• Pune, Maharashtra
कथा
तोही होई तेंडुलकर !

तोही होई तेंडुलकर !

                                               

         दिवस नुकताच मावळलेला होता. रानाच्या पाणंदीतून बायका गवताची ओझी आणि कडेवर तान्ही पोरं घेऊन बिगीबिगी चालत घराकडे निघाल्या होत्या. त्यांच्या पुढे चालणाऱ्या शेळ्यांना त्यांची कोकरे पिण्याचा प्रयत्न करत पुढे पुढे जात होती.

         माणसेही खांद्यावर खोरी-कुदळी, डोक्यावर पाट्या घेऊन घराकडची वाट पकडून निघाली होती. वरती आकाशात पाखरांचे थवेही आपापल्या मुक्कामाला निघाले होते. घराकडे परतणाऱ्या बैलगाड्याच्या चाकावरच्या घुंगरांचा, शिवाय बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचाही आवाज कानी पडत होता. 

       रानात वस्ती करून राहणाऱ्या पाटलाचा आठ वर्षाचा रामा जनावरं पाजण्यासाठी बांधलेल्या छोट्या हौदात दोन्ही पाय सोडून आपल्या पांढऱ्या पण मळक्या सदऱ्याला डोळे पुसत हुंदके देत बसला होता. हौदातले पाणी त्याच्या खाकी चड्डीला लागलेही नव्हते तरीपण त्याची चड्डी ओली झालेली होती.

         तितक्यात तिथे त्याच्याच वर्गात असणारा कुलकर्ण्याचा सदा, कानाला रेडिओ लावून दशम्या खात तिथे आला. रेडिओवर शारजा कपच्या भारत-ऑस्ट्रेलिया sharja cup india australia match सामन्याची कॉमेंट्री cricket commentry सुरु होती. सदाने पुन्हा सदऱ्याला डोळे पुसले आणि मागे पाहत त्याने त्याला विचारले, “चेंडुलकरनं किती मारल्या?” sachin tendulkar odi centuries

          “मारल्या काय रामा? अजून खेळत आहे तो. आत्ताच सेंचुरी झालीया.” असे म्हणत सदा त्याच्या शेजारी येऊन बसला व त्यानेही आपले पाय हौदात सोडून दिले. 

          “लगा आपला चेंडुलकर लै जबरी खेळतुया. नाय का?”

          “रामा तुला कितीदा सांगितलंय, चेंडुलकर नाही तेंडुलकर आहे तो. तुला पुढच्यावेळी पेपरच आणून दाखवतो.” sachin tendulkar birthday

          रामा काहीच बोलला नाही. गावात पेपर आलाच तर तो फक्त कुलकर्ण्यांच्या घरीच! तिथून तो सरळ वाण्याच्या दुकानात पुड्या बांधण्याच्या कामी येई. 

         “दशम्या खाणार का?” हात पुढे करत सदाने त्याला विचारले आणि त्याची ओली झालेली चड्डी पाहत पुन्हा विचारले, “आंगोळ केली का?”

         “नाय. मुतलोय.”

         सदाने त्याला दशम्या देण्यासाठी पुढे केलेला हात लगेचच मागे घेतला. 

         “बा नं हाणला मला. देवळापुढं चेंडू खेळत असताना.”

         “मुतोस्तोवर?”

         रामा काहीच बोलला नाही. थोडा वेळ दोघे नुसतेच बसून राहिले. फक्त त्यांच्या पायांच्या हालचालीमुळे हौदातील पाण्याचा आवाज मात्र होत होता. 

         “सदा, शाळत सांगू नकु बरं का?” असे म्हणून रामा तिथून उठून गेला. 

        रोज कोपरापर्यंत ओघळ येईस्तोवर दूध-काला वरपणारा सदा, मघाशीच बापाचा मुतोस्तोवर मार खाल्ल्यामुळे आईपुढे बसून आज मुकाट्यानेच  मान खाली घालून दूध-काला खात होता. इतक्यात पाटील तिथे आलाच आणि रागातच म्हणाला, “राम्या तीनचा पाढा म्हण.”
        तोंडात घातलेला घास गिळत रामा सुरु झाला, “तीन एके तीSन, तीन दुणी सSहा, तीन त्रिक दSहा, तीन चोक तेSरा, तीना पाची पंधरा.”
        “बाई, किती फडाफडा पाढं म्हणतया माझं पोरगं.” आईने पिठाचे हात त्याच्या गालावरून फिरवले आणि परत आपल्या कानाजवळ टेकवून कट्ट दिशी मोडले. आयांची मया करायची पद्धतच भारी असते!
        “लै फडाफडा? अगं चुकीचं म्हणतंय ते.” असं म्हणत त्याने रामाच्या पाठीत जोरात मुक्का मारला तसा त्याच्या घशातला घास तोंडात आला. आधीच चावून बारीक झालेला घास तो आता परत चावू लागला.
        “आवं, नीट जीव तर द्या की पोराला. ही काय रीत झाली का? जावा, बसा जावा सोप्यात. जेव रं माझ्या सोन्या.”
        “बायलीचा सोन्या तुझा, शाळा बुडवून दुपारपासनं चेंडू खेळत बसला हुता म्हारतीच्या देवळापुढं. तीबी मिशा फुटायला लागलेल्या पोरात. शिकायच्या नावानं बोंब झालीया. पोरगं वाया गेलं म्हंजी मला बोलू नगस.” असे रागातच म्हणून तो बाहेर निघून गेला. how to bunk a school, how to bunk a class
        “रामा, आरं शाळा शिकली पाहजे रं. शाळा सुटल्यावर खेळ की कितीबी.”
        “आयं, दुपारपासनं मी त्यांना औटच झालू न्हाय म्हणून शाळा बुडाली.”
        “आरं पण शाळा का म्हणून बुडवायची बाळा? शिकून मोठं बनायचं हाय तुला. “
       “आयं, म्या मोठा झाल्यावर चेंडुलकर हुनार हाय.”
        तो असं म्हणल्यावर त्याची आई कसलातरी विचार करू लागली आणि परत म्हणाली, “चेंडू खेळल्यावर चेंडुलकर हुतं का रं राम्या?”
        असा हा पाटलाचा रामा अगदी लहानपणापासूनच सचिनचा फॅन होता. कुलकर्ण्यांच्या सदाने एकदा पेपर आणून त्याला सचिनच्या नावासहित त्याचा फोटोपण दाखवला होता. कुलकर्ण्यांच्याच घरी जेव्हा गावातील पहिला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही black and white television आणला होता, तेव्हा पहिल्यांदा रामाने सचिनला टीव्हीवर पाहिला होता.

         साक्षात हनुमंताला प्रभू रामचंद्राचे दर्शन घडावे असा प्रसंग घडला होता, असे सदा सांगत होता. कारण ह्या पठ्ठयाने सदाच्या घरात टीव्हीवर सचिनला sachin tendulkar batting पाहताच तिथेच लोटांगण घातले होते.
        चिंध्या गुंडाळून बनवलेला चेंडू रानातल्या लिंबाच्या झाडाला  बांधून रामाने तासनतास सचिनचे सगळे ड्राईव्ह शिकून घेतले होते. वयाने लहान असूनही गावातील मोठी पोरे त्याला गावोगावी भरणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यांना खेळायला घेऊन जात होती. आसपासच्या पंचक्रोशीत तो चेंडुलकर ‘  या विशेष नावाने प्रसिद्ध झाला होता. २००३ सालची फायनल 2003 worldcup final हरल्यावर महाशय दोन दिवस उपाशी होते.

         त्या दोन दिवसाच्या स्वयंघोषित उपवासानंतर त्यांना काहीतरी साक्षात्कार झाला होता आणि तेव्हापासून त्यांच्या देव्हाऱ्यात अगदी गणपतीला खेटूनच सचिनची पण स्थापना झाली होती. बिचारी त्याची आईपण त्याच्या हातातील बॅट आणि डोक्यावरील हेल्मेट पाहून त्याला ‘असेल मारुतीरायासारखा एखादा देव’ म्हणून अगदी नित्यनियमाने पूजाअर्चा करत होती.
        आता तो कळता झाला होता. त्यामुळे पात्रता फेरीतच टीम इंडिया team india बाहेर पडली, तरी तो रडला नाही. तो खेळतच राहिला. आता त्यालाही भारतीय संघात खेळण्याची इच्छा होत होती. कधी कधी तर त्याला तो नॉन स्ट्रायकिंग एन्डला non striking end उभा राहून स्ट्राईकला असणाऱ्या सचिनला पाहत असल्याची स्वप्ने पडत होती. मग सचिन चेंडू पटकवायचा आणि धाव घ्यायला धावायचा आणि रामा आपला त्याचे निर्गुण रूप पाहण्यात दंग. मग शेवटी बापाचा खोऱ्याचा, उलट्या दांड्याचा, दणका पाठीत बसला की फुटलेले दार तुंबायला तोही धाव घ्यायचाच!
        एके दिवशी औताला जुंपलेला बैल पाटलाला घावता घावेना. बैलामागे पळून पळून पाटलाच्या तोंडाला अगदी फेस आला होता. तेव्हा रागातच त्याने दिवाळीच्या वेळी भरवलेल्या सामन्याच्या मैदानात येऊन अक्ख्या पंचक्रोशीतल्या प्रेक्षकांसमोर चाबकाने रामाची पार धुलाई केली. चेंडुलकरची बॅटिंग पाहायला आलेले लोक त्याची धुलाईच पाहून गेले!
        त्या दिवसापासून रामाने बॅटला स्पर्शदेखील केला नाही. बॅटच्या जागी हातात खोऱ्या-कुदळ घेतले, हेल्मेटच्या जागी डोक्यावर मुंडासे घातले आणि सलग एक आठवडाभर आपल्या एका बैलाबरोबर स्वतःला नांगराला जुंपून त्याने अख्ख रान नांगरून काढले.

         भारताने जेव्हा २००७ सालचा टी -२० विश्वचषक t20 world cup 2021 जिंकला होता, तेव्हा रामाने आपल्या शेतातून पन्नास पोती भरून ज्वारी आपल्या अंगणात आणून टाकली होती.
        इकडे सचिन विक्रमावर विक्रमांचे डोंगर रचत होता तर रामाही इकडे आपल्या अंगणात धान्यांच्या राशीच्या राशी लावत होता. master blaster sachin tendulkar

        जेव्हा २०११ च्या त्या रात्री सचिन जिंकलेला विश्वचषक उंचावत होता, त्याच रात्री हा चेंडुलकरही जिल्ह्याचा मानाचा असा बळीराजा baliraja पुरस्कार उंचावत होता. त्या दिवशी त्याचं क्रिकेट संपलं होतं खरं; पण त्याच्यातील खेळाडू अजूनही तसाच होता. त्याच्या मैदानातला तो तेंडुलकर झाला होता. तिकडे वानखेडे स्टेडियम wankhede stadium mumbai आणि इकडे हे सभागृह टाळ्यांच्या कडकडाटांनी दुमदुमून निघाले होते!
        आणि त्याची आई समोरच्या रांगेत बसून पाणावलेल्या डोळ्यांनी तिचा रामा ‘चेंडुलकर ‘  झाल्याचे पाहत होती!