           औरंगाबादला जाऊन तिथून मध्यप्रदेशात जाण्याची काही ना काही सोय होईल, असा विचार करून त्याने पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी पायीच रेल्वेच्या पटरीवरून औरंगाबादेच्या दिशेने आपले बिऱ्हाड घेऊन दिवस मावळतीलाच प्रस्थान केले होते.                                      रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे आत्ताच्या घडीला तिथे कोणती रेल्वे येणे शक्य नाही, असा विचार करून त्याने थोडावेळ तिथे मुक्काम करणे योग्य समजले आणि खांद्यावरच्या मुलीला खाली घेतले. तिचा केव्हाच डोळा लागला होता.                                                                        त्याच्या बायकोने डोक्यावरचे गाठोडे खाली घेतले आणि प्रवासाला निघताना सोबत घेतलेली चटणी-भाकरी बाहेर काढून ते गाठोडे रूळावर ठेवले व त्यावर डोके ठेऊन ती पडून राहिली. झोपलेल्या पोराला नीट करत त्याने त्याचे डोके हळूच रेल्वेच्या रुळावर टेकवून दिले व स्वतः तो त्याच्याकडे पाहत, त्याचे केस कुरवाळत, त्याच्या शेजारी बसून राहिला.

          “आवं, चार घास खाणार का?” त्याच्या बायकोने त्याला विचारले.
          “काय नको.”
          “चालून चालून दमला असाल म्हणून विचारलं.”
          तो काहीच न बोलता रुळावर आपले डोके टेकवून आकाशाकडे पाहत पडून राहिला.
          “झोपू नगस. थोड्यावेळानं निघायचंय.” तो म्हणाला व परत आकाशाकडे पाहत पुनवेचं चांदणं न्याहाळू लागला. आज पुनवेचा चंद्र भलामोठा दिसत होता. चंद्राला एकटक न्याहाळता न्याहाळता आता चंद्राची चांगली भाकरी झाली होती.
          “ह्या घे पाच भाकऱ्या आणि तिथून चटणी घेऊन निघ तू किसना.” मुकादमाने भाकऱ्यांच्या थप्पीवरून पाच भाकऱ्या काढून त्याच्या हातात देत म्हणाला.
          “आवं पण मुकादम लांब जायचंय, दहा भाकरी तर द्या मालक. कृपा होईल चांगली.” किशन विनवणी करत म्हणाला.
          मुकादमाने तोंड मुरगळत त्याच्या हातात अजून तीन भाकऱ्या दिल्या आणि म्हणाला, “साल्यांनो कामे नसताना इतकं कसं खाता रे तुम्ही?”
          “कंबकत पेट को कौन समझाये? लै मेहरबानी मालिक.” असे म्हणून त्याने कसलातरी विचार केला आणि परत मुकादमाला म्हणाला, “मालिक हजार रुपये मिळाले तर अजून मेहेरबानी होईल.”
          “आयला , किसन्या तू तर लै पाय पसरायला लागला लेका. लॉकडाऊनमुळं सगळं वांदे झालेत आमचे आणि तू पैसे काय मागतो?”
          “प्रदेश जाना था. वापस आलो की घ्या की वजा करून.” हातातील भाकरीसहित हात जोडून तो म्हणाला.
          मुकादमाने एकटक त्याच्याकडे पहिले आणि खिश्यातून पैसे काढले आणि मोजून त्याने साडेआठशे रुपये त्याच्या हातातील भाकरीवर टेकवले.
          “हजार मलिक.”
          “दीडशे रुपये भाकरीचे वजा केलं किसन्या; पण देताना तू मला हजारच रुपये द्यायचे बरं का.”
          पाणावलेल्या डोळ्यांनी तो हातातील भाकऱ्यांकडेपहातच राहिला. भाकऱ्यांकडेनोटा महत्वाच्या की भाकरी महत्वाची या विचारात तो गढून गेला.
          डोळ्यांतील पाणी जसे कानाकडे ओघळले तसे त्याने ते हातानेच टिपले आणि परत नजर आकाशाकडे लावून न्याहाळत राहिला. टिपूर पडलेल्या चांदण्यांतून लुकलुकत पुढे जाणाऱ्या विमानाकडे तो पाहत होता. त्याचा बारीक आवाजही त्याच्या कानी पडत होता.
          “बाबा ही विमाने वरून फुले का टाकत आहेत?” किशनच्या मुलाने कोविड वॉरीयर्सचा गौरव करण्यासाठी पुष्पवृष्टी करणाऱ्या भारतीय लढाऊ विमानाकडे पाहत किशनला विचारले.
          “बेटा, मला नाही माहित, लेकिन कुछ अच्छे के लिए ही फुलं टाकत असतील ते.”
          “मग आपण लवकरच घरी जाणार?”
          “सरकार ने चाहा तो जल्द ही बेटा.”
          “बाबा, मी पण एक दिवस विमानात बसणार.”
          “हो बेटा.”
          किशनने बाजूला पहिले तर त्याची बायको झोपली होती. आपल्या लहान मुलांकडे पाहत त्याने स्मित हास्य केले आणि एका अंगावर होत तो त्या रेल्वे रुळाकडे पाहत पडला होता. रुळाच्या दोन रेषा काही अंतरापर्यंत स्पष्ट दिसत होत्या मात्र अंधारामुळे तिथून पुढचे त्याला काहीचदिसत नव्हते. अंधारात गडप झालेल्या रुळांच्या रेषा पाहून त्याला त्याचे नशीब असे अंधारातच गडप झाल्यासारखे वाटत होतं कदाचित! विचार करता करता किशनला झोप कधी लागली समजलंच नाही. सलगच्या पायपिटीमुळे तोही थकून गेला होता.
          रेल्वेचा भोंगा वाजत होता, रेल्वेची लोखंडी चाके रुळावर आवाज करत पुढे जात होती. आतमध्ये किशनची बायको, मुले गाढ झोपली होती. किशन रेल्वेच्या खिडकीतून आनंदाने बाहेर पाहत होता. तो एकदम खुश दिसत होता. तो त्याच्या घरी निघाला होता. झाडे-झुडपे, नद्या-नाले, राने-वने भराभर मागे पडत होती. कुणीतरी रेल्वे पकडण्यासाठी धावत होतं; पण रेल्वे मात्र भराभर पुढे निघाली होती. भोंगा वाजवत!
          भोंग्याचा तो कर्णकर्कश आवाज त्याला सहन होत नव्हता. तरीही तो खिडकीतून बाहेर पाहतच होता. रेल्वेचा लोकोपायलट मुंडके बाहेर काढून जोरजोरात भोंगा वाजवातच होता. भोंग्याच्या आवाजाने त्याच्या कानाचे पडदे फाटतील की काय असे वाटले आणि त्याचे डोळे उघडले गेले. देवा…..!
          काही कळायच्या आतच रेल्वे भोंगा वाजवत त्याच्या जवळ आली. त्याने पाहिले, रेल्वे स्लो मोशनमध्ये त्याच्याकडे येत होती, लोको पायलट जोरजोरात भोंगा वाजवतच होता. पटरीवरील खडे आता उड्या मारू लागले होते, लोखंडी पटरी थरथरत होती आणि त्याचे हृदय धडधडत होते, तेही स्लो मोशनमध्ये! वेळ नव्हताच त्याच्याकडे! त्याने हताशपणे आपल्या निजलेल्या बायकोकडे पहिले व आपल्या पोरांना वरून मिठी मारली तशी ती रेल्वे त्यांच्या अंगावरून निघून गेली आणि पुढे जाऊन थांबली.
          प्रवासात सोबत खायला घेतलेल्या भाकऱ्या अस्ताव्यस्त विखरून पडल्या होत्या. आपल्या गावी जाणारे ते पाय बिना धडा-मुंडक्यांचेअगदी चिरडून गेले होते. ना किंचाळ्या, ना आर्त हाका!
          प्रदेश सरकारने त्याची मृत शरीरे विमानाने त्यांच्या गावी पोहचवण्याची घोषणा केली खरी; पण एका विशेष रेल्वेने त्यांची ती मृत शरीरे त्यांच्या गावी पाठवण्यात आली! जिवंतपणी वेळीच एक रेल्वे न मिळालेली ती लोकं आज एका विशेष रेल्वेने आपल्या प्रवासाला निघाली! अंधारात गडप झालेली ती पटरीच शेवटी बनली ‘स्वर्गाची शिडी ‘ !     

हे पण वाचा:

माय व्हॅलेंटाईन

रुपेरी रिंगण

2 thoughts on “स्वर्गाची शिडी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *