• Pune, Maharashtra
कथा
गंडी अण्णा:भाग १

गंडी अण्णा:भाग १

 

      दिवस अगदी डोक्यावर आला होता. ऊन नुसतं रखरखत होतं. पावसाळा अगदी तोंडावर होता; पण आभाळात मात्र ढगांचा मागमूसही नव्हता. आभाळाएवढ्या उंचीच्या, शे-दीडशे वर्षांच्या जुनाट चिंचेच्या झाडांमधून वाहणारा वारा रों रों आवाज करत होता. अशाच एका भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाला लागून असलेल्या विहिरीच्या मोटारीचा बुंSSग असा आवाज कानी पडत होता आणि विहिरीवरच असलेल्या चंबूरमधून पडणाऱ्या पाण्याचाही मंजुळ आवाज सतत कानावर येत होता. मधूनच होल्याच्या गाण्याचा आवाज कानी पडत होता. कसलीतरी चाहूल लागताच भित्रा तित्तर चिलारीच्या झुडपातून फर्र्कन उडून जात होता. अचानक दंडातील पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज झाला आणि किडे-खरपुडे खायला जमलेले पांढरेशुभ्र बगळे फडफड उडाले.
          एक अस्सल माणदेशी शिवी हासडून, आपल्या हाताने दंडाच्या ढुंब्याचा आधार घेत  गंडी अण्णा चिखलाने माखलेल्या अंगाने लटपटतच उठला आणि दोन्ही हातात चिखल घेत फुटलेले दार तुंबू लागला; पण सकाळी दाराला येताना छोट्याच्या पानपट्टीवर घेतलेली वीसची सरमाडी ऊन चढेल तशी चढली होती, त्यामुळे त्याला धड उभा पण राहता येत नव्हते. शेवटी त्याने उठत-आपटत, चिखलाने माखत कसेबसे दार तुंबलेच!
          येळवाच्या दांड्यांसारखे वाळून गेलेले आणि तासले तरी मांस निघेल की नाही अशी शंका येणारे पाय, कमरेला नाडीची घट्ट गाठ दिलेली व मांड्यांपर्यंत दुमडलेली मळकट अशी ढगळी विजार, कमरेवर एक सैलसर असा काळा करदोडा आणि त्याला लोंबणाऱ्या दोन किल्ल्या. करदोडा इतका सैल की अजून एखादी किल्ली त्याला अडकवली असती तर कोणत्याही क्षणी तो ढुंगणावरून खाली घसरला असता. असा हा गंडी अण्णा इतकं ऊन असूनही आपला सदरा चिंचेच्या भल्यामोठ्या बुंद्यावर ठेवून देऊन त्यावर आपली कातडी चप्पल ठेवून एखाद्या काडीपैलवानागत रानात दारे धरत होता. सोबतीला असलेले बगळे पाहून गंडी अण्णा जणू गोऱ्या साहेबांचे संचालन करीत असल्याचं भासत होतं.!
          दार तुंबून, डोक्यावरची टोपी दादा कोंडके स्टाईलने आडवी करत गंडी अण्णा कमरेवर हात ठेवून चंबूरकडे पाहत उभा होता. त्याच्या उघड्या अंगाच्या नुसत्या बरगड्या दिसत होत्या, दोडक्यासारखे दंड आणि छातीवर असलेल्या काळ्या-पांढऱ्या केसांमध्ये अडकून उन्हाने वाळून गेलेला चिखल. हे दृश्य जणू एखाद्या बुजगावण्यागत वाटत होते. सूर्य अगदी डोक्यावर आला आहे आणि अजून लाईट कशी काय जाईना असा विचार करत तो एकदा चंबूरकडे पाही तर एकदा वर सूर्याकडे पाही. वरती सूर्याकडे पाहताना त्याच्या दाढीचे पांढरे खुंट त्या सूर्यप्रकाशात प्रकाशित व्हायचे.
           “च्यायला आज बोर्ड काय दिवसाच पेयला बसलं का काय? फुकणीचं लाईट घालविणात आज.” गंडी अण्णा वैतागून म्हणाला व दंडातूनच डुबुक डुबुक आवाज करत चंबूरकडे चालत आला. डोळे मिचकावत तो चंबूरकडे पाहू लागला आणि पाणी प्यायच्या इराद्याने तो चंबूरवर हात ठेवून पुढे झुकला तसा तोल जाऊन तो परत पाण्यात पडला.
           “गाबड्या, तू काय माझ्या आधीचा हायस का?” असे म्हणत तो चंबूरला धरून उठला आणि पाण्यातच गुडघे टेकून घटाघट पाणी पिऊ लागला. पाच-सहा घोट पाणी पिऊन झाले नसेल तोच लाईट गेली. विहिरीतील मोटारीचा आवाज एकदम बंद झाला आणि गंडी अण्णाची तहान अर्धवटच राहिली. तसाही पाण्यागत दारू पिणारा तो!

           पुन्हा एक माणदेशी शिवी हासडून त्याने चंबुरच्या बाजूला असलेल्या काळ्या दगडावर बुड टेकवले आणि चंबुर खालच्या पाण्याने तो आपले चिखलाने माखलेले हातपाय धुवू लागला. शेवटी दोन ओंजळी पाणी तोंडावर मारून, तोंडावरचं पाणी पुसत तो उठला आणि चप्पल बाजूला ठेवून चिंचेच्या बुंध्यावर ठेवलेला सदरा त्याने अंगात घातला आणि चप्पल पायात घालून पाण्याने ओली झालेली टोपी पिळून ती डोक्यावर घालून, ओल्या विजारीने तो गावाच्या सडकेला लागला. पाण्यात पडल्यामुळे आता त्याची दारू बऱ्यापैकी उतरली होती.
           साडेबारा वाजता तो आणि राम अण्णा त्यांच्या एम.८० वरून लोटेवडीच्या म्हसोबावर राम अण्णाच्या पाहुण्याची बोकडाची जत्रा खायला जाणार होते. राम अण्णा देवळापुढे गाडी घेऊन यायच्या आधी त्याला गावात पोहचून छोट्याच्या पानपट्टीवर जाऊन दहाची सरमाडी घ्यायची होती आणि म्हणूनच तो भराभर पाऊले टाकीत निघाला होता. त्याच्या ओल्या विजारीतून टपाटपा पाणी टिपकत होते.
           गाव जवळ येताच गंडी अण्णाने दुमडलेली विजार खाली सोडून दिली आणि थेट छोट्याच्या पानपट्टी समोर उभा राहुन छोट्याला म्हणाला, “वत रं दहाची.”
           “आवं अण्णा, सकाळी विसची पेलता की. दुपारपर्यंत उतरली बी?”
           “अन .. नाद हाय का अण्णाचा? तू वत आधी दहाची. मग हू दी खर्च.”
           छोट्याने ग्लासमध्ये दारू ओतली आणि आतूनच ग्लास गंडी अण्णासमोर धरला. तेवढ्यात त्याची नजर अण्णाच्या विजारीवर पडली आणि तो एकदम ओरडला, “अण्णा, तुमचा तर नादच न्हाय राव. मुतोस्तोवर दारू पिताय तुम्ही तर.”
           तेवढ्यात गंडी अण्णाचा पोरगा गण्या बापाचा आवाज ऐकून देवळातून चलसा खेळता खेळता तिथे येऊन उभा राहिला. गंडी अण्णाने दारूचा ग्लास तोंडाला लावला आणि डोळे झाकून त्याने ग्लासातील दारू पिऊन तो ग्लास रिकामा करून छोट्यासमोर आपटला आणि म्हणाला, “गैबान्या, मी दारू पिऊन मुतंल नायतर कायपण करंल, तू आपला गल्ला सांभाळ.”
           “अण्णा मला गोळ्या.” गण्या म्हणाला.
           “गाबड्या, कधीबी गोळ्या खायला तुझा काय बाप काय जहागीरदार हाय वी? पळ हितनं.”
           “अण्णा. तुमी बी कधी बी दारू पिताय की.”
           “मी हाय जहागीरदार म्हणून पितूय. मग हू दी खर्च.”
           “मग गोळ्या पण द्या की अण्णा.”
           इतक्यात राम अण्णाची एम.८० चावडीकडून आवाज करत तिथे आली. गाडी उभा करून एक पाय धोतरातून बाहेर काढून खाली टेकवत राम अण्णा म्हणाले, “गंडी अण्णा, उरकलंस का?”
           “उरकलंय उरकलंय.” असे म्हणून तो छोट्याकडे पाहत म्हणाला, “दोन गोळ्या दी रं ह्येला.”
           छोट्याने बरणीतल्या दोन गोळ्या गण्याच्या हातात ठेवल्या आणि म्हणाला, “अकरा रुपयं झालं अण्णा.”
           “कसलं अकरा रुपयं? गप्प बसतू का?” असे म्हणत गंडी अण्णा गाडीकडे आला. गण्याही त्याच्या मागोमाग चालत आला.
           गंडी अण्णा राम अण्णाच्या मागे पाय टाकून गाडीवर बसला तसे गण्याने त्याला विचारले, “अण्णा कुठं चाललाय?”
          “म्हसुबाला चाललुय मटण खायाला.”
          “अण्णा, मला पण मटान.”
          “गाबड्या, आता गोळ्या दिल्या की तुला. बस की गप्प. चला वं राम अण्णा.”
          “अण्णा, वहीत मांडून ठिवतू.” छोट्याने टपरीतूनच आवाज दिला.
          “धांडुर वड्यात कुठल्या पोरीची सायकल अडवली हुती ती सांगू का रं तुझ्या बापाला? मग हू दी खर्च.” गंडी अण्णा जोरात बोलला तशा चिंचेच्या झाडाखाली पत्त्या खेळणाऱ्यांच्या नजरा छोट्याकडे वळल्या.
          “अण्णा, जावा तुमी म्हसुबाला. मी काय बी नाय मांडत वहीत.”
          राम अण्णाने गाडीची किक मारली आणि गाडी म्हसोबाच्या दिशेने सोडली.
          गाडी नदीतून वर चढते न चढते तोच राम अण्णा म्हणाले, ” गंडी अण्णा…”
          “बोला की राम अण्णा.”
          “लगा इतकी बी दारू पेयची नाय रं.”
          “का वं अण्णा, काय झालं ?”
          “माझं धोतार वलं झालंय अन तुला लगा इजारीत मुतल्याचं बी भान नाय.”
          “आयला, चंबूर खाली पडल्यालू तवा इजार वली झाल्याय. काय अण्णा तुमी बी.”
          “आरं, मी थूडी बगाय आलतू तू कुठं पडलाय ती.”
          “आयला, उतरू का मग आता गाडीवरनं? तुमाला तर काय इस्वासच लागंना झालाय.”
     
  [पुढे चालू राहील.. ]
       
       

3 thoughts on “गंडी अण्णा:भाग १

Leave a Reply

Your email address will not be published.