• Pune, Maharashtra
कथा
बामणीन : भाग १

बामणीन : भाग १

  

 

बामणीन : भाग १


     शेसा ओढ्याच्या टेकावर उभी राहून, आपली इवलीशी मान बागळ्यासारखी लांब करून व टाचा वर उचलून सगळा भार आपल्या पंज्यांवर देत, कच्च्या सडकेवरून फुफाटा उडवत बामनाच्या मळ्यात निघालेल्या पांढऱ्या अँबेसेडर कडे पाहत उभी होती. सडक उतरून गाडी पाणंदीला लागली आणि हेलकावे खातच ती मळ्याच्या मधोमध असलेल्या बामणाच्या घराकडे निघाली.
   बामणाचे घर म्हणजे, वर ओढ्यापासून ते खाली नदीपर्यंत पसरलेल्या सुपीक; पण माणकाठ रानात बरोबर मधोमध असलेले व काळ्या दगडांच्या चिरेबंदी भिंतींना सिमेंट लाऊन बांधलेले असे छोटेसे; पण भारीच टुमदार होते. गावातले पहिले सिमेंटचे घर होते ते. 
   यावर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने माणगंगा कोरडीच होती आणि त्यामुळे बामणाच्या मळ्यातही म्हणावी तशी हिरवळ नव्हतीच. त्यात माणदेशचा उन्हाळा म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखा कडक!
   भर उन्हात शेसाच्या डोक्यातून घामाच्या धारा लागल्या होत्या. तरीही ती कपाळाला आट्या पाडून, भुवयांवरती हात लाऊन, गाडीला पाहतच उभी होती. पों पों हॉर्न वाजवत, सावकाश जाऊन गाडी घरासमोर उभी राहिली. घरातून कुणीतरी बाहेर आले व गाडीतूनही एक बाई आणि एक माणूस दोघे खाली उतरले; पण शेसा फार दुरून पाहत होती त्यामुळे तिला नीटसे मात्र काही दिसले नाही. 
   ओढ्याच्या काठाला लागून खालपासून वरपर्यंत करंजाची झाडेच झाडे होती, जणू एखादी सुवासिनच रखरखत्या उन्हात व ओसाड रानात आडवी पडून उन्हे झेलीत असल्यासारखी; पण बामणाच्या मळ्यात सततचं पाणी असल्यामुळे कदाचित त्यांच्या रानाला लागून असलेल्या करंजांना जरा जास्तच करंज्या लागत होत्या. त्यामुळे बामणीन कुणालाही तिथे करंज्या गोळा करू देत नसे. 
   झाडींतून थोडीशी जरी चाहूल कानी आली की लगेच वटावटा करीत बामणीन तिथे हजर झालीच म्हणून समजा. आणि मग गोळा केलेल्या सगळ्या करंज्यांची ती एकटीच धनीन व्हायची! वर्षा काठाला नाही म्हटलं तरी पाच मोठ्या पितळेच्या घागरी भरून तेल घाण्यावरून तिच्या घरी यायचं. बैलगाडीतून! 
   "पूरींनो, येचा की भराभरा करंज्या. तुमाला म्हाईत नाय का काल बामणीन माघारी आल्याय ती?" चोळी-परकर घातलेली, केस विस्कटलेली अशी वयात आलेली एक पोरगी, सोबत आलेल्या पोरींना म्हणाली. बामणीन आली आहे हे समजताच शेसाचे करंज्या गोळा करणारे नाजुक हात तिथेच थांबले, तिच्या डोळ्यांत एक चमक आली. 
   आता मात्र तिची पुरती खात्री झाली होती की काल त्या गाडीतून बामणीन पण उतरली होती. ती आपल्या हातातील करंज्या तशाच पकडून तिच्या विचारांत हरवून गेली. आजपर्यंत तिने कधी त्या बामणीनीला पाहिलेसुद्धा नव्हते; पण तिने तिच्या आईकडून, मैत्रिणींकडून, शेजऱ्यां-पाजाऱ्यांकडून तिच्याबद्दल खूप काही ऐकले होते. 
   त्यामुळे तिच्या मनात बामणीनीबद्दल एक आदरयुक्त भीती होती. आदर यासाठी होता की ती चांगली शिकली सवरलेली होती व तिचे राहणीमानही तशाच प्रकारचे होते आणि भीती यासाठी की बामणीन कधीही तिथे येऊन त्यांच्या कारंजा जप्त करेल!
   "शेशे, ये शेशे? करंज्या येचायच्या सोडून कुठं हरवून गेलीस बया तू?" ती पोरगी तिच्यावर खेकसली तशी शेसा भानावर येऊन ती तिच्या परकराच्या बनवलेल्या ओठीत करंज्या टाकू लागली.
   करंजाच्या गर्द सावलीत शेसा आणि सोबतच्या पोरी करंज्या वेचण्यात मग्न होत्या. उन्हे चढू लागली होती. करंजाच्या त्या दाट सावलीतून कधी गार वाऱ्याचे झोत येऊन अंगावर शहारे आणित तर मधूनच गरम झळया येऊन परत शहारे बुजवित होते. 
   पलीकडे वटलेल्या बाभळीच्या झाडावर बसून एखादा खंड्या शीळ घालीत होता, तर करंजाच्याच झाडावरील मुंगळे खाण्यासाठी चार-दोन साळुंक्या आसपास भिरभिरत होत्या. बामणाची एखादी जर्सी गाय दुरूनच हंबरडा फोडत होती. कदाचित तिची पाण्याची वेळ झालेली असावी.
   पोरी झराझरा करंज्या वेचत होत्या. तितक्यात बामणीन तिथे टपकलीच. तीही आपल्या कुत्र्या सोबतच!
   "कोण आहेत गं त्या भवान्या? बऱ्या आल्यात बामणाच्याच करंज्या गोळा करायला. थांबा आलेच तुमची हजेरी घ्यायला." घशाला त्रास न देता ती नाकातूनच ओरडली. रात्र शाळेत गावकऱ्यांना शिकविता शिकविता तिला तशी हजेरी घेण्याची सवय लागलीच होती!
   "पोरींनो पळा पळा. बामणीन आली!" ओठीत टाकण्यासाठी करंज्यानी भरलेली मूठ रिकामी करत एक पोरगी ओरडली आणि पुढे पळाली. बाकीच्या पोरींनीही हातातील करंज्या तशाच टाकून आपापल्या परकराची ओठी एका हातात घट्ट पकडून तिच्या मागे ओढ्यातून धूम ठोकली. 
   बामणीनीचं कुत्रं भुंकतच पळणाऱ्या पोरींच्या मागे गेले. बिचारी शेसा मात्र ओटीत करंज्या पकडून तशीच तिथे उभी राहिली. तिच्या तेल नसलेल्या बुचडयातून केसांची एक सोनेरी बट तिच्या डोळ्यांवर येऊन वाऱ्याने हळुवार हलत होती आणि तिच्या काळ्याभोर नाजूक डोळ्यांत बामणीनीला पाहण्याची उत्सुकता होती.
   वरच उभी राहून बामणीनीने तिला डोळे वटारून पाहिले आणि हाताची घडी घालत तिने शेसाला वरती बोलावून घेतले. हातातील करंजा ओटीत टाकून शेसा वरती चढून गेली आणि बामणीनीच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली.
   नुकतीच पन्नाशी ओलांडलेल्या बामणीनीच्या आट्या पाडलेल्या कपाळावर भलं मोठं कुंकू होतं. रेखीव भुवया, लोभस असे पाणीदार डोळे, शेसाला पाहताच गुलाबी ओठांवर उमटलेले एक स्मित हास्य. अंगावर घातलेली फिक्कट गुलाबी रंगाची साडी, अर्धवट पिकलेल्या; पण तेलाने माखलेल्या केसांचा बुचडा बांधून, त्याला त्याच आकारात मोगऱ्यांच्या फुलांचा हार गुंडाळलेला आणि त्याच बुचड्याच्या खालून पूर्ण पाठ झाकून व समोरून गुंडाळून एका हातात पकडलेला साडीचा पदर, पदरावरती गुलाबाच्या फुलांची सजावट व गळ्यातून खाली सोडलेला मध्यम आकाराचा गंठन आणि हातातील फिक्कट हिरव्या रंगाच्या मोजक्याच बांगड्या त्या बामणीनीच्या सुरकुतू लागलेल्या गोऱ्या कांतीवर अधिकच उठून दिसत होत्या.
   "काय गं, करंज्या चोरतेस माझ्या?" खोटा राग दाखवत व काहीशा मोठ्या आवाजात तिने शेसाला विचारले.
   "का? तेच्याव काय तुमचं नाव लिव्हलंय का?"
   "बाई, भलतीच कडक लक्ष्मी दिसतेस तू?"
   "अन तुमी माझ्या आयपेक्षा बी ग्वाड दिसताय." 
   तिच्या अशा बोलण्याने बामणीन एकदम वरमली.
   "तुमीच बामणीन हाय का?"
   क्षणभर शेसाला पाहून ती म्हणाली, "हो मीच आहे. . . . . . . . . . . .बामणीन." कदाचित तिला बामणीन म्हटलेलं आवडलं नसावं; पण का कुणास ठाऊक शेसाने मात्र काही क्षणांत तिच्या मनात घर केलं.
   "बाळ, नाव काय तुझं?" तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिने शेसाला विचारले.
   "आय मला शिशी म्हणती, बापू अन भावंडं बाय म्हणत्यात."
   "आणि शाळेत?"
   "शाळत मास्तर कधी शेसा म्हणत्यात तर कधी शेसाबाय." असे म्हणून तिने बामणीनीला प्रश्न केला, "तुमच्याकडं जरशा हायत्या का?"
   "हो आहेत की, शेसा. मी तुला शेसा म्हटलं तर चालेल?"
  शेसाने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, "मग मला दाखवा की तुमच्या जरश्या."
  बामणाने दुरून कुठूनतरी तीन जर्सी गायी आणल्या होत्या. त्यावेळी जर्सी गायी म्हणजे गावात एक कुतुहलाचा विषय बनला होता. गावात किंबहुना अख्ख्या पंचक्रोशीत पहिल्यांदा जर्सी गायी बामनानेच आणलेल्या. बिना शिंगांची गाय कशी दिसते हे पाहण्यासाठी लोक अगदी कुतुहलाने बामणाच्या मळ्यात जात असत. लोटेवाडीपासून ते खाली पार महूद, वाकी शिवण्यापर्यंतचे लोक तर विठलापूरापासून पार निंबवड्यापर्यंतचे लोक गायी पाहण्यासाठी तिथे येत असत. 
   खासकरून सकाळच्या वक्ताला आणि सांजच्या वक्ताला गायींचे दूध काढतानाचे वेळी लोक चवढयावर बसून आणि आ वासून दुधाने भरणाऱ्या घागरी पाहायचे. तेव्हा जर्सी गाय खरंच इतकं दूध देते यावर त्यांचा विश्वास बसायचा आणि कुणीतरी आवंढा गिळत म्हणायचाच, "हरी हरी हरी, का गाय हाय का काय हाय? आमच्या खिलारला आठवडाभर पिळलं तरी इतकं दूध नाय निघायचं."
  शेसा आणि बामणीन दोघी बंधावरून बामणीनीच्या घराकडे निघाल्या. बामणीनीच्या मागे मागे चालताना शेसाला तिच्या केसांतील मोगऱ्याचा मोहक वास येत होता. शेसाही ओटीत करंज्या पकडून तिच्या गजऱ्याकडे पाहतच मागे पाऊले टाकत निघाली होती. काही पाऊले पुढे जाताच मागून कुत्रं पण धापा टाकत येऊन त्यांच्यासोबत चालू लागलं.
  "शाळेत का नाहीस गेली आज?"
  "साळत बसत्याय नाय बसत्याय तवर चुलता यिऊन कधी गवतं गोळा करायला पिटाळतू , तर कधी करंज्या."
  बामणीनीने तोंड वाईट करून तिच्याकडे पाहिले व पुढे बघून चालू लागली.
  "अन तेंची पोरं वाकीला टाकल्याती शिकाय."
  "कुणाची?"
  "चुलत्याची वं बामणीन."
  घरासमोर पोहचताच शेसाला समोर उभी असलेली पांढरी अँबेसेडर गाडी दिसली तशी ती तिच्याकडे धावली.
  "अगं शेसा, तुला जर्सी गायी पहायच्यात ना?"
  "आदी तुमची मोटार बघती. मग गया." मोटारीला न्याहाळत ती म्हणाली.
  आपल्या टाचा उचलत मोटारीला प्रदक्षिणा घालत शेसा तिला न्याहाळू लागली. आरशासमोर येऊन तिने तो स्वतःकडे वळवला आणि त्यात आपला चेहरा पाहू लागली. धूळ बसली असल्यामुळे तिला नीटसे दिसत नव्हते, म्हणून तिने आपल्या थुंकीने तो साफ केला आणि मग तिने त्यात आपले रुपडे पाहिले. 
  "शेसा बाळा, असा थुंकी लाऊन साफ नसतो करायचा आरसा." बामणीन ओट्यावरूनच तिला म्हणाली. "पळ ये इकडे. तुला गायी दाखवते."
  शेसाने पटकन आपल्या परकराच्या ओठीतील करंज्या ओसरीवर ओतल्या आणि लगबगीने ती बामणीनीच्या मागे निघून गेली. गायी दाखवते असे म्हणून बामणीनीने शेसाला अख्खा बामणाचा मळा फिरवून दाखवला. मळ्यात बामण काका आणि त्यांचा पुतण्या झाडाखाली टाकलेल्या बाजावर बसून शेतकामाच्या गड्यांना सूचना करीत होते. 
   तिथून येऊन तिने शेसाला बामणाची विहीर, विहीरीवरील मोट, बामणाची जांभळ, बामणाचा हौद आणि शेवटी बामणाचे घरही दाखवले. इतके सगळे दाखवून शेसा दमली असेल म्हणून बामणीनीने तिला जेवूही घातले. स्वयंपाकीनीला सांगून तिने चपात्या बनवून घेतल्या. 
   साजूक तुपातल्या चपात्या, डिंकाचे लाडू, साखर घालून बनवलेला आमरस खाऊन, तृप्त होऊन शेसाने मस्त ढेकर दिली आणि मागे सरकून ती माचोळीला टेकली व डुलक्या घेऊ लागली.
  शेसा झोपेला आलीय हे पाहून बामणीनीने तिचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि तिच्या कोरड्या केसांवरती हात फिरवीत ती म्हणाली, "आजपासून तू माझी मैत्रीण झालीस, शेसा."
  "नाय बाय, अशी कशी झाली? आय म्हणती ग्वाड ग्वाड बोलणाऱ्या बाया लै आतल्या गाठीच्या असत्यात्या." बामणीनीच्या मांडीवरुन ताडकन उठून ती म्हणाली.
  "जा बाई शेसा, मी मेली आतल्या गाठीची वाटते का गं तुला?"
  "तुमी तर माझ्या आयपेक्षा बी ग्वाड वाटता की."
  "नको बाई आता काही बोलू. आम्हाला नाही करायची तुझ्याशी मैत्री."
  "तसं काय बी नाय वं; पण.."
  "पण काय?"
  "तुमी माझ्या आयपेक्षा बी मोठ्या हायसा." 
  "मग?"
  "त्यात तुमची केसं बी पिकल्यात."
  "मग?"
  "मग मी तुमाला आजी म्हणती की."
  "अगं ये लबाडा. इतकी पण म्हातारी दिसत नाही हो बरं मी."
  "मग काय म्हणू मी?"
  बामणीनीने जरा विचार केला आणि मग म्हणाली, "तू बामणीनच म्हण हो मला." ती असं म्हणताच त्या दोघीही हसू लागल्या.
  दोघींच्या छानपैकी गप्पागोष्टी चालल्या होत्या. हसत खेळत दोघी पुरत्या त्यात गढून गेल्या होत्या.  
  "आईचं नाव काय गं तुझ्या?"
  "इटाबाय. तुमच्या रातशाळेला यिती बगा कवा कवा."
  "बरं; पण विठाबाई म्हणायचं. ठिकाय?"
  शेसाने मान हलवली आणि म्हणाली, "बामणीन लई येळ झालाया. मी जाती आता."
  "जाते नाही म्हणायचं शेसा, येते म्हणायचं."
  "बरं, यिव का मग?"
  "ये हो. ये."
  शेसा उठून लगेच उंबरा ओलांडून बाहेर आली व खाली बसून मघाशी ओसरीवर ओतलेल्या करंज्या आपल्या परकराच्या ओठीत भरू लागली. करंज्या भरून झाल्यावर ती उठून उभी राहिली. बामणीन तिच्या मागेच उभी होती.
  "शेसा, असं शाळा बुडवून करंज्या गोळा करणं बरं नव्हे बाळ. शाळेत जायचं. शिकून शहाणं व्हायचं."
  शेसाने तिच्याकडे पाहिले, एक स्मितहास्य केले आणि ओसरी उतरून ती वाट चालू लागली. बामणीन मात्र तिच्याकडे पाहत तिथेच उभी राहिली.
  रात्री आईसोबत झोपली असताना शेसा तिला म्हणाली, "आये तू केसांना सारखं त्याल का नाय लावत गं?"
  "का गं? तू का इचारत्यास."
  "आये अगं बामणीनिनीच्या केसांचा लय भारी वास येतो अन तुझं क्यास आंबाटझ्यार वास मारत्यात."
  "अगं आपल्याला कोरड्यासात घालायला त्याल मिळंणा झालंय, डोसक्याला कवा लवायचं? तुझी बामणीन बघ दित्याय का त्याल." विठाबाई हसून म्हणाली.
  थोड्याच दिवसात शेसाची आणि बामणीनीची चांगलीच गट्टी जमली. शेसा वरचेवर बामणीनीकडे जायची. बामणीनपण तिला चांगले खाऊ-पिऊ घालायची तर कधी शेसा तिला मकेच्या कण्या, हुलग्याचे माडगे घेऊन जायची. बामणीनीला पोर-बाळ नसल्यामुळे कदाचित तिचा शेसावर जीव जडला असावा. 
   ती शेसाच्या तांबड्या केसांना कधी कधी तेल लावायची, कधी तिला काजळ लावायची, कधी तर तिच्या दोन वेण्या बांधायची तर कधी ती शेसाच्या केसांत मोगऱ्याच्या फुलांचा गजराच गुंफायची. एकदा तर नागपंचमीला तिने शेसाला असे नटवले होते की गावंदर मळ्यात आईसोबत नागोबाला पुजायला गेल्यावर चक्क एक बाई तिला म्हणाली होती- "ती आली बगा बामणीनीची नात.! "
  

                    
     (पुढे चालू राहील..)

6 thoughts on “बामणीन : भाग १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *