• Pune, Maharashtra
कथा
नारायण. . . नारायण

नारायण. . . नारायण

नारायण. . . नारायण 

          आज इंद्राचा दरबार खचाखच भरलेला होता. देवाधिदेव इंद्र आपले दोन्ही बाहू आपल्या सुवर्ण सिंहासनावर विसावून क्रोधीत नजरेने एकटक समोर पाहत बसले होते. त्यांचा सुवर्ण मुकुट आज जरी झळाळत असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज मात्र गायब होते. त्यांच्या सिंहासनाच्या एका बाजूला नाथ तर दुसऱ्या बाजूला उद्धव आपापली आसने ग्रहण करून बसले होते व त्यांना लागूनच दोन्ही बाजुंनी देवतालोकही आसनाधिस्त झाले होते. शिवाय एका खास असनावरती श्रीगणेश दुःखीत होऊन बसले होते. भव्य अशा इंद्र दरबारात, सिंहासनाच्या खाली भल्यामोठ्या चौदा सुवर्ण पायऱ्या उतरून समोर डाव्या बाजूला प्राणिलोक व उजव्या बाजूला मनुष्यलोक समोरासमोर बसले होते. प्राणिलोक क्रोधित होऊन, तर मनुष्यलोक शरमेने खाली मान घालून आपापल्या आसनांवरती बसले होते. नेहमीप्रमाणे आज दरबारात कसलीच कुजबुज, कसलाच आवाज नव्हता. दरबारात एक भयाण शांतता पसरलेली होती. सगळीकडे अगदी चिडीचूप!
        बाहेरील द्वारपालाचा आवाज होताच दरबाराचा अजस्र असा सोन्याचा दरवाजा कर्रर्रर्र आवाज करीत उघडला गेला व दरबारात एक तेजोमय असा पांढरा-शुभ्र प्रकाश पडला. डोळे दिपवून टाकणाऱ्या अशा शुभ्र प्रकाशातून एक अजस्र प्राणी, कान हलवत, सावकाश चालत आतमध्ये येताना दिसला. तो जसजसा पुढे येत होता तसतसा प्रकाश कमी होत होता.
        शेवटी तो प्राणी दरवाज्यातून आत दाखल झाला तसा तो स्पष्ट दिसला. एक भली मोठी हत्तीण तोंडातून रक्त वाहणाऱ्या अवस्थेत दरबारात पाऊले टाकत पुढे येत होती. तिचं एकेक पाऊल मनुष्यलोकांच्या उरांत धडकी भरवणारं होतं. तिच्या प्रत्येक पावलागणिक तिने अख्खा दरबार कंपवून टाकला होता. हळू हळू दरबाराचा दरवाजा बंद झाला तसे त्या हत्तीणीच्या पायांत लटपटत पाऊले टाकत चालणारे तिचे छोटे गोंडस पिल्लू एकदमच नजरेस पडले, तसे प्राणिलोक मानुष्यलोकांकडे पाहून अधिकच आक्रमक झाले. पुढच्या रांगेत बसलेले वाघ-सिंह, चित्ते-बिबटे दात विचकत त्यांच्यावर गुरारू लागले. त्यांच्या मागच्या रांगेत बसलेले लांडगे, तरस, कोल्हेही त्यांना साथ देत होते तर शेवटच्या रांगेत असलेले पक्षी आणि माकडे, अस्वले, उंट, घोडे आदि  प्राणीही आपापल्या परीने मनुष्यलोकांचीअवहेलना करू पाहत होते. मनुष्यलोक काहीच न करता खाली मान घालून नुसते बसून राहिले होते.
        हत्तीण दरबारात चालत जाऊन खाली इंद्राच्या सिंहासनासमोर उभी राहिली. तिचे पिल्लू तिच्या पायांमधून निघून पायऱ्या चढून वरती इंद्राच्या सिंहासनाकडे आले आणि इंद्राच्या पायांना आपल्या चिमुकल्या सोंडेने स्पर्श करू लागले. इंद्रानेही त्याच्या डोक्यावर हात ठेवत त्याला कुरवाळले व समोर पाहत आपला उजवा हात वर नेला तशी पुन्हा एकदा सर्वत्र शांतता पसरली. मग प्राणीलोकांतून एक अस्वल, वकील म्हणून हत्तीणीच्या उजव्या बाजूला येऊन उभे राहिले तर मनुष्यलोकांतून एकजण उठून सावधगतीने येऊन तिच्या डाव्या बाजूला थोड्या अंतरावर उभा राहिला. तो मनुष्य तिथे उभा राहताच प्राणीलोकांत पुन्हा एकदा गोंधळ माजला. त्यांच्यातील प्रत्येकजण मनुष्यलोकांवर आपली नाराजी व्यक्त करत होता, त्यांची छी-थू करत होता. इंद्राने इशारा करूनपण तो गोंधळ आटोक्यात येईना. शेवटी त्या हत्तीणीने मागे वळून आपली सोंड वर करून, छिन्नविछिन्न झालेल्या आपल्या रक्ताळलेल्या तोंडातून कानाचे पडदे फुटतील इतक्या जोरात गर्जना केली, तशी प्राणीलोकांत शांतता पसरली. मनुष्यलोकांतमात्र एक भीतीचे वातावरण पसरले होते.
        “घाबरण्याचं काही कारण नाही. मी पृथ्वीलोकांतही तुम्हाला कोणती इजा केली नाही. नाही स्वर्गलोकांत करण्याची माझी इच्छा आहे. निश्चिंत रहा.” हत्तीण मनुष्यलोकांकडे पाहत म्हणाली आणि इंद्राकडे तोंड करून शांत उभी राहिली.
        दरबार आता शांत झाला होता. इंद्राने मग वकील अस्वलाकडे पाहून त्याला पुढील कार्यवाही सुरू करण्याचा नजरेने इशारा केला.
        “स्वतः एका वैश्विक महामारीच्या गर्तेत असताना असला कुठला आसुरी आनंद तुम्हा पृथ्वीलोकांतील मनुष्यांना घ्यायचा होता, जे तुम्ही एक फटाक्यांनी भरलेले अननस या निष्पाप मातेला खाऊ घातलं, जिच्या पोटातील एक निष्पाप जीवाला पृथ्वीवर साधा एक श्वासही घ्यायला मिळणे दुरापास्त होऊन बसलं?” वकीलपत्र स्वीकारलेल्या अस्वलाने वकील म्हणून पुढे आलेल्या मनुष्याकडे पाहत प्रश्न केला.
        “कुणा एखाद्या मनुष्याच्या चुकीमुळे अख्ख्या मनुष्य जातीला धारेवर धरणे कितपत योग्य आहे, देवाधिदेव? आम्ही मनुष्य आहोत म्हणून तर पृथ्वी आणि तिच्यावर हे सगळे प्राणी टिकून आहेत. शेवटी आम्ही त्यांना खाऊ पण घालतोच की.”
        “हो. हो, तुम्ही आम्हाला खाऊ घालता.” पुढच्या रांगेत बसलेला त्यांचा प्रमुख, सिंह म्हणाला आणि आपल्या असनावरून खाली उडी घेत तो सिंहासनासमोर आला, त्याने काही क्षण हत्तीणीकडे पाहिले आणि एक नजर इंद्रावर टाकून तो मनुष्यलोकांकडे जात म्हणाला, “तुम्ही खाऊ घालता आम्हाला पिंजऱ्यात कैद करून, तुम्ही खाऊ घालता आम्हाला गळ्यात पट्टे बांधून, तुम्ही खाऊ घालता आम्हाला चाबकाचे फटके देऊन, तुम्ही खाऊ घालता आम्हाला आमच्या दूधासाठी, तुम्ही खाऊ घालता आम्हाला आमच्या चामडीसाठी, दातांसाठी, केसांसाठी आणि नखांसाठी! तुम्ही खाऊ घालता आम्हाला आम्हालाच खाण्यासाठी! आम्हाला खाऊ घालण्यात तुमचा सदैव आणि सदैव स्वार्थच असतो, स्वार्थ.”
        सिंहाच्या प्रत्येक वाक्याला हरतऱ्हेच्या प्राण्याकडून त्याला दाद मिळत होती.
        वकील असलेल्या मनुष्याने एकवेळ सर्व प्राण्यांवरून नजर टाकली आणि एक दीर्घ श्वास घेऊन त्यानं आपलं बोलणं सुरू केलं, “झालेली घटना खूप निंदनीय आहे. आम्ही मनुष्य लोक त्याचा निषेधही व्यक्त करतो; पण त्यासाठी सरसकट अख्ख्या मनुष्यलोकांना दोष देणे योग्य न्हवे.”
        “नारायण. . . . . नारायण.” असे म्हणत नारदमुनी दरबारात हजर झालेच.        “घटना एक असेल तर चूक भूल मान्य; पण कधी श्वानाला फाशी, कधी मर्कटाला अग्नि, तर कधी एखाद्या निष्पाप प्राण्याची विटंबना. हे सगळं करणारा मात्र एक मनुष्य नसतो. हरतऱ्हेचेमनुष्य मिळून बनलेला मनुष्यलोक असतो.”        “पण श्वान आम्ही घरी पाळतो. आम्ही त्याचे लाडही पुरवतो.”
        “आणि तोच श्वान वृद्ध झाला की त्याची हत्याही घडवून आणतो.” नारदमुनी पटकन बोलले.
        “मांजर पाळून त्याला मुलाप्रमाणे वाढवतो.”
        “पण त्याला पिल्लं होऊ नये म्हणून त्याची नसबंदी करतो किंवा गर्भाशय काढतो.”
        “आम्ही गाई-म्हैशीही पाळतो, त्यांना चारापाणीही देतो, त्यांची पुजा करतो.”
        “हो, मग त्याचं रेडकू, वासरू उपाशी राहिलं तरी चालतं; पण आपण मात्र दुधाचे घडे भरतो. पैदास वाढवण्यासाठी अनैसर्गिक बलात्कार घडवून आणतो आणि त्यातही ते जनावर म्हातारं झालं की त्याला कत्तलखाण्यालाही देतो.”
        “बस्स, नारदजी बस्स.” श्रीगणेश आपल्या आसनावरून उठत म्हणाले आणि पायऱ्या उतरत ते खाली येऊ लागले. हत्तीणीचं पिल्लूही त्यांच्या पाठोपाठ पायऱ्या उतरू लागले.          “खोटी भूतदया तर मनुष्यलोकांत ओतप्रेत भरलेली आहे. त्यांना प्रिय वाटणाऱ्या प्राण्यांसाठीच असते त्यांची भूतदया. पिकांस उपद्रव करणाऱ्या प्राण्यांना मज्जाव, पाळीव प्राण्यांशी लगाव, कावळ्यांचा तिरस्कार, पोपटांवर प्रेम, मूषकांना विष तर खारींना मात्र खीर. हीच ना तुमची भूतदया?”
        सर्व मनुष्यलोकांच्या माना शरमेने खाली झुकल्या होत्या. हत्तीणीचं ते पिल्लू आता निश्चल बसलेल्या मनुष्य लोकांना आपल्या सोंडेने स्पर्श करत अल्लड चाळे करत पुढे पुढे निघालं होतं.
        “पहा त्याच्याकडे, त्या निरागस जीवाला कल्पनापण नाही त्याच्यासोबत काय घडलंय ते. तुमच्यासारख्या क्रूर लोकांत तो अगदी बिनधास्त वावरतोय. आणि तुम्ही? स्वतःला बुद्धिमान प्राणी म्हणवता ना? मग अशी लालसा, अशी विकृती त्याच बुद्धिमत्तेमुळे म्हणायची का? तसे असेल तर आज तुमच्यामुळे मला बुद्धीचा देवता म्हणून घ्यायलाही लाज वाटते आहे.” श्रीगणेश बोलता बोलता ताडकन मागे वळले आणि हात जोडून इंद्राकडे पाहत म्हणाले, “देवाधिदेव, आता माझी या दरबारात थांबण्याची तसूभरही इच्छा नाही. मला क्षमा करावी. कृपया आज्ञा असावी.”         हात जोडून त्यांनी क्षमा मागितली आणि तिथून जाण्याची परवानगी घेत त्यांनी हत्तीणीच्या डोळ्यांत पाहिले व ते प्रवेशद्वाराकडे जाण्यास निघाले. दरबारात एकदम चिडीचूपशांतता पसरली होती. साक्षात श्रीगणेशाला क्रोधित झालेले पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
        “तुमच्या विकृतीचं प्रदर्शन मांडताना तुम्हाला एखाद्या प्राण्यात, अशा हत्तीत माझी छबी दिसत नसेल तर तुम्ही माझे उत्सव साजरे न केलेलेच बरे. तुमच्याइतकेच त्यांचेही आत्मे पवित्र नक्कीच आहेत.” जाता जाता श्रीगणेश मागे वळून बोलले व दरबारातून बाहेर पडले.
        इंद्राने क्षणभर विचार केला व म्हणाला, “हे गज जननी, तुझ्यावर भलामोठा अन्याय झाला आहे. तुला योग्य तो न्याय . . . . . . “
        “न्याय, अन्याय, बदला, सुड काही नकोय मला. माझ्या मुखात अननसाचा स्फोट झाला तेव्हाच मी सुड घेऊ शकले असते. किंबहुना घेतलाही असता. पण पुन्हा या मनुष्यलोकांनी मला उपद्रवी, पिसाळलेली म्हणून गोळ्या घातल्या असत्याच ना?” हत्तीण इंद्राचे बोलणे मध्येच काटत बोलली आणि तिने आपले बोलणे पुढे सुरूच ठेवले, “आई होणार होते मी. माझ्यासाठी तीच एकमेव आनंदाची गोष्ट होती. पोटात आग पडली होती, म्हणून मी मनुष्य वस्तीत आले. मनुष्यांवर विश्वास ठेवला आणि दिलेले अन्न आनंदाने खाल्ले. मला आठवताहेत ना, त्या विकृत नजरा मला खाऊ घालतानाच्या आणि माझ्या मुखाचे छिन्नविछिन्न झालेले रूप पाहून हसतानाच्या पण! मला दिसत होते लोक, घरे, लहान लहान मुले. वाटत होतं की जावं सगळं पायदळी तुडवित; पण मी ही हिरकणीच्या, राणी लक्ष्मीबाईच्या गोष्टी ऐकल्या होत्याच की! म्हणून आधी पोटातला गोळा महत्वाचा वाटला. नदीत उतरले. वाटलं याला काही इजा होऊ नये. काय माहीत परत कधी स्फोट होईल? बसले सोंड आणि तोंड खुपसून; पण गर्भ बिचारा टिकलाच नाही. देवभूमीत तो पोटातच देवाघरी गेला.” तिच्या डोळ्यांतील पाणी तिच्या सोंडेवरून खाली ओघळू लागले होते. सगळा दरबार डोळ्यांत पाणी आणून ऐकत होता.
        “बाळ गेलं. आता पुढे काय? स्वतःचा श्वास कोंडून स्वतःला संपवून घेणं अशक्य आहे. मी ते शक्य केलं. सुरवातीला त्रास झाला. मी बऱ्याचदा तोंड बाहेर काढून श्वास घेतलाही; पण मला मनुष्य लोकांचा निषेध करायचा होता. असा निषेध ज्याचे पडसात इथे स्वर्गलोकांत उमटावे. कारण शेवटी चूक माझीच होती. मी मनुष्य लोकांच्या विकृतीला बळी पडले होते आणि माझं बाळ गमावून बसले होते. तीन दिवस निश्चयाने पाण्यात उभी राहून मी जलसमाधी घेतली आणि मनुष्यलोकांच्या असल्या फाजिल, राक्षसी, अमानवीय विकृतीचा निषेध नोंदवला.!” मनुष्यलोकांकडे पाहत ती म्हणाली. सारा दरबार हळहळत होता. मनुष्यलोक शरमेने माना खाली घालून बसले होते.        “मला न्याय नकोय, देवाधिदेव. मला न्याय नकोय.” असे म्हणत ती दरबारातून चालती झाली आणि तिचं गोंडस; पण न जन्मलेलं पिल्लू तिच्या मागे शेपूट हलवत निघून गेलं.
        काही क्षण दरबारात शांतता होती. अशा परिस्थितीत काय बोलावे कुणालाच काही सुचेना. हत्तीणीचा तो निषेध मनुष्यलोकांसाठी लगावलेली एक सणसणीत अशी चपराकच होती!
        एक दीर्घ श्वास घेऊन इंद्रदेव आपल्या सिंहासनावरून उठले आणि समोर मनुष्यलोकांवर नजर टाकत म्हणाले, “प्राण्यांमध्ये मनुष्यलोक म्हणून तुम्ही श्रेष्ठ जरूर असाल; पण मनुष्य म्हणून तुम्ही अगदीच नीच प्राणी आहात.!”        आपल्या हातातील चिपळ्या वाजवत नारद मुनींच्या तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडले,
 “नारायण. .  नारायण!” 

 

 

हे पण वाचा:

या पाऊस धारा- Ya Paus Dhara

गोदा म्हातारी: भाग १

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *