
यशोदा: भाग-२
इतक्यात यशोदा आपले ओले केस पुसत आत आली आणि लाकडी कपाटाला असलेल्या मोठ्या आरशासमोर येऊन उभी राहिली व भावशून्य चेहऱ्याने आरशात स्वतःला पाहत केस सुकवू लागली. ती आता पुन्हा कशात तरी हरवून गेली होती.
“माई, कुंकू लावू की टिकली लावू?” आरशात वाकून स्वतःच्या कपाळावरील हिरवे गोंदण पाहत यशोदेने माईला विचारले.
“टिकली नको बाई. कुंकू लाव.”
“पण मला नाही ना लावायचं कुंकू.”
“यशोदे, उगीच ना चा पाढा सुरू करू नको हं आता. पटकन तयार हो. पाहुणे येतीलच इतक्यात. आलेच मी.”
“आता कुठं निघालीस?” यशोदेचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच माई बाहेर निघून पण गेली. यशोदेनं आपल्यापुढील कुंकवाचा करंडा उचलला आणि तो उघडून हळूच बोट आत घालून तिने बोटावर कुंकू घेतले व ती आपल्या कपाळावरील गोंदणाच्या वर लावू लागली. कुंकू लावताना तिच्या गालावर एक विलक्षण हास्य उमटले होते. कदाचित यापुढे ती कुंकू लावेल तर ते शामरावांच्या नावाचंच, असा विचार तिच्या मनात आला तरनसेल? म्हणून ती खुदकन हसून लाजलीही !
“चांगलीच लाजतेस की.” माईच्या बोलण्याने ती एकदम सावध होत म्हणाली, “माई तू कधी आलीस? आणि अचानक असं निघून कुठं गेलतीस?”
“सांगते पण तू आधी इकडे बघ पाहू.” असे म्हणत तिने तिच्या हनुवटीला पकडून तिची मान आपल्याकडे वळवली आणि पुढे म्हणाली, “किती गं गोड दिसतेयस यशोदे आज तू?”
माईच्या डोळ्यांत पाणी आले. तिने मघाशी बाहेर जाऊन बोटावर आणलेली तव्याची काजळी आपल्या डोळ्यांतील पाण्याने ओली केली आणि ते बोट हळूच यशोदेच्या कानाच्या मागे लावले व म्हणाली,
“कुणाची दृष्ट नको लगायला माझ्या लेकीला.”
“एवढ्यासाठी बाहेर गेलतीस?”
माईने नुसतीच मान हलवली आणि म्हणाली, “कधी मोठी झाली कळलंच नाही बघ तू आणि आता तर सासरी पण जाशील. आली तर चार दिवसाच्या मुक्कामाला येशील.” बोलता बोलता माईच्या डोळ्यांतून अश्रुंच्या धारा खाली ओघळू लागल्या.
“तुलाच घाई झालीय मला सासरी पाठवायची.” असे म्हणत ती तिच्या गळ्यात पडली.
“आई, अगं ये आई? आई?” माधुरीच्या मोठ्या हाकेने आरशात हरवलेली यशोदा अचानक भानावर आली.
“अं?”
“अगं कुठं हरवली आहेस? मला तेवढ्या साडीच्या निऱ्या पाडून दे की.”
“हरवली? कुठे? कुठे नाही?”
“आज नक्कीच काहीतरी बिनसलंय तुझं? कधीची हाका मारतेय मी, तुझं आपलं लक्षच नाही.” “लक्ष? लक्ष आहे ना. बोल.”
“एवढ्या निऱ्या पाडून दे ना मला साडीच्या. कधीची आबदतेय. पडेनातच मेल्या.”
यशोदेनं जवळ जाऊन तिच्या साडीला अगदी रेखीव निऱ्या पाडून दिल्या आणि तिच्याकडून पिन घेऊन त्यांना पिनही लावून दिली. तेवढ्यात समाधान दरवाज्यात येऊन थडकला.
“आई तू इथे आहेस होय? मी अख्खं घर पालथं घातलं. अगं पाहुणे आलेत पाहुणे. आवारा पटकन. आप्पांनी घाई करायला सांगितलीय.” असे म्हणून तो घाईत निघून पण गेला.
“तू आवर तुझं. रेखाने फोडणीची तयारी केलीय. मी जाऊन पोहे टाकते. वाटलंस तर तिला तुझ्या मदतीला धाडते मी.” असे म्हणून तिने स्वतःच्याच तोंडावरून दोन्ही हात फिरवले व एक मोठा श्वास घेऊन ती बाहेर जाण्यास निघाली. चार पाऊले जाताच ती पुन्हा माघारी फिरली व कपाटाकडे जात तिने आरशासमोरील काजळाच्या डबीतील काजळ बोटावर घेऊन ती माधुरीकडे आली. माईने जशी तिची दृष्ट काढली होती अगदी तशीच दृष्ट तिने माधुरीचीपण काढली आणि माईचीच ती मायेची वाक्येपण माधुरीसाठी बोलून टाकली.
बाहेर पाहुणे मंडळी येऊन आपापल्या जागेवर विराजमान झाली व गप्पागोष्टींत मग्न झालीही! थोड्या वेळाने बाहेरून एक मोठा व भारदस्त आवाज आला, “पोहे झालं असतील तर येऊ द्या की पोरीला.”
क्षणातच मग डोक्यावर पदर घेतलेली व लाजेने मान खाली घातलेली यशोदा पोह्यांचे तबक हातात घेऊन नाजुक पावलांनी बाहेर आली आणि बसलेल्या पाहुण्यांना पोहे देऊ लागली. नव्यानेच मिसरूढ फुटलेले शामराव मात्र आता यशोदेचा चेहरा पाहण्यास खूप अतुर झाले होते. सर्वांना पोहे देऊन झाल्यावर यशोदेनं रिकामा तबक खाली ठेवून दिला आणि पाहुण्यांच्या समोरच मांडून ठेवलेल्या पाटावर आपला पदर सावरत ती सावकाश बसली.
पाहुणे मंडळी एकएक करून तिला प्रश्न विचारू लागली. कुणा एका पाहुण्याने तिला स्वयंपाक येतो का, हे आवर्जून विचारलेही! प्रश्नोत्तरांच्या तासानंतर काही क्षण बाहेर शांतता पसरली आणि मग बाहेरून एक आवाज आला, “पोरगी पसंत आहे आम्हाला.”
पाहुण्यांचा होकार येताच इकडे आतमध्ये मात्र यशोदेच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. सूनबाईही लगबगीने तिच्याजवळ येऊन ‘ताईसाब पसंत पडल्या त्यांना ‘ असे म्हणत ती तिला बिलगली देखील.! माधुरीही तिथून उठून लाजतच आतमध्ये दाखल झाली.
“हे बघा, आता तुम्हाला पसंत आहे, आम्हाला पण पसंत आहे तर पुढची बोलणीपण आजच करून टाकूया की. काय म्हणता?” पाहुण्यांपैकी एकजण म्हणाला. बहुतेक मुलाचा मामाच असावा!
“असं म्हणता? एक पाचच मिनिटं थांबा मी आलोच.” म्हणून शामराव आतमध्ये आले. त्यांना पाहून माधुरी अजूनच लाजली.
“शामा लेका नात लाजली की रे माझी.” कोपरा धरून बसलेली म्हातारी म्हणाली.
शामराव येऊन यशोदेच्या समोर उभे राहिले. ती आता परत उद्विग्न चेहऱ्याने खाली नजर रोखून त्यांच्या पुढे उभी होती. थोड्यावेळापूर्वीचे हास्य आता गायब झाले होते. नक्कीच तिच्यात आणि शामरावांच्यात रात्री काहीतरी घडले होते हे मात्र नक्की: पण घडले काय होते?
“कसं करायचं मग?” शामरावांनी तिला विचारले.
“कशाचं?”
“पुढची बोलणी करू म्हणतायत पाहुणे.”
“करा की मग.” म्हणून ती मागे फिरली आणि स्वयंपाकाच्या कामाला लागली.
तिचा प्रतिसाद पाहून सर्वांनाच थोडे आश्चर्यच वाटले.
“आप्पा, झालं का तुमचं?” समाधानने उंबऱ्यातूनच हाक दिली.
“आलो,आलो.” असे म्हणून शामराव पुढची बोलणी करायला बाहेर गेले.
“शामा नीट बोलणी कर रे बाबा.” म्हातारी बारीक आवाजातच म्हणाली.
पाहुणे आता पुढची बोलणी करून जाणार म्हटल्यावर त्या तिघीही स्वयंपाकाला लागल्या, तर बाहेर लग्नाची बोलणी पण सुरू झाली.आतमध्ये भाकऱ्या थापल्या जात होत्या आणि बाहेर रितीरिवाजाची बोलणी ठरत होती. नंतर कालवणाच्या फोडणीबरोबर देण्याघेण्याच्या गोष्टी पण ठरल्या.
“चला, मग ठरलं तर. लग्न मुलीकडे राहील. बाकी सारे रीतिरिवाज आपापल्याकडे राहतील. मुलीला पाच तोळे सोने व मुलाला साखरपुड्यासाठी दोन तोळ्यांची अंगठी. आणि साखरपुडा व लग्नाची तारीख लवकरात लवकर काढू काकाला बोलावून. मान्य आहे का?” मुलाच्या मामांनी विचारले.
“शामरावांनी एक कटाक्ष आपल्या मुलाकडे टाकला व म्हणाले, “मान्य आहे.” तितक्यात पाहुण्यांपैकी कुणीतर हळूच हुंड्याचा विषय काढला. म्हणून परत मामांनी विचारले, “आणि हो, पन्नास हजार रुपये हुंडा पण मान्य आहे का?”
शामराव होकार देणारच इतक्यात यशोदा उंबऱ्यात येऊन शामरावांकडे पाहत, डोळे मोठे करून व नाकपुड्या तणवून मोठ्या आवाजात म्हणाली, “एक पैशाचा पण हुंडा मिळणार नाही.”
एक चिडीचूप शांतता पसरली. बसलेले सगळे पाहुणे अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिले. आतून माधुरी व रेखा काही विचित्र घडल्यासारखं तिच्याकडे पाहत होत्या. तिची अशी नजर पाहून शामरावही काही क्षण थबकून गेले होते. आता त्यांना काल रात्रीचा तो प्रसंग आठवला.
“पोरगी लग्नाला आली ना आपली?” यशोदेने शेजारी झोपलेल्या शामरावांना विचारले.
“होय गं. असं वाटतंय कालपरवापर्यंत माझ्या अंगाखांद्यावर खेळत होती ती.”
“दिवस किती पटापट निघून जातात ना?”
“हं.”
“उद्या तर तिला बघायला पाहुणे पण येणार आहेत. . . मी नाही बाई माझ्या लेकीला सासरी पाठवणार.”
“यशोदे तू पण ना.” शामराव म्हणून गप्प झाले. काही काळ यशोदापणकाहीच बोलली नाही.
“यशोदे?”
“काय?”
“बरेच दिवस बोलेन बोलेन म्हणतोय; पण. . . “
“पण काय?”
“काय नाही. जाऊ दे.”
“जाऊ दे तर जाऊ दे. मी झोपते. उद्या पाहुणे सकाळीच येणार आहेत.” असे म्हणून ती एका अंगावर झाली.
शामराव थोडावेळ काहीच बोलले नाहीत; पण यशोदेला अजून झोप लागली नाही हे पाहून ते म्हणाले, “आपल्या लग्नात तुझ्या वडिलांनी पंचवीस हजार रुपये हुंडा द्यायचं कबूल केलं होतं. आठवतंय तूला?”
“हं; पण आत्ता त्याचं काय?” म्हणत यशोदा पुन्हा त्यांच्याकडे वळली.
“तुझ्या वडिलांनी परिस्थितीचं कारण देऊन तो पुढे-मागे देऊ असंही कबूल केलं होतं; पण तो आजवर काही दिलाच नाही त्यांनी. म्हटलं आता माधुरीच्या लग्नासाठी पण हुंडा द्यावा लागेल तर. . . . “
“तर काय?”
“तू हुंडा माग ना घरी.”
ते शेवटचं वाक्य ऐकून यशोदेच्या मनात अगदी धस्स झालं. ती काहीच न बोलता परत एकाअंगावर झाली. एका क्षणात तिच्या डोळ्यांत अश्रू उभेराहिले. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही आपल्या नवऱ्याच्या मनात ही गोष्ट अगदी वाळवीसारखी चिकटून आहे याचं तिला मनोमन वाईट वाटलं. तिच्या मनात नानातऱ्हेचे विचार येऊ लागले. आजपर्यंत नवऱ्यासाठी केली जाणारी प्रत्येक व्रतवैकल्ये आपण अगदी न चुकता, पतीपरमेश्वर मानून केली होती आणि आज जाऊन आपल्याला हे फळ मिळाले. हुंड्याच्या पलीकडे जाऊन एक पत्नी आणखी काही नसतेच का? आपल्या म्हातारपणीही यांनी हुंडा मागितला असता का? अशा शेकडो प्रश्नांनी तिच्या मनात कल्लोळ माजवला.
“मला मान्य आहे.” नवऱ्या मुलाने स्वतः असे म्हटल्यावर ती शांतता एकदाची भंग झाली.
“चला मग टावेल-टोपी करून सुपारी फोडू. काय शामराव?” पाहुण्यांपैकी एकजण म्हणाला.
“हं. हं.फोडू फोडू.” ते जरा सावरतच म्हणाले मात्र अजून ते पुरते भानावर नव्हते. ते कधी यशोदेकडे पाहत होते तर कधी पाहुण्यांकडे. समाधानला आपली आई असं का वागली हे काही कळालं नव्हतं. तोही त्या दोघांकडे सतत पाहत होता. मात्र शामरावांना जे कळायचं ते कळलं होतं. !
पाहुणे जेवून-खाऊन निघून गेल्यानंतर शामराव झोपाळ्यावर निवांत पान चघळत बसले होते. स्वयंपाकघरातून भांड्यांच्या धुण्याचा आवाज येत होता.
“येऊ का म्हटलं आत, आप्पा?” बाहेरूनच गणपा सुतारानं आवाज दिला तसे शामराव झोपाळ्यातून उठून उभे राहिले व म्हणाले, “कोण? गणपा? अरे ये ये.”
“नाही म्हटलं झोपला बीपला असाल.”
“झोपतोय कुठला लेका. दिवसभर पाहुण्यांच्या पाहुणचारातच होतो.”
“बरं बरं.काय काम हाय म्हणाला तुम्ही?”
“ते पलंगाला भुंगा लागलाय. तेवढं बघ की जरा.”
“ठिकाय, चला आत मधी.”
शामराव सुताराला घेऊन आत गेले आणि भुंग्याचा बंदोबस्त करूनच बाहेर आले.
“आता तुमच्या भुंग्याचा बंदोबस्त झालाय आप्पा. चला येऊ का?” असे म्हणत शामरावांच्या हातातील पैसे घेऊन तो निघून पण गेला. शामराव मागे वळून पुन्हा झोपाळ्यावर बसणार इतक्यात त्यांची नजर स्वयंपाकघरातल्या यशोदेवर पडली. ती त्यांनाच पाहत उभी होती. पलंगाला लागलेल्या भुंग्याचा बंदोबस्त झाला होता आता यशोदेच्या मनाला लागलेल्या भुंग्याचा बंदोबस्त बाकी होता. नाही नाही. त्याचा बंदोबस्त तर तिने मघाशीच केला होता…!!
[समाप्त]
पहिला भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर जा. https://lekhanisangram.com/katha/यशोदा-भाग-१