
बामणीन: भाग २
एके दिवशी दुपारी बामणीन शेसाला म्हणाली, “उद्या किनई शेसा, मी तुला एक गंमत दाखवणार आहे हो.” गंमत पाहायला मिळणार म्हटल्यावर शेसाच्या डोळ्यांत अचानक चमक आली आणि त्यात बामणीन गंमत दाखवणार आहे म्हटल्यावर काही खासच बाब असणार याची शेसाला खात्री होती.
शेसाने आपल्या आईला, भावंडांना त्या गंमतीबद्दल कल्पना दिली. रात्रभर बामणीन आपल्याला उद्या कसली गंमत दाखवेल याचाच ती विचार करत राहिली. सकाळी उठून, सगळं आवरून ती सरळच बामणाच्या मळ्यात गेली. दारात तिच्या पुतण्याची मोटार उभी होती. म्हणजे बामणीनीचा पुतण्या पुण्याहून आला असावा असा तिने अंदाज बांधला व ती ओसरी चढून घरात गेली. आतमध्ये बामणीन व तिचा पुतण्या एका लाकडी पेटीवजा गोष्टीशी काहीतरी खटापटी करण्यात गुंतले होते. त्यांना शेसाच्या येण्याची काहीच कल्पना नव्हती. शेसा जशी त्या खोलीत आली तसा त्या पेटीतून कुण्या एका बाईचा मोठा आवाज कानी आला- “आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे नऊ वाजले आहेत आणि आपण जाणून घेत आहोत काही प्रादेशिक घडामोडी. .! “
बामणाच्या घरातून कुठून असला आवाज आला हे शेसाला उमगले नाही आणि ती भूत भूत असे ओरडतच घराबाहेर पळाली. तिच्या आवाजाने रानातील कामाला असलेले नोकर-चाकर, स्वयंपाक घरातील स्वयंपाकीण बाई आणि बामणीन व तिचा पुतण्या धावतच ओसरीवर आले.
बामणीनीला पाहताच ती तिला म्हणाली, “तुमच्या घरात भूत हाय.”
बामणीनीला सगळा प्रकार समजायला वेळ लागला नाही. ती काहीच न बोलता आत गेली आणि हातात लाकडी पेटीसारखा वाटणारा रेडिओ घेऊनच बाहेर आली. रेडिओ हातात पकडून तिने सर्वांवर एक नजर टाकली आणि आपल्या पुतण्याकडे पाहत त्याला रेडिओ सुरू करण्याचा इशारा केला.
त्याने रेडिओ सुरू करताच पुन्हा ती बाई मोठ्या आवाजात बोलू लागली, तसे ओसरीवर जमलेले नोकर-चाकर ओसरीवरून खाली उड्या मारून लांब पळाले, स्वयंपाकीण बाई भिंतीला टेकून डोळे मिटून उभी राहिली, तर शेसा ओसरीआड लपून बसली. त्यांची धांदल उडलेली पाहून बामणीन व तिचा पुतण्या पोट धरून हसू लागले.
रेडिओ काय असतो हे खूप समजावल्यावर शेसाची व बाकीच्यांची भीती कमी झाली. या आधी गावात कुणीही रेडिओ पाहिला नव्हता. नुकतंच सांगली आकाशवाणीचं केंद्र सुरू झालं होतं, म्हणून पुण्यावरून येताना बामणीनिनीच्या पुतण्याने तो रेडिओ आणला होता. गावातला पहिला रेडिओ.!
“एकतर मला अक्षरं बघितल्यावर चक्कर आल्यासारखं हुत, त्यात आणि तुमी कवा कवा त्येंचं प्वाट फोडायला लावता, कवा त्येंचा पाय मोडायला लावता. त्यात अजून काना, मात्रा, उकार, टुकार, वेलांट्या, बिलांट्या. मेंदवाची चिघळ व्हायचा वकूत हुतू नुसता.” बामणीनीच्या रात्र शाळेस सारख्या दांडया मारण्याबाबत प्रश्नाला विठाबाई उत्तर देत म्हणाली. शेसाला घेऊन ती बामणाच्या मळ्यात भांगलायला आली होती.
“अन तसं बी ह्या वयात शाळा शिकून मला कुठं मास्तरीण व्हायचंय?”
“ते तुमचं झालं विठाबाई, मुलाबाळांना करंज्या, गवतं गोळा करायला पाठवण्यापेक्षा शाळेत बसू देत जा हो.” बामण काका मध्येच म्हणाले.
“हो. हेच वय असतं शिकायचं. आमचा पुतण्या बघा कसा शिकून किर्लोस्करला लागलाय.” बामणीन म्हणाली.
“तुमची बातच निराळी हाय बामणीन.” “तसं नाही विठाबाई. कमी वयात पैशाची चटक लागली की लेकरं वाम मार्गाला लागतील. करंज्या गोळा करता करता त्यांच्या आयुष्याच्या करंज्या नको व्हायला. उगाच वेळ का दवडता?” शेसाकडे पाहत बामण काका म्हणाले.
“वेळेचं गणित कुणाला सुटलं नाही आणि वेळ कुणाला सापडलीही नाही.” विठाबाई खुरपे थांबवत म्हणाली. यंदा पाऊसकाळही बरा झाला होता. माणगंगा चांगली गुडघाभर वाहत होती.ओढ्यालाही घोटाभर पाणी होते. ओढ्यात सपय काळे धोंडे टाकून, हिंगणाच्या झाडाची फळे तोडून आणून व लुगड्याचा काष्टा घालून, बायका घसाघस कपडे घासत बसायच्या. कुणी आपल्या म्हशी पाण्यावर आणायच्या, तर कुणी आपली नागडी पोरं तिथं न्हाऊ घालायच्या. दिवाळी अगदी आठवड्यावर आली होती आणि काही बायका अजून आपली गोधडीच ओढ्यात आपटीत होत्या!
त्या दिवशी बामणीनीच्या माघारी शेसा रेडिओला झटत बसली होती. कुठे बटणे दाब, कुठे अँटिना हलव, असले उद्योग करीत ती बसली होती. का कुणास ठाऊक; पण अचानक बामणीनीने येऊन तिच्या टाळक्यात मारले आणि ती तिच्यावर जोरात खेकासली पण, “भवाने, अगं बिघवडून टाकशील ना तो रेडिओ.”
बामणीनीच्या अचानक अशा वागण्याने शेसा मात्र चमकून गेली. नेहमी मऊ बोलणारी बामणीन आज इतकी कठोर कशी काय बोलली असेल या द्वंद्वात ती डोळे पुसत तिथून धडक घरी आली.
दिवस उगवायचा आणि मावळायचा; पण शेसा आता बामणीनीच्या घरी जात नव्हती, ना बामणाच्या मळ्यात आपल्या आईसोबत भांगलायला जात होती. ओढ्याच्या टेकावर उभी राहून ती बामणाच्या घराकडे पाहायची आणि पुढे पडणारे पाऊल पुन्हा आपल्या घराकडे वळवायची. तिला बामणीनीकडे जाण्याची ओढ होती; पण मनात तिच्याबद्दल नाराजी पण होती.
बामणीनही दररोज सकाळी तिच्या येण्याकडे डोळे लावून बसत होती. रोज न चुकता ती ओढ्यातील करंजाकडे जाऊन येत होती, तर कधी विठाबाईजवळ तिच्याबद्दल विचारणा करीत होती. गावात जाऊन शेसाला भेटावे, तिला गंध-पावडर करावे, तिची तेल-वेणी करावी, तिला कुरवाळावे, तिच्या सहवासात वेळ घालवावा अशा कैक गोष्टी तिला करू वाटत होत्या. त्या दिवशी पुतण्याची दिवाळीला येणार नाही अशी तार आली नसती तर आपण रागाला गेलो नसतो आणि तो राग आपण शेसावर काढलाच नसता. या विचाराने तिचं मन तिला सारखं खात होतं.
दिवाळी झाल्यानंतर एक बाई बाहेर विठाबाईशी बामणीनीबद्दल सांगताना शेसाने ऐकलं, ” इटा, बया बामणीनीची साकर कमी झाल्याय.”
“ह्या येळाला कमी झाली. पुढच्या येळाला हुईल की जास्त. लई ऊस हाय यंदा त्येंचा.”
“अगं बया, हाय का आता. तिच्या अंगातली साकर कमी झाल्याय. उद्या तिला पुण्याला घिऊन जाणार हायती”
“आत्ता गं बया. अंगात बी साकर आसत्याय वी?”
“काय की, कसला तरी नवीन रोग का काय आलाय बाई. पण हुय गं? बामणीनीला साकर झालीया तर मग आपल्याला गूळ बिळ हुईल का गं इटा?”
“मला काय बी ईचारु नगस बया. माणसाला बी साकर हुतीया मला आता कळलंय.”
दुसऱ्या दिवशी सकाळीच शेसा ओढ्याच्या टेकावर जाऊन बामणाच्या घराकडे नजर लाऊन उभी राहिली. घराला कुलूप लाऊन बामणीन आणि बामण काका तिला गाडीत बसताना दिसले. बघता बघता गाडी सुरू झाली आणि सडकेला पण लागली. धुरळा उडवीत ती ओढ्यात आली आणि ओढ्याचा चढ चढून ती निघून पण गेली. शेसा बराच वेळ तशीच त्या टेकावर उभी राहिली. आपली बामणीनीशी भेट व्हायला हवी होती असं तिला मनोमन वाटलं. आता रोज ती बामणाच्या मळ्यात जायची, कुलूप लावलेल्या बामणाच्या घरच्या ओसरीवर ती तासनतास बसून राहायची, कधी ताडकन उठून ती खिडकीच्या फटीतून आतमध्ये डोकावूनही पाहायची. मळ्याला, जनावरांना चारा-पाणी द्यायला आलेल्या चाकरांना ती खूपदा तिथे बसलेली दिसायची. बोलायची मात्र कुणाशीच नाही.
दिवसागणिक दिवस जात होते. थंडीपण अर्धी संपली होती. नेहमीप्रमाणे शेसा बामणाच्या मळ्यात येऊन घराच्या ओसरीवर गुडघ्यावर हनुवटी टेकवून बसली होती. दुपार टळून गेली होती आणि सूर्य हळू हळू मावळतीकडे झुकू लागला होता. आटपाडीचा बाजार उरकून लोटेवाडीच्या बैलगाड्या नदीच्या उताराला लागल्या होत्या. पाण्याने भरलेली पकाल रेड्यावर टाकून शंकर कोळी गावाकडे निघाला होता. लांबून मोरांचा केकारव कानी पडत होता. शेसाला आता बामणीनीच्या परतण्याची आशा राहिली नव्हती. कोळ्याच्या मागे घरी परतावे म्हणून तिने उठून आपला परकर झाडला. तेवढ्यात पों पों असा आवाज तिच्या कानी पडला, तशी तिची नजर आवाजाच्या दिशेने वळली.
तिने पाहिले, ओढ्याच्या उताराने बामणाची अँबेसेडर खाली येत होती. तिच्या डोळ्यांत मग आपसूकच चमक आली, चेहऱ्यावर कळी खुलली. . . . !
[समाप्त]
marathi gramin katha, marathi moral stories, marathi stories, blog marathi, top bloggers in marathi,